Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

नासा येवतीकर

Drama Others


3  

नासा येवतीकर

Drama Others


हार-जीत

हार-जीत

6 mins 290 6 mins 290

हरिपूर गावात ग्रामपंचायतीचे वारे वाहू लागले तसे गरमागरम चर्चेला उधाण आले होते. कोण कोणाकडून उभे राहणार ? कोण जिंकून येणार ? कोण सरपंच होणार ? या सर्व प्रश्नावर जिथे तिथे जोरात चर्चा चालू होती. त्याला निमित्तही तसेच होते. शासनाने अचानकपणे निवडणूक कार्यक्रम घोषित करून टाकला आणि गावातील वातावरण एकदम बदलून गेलं. कोरोना व्हायरसमुळे सारं गाव शांत शांत होतं, जो तो आपापल्या घरात बसून सुखी समाधानी होता मात्र निवडणूक होणार असे कळल्यावर वारुळात पाणी शिरल्यावर लपून बसलेल्या मुंग्या जशा पटापट बाहेर पडतात तसे गाव पुढारी घराबाहेर आले. जो तो मी निवडून येणारच या अविर्भावात गावातील चर्चेत सहभागी होत होते. यावर्षी सरपंचपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी सुटले होते. त्यामुळे गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे आनंदराव यांच्या पत्नीचे सरपंच म्हणून स्थान पक्के झाले होते.


गावाच्या विकासात आजपर्यंत आनंदरावाचे महत्व अनन्यसाधारण होते, त्यामुळे सर्वांच्या मनात होते की, आनंदरावांची पत्नी वनिता यांनी सरपंच व्हावे पण त्यांच्याच भाऊकीमध्ये असणारे भाऊराव यांना मात्र ते पटत नव्हते. त्यांचा आनंदरावला नेहमीच विरोध असायचा. त्यामुळे सरळ सरळ दोन पार्टी तयार झाल्या. एक म्हणजे आनंदराव पॅनेल आणि दुसरे म्हणजे भाऊराव पॅनेल. आनंदराव पॅनेलमध्ये आनंदरावांची पत्नी, तुकाराम, जयराम, साहेबरावांची पत्नी, रामराव, अहमदची पत्नी आणि साईनाथ अशी चांगल्या व्यक्तिमत्वाची आणि दिलदार मनाची माणसं होती तर भाऊराव पॅनेलमध्ये भाऊरावची पत्नी, सखाराम, दिगंबर, भैय्यासाहबची पत्नी, गंगाराम, नामदेवाची आई आणि रामदास ही मंडळी होती. ज्यांची ओळख गावातील मंडळी चोर, डाकू, लुटेरे अशी करतात.


साऱ्या गावाला माहीत होतं की, भाऊराव पॅनेलमधील एकही व्यक्ती निवडून येणार नाही. हे त्यांनाही माहीत होतं की आपले एकही उमेदवार जिंकणार नाहीत पण निवडणूक लढवायची म्हणजे लढवायची, त्यासाठी लागेल तेवढा पैसा खर्च करण्याची भाऊरावची तयारी होती. 'भाऊ आहे वरचा होऊ दे खर्चा' म्हणत भाऊरावच्या पॅनेलमधील सारेजण भाऊच्या पैशावर ऐश करू लागले. सर्वांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. स्थानिक आमदारांनी गावात येऊन आवाहन केलं की, आपले गाव जर बिनविरोध काढत असाल तर पाच लाख रुपयांचे बक्षीस मी गावाला देईन. पण भाऊराव ऐकायला तयार नव्हता. निवडणूक लढवायची म्हणजे लढवायची याच जिद्दीवर तो अडून बसला होता. गावातील काही लोकांना तर तेच पाहिजे होतं.


निवडणूक झाली नाही तर रोज प्यायला आणि खायला कुठून मिळणार ? म्हणून काही मंडळी भाऊरावचे कान भरत होते. भाऊरावचा चुलता श्यामराव हा शहरातील एका सरकारी शाळेत शिक्षक होता. गावात एकटाच काय तो सरकारी कर्मचारी, त्याचे बोलणे भाऊराव ऐकेल म्हणून आनंदरावांनी त्याला बोलावणे पाठविले. श्यामरावने भाऊरावला अनेकप्रकारे समजावून सांगितला पण पालथ्या घागरीवर पाणी म्हटल्याप्रमाणे भाऊराववर काही परिणाम झाला नाही. अखेर हरिपूर गावात निवडणूक लागली.


आनंदराव पॅनेल विरुद्ध भाऊराव पॅनेल अशी लढत लागली होती. दोन्ही पॅनेलमध्ये विरोधक कोण होते तर त्यांच्या जवळचेच होते. कोणी आपल्या काका विरुद्ध लढत होते तर कोणी आपल्या भावजयच्या विरुद्ध लढत होते. निवडणूक म्हणजे गावातील लोकांचे चांगले संबंध बिघडवून टाकणारी एक यंत्रणा आहे. या निवडणुकीने आतापर्यंत कोणाचं भलं केलं आहे म्हणून यांचे करणार ? अशी चर्चा गावातील काही मंडळी जे की कोणत्याच पॅनेलकडून नाहीत ते करत होते. डोर टू डोर जाऊन त्यांच्या प्रचार कार्यास सुरुवात झाली. सायंकाळ झाली की भाऊराव पॅनेलमध्ये लोकांची गर्दी व्हायची. गावापासून दूर असलेल्या त्यांच्या शेतात एक झोपडी टाकली होती. त्याठिकाणी रोजच रात्रीला मटण आणि दारूची पार्टी होऊ लागली. मतदार असलेले आणि नसलेले सारेचजण तेथे जाऊन पार्टी एन्जॉय करू लागले. आनंदराव पॅनेलमधली लोकं उघड्या डोळ्यांनी पाहत होते मात्र काही करू शकत नव्हते. रोजच्या या पार्टीने त्यांच्या पॅनेलमध्ये खलबतं सुरू झाली. खरंच जर मतदारांनी या पार्टीला भुलून जर भाऊरावच्या पॅनेलला मतदान केलं तर कसे होईल ? या प्रश्नांवर त्यांची रोज चर्चा चालत असे.


नवीन तरुण रक्ताचे सारे मतदार भाऊरावकडे वळले होते तर बुजुर्गमंडळी सारी आनंदरावकडे वळले होते. बुजुर्गमंडळीपेक्षा तरुण रक्ताची व नवीन मतदारांची संख्या जास्त होती. यामुळे आनंदरावची काळजी वाढली होती. मागेल त्याला दारू आणि पैसा सोबत मटणाची पार्टी देऊन भाऊरावने गावातील सर्व लोकांना आपलेसे करून टाकले होते. सुरुवातीला आनंदरवांचा जयजयकार करणारी मंडळीदेखील हळूहळू भाऊराव पॅनेलकडे वळू लागली.


पाहता पाहता प्रचार करण्याचा काळ संपला. निवडणूक विभागाच्या गाड्या व कर्मचारी गावात डेरेदाखल झाले. सोबत पोलिसांची गाडी त्यात दहा-पंधरा पोलीस कर्मचारी म्हणजे जवळपास तीस एक सरकारी कर्मचारी गावात दाखल झाले. गावात स्मशान शांतता होती. भाऊरावने प्रत्येक घरातील तरुण पोराला हाताशी धरलं होतं आणि त्याला बजावून सांगितलं होतं की, घरातल्या सर्वांना भाऊराव पॅनेलला मतदान करायला सांगायचं, पॅनेल जर निवडून आलं तर पाच वर्षे तुमची मजाच मजा, असे म्हणून भाऊरावने सर्वांच्या घरात त्यांची आवडती दारू आणि मटण पोहोचवली होती.


भाऊरावानी सांगितल्याप्रमाणे या तरुण पोरांनी, घरातील मंडळींवर दबाव टाकला भाऊराव पॅनेलला मत टाका नाहीतर माझं मेलेलं तोंड पाहाल. त्या रात्री प्रत्येकजण मनसोक्त दारू पिऊन घेतलं आणि पोटभर मटण खाऊन झोपी गेले. अखेर निवडणुकीचा दिवस उजाडला. सकाळी सात वाजता मतदानाला प्रत्यक्षात सुरुवात झाली.


दारू पिऊन ढाराढुर झोपलेले सकाळी बऱ्याच उशिरा उठले. बाया-माणसांनी सकाळी सकाळी आपले मतदान करून मोकळे झाले. शेतीच्या कामाला जाणाऱ्या शेतकऱ्यांनीदेखील आपले मतदान करून शेतीच्या कामाला निघून गेले. विविध कामासाठी शहरात गेलेल्या लोकांना मतदानाला येण्यासाठी भाऊराव पॅनेलने गाड्याची व्यवस्था केली होती. त्यामानाने आनंदराव पॅनेलने काही खर्च केला नाही. गावातील साऱ्या लोकांना माहीत होतं की यावर्षी आनंदराव पॅनेलचे काही खरे नाही. भाऊराव पॅनेल जिंकून येणार म्हणजे येणार असे सर्वजण चर्चा करत होते. अखेर सायंकाळी पाच वाजता निवडणुकीची वेळ संपली. चौदा जणांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले. धुरळा उडवीत निवडणुकीची गाडी सायंकाळी अंधार पडताना निघून गेली. त्यादिवशी भाऊरावने शेतात जंगी पार्टी केली, दोन बोकडे कापली आणि दारूचा महापूर वाहिला. सर्व गावकऱ्यांना त्याने जेवण दिलं. निकालाच्या अगोदरच भाऊरावला जिंकल्याचा भास होत होता. हे सारं चित्र आनंदराव आणि त्याचे मित्रमंडळी दुरून पाहत होते. 


दुसऱ्या दिवशी निकाल होता. दोन्ही पॅनेलची माणसं तालुक्याच्या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी पोहोचले होते. हरिपूर गावाचा निकाल येण्यास सुरुवात झाली. आनंदराव पॅनेलचा पहिला उमेदवार निवडून आल्याचे जाहीर होताच एकच जल्लोष झाला. त्यानंतर भाऊराव पॅनेलचा उमेदवार जिंकल्याचे जाहीर होताच त्यांनीदेखील एकच जल्लोष केला. एकानंतर एक निकाल येत होता. आनंदरावचे तीन आणि भाऊरावचे तीन असे समसमान उमेदवार जिंकून आले होते. आता सरपंच पदाचे दावेदार असलेले उमेदवार असलेल्या दोघांच्या पत्नीचा निवडून येण्याचा निकाल बाकी होता. जे कुणी जिंकेल तो सरपंच बनणार आणि त्यांचा पॅनेलही जिंकून येणार. दोन्ही गोटात निरव शांतता होती. निकालाची उत्सुकता ताणली जात होती. आनंदराव आणि भाऊराव दोघांच्या चेहऱ्यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात माईकवर बोलण्यास सुरुवात झाली, 'हरिपूर गाव वार्ड क्र. एक मधील सुनंदा भाऊराव आणि वनिता आनंदराव यांना समान मते मिळाली' हे ऐकून दोन्ही पॅनेलमधील माणसं चुळबुळ करू लागली. आता काय होणार ? कोणाला विजयी घोषित करणार ? दोघांत टॉस होईल का ? नशीब कोणाच्या बाजूला असेल ? असे नाना प्रकारचे प्रश्न आणि त्यावर चर्चा होऊ लागल्या. तेवढ्यात माईकवरून अजून काही तरी बोलणे ऐकू येऊ लागले म्हणून साऱ्यांचे कान टवकारले गेले, 'दोघांना समान मत मिळाले, त्यामुळे टॉस करणे आवश्यक होते मात्र या वार्डसाठी आमच्याकडे एक पोस्टल बॅलेट आलेले आहे. त्यात ज्यांना मतदान मिळेल ते विजयी घोषित करण्यात येईल, निकालासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करा.' असे म्हणत माईक बंद झाले. एकच पोस्टल बॅलेट आलंय म्हणजे ते श्यामराव गुरुजीचे असेल. गावात तेच एकटे सरकारी कर्मचारी होते आणि त्यांना निवडणुकीचे कामदेखील लागले होते. भाऊरावच्या चेहऱ्यावर खुशीची लहर दिसत होती कारण श्यामराव त्याचा चुलता होता तेव्हा तो आपल्यालाच मतदान करेल याची त्याला खात्री होती. तर आनंदराव परमेश्वराला हात जोडून उभा होता आणि मनोमन प्रार्थना करत होता.


पुन्हा एकदा माईक चालू झाले, 'पोस्टल बॅलेटच्या मतानुसार वनिता आनंदराव हे विजयी घोषित करण्यात येत आहे.' असे म्हटल्याबरोबर आनंदराव आणि त्यांच्या मित्रमंडळींनी जोरदार नाचायला सुरुवात केली. प्रत्येकजण येऊन त्यांचे अभिनंदन करू लागले. आज एका पोस्टल बॅलेट मतदानामुळे आनंदरावांची पत्नी वनिता विजेती ठरली होती. निवडणूकीमध्ये एक एक मतदान महत्वाचे आहे. भाऊराव याने आपला चुलता श्यामराव गुरुजीला कधी गोड बोलला नाही, त्याचे बोलणे कधी ऐकलं नाही. त्याउलट आनंदराव हे श्यामराव गुरुजीचा आदर करत असत, प्रेमाने विचारपूस आणि चौकशी करत असत त्यामुळे श्यामराव गुरुजींनी आपले अमूल्य मत आनंदराव यांच्या पॅनलला दिले आणि त्यांच्या एका पोस्टल बॅलेटमुळे हरिपूर गावात पुन्हा एकदा चांगल्या माणसांचे सरकार स्थापन झाले. आनंदराव देवाचे, श्यामराव गुरुजीचे आणि समस्त गावकऱ्यांचे मनोमन आभार मानले.


Rate this content
Log in

More marathi story from नासा येवतीकर

Similar marathi story from Drama