Pratibha Tarabadkar

Crime Thriller

4.6  

Pratibha Tarabadkar

Crime Thriller

हनिमून एक्स्प्रेस भाग २

हनिमून एक्स्प्रेस भाग २

6 mins
485


त्या पानसे नावाच्या वृद्ध गृहस्थांबरोबर पराग बाकावर बसला. ते आपल्याला कसे काय ओळखतात आणि त्यांना काय सांगायचे आहे याबद्दल परागच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले.पानसे थोडा वेळ गप्प बसले.कदाचित शब्दांची जुळवाजुळव करीत असावेत.ते बोलू लागले,'मी तुमच्याच ट्रेनमध्ये समोरच्या बेंचवर बसलो होतो.'पराग सावरुन बसला.'गाडीत चढल्यावर सामान बेंच खाली सरकवून बसलो तेव्हा माझ्या लक्षात आले की समोरच्या बर्थवर बसलेली युवती अतिशय अस्वस्थ आहे.सतत गाडीच्या डब्याच्या दाराशी जात होती, खिडकीतून बाहेर डोकावून पहात होती, स्वतःचे सामान परत परत चेक करीत होती.शेवटी गाडी सुटायच्या पाच मिनिटं आधी तुम्ही आलात.'


'हो,रजेवर असूनही एक अतिशय कॉंप्लिकेटेड केस आली म्हणून जावे लागले होते.'पराग म्हणाला  'साधारण नऊ वाजता तुम्ही जेवलात आणि हात धुवायला बेसिनवर गेलात.तेव्हढ्या वेळात तुमच्या पत्नीने घाईघाईने तुमच्या पाण्याच्या ग्लासमध्ये कसलीतरी पूड घालून ती ढवळली.'पराग एकदम ताठ झाला.‌तरीच एवढी गाढ झोप लागली होती.पानसेकाका पुढे सांगू लागले,'ती एव्हढ्या वेगाने साऱ्या हालचाली करीत होती की असे वाटले, तिच्या मनात काहीतरी काळेबेरे असावे.हात धुवून परत आल्यावर तिने तो पूड घातलेला ग्लास तुमच्या पुढे केला.पाणी पिऊन मोबाईलवर तुम्ही ऑपरेशनच्या बाबतीत सूचना केल्या. आईवडीलांशी बोलता बोलता तुम्हाला झोप येऊ लागली तशी तुमच्या पत्नीने तत्परतेने आधीच चादर उशी तयार ठेवलेल्या बर्थवर चढण्यास मदत केली.'पानसेकाका जे सांगत होते ते खडानखडा बरोबर होते.


पानसेकाका पुढे सांगू लागले,'तो जनरल डबा असल्याने माणसांची वर्दळ, गुजरातीमध्ये चाललेल्या मोठमोठ्या आवाजातील गप्पा यातसुद्धा तुम्ही गाढ झोपला होतात.मला उतरायचे होते ते ठिकाण मध्यरात्री येते म्हणून मी जागाच होतो.तुमची पत्नी तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने हलवून 'पराग,पराग'अशा हलक्या आवाजात हाक मारुन तुम्ही गाढ झोपला आहात ना याची खात्री करून घेत होती.बडोदा जवळ येऊ लागले तशी तिने लगबगीने तुमचा फोन स्वीच ऑफ करून तुमच्या शर्टाच्या खिशात ठेवला तसेच सामानाच्या चाव्यांचा जुडगाही तुमच्या खिशात कोंबला.तोपर्यंत बडोदा स्टेशन आले.खिडकीतून तिने कोणालातरी हात केला.ती व्यक्ती आत आली.मुस्लिम पुरुष नमाज पढताना घालतात तशी टोपी त्याने घातली होती.त्याच्याबरोबर ती निघाली.तेवढ्यात तिला काहीतरी आठवले व भराभर तिने सॅकमधून एक फोल्डर काढले आणि सॅक बंद केली व 'जुनैद,यह तो मैं भूल गयी थी'म्हणत त्याच्याबरोबर डब्यातून खाली उतरली आणि अंधारात नाहीशी झाली.'


पराग आता उत्तेजित झाला होता.गायत्री अचानक ट्रेनमधून गायब होण्यामागे हे रहस्य होतं तर! 'हे माझं व्हिजिटींग कार्ड,'पानसेकाकांनी पाकिटातून कार्ड काढताना एक चिठोरेही काढले.'ती सॅक मधून फोल्डर काढताना हे खाली पडले ते मी उचलून ठेवले होते.तुमच्याबद्दल बातमी वाचली तेव्हा एका सज्जन कुटुंबाला नाहक बदनाम व्हावे लागत आहे याबद्दल वाईट वाटले पण तुम्हाला कुठे आणि कसं भेटणार हा प्रश्नच होता.योगायोगाने आज भेटलात.बरं मी निघतो आता.माझी काही गरज लागली तर बेशक फोन करा',पानसेकाका उठत म्हणाले. पराग आपल्याच विचारात हरवला होता.पानसेकाकांचे आभार मानण्याचे भानही त्याला उरले नाही.


परागची पावले वेगाने घराकडे वळली.कधी एकदा घरी जाऊन आई-बाबांना हे वृत्त सांगतो असे त्याला झाले होते.'अगंबाई,हा अॅंगल कधी आपल्या लक्षातच आला नाही'आई डोळे विस्फारून म्हणाली.'मी पण त्या अचानक घडलेल्या घटनेने इतका बावरुन गेलो होतो की गायत्रीच्या नाहीशा होण्यामागे असेही कारण असू शकते हे लक्षातच आले नाही.'बाबांनी कबुली दिली.


गायत्री बडोद्याला उतरली हे जरी खरे मानले तरी याला पुरावा काय?पानसेकाकांनी दिलेले चिठोरे? शिवाय एवढ्या मोठ्या शहरात तिला शोधणे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखे आहे.परागने आता पोलिसांकडे न जाता स्वतःच शोध घ्यावयाचे ठरविले.त्याप्रमाणे तो तयारीला लागला.त्याचा मित्र नमन पारेख याने बडोद्यात हॉस्पिटल उघडले होते.बरेच दिवस तो बोलवत होता पण त्याच्याकडे जायला वेळच मिळाला नव्हता.परागने नमनला फोन लावला.नमनने त्याला बडोद्याला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले.पराग बडोद्याला पोहोचल्यावर नमनने पाठविलेल्या गाडीने त्याच्या घरी पोहोचला.दोघा मित्रांची गळाभेट झाली.नमनची पत्नी रुपाभाभीने व्यवस्थित आदरातिथ्य केले.


'बोल स्कॉलर, तुला मी काय मदत करु?'नमनने प्रश्न केला तशी हनिमूनला जाण्यासाठी गाडीत बसल्यापासूनची सगळी कहाणी परागने ऐकवली.त्याचबरोबर पानसे काकांनी दिलेले चिठोरेही दाखविले.त्यावर हाताने खरडलेला एका ब्यूटी पार्लरचा पत्ता होता.'हा बडोद्याचा एक्स्टेंशन एरिया आहे.'रुपाभाभीने तो पत्ता वाचून सांगितले.'म्हणजे याच भागात ती राहत असावी.पण शोधणार कसं?

'मी एक आयडिया सांगू का?'रुपाभाभीने विचारले.'माझ्या मैत्रिणीच्या भावाने डिटेक्टीव्ह एजन्सी खोलली आहे.त्याची मदत घेऊ या का?'


'चालेल'पराग तत्परतेने

म्हणाला.'तोपर्यंत तू इथेच राहा आणि माझ्या क्लिनिक मध्ये येऊन बसत जा म्हणजे वेळपण चांगला जाईल.'परागला संकोच वाटला पण मित्राला क्लिनिकमध्ये मदत करण्याच्या विचाराने तो तयार झाला.रुपाभाभीने ताबडतोब मैत्रिणीला फोन केला.डिटेक्टीव्ह भावेश थोड्याच वेळात हजर झाला.'हा भावेशभाई, याला तुम्ही तुमची केस सांगा',रुपाभाभीने दोघांची ओळख करून दिली.परागने भावेशला हनिमूनला जाण्यासाठी गाडीत बसल्यापासूनची कथा ऐकवली.भावेशने मन लावून कथा ऐकली.काही डाऊट आल्यास परागला थांबवून प्रश्नही विचारत होता.गायत्रीचे विविध गेटअपमधील फोटोसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये अपलोड केले.परागने ब्युटी पार्लरचा पत्ता असलेले चिठोरे दाखविताच भावेशने त्याचा फोटो मोबाईल वर काढून ते चिठोरे जपून ठेवा,त्याच्या फोटो कॉपीज काढून ठेवा असे सांगितले.


'तुमची वाईफ पण डॉक्टर आहे का?'


'नाही ती फिजिओथेरपीस्ट आहे.'


'अरे, मग तर फारच सोपं काम आहे', भावेश नमनकडे वळून म्हणाला,'नमनभाई, सगळ्या छाप्यांमध्ये आय मीन पेपरमध्ये आणि होस्पिटलच्या वेबसाईटवर जाहिरात द्या फिजिओथेरपीस्ट पाहिजे म्हणून'.


'वांदो नथी'असे म्हणत नमनने ताबडतोब भावेशभाईची सूचना अमलात आणली.जाहिरातीमध्ये दर्शविलेला आकर्षक पगार पाहून अपेक्षिल्याप्रमाणे होतकरुंचे c.v.येणे सुरू झाले. भावेश, पराग, नमन आणि रुपाभाभीने अर्जांची छाननी करून दोन अर्ज वेगळे काढले.त्यामधील एक होता जुनैद आसिफ बेग याचा तर दुसरा होता जुबैदा जुनैद बेग हिचा.दोघांना इंटरव्ह्यूसाठी दुसऱ्याच दिवशी बोलविण्यात आले.नमन आणि रुपाभाभी मुलाखत घेणार होते तर शेजारच्या रुममध्ये भावेश आणि पराग बसणार होते.भावेशने त्याच्याकडील उपकरणांची अशी रचना केली की नमनच्या खोलीतील दृष्य आणि संवादाचे रेकॉर्डिंग त्यांच्या खोलीत व्हावे.प्रथम जुनैद आला.फिजिओथेरपीमधील काही प्रश्न विचारुन नंतर कळवू असे सांगितले.मग आली जुबेदा.बुरखा घालून आली होती.सर्वांची उत्सुकता शीगेला पोहोचली होती.खुर्चीवर बसल्यावर तिने चेहऱ्यावरची जाळी दूर केली.पराग खुर्चीत ताठ झाला.नक्कीच गायत्री! कपडे बदलले तरी मूळ चेहरा थोडी बदलतो! मुलाखत सुरू झाली.गायत्री उर्फ जुबेदा सराईतपणे उत्तरे देत होती.परागने खूण केली तशी भावेश झटकन् उठला आणि डॉक्टर साब असे म्हणत मुलाखतीच्या खोलीत घुसला.त्या तिघांकडे बघत सॉरी सॉरी म्हणत परत गेला.झालं!नमन आणि रुपाभाभीला सिग्नल मिळाला.रुपाभाभीने गायत्रीला विचारले,'मिसेस जुबेदा बेग, आम्हाला तुमची प्रोफाईल आवडली आहे.पण तुम्ही कुठे राहता? म्हणजे रोज हॉस्पिटलला येणे जाणे शक्य होईल का?फारच लांब राहत असाल तर मग कठीण होईल.'त्याबरोबर गायत्रीने समोरचा कागद घेऊन स्वतःचा बडोद्यातील पत्ता खरडला आणि रुपाभाभीकडे सरकवत हसत हसत म्हणाली,'टू व्हिलर असल्यावर कितीकसा वेळ लागेल इथे यायला?'


'तुम्हाला लवकरच कळवतो'असे सांगून नमन आणि रुपाभाभीने तिची बोळवण केली.गायत्रीच्या गुन्ह्याला वाचा फुटली होती.स्वतःच्या हस्ताक्षरातील तिने लिहिलेला पत्ता तिच्याविरुद्ध मोठा पुरावा होता.भावेशने पत्त्याचा फोटो मोबाईलमध्ये बंदिस्त केला आणि तो कागद जपून ठेवण्यासाठी परागकडे सुपूर्द केला.


संध्याकाळी भावेशने बातमी आणली की गायत्री उर्फ जुबेदा बेग आणि जुनैद बेग त्याच पत्त्यावर राहतात.आता वेगाने हालचाल करावयास हवी होती.सर्व रेकॉर्डिंग, गायत्रीच्या हस्ताक्षरातील कागद घेऊन पराग मुंबईला निघाला.आल्या आल्या आई-बाबांना सर्व वृत्तांत कथन करुन त्याने पानसेकाकांना फोन लावला.


पोलिस स्टेशनमध्ये इ.कदम कामाचा आढावा घेत असताना पराग,त्याचे आई-बाबा आणि पानसेकाका शिरले.परागने इ.कदमांना सारा वृत्तांत कथन केला आणि पुराव्यादाखल सारे रेकॉर्डिंग व पत्त्याची चिठ्ठी समोर ठेवली.इ.कदम चक्रावलेच.पण वेळेचे महत्त्व जाणून त्यांनी भराभर सूचना केल्या आणि पोलिसांचा ताफा बडोद्याला जाण्यासाठी सज्ज झाला.

गायत्रीला घेऊन महिला पोलिस आली तेव्हा पराग,त्याचे आई-बाबा,गायत्रीचे आई-बाबा आणि पानसेकाका पोलिस स्टेशनमध्ये उत्कंठेने बसले होते.आपलं पितळ उघडं पडलंय या कल्पनेने गायत्रीच्या पायातील त्राण गेलं आणि ती धप्पदिशी खुर्चीवर बसली.'बोला, गायत्री उर्फ जुबेदा बेग',इ.कदम यांचा जरबेचा आवाज ऐकून गायत्रीने धैर्य गोळा केले व ती सांगू लागली.


'जुनैद माझ्याच हॉस्पिटलमध्ये काम करत होता.आम्ही एकमेकांच्या प्रेमात ‌पडलो.पण आमच्या लग्नाला दोन्हीकडून प्रचंड विरोध होणार हे निश्चित होते म्हणून आम्ही असं प्लॅनिंग केलं.’


'पण तुझ्या मोबाईल मध्ये तर जुनैदचा मोबाईल नंबर नव्हता.'


’हो मी जाणूनबुजून त्याचा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह केला नव्हता.आम्ही चिठ्ठी लिहून संपर्कात राहत होतो.वाचून झाली की फाडून टाकत होतो.नंतर जुनैद बडोद्याला गेला तेव्हा दुकानाबाहेरील पी.सी.ओ. वरुन मी संपर्क साधत असे.परागशी लग्न ठरल्यावर मला जाणवले की मी जुनैदशिवाय राहू शकत नाही तेव्हा इंदूरला जाण्याच्या बहाण्याने बडोद्याला पलायन करावयाचे ठरले.मुद्दाम जनरल बोगीचे रिझर्व्हेशन केले कारण तिथे सतत वर्दळ असते त्यामुळे माझ्याकडे कोणाचे लक्ष जाणार नाही.पुढचे तुम्हाला ठाऊक आहेच.'गायत्रीचे बोलणे संपतंय तोच काही कळण्याच्या आत गायत्रीच्या वडीलांनी गायत्रीच्या थोबाडीत मारली.'या परागचा काय अपराध होता की याला तू एवझी मोठी शिक्षा दिलीस?'

'सॉरी पराग', गायत्री गाल चोळत म्हणाली.

पण पराग थोडी तिच्या सॉरी म्हणण्याने तिला माफ करणार आहे?आपली सामाजिक प्रतिष्ठा,आपलं करीअर,आपलं उज्ज्वल भवितव्य यांची माती करणाऱ्या गायत्रीला जास्तीत जास्त कलमं लावून कशी अद्दल घडविता येईल यासाठी पराग तज्ज्ञ वकीलांचा सल्ला घेत आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime