The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Nagesh S Shewalkar

Tragedy Crime

3  

Nagesh S Shewalkar

Tragedy Crime

झुंज

झुंज

10 mins
1.7K


                       

   रात्रीचा काळाकुट्ट अंधार सर्वत्र पसरला होता. पोर्णिमेची रात्र असूनही चंद्र काय साध्या चांदणीचेही दर्शन होत नव्हते. बाहेर रस्त्यावर उतरले तर हाताच्या अंतरावरील काही दिसत नव्हते. निसर्गाची किमया कशी वेगळीच असते. पोर्णिमेच्या रात्री....भर हिवाळ्यात ढगांनी गर्दी केली होती. एका ढगाच्या आडून दुसऱ्या ढगाकडे जाताना चंद्राचे दर्शन होत होते पण ते क्षणभंगुर! कारण चंद्र पुन्हा दुसऱ्या ढगामागे जाऊन लपला की, ढगांच्या काळ्याभोर सावल्या पृथ्वीला कवेत घेत होत्या. पाऊस आता पडतो की, थोड्या वेळाने असे साशंकतेचे वातावरण निर्माण झाले होते. चिंतेचे कारण म्हणजे निसर्गाच्या अशा वातावरणापेक्षाही एक वेगळे दाट भीतीचे, दहशतीचे वातावरण राज्यात पसरले होते. गावोगावी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. काहीही घडले तरी उद्भवलेल्या परिस्थितीला काबूत आणण्यासाठी पोलीस सक्षम होते. केव्हा काय होईल हे सांगता येत नव्हते. जनतेतही एक औत्सुक्य, एक कुतूहल तर होतेच परंतु सोबत परस्परविरोधी चीड, राग, संताप, त्वेष अशा भावना होत्या.

   कुटाळवाडी म्हणजे जेमतेम सहा हजार लोकसंख्या असलेले गाव. या गावातही भयाण अशी शांतता पसरली होती. घरातील ओसरीवर बसलेल्या माणसाला पार तळघरात ताटाला ताट लागल्याचा आवाज येताच तो माणूस दचकून काय घडले अशा प्रश्नार्थक नजरेने आजूबाजूला बघत असे. गावात एक उच्च माध्यमिक शाळा होती. या शाळेत पंचक्रोशीतील मुले शिकायला येत असत. गावात ग्रामपंचायत, सरकारी आणि काही खाजगी दवाखाने होते.गावात साठ टक्क्यापेक्षा अधिक आदिवासी समाज असल्यामुळे गावासाठी विशेष सवलतीही मिळत असत. जेमतेम दहावी उत्तीर्ण झालेले मुलही नोकरीला लागले होते. गावात मराठा, मुसलमान, बौद्ध आणि आदिवासी समाजाचे लोक रहात होते. गावात जागोजागी पाण्याचे हापसे, विद्युत खांब होते. परंतु तशा तंग वातावरणातही खांबावरचे लाइटचे गोळे जणू संपावर होते. 

   सरपंच बांडे यांच्या घरासमोर असलेल्या ग्रामपंचायतच्या कार्यालयात सरपंचासह सारे पंचायत सदस्य चिंतायुक्त चेहऱ्याने बसून होते. सरपंचाचा चेहरा अधिकच काळवंडला होता.तलाठी, ग्रामसेवकही बसून होते. समोर दूरदर्शनवर 'आमची माती, आमची माणसं' हा कार्यक्रम सुरू होता. शेतकऱ्यांशी निगडित कार्यक्रम असल्यामुळे सरपंचासह अनेक नागरिक कार्यक्रम पाहताना दररोज चर्चा करत असत परंतु त्यादिवशी प्रत्येकालाच तो कार्यक्रम कधी संपेल असेच वाटत होते. सारेच सात वाजता लागणाऱ्या बातमी पत्राची सारे आतुरतेने वाट पाहात होते. 

"काय व्हईल व्हो, सरपंच?" एका जणाने त्या भेसूर शांततेचा भंग करत विचारले.

"सरपंच, आज होणारच तसे आम्हाला आदेश आहेत."

"तर मंग सरकारचे आदेश आहेत म्हणून तर तुम्ही आणि तलाठी दोघेही तळ ठोकून आहेत. धा-धा दिस गावात तोंड न दावणारे तुम्ही सूर्य आणि चंद्र आज सांच्याला उगवले म्हणून म्हणलं ...."

"तसं आपलं गाव शांत आहे म्हणा...."

"कसं ऱ्हाते सरपंच, गाव कव्हाबी शांतच असते हो पर, तकडं मंबई म्हणा, दुसरी शेहरं पेटली की मंग आपली बी डोस्की सरकत्यात आन मंग शांत वाटणार गाव भडकून उठते."

"गावात जास्ती न्हाई, पर धा-पाच कार्टी हाईत गरम डोस्क्याची. त्यांना जरा तंबी..."

"तंबी देऊन भागायचं न्हाई. सरपंच अव्हो, माकडेच ती कव्हा या फांदीवरून त्या फांदीवर जातील पत्ताच लागणार न्हाई."

"गावात पोलीसबी हायेत तव्हा औंदा कायबी गडबड व्हणार न्हाई..." पोलीस पाटील म्हणाले.

"पर म्या म्हण्तो इझलेल्या इस्त्याला हवा देलीच कावून? "

"अव्हो, इस्तू इझलाच नव्हता, धगधगत व्हता. आपली वाडी शांत हाय म्हणून काय झाले? शेहरात मोर्चे, संप, बंद चालूच व्हते."

"आर, पर आज काय-बाय झालं तर ही पोर्र गप बसायची न्हाईत."

"न्हाई तर काय, हे सरकार आन् ही फुढारी मंडळी मत्तायसाठी काय बी करतील."

"मत्तायसाठी काय म्हणून? आमचा हक हाय त्यो. आम्ही काय भीक मागत न्हाईत हक्काचं मागतोय...."

"थांबा. थांबा. तुम्ही गराम पंचायतीचे मेंब्र आणि तुम्हीच आसं येकमेकायला पाण्यात पाह्यलं तर गावातील जन्ता आन् गरम डोस्क्याची ती पोऱ्हं काय करतील?"

"काय व्हायचं ते येकदाच व्हईल. गुमान बसणार नाही. उठसूट जो बी उठतो तो सवारच व्हयाला बघतो...."

"न्हाई तर काय मंग काय पूंजा करायची तुमची? आपले सरकारबी येडं हाय. जव्हा पाहाव त्येंनाच देती सम्द..."

"नही तो क्या, हमारी मस्जिद गिराते समय भी सरकार देखती रह गयी।....."

"आरं बाबा, जीर्ण झालेली ती मज्जीद कव्हाबी ...."

"क्यूं पडती? अभी और सौ साल बी बीत जाते..."

"हे बघा, जे झाले ते झाले. ते तिकडे झाले. होणार हाय त्ये बी तिकडच हुईल. आपल्या गावात दुश्मानकी कावून?"

"दुश्मानकी होवो अगर काय बी. पोट्टे म्हणतात आता माघार घ्यायची न्हाई. सरपंच, काय बी झालं तरी व्हणारी गोस्ट लय बेकार..."

"तुमाला बेकार लागलच की, तुमच्या इरोधात व्हतेय ना. आर, या प्रस्नासंग आमची काय म्हण्त्यात ती आसमिता..."

"बोडक्याची आलीय आसमिता. तुम्हाला खुश करताना आमची आसमिता काय झोपी जाते का?"

"आर, भांडू नका रे. इस्तू टाकणाऱ्यांना हेच तर पाहिजे ना, आपलं आपसात भांडणं.आर ही भांडण लावणारी माणसं म्हंजी ना, दोन कोंबड्यांची भांडणं लावून मंग त्यांच्याच तंगड्या भाजून त्यावर ताव मारणाऱ्या आवलादी हायेत. पर हे आपल्या आडाण्यांच्या कव्हा ध्यानात येईल?"

"आर, थांबा रं. बातम्या लागत्यात...."

'१९:२९:५९, १९:२९:६०, १९.३०......, १९:३१:५८.....'

"आर तिच्या मारी, ही बातम्या देणारी बाय झोपली की काय?"

"खरच की. दोन मिन्टं वर झाली..."

"ऐका रं...."

अपेक्षेप्रमाणे पहिलीच बातमी राज्यात पसरलेल्या दंगलीची होती. दोन जातीमध्ये प्रचंड प्रमाणात मारामारी सुरु झाली होती. शेकडो मयत झाले होते, हजारो जखमी झाले होते.

"आर, उठा. चला बिगीन. पोऱ्हं कुठी हाईत ते फा. आता झालं ते झालं. खबरदार! काही आस तस बोलायचं न्हाई. नाही तर तुम्ही कायबाय बोलून बससाल आन् मंग गाव पेटल."

जमलेले सारे उठून बाहेर आले. ढगाआडून आलेला चंद्र कसा सुंदर, मनमोही दिसत होता . तितक्यात पाऊस सुरु झाला. ते पाहून एक जण म्हणाला,

"बगा तर पाऊस म्हंजी देवानं उधळलेली फुलच हाईत की..."

"फुलं उधळली न्हाईत रे, आर देवाची आश्रू हायती ती. हे आसलं अराजक फावून देवालाबी वाईट वाटत आसणार...."

तितक्यात गावातून कुणी तरी धावत येऊन म्हणाले, "सरपंच, अवो सरपंच, बिगीन चला."

"त्ये तिकडं त्या गल्लीत पोऱ्हं घुसलीत. दिसल त्याला ठोकत सुटलीत. सरपंच, काय तरी करा न्हाई तर येक बाई का माणूस हाती लागणार न्हाई."

"आरे, चला रे. ..." असे म्हणत सारे तिकडे धावले. 

"मारा...मारा...ठेचा. सोडू नका..."

"आई ग, मेलो ग..."

"बापो रे, डोस्क फुटलं रे..."

"आरे, आम्हाला कहापायी मारता?"

"हाणारे, एक बी सुटू न्हाई..."

"पळा रे पळा. सरपंच आन् लय माण्स यायलेत...." कुणीतरी ओरडले आणि ती सारी गँग बाहेर पडली. सरपंच, पोलीसपाटील, तलाठी सारे तिथे पोहोचले. तिथे दिसलेल्या पोलिसाला सरपंच म्हणाले,

"साहेब, तुम्ही इथं काय करता? तिकडे माणसं मरायलेत आन् तुम्ही..."

"आम्हाला पुतळा सांभाळायची ड्युटी आहे. पुतळा सोडून आम्हाला कुठे जाता येणार नाही..."

"वा रं म्हणं ड्युवटी? आर तिकडे लोकायचे सौंसार मोडायलेत आन् तुम्ही हालणार बी न्हाईत? जनतेचे पुतळे उभारायची येळ यायली...." बोलत बोलत सारे त्या गल्लीत पोहोचले.

"धावा रे. लै लागलं रे.."

"मायो, आर देवा, सहन व्हत न्हाई रे..."

"पाणी...पा..णी....द्या रं...."

"आर जा, गावात. गाड्या, बैलं आणा. दवाखान्यात जावं...."

"न्हाई, काय उपेग न्हाई. दवाखान्यात या वक्ती कोण ऱ्हाते का? समदे पळाले आसतील शेहरात."

"आर, गावातल्या खाजगी डॉक्टरला तर घेऊन या..."

"गेल्तो. पर त्ये म्हणत्यात की, मारामारीची केस हाय. पोलिसांना कळवल्याशिवाय हात न्हाई लावणार आम्ही...."

जिकडेतिकडे लहान-मोठे, स्त्री-पुरुष सारे विव्हळत होते. कुणी पाय धरून, कुणी हात पसरून, कुणी कपाळावर पडलेल्या भेगेतले रक्त दाबण्याचा प्रयत्न करीत होते, कुणी डोके गच्च धरुन, कुणाचे नाक फुटलेले, कुणाची बत्तीशी बाहेर आलेली, कुणाची पाठ, कुणाची छाती, कुणाचे काही तर कुणाचे काही. सारे ओक्साबोक्शी रडत होते. तळमळत होते. अंगाची आग आग होत होती. रक्ताचा सडा पडला होता. त्यात कोण-कोणाचा काही ओळखू येत नव्हते. 

"ये, किसन्या, कुठं हायेस रे?"

"अरे, ये जास्त लागलय का रे?"

"मुडदे जावो रे तुमचे. किती मारलय रे?"

"लाइट बी गेली टायमलाच."

"आर, गेली न्हाई रे. माकडायनं मुद्दाम बंद केली आसणार."

"सरपंच, तो बगा तिकडं जाळ दिसतो.. .."

"आरं, तिकडं तर साळा हाय. म्हंजी साळा तर जळत न्हाई ना?"

"व्हय रे व्हय. साळंकडूनच जाळ येतो हाय. हाईस्कुल पेटली रे पेटली...."

विव्हळणाऱ्या, तळमळणाऱ्या जखमींना सोडून सारे शाळेकडे धावले. रस्त्याने जाताना जाळाचे लोट वरवर जात होते म्हणजे आग वाढत होती. धडधडत्या अंतःकरणाने सारे शाळेजवळ पोहोचले. तिथे असलेला एकमेव शिपाई डोक्यावर हात ठेवून शाळेकडे पाहात होता.

"कोण कोण होत रे?" सरपंचाने शिपायाला विचारले.

"मी न्हाई फायल बुवा. मी झोपायच्या तयारीत असताना वीस-पंचवीस पोरांचं टाळकं आलं मला बाहेर ओढून काढलं, दारं तोडली. समोर दिसल त्याच्यावर घासलेट ओतून पेटलेल्या काड्या फेकल्या. अंधारात काय बी दिसलं न्हाई. तितक्यात तुम्ही येत असल्याचा सुगावा लागला आन् सम्दे तिकडं पळून गेले." शिपाई सांगत असताना पेट्रोलिंग करणारी पोलीसांची गाडी आली. पाठोपाठ गावात राहणारे शाळेचे मुख्याध्यापक आणि तीन शिक्षक आले.

"इथे कुणी होते का?" फौजदाराने विचारले.

"ह्याची ड्युटी होती..." मुख्याध्यापकाने शिपायाकडे बोट दाखवून म्हटले."

"का रे, कोण कोण होते?"

"अंधारात कुणी ओळखू आले नाही."

"तू अडवले नाहीस?" पोलीसाने विचारले.

"काय होते ते समजलेच नाही. शिवाय मी एकटाच. त्यांना कसा काय अडवू शकणार?"

"ते गेल्यावर तू पाणी तर टाकायचेस ना?"

"विहीर तिकडे दूरवर आहे. तरीही मी जाणारच होतो. तेवढ्यात सरपंच साहेब आले."

कुणीतरी म्हणालं आणि जमलेल्या गावातील लोकांनी विहिरीपर्यंत रांग केली. शाळेजवळ असलेल्या वस्तीतून दहाबारा बादल्या आणून पाणी टाकायला सुरुवात झाली. परंतु जिथे आभाळच पेटलं होतं तिथे पाणी किती पुरणार आणि टाकणारे किती टाकणार?

  "हॉलो, कंट्रोल रुम...मी झिरो झिरो इलेव्हन... कुटाळवाडीची शाळा पेटवून दिली आहे. गावातही हाणामारी सुरु आहे. लवकर पोलीस फोर्स पाठवा...लवकर...क्विक...."

"साहेब, मागच्या वेळी असाच शाळेवर हल्ला झाला होता. दोनच दिवसांपूर्वी मी ठाण्यात येऊन लेखी दिले होते. पोलीस ....."

"चार ओळी लिहून दिल्या की, संपलं का सारं? पोलिसांनी तरी किती पाहावे?...."फौजदार बोलत असताना एक शिक्षक मुख्याध्यापकाना म्हणाले,

"साहेब, शाळा जळतेय म्हणजे आतले सर्वीस बुक, टि. सी. बुकही..."

"सारे आतच आहे. जळून खाक होणार."

"बाप रे! सर्वीस बुक जळाले तर पुन्हा नव्याने करावे लागतील. प्रत्येक ठिकाणी जाऊन नोंदी घ्यायच्या म्हणजे नाकीनऊ येणार. या गावची नोंद...त्या गावातील नोंद....."

तिकडे पाणी टाकणारे थकले होते. आग हळूहळू शांत होत होती. अर्ध्या तासाने पोलिसांची कुमक आली. आणि सुरु झाला नवाच अध्याय. पोलिसांजवळ संशयितांची यादी होती. त्याप्रमाणे त्यांनी धरपकड सुरू केली. घरात घुसून पोलीस लोकांना बाहेर काढून गाडीत कोंबू लागले. काठ्यांनी बदडून काढू लागले. एक आत्मिक समाधान मिळालेली ती माणसं... माणसं कुठली? कोवळी पोरेच ती. पोलिसांचा मार खात आनंदाने घोषणा देत गाडीत बसू लागले. पोरांचा म्होरक्या कुठे सापडत नव्हता. त्याचा शोध लागताच पोलिसांनी त्या घरावर थापा मारल्या.

"कोण हाय रे?" आतून आवाज आला.

"ये दार उघड रे. का तोडू?" एका शिपायाने विचारताच आतून एक तरुण बाहेर आला. शिपायाने त्याचा शर्ट धरण्याचा प्रयत्न केला असता तो म्हणाला,

"ये शिपुरड्या, आगावू बोलायचं काम न्हाई. अंगाला हात लावायचा नाही. चला. कुठं जायचं ते?" असे म्हणत एखाद्या राजाच्या थाटात तो पोलिसांच्या गाडीत बसला.

"साहेब, कोवळी पोरं हाईत ती. करू न्हाई अशी आगळीक केली हाय तव्हा..."

"सरपंच, घाबरु नका. आम्हीही माणसेच आहोत. आम्हाला का भावना नाहीत? सगळं वातावरण शांत होईपर्यंत ठेवतो आत. देतो मग सोडून..." असे आश्वासन देत फौजदार जीपमध्ये बसले....

    "पोरास्नी मारणार तर न्हाईत की?"

"पोलिसच ते. मारणार न्हाई तर काय बासुंदी पुरी खाऊ घालणार आहेत?"

"धनी, कसं समजत न्हाई तुम्हाला? कोवळी पोऱ्हं हाईत जी."

"त्याला समजू न्हाई? कशाला जावाव आगावू कामात?"

"त्याचं वय हाय का, भलंबुरं कळायला?"

"न्हाई. न्हाई. दुधपितं हाय की अजून."

"दूध पिणारं नसाल पर व्हटावरचं दूध बी सुकलं न्हाई जी."

    "सरपंच, अव्हो, काय तरी करा. दोन दिसांपासून पोरांना बजावत व्हतो. आरं जाऊ द्या रं मध्यात पडू नका म्हणून. त्ये शेहर ऱ्हायलं तिकडं त्या पायी गावात दुश्मानकी कहाला? पर ऐकत्ये कोण? म्या म्हणतो, आसं झ्येंगट काढायचं कशाला?"

"मतायसाठी. दुसरी गोष्टच न्हाई. मज्जीद पाडली आन ....."

"आर, त्येंची मतं काय बी झालं तरी मिळणार हाईत का? आपली येवढी मतं असताना ... आपून मतदार बी लयच येडे..."

"ते जाऊ द्या रं तिकडे पाहता का न्हाई? मरायलेत रे जागेवर..."

"आता रात्रभर कळ सोसा म्हणा. सकाळी बघू काय ते. राती आंधारात काय व्हणार?"

"ही दवाखान्याची माणसं कव्हा टायमाला सापडणार नाहीत. सरकारी दवाखाना म्हंजी 'आसून वळंबा, नसून खोळंबा' आशी गत हाय. फुकून टाकावा असा दवाखाना."

"हां. त्येच करा. त्येंनी साळा जाळली. तुम्ही दवाखान्याला काडी लावा. फिट्मफाट."

   एकदाचा दिवस उजाडला. परंतु घेऊन आला एक प्रलय, महाभयंकर प्रलय. गावोगावी प्रेतांचा खच. विव्हळणारी माणसे. मुसळधार पावसाने नद्या दुधडी भरून वाहावी तसे तुरुंग माणसांनी खचाखच भरले होते. पोलीस स्टेशनमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. कुठे शाळा, कुठे दवाखाने, कुठे वीज मंडळाचे कार्यालय तर कुठे काही, कुठे काही जाळले होते. अशा अनेक प्रकारचे नुकसान झाल्याच्या बातम्या रेडिओवर येत होत्या. मयताचा आकडा बातम्यागणिक वाढत होता, महापुरात पाण्याची पातळी वाढल्याप्रमाणे! मोटारी, वाहने, शैक्षणिक संस्था सारे काही बंद ठेवण्यात आले होते. रस्त्यावर कुठे चिटपाखरूही दिसत नव्हते. जिकडे तिकडे पोलिसच पोलीस! शहरे अजूनही धगधगत होती. कुठे कुठे मारामारी चालूच होती.

   उजाडल्याबरोबर सारी कुटाळवाडी शाळेकडे धावली. शाळेची आग अजून पूर्णपणे शांत झाली नव्हती. तिथे जमलेल्या शिक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली,

"साहेबांनी सर्वीस बुक घरीच नेऊन ठेवायला पाहिजे होते."

"हो ना. परिस्थितीची कल्पना होती की. पण टि. सी. बुक, प्रवेश निर्गम..."

"ते जळू द्या हो. आपल्या जाणं-येणं करणाऱ्या लोकांचे काय?"

"लागेल की रजा. "

"पण किती रजा? हे प्रकरण काही लवकर आटोक्यात येईल असे वाटत नाही. या लोकांच्या रजा तरी कुठे शिल्लक आहेत?"

"चला. आतमध्ये पाहूया तर...." एक शिक्षक म्हणाला आणि इतर शिक्षक त्याच्या पाठोपाठ निघाले. आत सारे कोळशाचे साम्राज्य होते. रेकॉर्ड, खुर्च्या, टेबले, बाके, फळे सारे अर्धवट जळाले होते. लोखंडी खुर्च्या वाकल्या होत्या. पंख्यांची पाती वाकली होती. राष्ट्रीय नेत्यांच्या फोटोंनी राम म्हटले होते. वाचनालयाची पुस्तकेही जळाली होती. नाही म्हणायला लोखंडी आलमाऱ्या तेवढ्या सुरक्षित होत्या. 

"चला. बरे झाले. काही दिवस आराम तरी मिळेल....." ते शिक्षक बोलत असताना बाहेरुन फौजदाराचा आवाज आला,

"कोण आहे आत? गुरुजी, आत कशाला गेलात? पंचनामा व्हायचा आहे..." पाठोपाठ शिक्षक बाहेर पडले. पंधरा मिनिटात पंचनामा आटोपला. तेवढ्यात मुख्याध्यापक आले.

"घ्या. हेडमास्तर, आवरा आता सारे."

"आता काय आवरायचं? उकंडाच दाखवावा लागेल."

मुख्याध्यापकांनी सारे शिक्षक सफाई कामाला जुंपले. राष्ट्रीय कार्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या शिक्षकांच्या नशिबी हेही काम होते तर ?

     होता होता एक महिन्यानंतर राज्यातील वातावरण निवळले, कारभार पूर्व पदावर आला. महिनाभर सारे व्यवहार ठप्प होते. हातावर पोट असणारांचे, दिवसभर मजुरी केल्यानंतर सायंकाळी चूल पेटणाऱ्या लोकांचे हाल तर बघवत नव्हते. बिचारे, दुःखाने पोट भरताना, आसवं तोंडी लावत होती. दंगलीनंतर पकडलेले मुलं पंधरा दिवसांनी सुटली होती. मनाविरुद्ध घटना घडली असली तरीही आम्ही बदला घेतलाच...वेळ पडल्यास पुन्हा इंगा दाखवता येईल अशा भावनेने सारे परतले होते. सारे व्यवहार हळूहळू सुरु झाले असले तरीही दुभंगलेल्या मनांचे काय? शरीरावर झालेल्या जखमा एकमेकांना पाहताच जास्तच सलत असायच्या, सुडाची भावना पेटून उठायची परंतु पोटासाठी त्या जखमा दाबून, सहन करून कामावर जावे लागे. एकमेकांना अभिवादन सुरु झाले. पाण्यात राहून का माशांशी वैर करता येते.

   सकाळची वेळ होती. शाळा भरली होती. मुख्याध्यापक त्यांच्या कार्यालयात बसून एक-एक काम हातावेगळे करत असताना आवाज आला, "सर, नमस्कार."

"नमस्कार. या. " मुख्याध्यापकांनी त्या तरुणास प्रतिसाद दिला.

"सर, मला माझी टि. सी. पाहिजे."

"नेली नाही आत्तापर्यंत?"

"नाही ना. कामच पडलं नाही."

"शाळा कधी सोडली?" मुख्याध्यापकांनी विचारले.

"झाले असतील पाच वर्षे."

"बाप रे! सारेच मुसळ केरात की. कालच्या दंगलीत सारे रेकॉर्ड जळाले की."

"सर, मला टि. सी. ची फार गरज होती हो. नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ही संधी गेली ना सर, तर मला जन्मभर मजुरी करावी लागेल हो."

"माझा नाइलाज आहे. रेकॉर्ड असते तर पाच मिनिटात दिली असती."

"सर, प्रयत्न करा ना. काही तरी मार्ग असेल ना?"

"नाही ना.काहीही मार्ग नाही. मला वाटते, शाळा जाळताना तुम्ही होता ना? "

"होय सर. माझे चुकले. कसे सांगू सर, अगोदर रॉकेल मीच टाकले आणि नंतर काडीही मीच फेकली. तेंव्हा काय माहिती होते की, मीच माझ्या जीवनाला इस्तू लावतो ते, माझं जीवन जाळतो म्हणून. आता कसे हो सर, माझ्या जीवनाचा कोळसा होईल हो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy