गोविंदा...!
गोविंदा...!


गोविंदा म्हंटले की सर्वांना गोविंदा गोविंदा गजराची जाण होते.प्रसिद्ध बालाजी देवस्तानची आठवण होते.पण मला गोविंदा म्हंटल की गोंदा आठवतो.ज्याच्या अंगा खांद्यावर माझे बालपण गेले तो गोंदा जोशी.
घरची परिस्तिथी त्या काळी भडजी म्हणून अगदीच बेताची.त्यात मोठा संसार त्यामुळे जीवन जगणे कठीण.थोडी बहुत शेती, तीही जिराईत.सारी गुजराण चार घरच्या पूजा अर्चा आणि पंचांग सांगणे यावर आणि जी काही वर्षीलकी मिळेल त्यावर चालायची.वर्षीलकीत वर्षाच्या पूजा आणि इतर धार्मीक कार्य पार पडायची.
गोंदा हा केशव जोशींचा मुलगा,हाताने थोडा अधू होता पण हुशार आणि परिस्थिती ची जाण असलेला. त्या काळी फरशी नव्हती,तो सारवणा पासून ते भाकऱ्या करण्या पर्यंत सारी काम करायचा.पाणी पिण्याचे ओढ्यावरून आणणे, आणि खर्चाचे जवळच्या विहिरीतून भरणे हे तो नियमित पणे करायचा.
आमचा अभ्यासही तोच घ्यायचा.आवाज इतका गोड की तो लीलया गीत रामायणातली गाणी सुरेख म्हणायचा.तबला पेटी पण छान वाजवायचा आणि इतका नम्र की तो प्रत्येकाला आपलाच वाटायचा.
एकदा त्याने शिवाजी महाराजांच्या नाटकात जिजाऊची भूमिका केली होती.आणि त्या भूमिकेसाठी चांगले हातभार केसही वाढवले होते.हे वडीलधाऱ्या मंडळींना काहीच माहीत नव्हते.दुसरे दिवशी नाटक आणि आदले दिवशी फुकटात केस कापले जातात म्हणून त्याच्यावर केस कापून घ्यायची पाळी आली.दुसरे दिवशी नाटकात पदर ढळला आणि बिन केसांचे डोके उघडे पडले,हसे झाले पण त्याने प्रसंग निभावून न्हेला.आजही तो दिवस आठवतो आणि त्याकाळच्या परिस्थितीच्या चटक्यांची जाणीव आणि आठवण झाली की गलबलायला होते.
पुढे लग्न संसार सार घडत गेलं आणि माझं जेंव्हा लग्न ठरलं तेंव्हा माझ्या मिसेसला त्यानं इतकंच सांगितलं,
तुझ्या नवऱ्याला लहानाचा मोठा मी केलाय त्यामुळे तुला विचार करायची काही गरज नाही.माझे ही लग्न झाले संसार झाला पण गोंदाचे स्थान केंव्हा गोविंदात झाले मला कळाले नाही.त्याचे कालांतराने निधन झाले खूप वाईट वाटले पण जेंव्हा जेंव्हा गोविंदा म्हणतो तेंव्हा तेंव्हा मला गोंदा आठवतो आणि आजही डोळ्यात पाणी साठवतो.अशी माणसं जीवनात लाभण हे मी माझं भाग्य समजतो. त्यानं दुसरं तिसरं काही केलं नाही पण जन्मभर ऋणात बांधून ठेवलं त्याच्या प्रेमाची जाण सदैव उरी राहील यात शंका नाही. असे अनेक गोंदा जीवनात लाभतात म्हणून तर आपल्या देशात सौख्य समाधान शांती वास करून राहते ,हेच सत्य आहे..!