जेव्हा तुझ्या बटांना
जेव्हा तुझ्या बटांना
फेब्रुवारी महिना सुरू झाला की, तरुणाईला व्हॅलेंटाइन डे चे वेध लागतात. मग यात तरुणाईच नव्हे तर, पिकली पाने ही, देठ हिरवा करण्याचा प्रयत्न करतात. मग सहचारिणी बरोबर फिरायला जाऊन डोक्यात गजरा माळून, आणि काळाबरोबर पावले टाकत एखादं गुलाबाचं फूल देऊन, तर कधी "आय लव यू " म्हणत रोमांटिक होऊन.
शामलाताई आणि अनिकेतराव यांचा असाच 50 वर्षाचा सुखी संसार. 14 फेब्रुवारीलाच लग्न, अविस्मरणीय अशी आठवण.मुलांनी हौसेने सुवर्ण महोत्सव साजरा केलेला. सगळी पाहुणेमंडळी, आप्तेष्ट, मित्रमंडळी या निमित्ताने एकत्र आलेली. विवाहाचा दुसरा अनुभव, पण जाणतेपणी घेतलेला. तीच मंगलाष्टके, अक्षदा, एकमेकांना हार घालणे, कृतार्थतेचा भाव एकमेकांच्या डोळ्यांमध्ये दिसत होता.अनिकेत रावांनी दिलेलं गुलाबाचं फूल हसत हसत घेतलं. श्यामलाताई अजूनही लाजतच होत्या. पाहता पाहता भूतकाळात रमून गेल्या.
आज नंदिनीला पहायला पाहुणे येणार होते. नंदिनीचे वय जेमतेम वीस वर्षाचे. नंदिनीच्या आईच्या मनात तिला खूप शिकवायचे होते. पण वडिलांच्या हट्टापुढे कोणीच बोलू शकत नव्हते. स्थळ ओळखीत होते. मुलाला सरकारी नोकरी होती. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. ठरल्याप्रमाणे मंडळी पाहायला आली. नंदिनी सावळी पण आकर्षक दिसत होती. नाकी डोळी नीट होती त्यामुळे चेहरा उठावदार दिसत होता. फिक्कट पिवळ्या कलरची साडी तिला शोभून दिसत होती. लांबसडक वेणीवरचा, पांढर्याशुभ्र गजरा, तिच्या साध्या सौंदर्यात भर घालत होता. कोणालाही आवडेल असेच व्यक्तिमत्व होते नंदिनीचे. त्यामुळे अनिकेतला, नंदिनी पाहताक्षणीच आवडून गेली.पण नंदिनी ची हिंमत होत नव्हती, मान वर करून मुलाला पाहण्याची आणि वडीलांपुढे जाण्याची हिंमतही नव्हती. लग्न सोहळा ठरला आणि पार पडला ही.
घरात एकत्र कुटुंब पद्धती होती. दोन दीर, जावा, त्यांची मुले, सासू सासरे, अनिकेतला आजी देखील होती. या सगळ्या गोतावळ्यातच नंदिनी आणि अनिकेत चा संसार सुरू होणार होता. लग्नानंतर नाव बदलण्याची पद्धत तेव्हा होती. त्यामुळे नंदिनीची "श्यामला" झाली. आजेसासू यांच्या मार्गदर्शनाखाली, सासूबाईंच्या शिस्तीमध्ये, जाऊबाई च्या मदतीने, श्यामला चे लग्नानंतरचे दिवस सुरू झाले. दिवसभर माणसांचा गोतावळा त्याच्यामुळे, दोघांना निवांत बसायला किंवा बोलायला मिळत नसे. लग्नानंतरचा जागरण गोंधळ, सत्यनारायण, कुलदेवी ला जाऊन येणे, यातच आठ-दहा दिवस निघून गेले. अनिकेत आणि श्यामला क्वचित समोरासमोर येत. त्यातूनच नजर भेटीचे सुख मिळेल तेवढेच. अनिकेतच्या नातेवाईकांच्यात एकाचे लग्न होते. त्यासाठी घरची सर्व मंडळी जाणार होती. नवीन जोडप्याला वेळ मिळावा, म्हणून अनिकेत आणि शामला सोडून सर्वजण जाणार होती. अनिकेतच्या मनात आनंदाचे लाडू फुटत होते. आज तरी श्यामलाला डोळे भरून बघू ,बोलू ,गप्पा मारू, असे अनिकेत ठरवत होता. घरी न सांगता त्याने एक दिवसाची सुट्टी ही टाकली होती. ठरल्याप्रमाणे मंडळी लग्नासाठी निघाली. सर्वांनी शामला ची गोड चेष्टा केली. श्यामला खुप लाजली .
मंडळी निघून गेल्यावर, दोन तासांनीच घराची कडी वाजली. अनिकेतला यायला तर रोज संध्याकाळ होत असे. मग 'आत्ता कोण आलं' या विचारातच तिने दार उघडले आणि समोर अनिकेतला पाहून, तिने ओंजळीत तोंड लपवले. दार लावून घेत, त्याने तिच्या चेहऱ्यावरचा हात काढण्याचा प्रयत्न केला. पण, लाजेने श्यामला अर्धमेली झाली होती. आज कितीतरी दिवसांनी, अनिकेत तिला डोळे भरून पाहत होता. तिचा सावळा वर्ण, अजूनच आकर्षक दिसत होता. लांबसडक वेणी, कामात असल्यामुळे, विखुरलेल्या केसांच्या बटा, चेहऱ्यावरचे स्मित तिचे सावळे सौंदर्य अजूनच खुलवत होते. तेवढ्यात खिडकीमधून, हळूवारपणे वारा आला आणि कपाळा वरच्या बटांना, श्यामला सावरू लागली. अनिकेतने तिचा हात वरच्यावर धरला. आणि शामला अनिकेतच्या बाहुपाशात विसावली.
तेवढ्यात चिन्मयने आजीला हाक मारले. श्यामला ताई भानावर आल्या आणि आज कितीतरी वर्षांनी, खरोखरीचा व्हॅलेंटाईन डे पार पडला होता. अनिकेतरावांच्या सहवासात.

