लॉकडाऊन डायरी #40
लॉकडाऊन डायरी #40
प्रिय डायरी,
आज चाळिसावा दिवस. बघता बघता चाळीस दिवस झाले. परिस्थितीमध्ये फारसा बदल नाहीच. पण आजार होऊन मरणाऱ्यांपेक्षा भीतीने मरणाऱ्यांची संख्या जास्त असते, असे म्हणतात. काही अंशी खरंही आहे ते. जग पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी कालावधी तर लागेलच. शेवटी जीव महत्त्वाचा. जीवन आहे तर सर्व आहे; त्यामुळे विनाकारण घाई करून तर काही उपयोग नाहीच.
सकाळी पोहे आणि चहा खाऊन मन तृप्त झालं. आज रविवार. एरवी ह्या दिवसाची किती वाट पाहिली जाते. पण आता प्रत्येक वार सुट्टीचा आहे! असंही काही होईल याची तर कल्पना कोणी केली नव्हती; परंतु असं अनुभवणारे आपण काही पृथ्वी वरील पहिलेच नाहीत, हेही आपण जाणतो. यापूर्वीही अनेक रोग येऊन गेले, युद्धे झाली; पण मानवजात वाचली आणि जगली. आपल्यालाही अशाच धीराने वागायचं आहे.
दुपारी अळूच्या वड्या खाऊन मस्त पोटभर जेवण झालं. आणि मग त्यानंतर खरबूज. मोठठं, गोड, रसदार खरबूज खाऊन थंड थंड वाटलं. मग थोडीशी झोप.
चहा पिऊन मांजरांसोबत थोडं खेळणं झालं. नि मग व्यायाम केला. टीव्ही वर सिनेमा पाहता पाहता सर्वांचं रात्रीच जेवण झालं. आता शतपावली नि मग झोपायची तयारी. शुभ रात्री, माझ्या प्रिय डायरी!