STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Fantasy Inspirational

3  

shubham gawade Jadhav

Fantasy Inspirational

झुंज

झुंज

4 mins
235

संध्याकाळची वेळ होती. पश्चिमेला लाल प्रकाश पडला होता.सूर्यदेव आपली कृपादृष्टी करून आता निरोप घेण्यासाठी सज्ज झाले होते. पक्षी चोचीत अन्न घेऊन घरट्याकडे परतत होते. कपिला जोरजोरात कण्हत होती. आज सकाळपासून तिनं काहीही खाल्लं नव्हतं. कपिला म्हणजे माई आणि आबांचा जीव की प्राण. माहेरहून निघताना माईच्या पाठी लागलेली कालवड (गाईचं छोटंसं पिल्लू ).जणू माई विना तिझ जीवनच अधुरं. माईच्या घरात कपिलेमुळे दूध दुबत्याची रेलचेल होती. कपिलाने आजपर्यंत एकशे बढकर एक झुंजार अशी घोरी (गाईचं वासरू )दिली होती.


             माईची लगबग सुरु होती. माई सारखी घरात जा बाहेर ये करत होती. आबा कामानिमित्त तालुक्याला गेले होते. माईचा जीव थोडा थोडा होत होता. माई खरंच नावासारखी होती.सगळ्या गावाला जीव लावणारी मायेचा सागर होती. माईची नजर आबा येणाऱ्या वाटेकडे लागलेली होती. कपिला अजूनही कण्हतच होती. एकदाची एक भली मोठी धिप्पाड आकृती गावाकडच्या रस्त्यावरून घराकडे येताना दिसली.जसजशी आकृती जवळ येऊ लागली माईचा जीव मोठा होत होता. कपिलानेही आबाला पाहताच कण्हणं थोडस कमी केलं होतं. कपिला आता कोणाला जन्म देणार तिझ्यासारख्याच सुंदर गोंडस गाईला की झुंजार जबरदस्त लढाऊ बैलाला हे बघण्यासाठी गावातली बरीच मंडळी आबाच्या घराभोवती जमली होती.


                माई आणि आबाला लग्न झाल्यापासून मुलं - बाळ नव्हतं. माई अगदी स्वतःच्या पोटच्या गोळ्यासारख त्या गाईला आणि तिझ्या वासरांना जपत होती. आबा आले तशी मंडळी आबा काय बोलणार याकडे कान टवकारून नजर फिरवली. तेवढ्यात आबा एखाद मोठं झाड वादळाने कडाडून कोसळावं तस बोलले की " येवडा डाव कपिलेन घोर द्याया पाहिजील." लगेच कपिला मोठ्यानं हंबरली आणि सगळ्यांचं लक्ष्य तिझ्याकड वेधलं गेलं. कपिलेन तिझ्यासारखंच गोंडस, धष्टपुष्ट, पांढर तक्क घोर दिल होतं. साऱ्या जमलेल्या जमावाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उमटला होता. आबांना तर इतका आनंद झाला होता की बास. माईच्या डोळ्यातून तर आनंदाचे अश्रू अगदी मोत्यासारखे टपटप जमिनीवरती लाल सुरकुतलेल्या गालावरून ओघळून पडत होते.

              सगळ्या जमलेल्या जमावाला माई साखर वाटत होती.गर्दीत कोणतरी ओरडलं "हा नक्कीच पाखऱ्यासारखं आबांचं नाव गाजवणार अन आपल्या गावाची मान ताठ ठेवणार ".पाखऱ्याचं नाव आबांच्या कानावर पडलं आणि एवढे वडाच्या झाडासारखे भक्कम आबा मटकन खाली बसले. नकळत डोळ्यातले अश्रू पांढऱ्या दाढीत विरून गेले. आबांची बोलतीच बंद झाली होती. आबांच्या डोळ्यापुढे पाखऱ्या जसाच्या तसा उभा राहिला होता. आबांना प्रसंग आठवला.

                 

               पाखऱ्या म्हणजे आबांच्या हाताखाली वाढलेला पैलवान बैल. आबांनी त्याला लहानपणापासूनच झुंजीच म्हणजे टक्कर खेळायची तालीम दिलेली होती. झुंजीगावची शान म्हणजे पाखऱ्या आणि आबा. प्रत्येक टकरीत समोरच्या बैलाला एकाच धडकेत डोळे पांढरे करायला लावणारा पण त्या दिवशी आक्रितच घडलं. एकही टक्कर न हरणारा बैल अचानक हरला आबांनी रागराग पाखऱ्याला इतकं मारलं की तो मार त्याच्या इतका जिव्हारी लागला की पाखऱ्या दुसऱ्या दिवशी उठलाच नाही. आबा आणि झुंजी गावची शान मावळली गेली.त्यानंतर झुंजी गावला झुंजार आणि जबरदस्त बैल भेटलाच नाही. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी पाखऱ्यासारखा खोंड कपिलानी दिला.


               आबांनी त्याचं नाव सरज्या ठेवलं. आणि आता रोज आबांची तालीम सुरु झाली. सरज्याला आबांनी लहानपणापासूनच झुंजीची तालीम द्यायला सुरुवात केली. सरज्या हळूहळू वाढत होता. दिवसेंदिवस तो झुंजीत तरबेज होयला लागला.झुंजी गावाची मंडळीही सरज्याच तोंडभरून कौतुक केलं. अचानक एक दिवस आबांना शेजारच्या गावच्या पाटलांच बैलांच्या टक्करीसाठी आमंत्रण आलं. आबांचं हृदय धस्स झालं पुन्हा पाखऱ्यासारखी पुनरावृत्ती तर नाही ना होणार या चिंतेनं आबा पुरते गोंधळून गेले.


        संध्याकाळ झालेली होती. हवेत गारवा पसरलेला होता आबा या कुशीवरून त्या कुशीवर होत होते. आबांचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. आबांना वाटायचं याचही पाखऱ्यासारखं झालं तर. आबा अंथरुणातून उठले बाहेर गोठ्यात आले आणि आपण एखाद्या माणसासोबत बोलाव तस बोलू लागले. लेकरा माझ्या हातून एकदा चूक झाली. मी पाखऱ्याला मारायला नको होत.माझ्याहातून माझ्या लेकराचा जीव गेला नकळत घडलं र सारं.आता आबांना हुंदका अनावर झाला.एवढं बोलून आबा पुन्हा अंथरुणात पडले बळजबरी का होईना डोळे झाकले.

            

                      सकाळ झाली तस आबांची गडबड सुरु झाली. बघता बघता सारी गावाची मंडळी जमली आणि सरज्याला सजवू लागली.आबानीही आवरलं आणि सगळे शेजारच्या गावी निघाले. गावच्या जवळ आले तस हलग्यांचे आवाज स्पष्ट कानी येत होते.नजरेला पटांगण दिसायला लागलं. शेजारच्या गावाचा मदमस्त बैल दिसत होता. तो पाहून आबांना वाटलं आपण आमंत्रण स्वीकारून लई मोठी चूक केली. ह्यो बैल आपल्या लेकराला एका धडकित मारील. आबा गडबडले.आता माघारीही जाऊ शकत नव्हते. पटांगण आता गावकर्यांनी भरू लागलं होत. हलग्या जोरजोरात उर फोडत होत्या.पाटलाच्या बैलाला आणि सरज्याला आमनेसामने उभा करण्यात आलं. आबांना आपुन दुसऱ्यांदा केलेली चूक जाणवू लागली. आबांना तिथून निघून जाऊ वाटत होत पण आबांना ते जमलंच नाही.


                        हलग्यांच्या आवाजांनी सगळा आसमंत गाजत होता. दोनी बैलं पवित्र्यात उभी होती. सरज्यान नकळत एकदा आबांकडे नजर टाकली आबानीही त्याच्या डोळ्यात पाहिलं आबांना त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती.पाटलांचा हत्तीसारखा भासणार बैल मोठमोठ्यानं श्वास सोडत होता. तो जणू सरज्याला खुन्नस देत होता. त्याचं ते पिळदार शरीर पाहून सारेच झुंजी गावाचे गावकरी घाबरले होते. सगळ्यांना वाटत होत सरज्याचा याच्यापुढे निभाव लागण कठीण आहे.इशारत झाली आबांनी घट्ट डोळे झाकले. दोन मोठे दगड एकमेकांवर आदळावेत तसा ठक करून आवाज झाला.आबांनी आणखीनच डोळे घट्ट केले.त्या भयानक आवाजानंतर हळग्यांचा आवाज पुन्हा एकदा घुमू लागला. या आवाजाने सारा आसमंत दुमदुमत होता.आबांना वाटलं सरज्या पडला पण तेवढ्यात बाणाने अचूक लक्ष्य भेदाव तस कानात शब्द घुसले वारे भले बहाद्दर... हा तर पाखऱ्याच आहे जवळ जवळ आणि आबांनी डोळे उघडले तर पाटलांचा बैल तोंडातून फेस गाळत आसमंत बघत होता. सगळीकडे गुलाल उधळत होता.सगळे झुंजी गावकरी आनंदात होते आनंदाने उड्या मारत होते पण आबांची नजर मात्र सरज्याला शोधत होती. आबांचे डोळे पाण्याने डबडबले होते.सरज्याही आबांना शोधत होता. दोघांचीही नजरानजर झाली आणि खूप वर्षांनी स्वतःच लेकरू भेटावं तसें आबा सरज्याच्या गळ्यात पडून रडत होते. त्यांना वाटत होत की जणू प्रत्येक्षात पाखऱ्याच समोरचा उभा आहे. सरज्या आणि आबा घरी आले तर माई दारात आरतीचं ताट घेऊन उभा होती.                               


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy