नासा येवतीकर

Drama

3  

नासा येवतीकर

Drama

जिद्द

जिद्द

4 mins
581


प्रकाश हा अभ्यासू, कष्टाळू आणि जिद्दी तरुण. जीवनात त्याने अनेक कष्ट, यातना आणि संकटांना तोंड दिले पण हार पत्करली नाही. तो लहान असतांनाच त्याचे वडील त्याला सोडून देवाघरी गेले. त्यावेळी प्रकाशला काही कळत देखील नव्हते. छोट्याशा गावात तो आईसोबत राहत होता. शेती तर नव्हतीच होतं एक घर ते ही झोपडीच. आई दुसऱ्याच्या शेतीत मोलमजुरी करून कसेबसे दिवस काढत असे. प्रकाश शाळेला जाऊ लागला, त्याची हुशारी आणि कष्टाळूवृत्ती शाळेच्या अभ्यासात दिसून येऊ लागली. एकेक वर्ष संपत जात होते. वर्ग वाढत होते तसे त्याच्या समोर अनेक संकटे उभे राहू लागले. गावात सातवी पर्यंतची शाळा होती तोपर्यंत शिक्षण घेणे सोपे गेले मात्र आठव्या वर्गाचे शिक्षण घेण्यासाठी त्याला गावापासून दूर जाणे आवश्यक होते. पाच किमी दूरच्या शाळेत त्याला चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. सायकल विकत घेण्याइतके त्याच्याजवळ पैसे देखील नव्हते. तरी ही तो रोज न चुकता शाळेला जाऊ लागला. रोज पाच किमी जाणे आणि येणे असे दहा किमी तो चालायचा. प्रकाशला आता काही गोष्टीची जाणीव देखील होऊ लागली. आई ज्या शेतात कामाला जाते तेथे सुट्टीच्या दिवशी तो ही जाऊ लागला. त्यामुळे चार पैसे जास्त मिळू लागले. वही, पेन आणि पुस्तकासाठी आईला त्रास द्यायचा नाही,


आपला पैसा आपण कमवायचे आणि शाळा शिकायचं हे त्याने ठरवलं. त्याप्रमाणे तो दहावी देखील पास झाला. पण त्याला चांगले मार्क मिळाले नाही. तो दहावी पास झाला यातच तो आनंद मानत होता. आईला देखील खूप आनंद झाला. पुढील शिक्षणासाठी त्याला वीस किमी दूर तालुक्याच्या ठिकाणी जायचे होते मात्र समोर अनेक समस्या तोंड आ वासून होते. आई म्हणते बास झालं शिक्षण आता काही तरी कामधंदा बघ आणि कामाला लाग. पण प्रकाशला पुढे शिकायचं होतं. काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. शेवटी त्याने शिकण्याचा मनाशी पक्का निर्धार केला आणि तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाला. त्याच्या सोबत एक बॅग होती ज्याच्यात काही कपडे आणि आईने बांधून दिलेली शिदोरी होती. सुट्टीच्या काळात शेतात काम केल्यावर मिळालेली मजुरी म्हणून पन्नास शंभर रुपये होते. सकाळी सकाळी फाट्यावर गेला, काही वेळात बस आली. तो बस मध्ये बसला आणि शहराकडे निघाला. ते शहर काही नवीन नव्हते बऱ्याच वेळेला तो आई सोबत खरेदी करण्यासाठी येथे आला होता. तेथल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं. कॉलेजचेच हॉस्टेल होते आणि महिना तीस रुपये असा त्याचे भाडे होते जे की त्याला परवडत होतं. त्याने लगेच हॉस्टेलमध्ये एक कॉट मिळवलं आणि त्याचे शिक्षण सुरू झालं. कॉलेज संपल्यावर काही तरी करायला हवं म्हणून तो सायंकाळच्या वेळी गावात फेरफटका मारायला निघाला. त्याला काही काम हवे होते मात्र असे पार्टटाइम काम कोण देणार ? कोणी ही होकार देत नव्हते. शेवटी एका टाइप रायटरच्या दुकानात त्याला महिना वीस रुपये च्या बदल्यात नोकरी मिळाली. त्याचे तिथे काही जास्त काम नव्हते.


टायपिंग करण्यासाठी आलेल्या मुलांची नोंद करणे आणि त्यांची कागद त्याचा फाईलला लावणे असे सोपे काम मिळाले. कॉलेज संपल्यावर तो रात्री नऊ वाजेपर्यंत तेथे थांबायचा आणि होस्टेलवर आल्यावर रात्री बारा एक पर्यंत अभ्यास करायचा. आईला काळजी नको म्हणून गावी गेल्यावर तो सुखात आणि आनंदात आहे असे सांगितले. अकरावी ते पदवी पर्यंतचे शिक्षण त्याने असेच पूर्ण केले. प्रकाश हुशार असल्यामुळे सगळ्या गोष्टी तो पटकन आत्मसात करत होता. ज्याठिकाणी तो पार्टटाइम काम करत होता त्याच ठिकाणी तो नोकरी करू लागला. त्याने आपली टायपिंगची परीक्षा देखील पास झाला होता. शहरातील अनेक टायपिंगची कामे त्याला मिळू लागली त्यामुळे त्याच्या हातात काही पैसा देखील येऊ लागला होता. त्या दुकानात राहून त्याची शहरात चांगली ओळख ही निर्माण झाली. स्वतःचे एक दुकान असावे म्हणून तो प्रयत्न करू लागला. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी शासनाचे अनेक योजना असतात असे तो ऐकून होता म्हणून त्याने अनेक ठिकाणी भेटी दिल्या मात्र सर्व प्रयत्न विफल ठरले. तो यामुळे खूपच नाराज झाला होता. त्याचे हॉस्टेल सुटले होते आणि शहरात एका भाड्याच्या खोलीत तो राहू लागला. त्याचे खायचे वांदे होऊ लागले. कमावलेला सारे पैसे यातच खर्च होऊ लागले. पुढे काय करावं ? हे त्याला सुचत नव्हतं. पुढे येईल ते काम करत होता आणि चार पैसे मिळवीत होता. आईला आता शेतातले काम होत नव्हते म्हणून तो आईला आपल्या सोबत शहरात आणला. आई वृद्धावस्थेकडे झुकलेली, तिचा दवाखानयाचा खर्च संकटात भर टाकत होती.


पैसे कमविण्यासाठी त्याने अजून जिद्द सोडली नव्हती. त्याला चांगली टक्केवारी नव्हती म्हणून त्याने कधी सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नच केला नाही. मात्र त्याच्या एका मित्राने त्याला हायकोर्टात क्लार्कच्या भरपूर जागा निघाले आहेत आणि यात तुला यश मिळू शकते असा सल्ला दिला. वशिलेबाजी आणि पैसा याशिवाय नोकरी मिळत नाही आणि ते दोन्ही गोष्टीमाझ्याजवळ नाहीत असे तो मित्राला म्हणाला. पण मित्राने जबरदस्तीने त्याला अर्ज करायला लावला. काही दिवसांनी त्याची परीक्षा देखील झाली. दिलेली परीक्षा तो विसरून ही गेला कारण त्याला माहीत होतं की यात आपण यशस्वी होणार नाही. पण इथे मात्र त्याचं नशीब फळफलं त्याला हायकोर्टात क्लार्कच्या पदाची नोकरीचे पत्र आले आणि तो आनंदात नाचू लागला. त्या मित्राला त्याने सर्वप्रथम धन्यवाद दिले ज्याने याचा अर्ज भरला होता. आईच्या कष्टाचे आज खरे चीज झाले असे त्या माऊलीला वाटले. त्याची मेहनत, जिद्द आणि चिकाटी वृत्ती कामाला आली ज्यामुळे तो जीवनात यशस्वी झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama