जिद्द....!
जिद्द....!


मी सातवी इयत्तेत शिकत होतो आणि नेहमी प्रमाणे हेडमस्तरांनी रद्दी व्यवस्थित गोळा करायला लावली. मला आता तारीख आठवत नाही पण रविवार होता. मी माझा भाऊ उदय आणि एकटा मित्र सुरेश तिघे मिळून रद्दी व्यवस्थित गोळा करत होतो. रद्दी गोळा करत करत अधून मधून एखादं सदर पण न्याहळत होतो. इतक्यात उदयने माझे नाव पुढारी पेपर मध्ये आल्याचे दाखवले. मला आश्चर्य वाटले. मी पुन्हा पुन्हा बातमी वाचली.
तो सातवी स्कॉलरशीपचा निकाल होता. माझा गडहिंग्लज केंद्रात पहिला नंबर आला होता आणि सुरेशचा दुसरा व तिसरा मुलगा दुंडगे गावचा. आनंद झाला. माझा नंबर येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं, त्यामुळे निकाल पाहण्याचा खटाटोप कोणीच केला नव्हता, पण खरं सांगतो आत कोठेतरी मला खात्री त्या वयात होती आणि त्याला कारण ही तसच होत. आपण दुर्लक्षित झालो की आतून इर्षेची आग धग धगत असते आणि ती सुप्त होती इतकं खर.
आम्ही स्कॉलरशिपची परीक्षा देऊन बाहेर पडलो आणि विजय हवालदार आमचे वर्ग शिक्षक होते त्यांना मी म्हणालो माझा नंबर पहिला येणार, मित्र मंडळी हसली,काहींनी तर टर उडवली तेव्हा मन खाल्लं.
पण निकाल हाती पडला आणि माझं पहिलं ध्येय सफल झाल.
एकदिवस सकाळी सकाळी हेडमास्तर आले आणि सात वाजता 500 रुपयांचा चेक देऊन 'ही तुझी स्कॉलरशिप घे म्हणाले,! खूप आनंद झाला. माझी पहिली कमाई आणि शेवटची! पुढे स्कॉलरशिप आलीच नाही.तो काळच तसा होता. वडीलधाऱ्याना विचारायचं धाडस अंगी नसायचं.
आठवीत दुंडगेकर सर पी ई आणि ड्रॉईंग शिकवायचे. त्यांनी पोपट काढायला सांगितलं, मी ९ आकड्यावर आधारित फांदीवर बसलेला पोपट काढला.सरांना आवडला आणि त्यांनी आर्किटेक्ट होण्याचा सल्ला दिला.पहिल्यांदा हा शब्द माझ्या कानावर पडला आणि ध्येय निश्चित झाले.
नंतर बारावी झाली, परीक्षा पण मजेत गेली. पासींगच खर गुपित मला तेव्हा परीक्षा हॉल मध्ये उमजल आणि जो जिता वो सिकंदर हे पक्क मनात रुजलं.गणिताचा पेपर खूप कठीण,पहिली बॅच ,सर्वांना घाम फुटला.१२०मुलांचा वर्ग होता,मी शक्कल लढवली आणि पहिली पुरवणी उभे राहून मागितली. सर्वांच्या नजरा माझ्याकडे वळल्या,आश्चर्य वाटले आणि तिथेच मी किल्ला सर केला.एका पाठोपाठ एक पुरवण्या जोडल्या आणि अख्या वर्गाचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याने सहज पास झालो.आज खरच वाईट वाटत.भले भले रथी महारथी वर्गात होते ,पार सगळे झोपले.
बारावी नंतर आर्किटेक्चर कॉलेजला प्रवेशासाठी धडपडण चालू झाल आणि डिप्लोमाला मला पुण्यात अभिनव महाविद्यालयात प्रवेश मिळाला.शिक्षण चालू होण्यापूर्वी कोल्हापूरातून जाताना एक प्रसंग घडला ज्याने मनात ईर्षा निर्माण झाली आणि ती इतकी रुजली की शिक्षण पूर्ण होई पर्यंत तशीच राहिली.
माझा चुलत भाऊ म्हणाला 'एवढी धडपड करून शेवटी डिप्लोमाच ना?मनाला लागले,कारण सगळे डिग्री होल्डर आणि मी एकटाच डिप्लोमा घेणारा.सहज बाहेर पडता पडता माझ्या तोंडून वाक्य गेले,पुण्यात जातोय ,डिग्री घेतल्या शिवाय येणार नाही!
झालं पुण्याचं जीवन सुरू झालं.आमचं कॉलेज जरा जोशी अभ्यंकर खटल्यांमुळे बदनाम होत त्यामुळे घरातूनच माझ्या शिक्षणाला विरोध होता.त्यात भरीस भर डिग्रीसाठी तिसऱ्या महिन्यापासून संप पुकारला आणि आगीत तेल ओतण्याच्यावर माझी अवस्था झाली. वर्ष सगळे सत्कारणी लागले. कॉलेजला डिग्री कोर्स सुरू झाला. श्री.नाना माळवदकर सरांच्यामुळे मला डिग्रीला प्रवेश मिळाला. एक एक वर्ष पार पडलं आणि शिक्षणाचा गुऱ्हाळ मध्येच बंद पडला आणि गाडी अडकली.ना घर का ना घाट का अशी अवस्था. शेवटी कडू गोड अनुभव घेत शून्यावर मार्कलिस्ट येऊन ठेपल.पितृ बळ,बंधू बळ,गुरू बळ सारे पाप ग्रहांच्या राशीत फिट बसले आणि माझं पार चिप्पाड झालं.युनिव्हर्सिटीत केस दाखल केली,शून्य मार्कांचा छडा लावला, आणि परत पुन्हा गाडी मार्गस्थ झाली.प्राचार्य व्ही. आर.सरदेसाई सरांचे गुरुबळ लाभले आणि महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्तीत पणे पूर्ण करून बाहेर पडलो.ही गोष्ट १९८९सालातली,त्यावेळी फिजिक्स चे व्ही जी भिडे कलगुरु होते.त्यांच्या कडून डिग्रीचे प्रमाण पत्र मिळाले आणि जीवनातला महत्त्वाचा टप्पा पार पडला.सर्टिफिकेट पाहून डोळ्यांचे पारणे फिटले,कष्टाचे चीज झाले.कासव गतीने असेना पण मी म्हंटल्या प्रमाणे डिग्री चे सर्टिफिकेट घेऊनच पुणे सोडले..ध्येय सिद्धीचे, ध्येय पूर्तीचे मानसिक समाधान पदरात पडले.आजही मला माझ्या डिग्रीचे कौतुक वाटते आणि अधून मधून आठवणीने उर भरुन येतो आणि आपोआप डोळ्यात आनंदाश्रू साठतात..!!
म्हणून अनुभवाने म्हणावे वाटते
संकल्प असा असावा
की त्याला विकल्प असू नये...
आणि
श्रद्धा अशी असावी की
तिला पर्याय असू नये ....!!!