STORYMIRROR

Ajay Nannar

Horror Thriller Others

3  

Ajay Nannar

Horror Thriller Others

गावाकडच्या भुताच्या गोष्टी

गावाकडच्या भुताच्या गोष्टी

3 mins
237

मी बऱ्याच वर्षांपासून राहायला शहरात आहे पण माझा जन्म गावीच झाला. त्यामुळे लहानपणीची काही वर्ष मी तिथेच राहिलो. गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. मी तेव्हा ६ वी किंवा ७ वी त शिकत असेन. गाव म्हंटले की त्या काळी खूप मजा यायची. शेतात जाऊन करवंद खायचो. आमच्या अण्णांसोबत फिरायचो. गावात दर वर्षी १४ एप्रिल ला पालखी असते आणि जत्रा देखील भरते. पूजा होते आणि मग पालखी निघते. जी संपूर्ण गाव फिरून रात्री पुन्हा ठरलेल्या ठिकाणी परतते. 


त्या वर्षी ही तो दिवस जवळ आला होता त्यामुळे मी खूप उत्साहात होतो. पालखी म्हणजे बँड बाजा असणार आणि मग अगदी धमाल असणार. ठरल्याप्रमाणे मी ही खूप नाचलो पण वरच्या गावातून फिरून यायला रात्री बराच उशीर झाला. म्हणजे जवळपास २ वाजले. मी पुरता थकून गेलो होतो. त्यात रात्र झाल्यामुळे मला झोपही येऊ लागली. मी अर्धा तास कसा बसा काढला पण नंतर मात्र मला झोप आवरेनाशी झाली. मी तिथेच बसून डुलक्या काढू लागलो. पालखी घरा पासून काही अंतरावरच आली होती म्हणून मी घरी जायला निघालो. 

 

पुढच्या ५-१० मिनिटात मी घराजवळ पोहोचलो. इतकी झोप आली होती की पायात घातलेले बूट मी तसेच अंगणात भिरकावले आणि घरात शिरलो. आजी घरी एकटीच बसली होती. मी तिच्याशी काहीच न बोलता सरळ आतल्या खोलीत गेलो आणि झोपून गेलो. साधारण अर्ध्या पाऊण तासाने मला हलकीशी जाग आली. अचानक खूप थंडी वाजू लागली होती. पण मी जरा भानावर आलो आणि विचारात पडलो की एप्रिल मे महिन्याचे दिवस चालू आहेत. या उन्हाळ्याच्या दिवसात अचानक थंडी का लागतेय. मी किंचित से डोळे उघडले आणि मला जाणवले की माझ्या बाजूलाच कोणी तरी बसले आहे. 


मी डोक्यावरची चादर बाजूला केली आणि नीट पाहू लागलो. माझ्या बाजूला कोणी तरी पाठमोरे बसले होते. थकलो असल्या कारणाने उठायची ताकद नव्हती. माझी नजर त्या खोलीभर फिरू लागली. मी हाक दिली “आजी..” पण काहीच प्रतिसाद आला नाही. मी पुन्हा आजीला हाक मारली पण माहीत नाही आजी चा कसलाच प्रतिसाद आला नाही. माझ्या मनात भीती घर करू लागली होती. मी डोक्यावर चादर घेतली आणि कुस बदलली. पण कुशीवरून वळल्यावर मला त्या दिशेला ही पुन्हा कसलीशी चाहूल जाणवली. मी थरथरत्या हातानी डोक्यावरून चादर खाली केली आणि समोर पाहिले. त्या दिशेला ही कोणी तरी होत. तसच माझ्या दिशेला पाठ करून बसल होत. 

 

मला कळतच नव्हत कोण आहे. एका वेगळ्याच ग्लानीत गेलो होतो मी. आजूबाजूला हे असे कोण बसलेय. आणि मी विचारतोय तरी काहीच उत्तर देत नाहीये. माझे शरीर थंड पडू लागले होते. हृदयाची धडधड वाढू लागली होती. मी डोक्यावरून चादर घेतली आणि गप्प पडून राहिलो. गारवा इतका वाढला होता की मी चादर घेऊन ही आत थरथरत होतो. अर्धा-पाऊण तास मी तसाच पडून राहिलो. पण नंतर मला गुदमरल्यासारखे झाले. असे वाटू लागले की माझ्या छातीवर कोणी तरी बसलेय. मी देवाचा धावा करत होतो. त्या वेळी मला कशी झोप लागली कळले ही नाही. सकाळी दार वाजण्याच्या आवाजाने जाग आली. घड्याळात पाहिले तर ५ वाजून गेले होते. 

 

घरचे सगळे आले होते. त्याच्या मागून आजीचा आवाज आला पाणी दे ग जरा मला. आजीचा आवाज घराच्या बाहेरून आला आणि माझे सर्वांग शहारले. कारण आजी आता घरी येतेय तर मग रात्री घरात कोण होत. कारण मी जेव्हा आलो तेव्हा आजी घरात बसली होती. म्हणजे ती आजी नव्हती. पण मग माझ्या अंगावर चादर कोणी टाकली. खरं सांगायचं तर काल रात्री मी इतक्या मोठ्या घरात फक्त एकटा होतो. विचार करतच उठायचा प्रयत्न केला पण अंग खूप जड झाल होत. आई ने कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली “अहो.. याला खूप ताप भरलाय”. मला डॉक्टर कडे घेऊन गेले. काही दिवसांनी माझा ताप उतरला. 


त्या रात्री जे घडले ते मी आजपर्यंत कोणालाच सांगितले नाही. आज या गोष्टीला खूप वर्ष उलटली. आजही कधी गावी गेलो की रात्री झोपताना खरच खूप भीती वाटते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror