Pratibha Tarabadkar

Crime Thriller

4.5  

Pratibha Tarabadkar

Crime Thriller

एकमेका साह्य करू - भाग २

एकमेका साह्य करू - भाग २

9 mins
376


लक्ष्मीनगरमधील विसपुते सराफांचा बंद बंगला चोरांनी फोडला अशी बातमी आली आणि इ.कदम हबकलेच.शांती नगरमधील चार बंगले चोरांनी फोडल्याची घटना घडून चार दिवस होत नाही तो ही बातमी! त्या घरफोडींबाबत आपण अजून अंधारातच चाचपडतोय आणि आता ही नवीन घरफोडी!इ.कदमांनी सुस्कारा सोडला आणि गाडी काढावयास सांगितली.लक्ष्मीनगर मध्ये प्रवेश करतानाच लक्ष्मीचे मंदिर, बाग, बसावयास बाकं, मुलांसाठी झोके, घसरगुंडी इ. खेळही होते. सराफांची वसाहत असल्याने अर्थातच वैभवाची साक्ष देणारे एकापेक्षा एक सरस बंगले.

 

विसपुते यांचा बंगला शोधण्यास इ.कदमांना मुळीच वेळ लागला नाही.टी.व्ही.चे वार्ताहर, पुढारी,लक्ष्मीनगरचे रहिवासी यांच्या गर्दीतून बंगल्यात शिरण्यास इ.कदम आणि त्यांच्या टीमला पुष्कळ यातायात करावी लागली.त्या आलिशान बंगल्यातील दृश्य शांतीनगर मधील बंगल्याप्रमाणेच होते.कपाटं फोडून लॉकरमधील महत्वाची कागदपत्रं विखुरलेली.विसपुत्यांना किती दागिने चोरीला गेले याची मोजदाद करावी लागणार होती.पण आश्चर्य म्हणजे त्यांच्या घरातूनही नवाकोरा टी.व्ही.आणि नुकतेच घेतलेले वॉशिंग मशिन सुद्धा चोरांनी नेले होते.सराफ असल्याने त्यांच्या घराला अतिशय मजबूत असे कडीकोयंडे तसेच लॅचसुद्धा होते पण चोरांनी ते लीलया उचकटून काढले होते.

 

एकच गोष्ट जमेची होती ती म्हणजे विसपुते सराफांनी बंगल्याच्या प्रवेशद्वारावर c.c.कॅमेरा लावला होता.आणि तो चालू स्थितीत होता.'तुमच्या कॉलनीत वॉचमन नाही का?'इ.कदमांनी विचारले.'आहे ना, रात्री गस्त घालतो.पण त्याची बायको आजारी आहे म्हणून गावाकडून सांगावा आला म्हणून तो गावी गेलाय.पण सर,तो अतिशय प्रामाणिक राखणदार आहे.'विसपुत्यांनी घाईघाईने खुलासा केला.'चोरी झाली तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात?'आम्ही सर्व कुटुंबीय एका लग्नाला गेलो होतो.'सराफ उत्तरले.'तुम्ही गावी लग्नाला जाणार हे कोणाकोणाला ठाऊक होते?'

 

'सर, आमचे दुकान असल्याने प्लॅनिंग केल्याशिवाय अचानक गावी जाता येत नाही त्यामुळे पुष्कळ जणांना आधीपासूनच ठाऊक होते.शिवाय आम्ही गावाला आधीच गेलो होतो तरी माझा मुलगा इथेच होता.तो काल संध्याकाळी गावी येण्यास निघाला.फक्त एकच रात्र घर बंद होते.'याचा अर्थ यांच्या घरावरही कुणीतरी पाळत ठेवली होती.इ.कदमांनी मनाशी खूणगाठ बांधली.'कोणाला रात्री वाहनाचा आवाज ऐकू आला?'लक्ष्मीनगरमधील सर्व रहिवाशांनी नकारार्थी मान हलविली.तसेच आमचा कोणावरही संशय नाही असे एकमुखाने सांगितले.म्हणजे आता भिस्त होती ती केवळ सी.सी. कॅमेरावर!


 विसपुते सराफ हे गावातील मोठं प्रस्थ होतं.ऐन बाजारपेठेत मोक्याच्या ठिकाणी त्यांची 'शृंगार'नावाची दागिन्यांची प्रशस्त, दुमजली शोरुम होती.गुन्हेगार शोधून काढण्यासाठी इ.कदमांवर जबरदस्त दबाव आला होता.प्रत्यक्ष कमिशनर साहेबांनी स्वतः लक्ष घालून गुन्ह्याचा छडा लवकरात लवकर लावण्याचा आदेश दिला होता तर कायदा आणि सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे असे सर्व माध्यमं कंठशोष करून सांगत होती.अशा परिस्थितीत मन एकाग्र करून इ.कदमांना गुन्हेगार लवकरात लवकर शोधण्याचे आव्हान पेलायचे होते. विसपुते सराफांनी त्यांचे दागिने, चांदीची भांडी,रोख रक्कम आणि टी.व्ही.व वॉशिंग मशीन सर्व मिळून एकूण वीस लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे असा रिपोर्ट दिला.

 इ.कदमांनी चोरी झालेल्या रात्रीचे सी.सी.कॅमेराचे रेकॉर्डिंग तपासले.चोर एकूण तीन होते.हवालदार पाटील यांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे एक चोर स्क्रू ड्रायव्हरने सराईतपणे कडीकोयंडा उचकटत होता.दुसरा शेजारी उभा होता तर तिसरा बंगल्याच्या प्रवेशद्वारावर टेहळणीसाठी उभा होता.दार उचकटून दोघे जण आत गेले.थोड्या वेळाने एकजण एक मोठी थैली घेऊन बाहेर आला आणि ती तिसऱ्याच्या हातात दिली.ती थैली त्याने लगबगीने उभ्या असलेल्या टेंपोत टाकली आणि तोसुद्धा बंगल्यात शिरला.थोड्याच वेळात तिघांनी मिळून वॉशिंग मशीन आणि टी.व्ही.सुद्धा अगदी सफाईने उचलून आणले व टेंपो मध्ये ठेवले आणि तिघेही जण त्या टेंपोसह नाहीसे झाले.

 

इ.कदमांनी त्या तिघांचे चेहरे पहाण्यासाठी पिक्चर झूम केले.पण हाय रे दैवा, तिघांनीही हेल्मेटस् घालून आपले चेहरे झाकले होते.टेंपोचा नंबरही कागद लावून झाकला होता..या बुचकळ्यात टाकणाऱ्या गुन्ह्यातील पहिला दुवा तर मिळाला होता.चोरांच्या चपळ हालचालींवरुन ते वीस ते पंचवीस वर्षांचे असावेत असा अंदाज त्यांनी बांधला.


 हेल्मेटस् घातलेले तीन तरुण चोर आणि नंबरप्लेट झाकलेला टेंपो इतपतच आतापर्यंत शोधाची प्रगती झाली होती.इ.कदमांनी एक महिना आधीपासूनचे सी.सी.टी.व्ही.चे रेकॉर्डिंग तपासणे सुरू केले.सकाळी स्कूल बसने जाणारी मुले नंतर आपापल्या सराफी पेढी वर कारने जाणारी पुरुष मंडळी,मग एक एक करून येणाऱ्या कामवाल्या असेच सर्वसाधारण रेकॉर्डिंग त्यात होते आणि अचानक इ.कदम थबकले.

 

दुपारी साधारण दीड दोनच्या सुमारास एक फुगेवाला त्या कॉलनीत शिरला.फुगवलेले आठ-दहा फुगे त्याच्या हातात होते.दाढीमिशा वाढलेल्या,टी शर्ट आणि लुंगी घातलेला तो फुगेवाला तोंडाने चकार शब्दही न काढता बंगल्यांकडे आलटून पालटून बघत लक्ष्मीनगरच्या बंगल्यापर्यंत फेरी मारुन परत गेला.इ.कदमांनी पुढची रेकॉर्डिंग तपासली.तो फुगेवाला रोज लक्ष्मीनगर मध्ये दुपारी याच वेळी चक्कर टाकत होता.हातात फुगे,नजर बंगल्यांकडे आणि निःशब्द!


इ.कदमांनी या फुगेवाल्यावर लक्ष केंद्रित करावयाचे ठरविले.त्यांनी लक्ष्मीनगर मधील सर्वांना एकत्र बोलावले.त्यांना तो फुगेवाला सी.सी.टी.व्ही.वर झूम करून दाखविला.'साहेब, या फुगेवाल्याला मी पुष्कळ वेळा पाहिलंय.एका बंगल्यातलं काम आटोपून दुसऱ्या बंगल्यात जायची तवा.'सरुबाई म्हणाली.'मी बोलले पण त्याला, ओरडला नाहीस तर कोण फुगे घेईल तुझे?आनि फुगे इकायला कोणी दुपारी येतंय व्हय,सांजंला ये,समदी पोरं तुझ्या पाठीशी लागतील बघ!पण त्यानं कायबी ऐकलं नाही माजं साहेब.'

 

'सायेब हा फुगंवाला हाय ना,त्यो एक डाव बसस्टॉपवर एका माणसाशी बोलताना बघितलंय मी सायेब,'गंगूबाई म्हणाली.'त्या माणसाला म्या लगीच वळखला.त्यो माणूस विसपुते साह्यबांकडे टी.व्ही.आनि वॉशिंग मशीन फिक्सं करायला आला हुता.'गंगूबाईच्या या बोलण्याने इ.कदम एकदम सावध झाले.'आम्ही टी.व्ही. आणि वॉशिंग मशीन 'अजय सेल्स'या दुकानातून विकत घेतले.'विसपुत्यांनी खुलासा केला. इ. कदमांनी आपल्यात झालेल्या बोलण्याची वाच्यता कोठेही करावयाची नाही असे सर्वांना बजावले आणि आपला मोर्चा शांतीनगर कडे वळविला.रेकॉर्डिंगसहित.


'या फुगेवाल्याला मी एकदा बघितलंय सर',नागरगोजे काकू म्हणाल्या.'जोराचा वारा सुटला म्हणून अंगणात वाळत घातलेले कपडे आणायला दुपारी मी बाहेर गेले तर शेजारच्या बंगल्यासमोर तो उभा होता.त्याला म्हटलं अरे बाबा, आमच्या शांतीनगर मध्ये कोणी लहान मुलं नाहीत.सगळे वयस्करच रहातात.तुझे फुगे कोण घेणार?

 

इ.कदमांनी मनातल्या मनात कपाळावर हात मारला.अनोळखी माणसाला जास्तीची माहिती देऊ नये ही साधी गोष्ट कशी कळत नाही लोकांना?

ज्यांचा फ्रिज आणि टी.व्ही.चोरीला गेला होता त्यांच्या कडे इ.कदमांनी मोर्चा वळवला.'अजय सेल्स'मधूनच दोघांनीही ते खरेदी केले होते.तपासाचा रोख आता 'अजय सेल्स'कडे वळला.'तुम्ही नुकतेच टी.व्ही.,फ्रिज, वॉशिंग मशीन शांतीनगर आणि लक्ष्मीनगर मध्ये विकले आहे का?'इ.कदमांनी दुकानात शिरल्या शिरल्या प्रश्न केला.'रजिस्टर बघून सांगतो सर', दुकानात अचानक शिरलेल्या पोलिसांना बघून घाबरलेला मॅनेजर चाचरत म्हणाला.खरेदीसाठी आलेले ग्राहकसुद्धा पोलिसांना बघून आश्चर्यचकीत झाले.'हो सर, लक्ष्मीनगर मध्ये एक टी.व्ही. आणि वॉशिंग मशीन विसपुते सराफ यांना तर शांतीनगर मध्ये पालेकरांना टी.व्ही.तर कोपरकरांना फ्रिज विकला आहे.'रजिस्टरमध्ये पाहून मॅनेजरने सांगितले.'त्यांची डिलीव्हरी कोणी दिली?'इ.कदमांच्या या प्रश्नावर मॅनेजर परत रजिस्टर मध्ये डोकावले.'सर पांडू आणि सदू हमाल आणि भूपत मेकॅनिक असे तिघेजण गेले होते.'


'त्या तिघांना बोलवा'इ.कदमांनी हुकूम केला.पांडू आणि सदू ताबडतोब हजर झाले.'सर,भूपत मेकॅनिक गेल्या आठवड्यापासून येत नाहीये.'इ.कदम एकदम सावध झाले.'त्याच्या मोबाईलवर ट्राय केलं?''हो,पण त्याचा फोन स्वीच ऑफ येतोय सर.'गुन्हेगारांची नेहमीची चाल.'इ.कदमांच्या मनात आले.

 'कधीपासून तुमच्याकडे नोकरीला आहे तो?''दोन महिने झाले असतील.पण काय झालं सर?भूपतची का चौकशी करताय तुम्ही?'


'गावात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असावा असा संशय आहे आमचा.'इ.कदमांच्या या खुलाशाने 'अजय सेल्स'चे मालक आणि मॅनेजर हबकून गेले.'नोकरीवर ठेवताना तुम्ही त्याच्या आधारकार्डची फोटो कॉपी जमा केली असेल ना?''सर', मॅनेजर चाचरत म्हणाला,'मी त्याला पुष्कळ वेळा आठवण केली पण दरवेळी तो आज विसरलो, उद्या नक्की आणेन असे आश्वासन देत असे.शिवाय दुकानात सतत इतक्या ऑर्डर्स येत होत्या की मलासुद्धा त्याच्या कागदपत्रांचा विसरच पडला.'मग त्याचा एखादा फोटो?'मॅनेजरने मान खाली घातली.'सर , नवीन मोबाईल घेतला आणि त्याचा कॅमेरा व्यवस्थित चालतोय की नाही हे चेक करण्यासाठी मी सहज जवळ 


उभ्या असलेल्या भूपतचा फोटो काढला तर त्याने मला तो डिलीट करायला लावला.मलासुद्धा त्याचे वागणे खटकले होते.'

 इ.कदमांचा मार्गच खुंटला.हाता तोंडाशी आलेला घास गेल्यासारखे झाले.तरी त्यांनी हिंमत सोडली नाही.ते प्रत्येक शक्यता पडताळून पहात होते.आणि एक दिवस....

 'सर मी लालचंद बोलतोय',इ.कदमांचा खबरी बोलत होता.'बोल लालचंद, काय बातमी आहे?'

 'सर, मी एका टपरीवर चहा प्यायला गेलो होतो तर त्याच्या हॉटेलात नवाकोरा फ्रिज दिसला.मालकाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की तो त्याला तो फार स्वस्तात मिळाला.फ्रिजच्या मालकाला अचानक पाच वर्षांसाठी परदेशात जावं लागणार आहे म्हणून त्याने विकला.मी त्या फ्रिजचा फोटो काढून तुम्हाला तो पाठवतोय.आणि दुसरी बातमी म्हणजे त्याला एक मोठा फ्लॅट स्क्रीन टी.व्ही.सुद्धा स्वस्तात विकणार आहे.आज रात्रीच.'

 

लालचंदने फ्रिजचा फोटो मोबाईल वर पाठवून दिला.इ.कदमांनी ताबडतोब तो फोटो शांतीनगर मधील कोपरकरांना पाठवून 'तुमचा हाच फ्रिज चोरीला गेला होता का अशी विचारणा केली.'हो'असे उलटपावली उत्तर आले. इ.कदमांच्या अंगात आता उत्साह संचारला.त्यांनी लालचंद कडून त्या हॉटेलमालकाच्या घराचा पत्ता घेतला आणि त्यांच्या टीमसह घराच्या आसपास दबा धरुन बसले.

 

हॉटेलमालक रात्री उशिरा घरी आला आणि थोड्याच वेळात एक टेंपो येऊन उभा राहिला.त्याच्या मागच्या भागात भाजीच्या क्रेटस् ची चळत उभी होती.ती चळत बाजूला सारून एक तरुण खाली उतरला.दुसऱ्याने एक टी.व्ही. सरकवत पुढे आणला.तोपर्यंत टेंपोचा ड्रायव्हर मागे आला आणि टी.व्ही.उचलून तिघेही घरात शिरले.इ.कदमांनी सूचना दिल्या प्रमाणे सर्व टीम शांत होती.कारण आताच जर पुढे गेले असते तर त्यांना पाहून चोरट्यांनी टी.व्ही.खाली टाकून पळण्याचा प्रयत्न केला असता आणि त्यामुळे टी.व्ही.फुटला असता.

 

अर्ध्या तासाने ते तिघे बाहेर आले.इ.कदमांनी हाक मारली,'अरे भूपत',तसे तिघेजण दचकून जागीच उभे राहिले आणि क्षणार्धात पळायला लागले.पण त्यांनां पकडायला पोलिसांची टीम सज्ज होतीच.थोड्याच अवधीत पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांची गाडी पोलिस स्टेशनच्या दिशेने धावू लागली. तिघांचेही चेहरे भितीने पांढरेफटक पडले होते

 

इ.कदम त्यांच्यासमोर खुर्चीवर बसले.'पटापट तुमचं नाव आणि गुन्हा कसा केलात याची सविस्तर माहिती सांगा.जर टाळाटाळ केलीत तर पोलिसी खाक्या दाखवू.'इ.कदमांचं व्यक्तिमत्त्वच असं होतं की त्यांच्या जरबेला घाबरून गुन्हेगार पोपटासारखं बोलू लागत.हे तिघेही आधीच गर्भगळीत झाले होते की त्यांना बोलतं करण्यास मुळीच वेळ लागला नाही.'साहेब, मी भूपत आणि हे माझे भाऊ श्रीपत आणि संपत.गेली काही वर्ष मी इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात मेकॅनिकचे काम करत होतो.


श्रीपत भाजीच्या टेंपो वर ड्रायव्हर आणि संपत कपड्यांच्या दुकानात नोकरीला होता.''याच गावात?',इ.कदमांनी त्याचे बोलणे मध्येच तोडत विचारले.'नाही साहेब, इथून दोनशे किलोमीटरवर भोपरखेड आहे तिथे आम्ही रहातो.'बरंपुढे सांग,'इ.कदमांनी आदेश दिला.'आमची मिळकत फारच तुटपुंजी होती म्हणून मी नोकरीच्या शोधात इथे आलो आणि इथली समृद्धी, बंगल्यांची वसाहत पाहून एखादा डल्ला मारुन,डबोले घेऊन पसार होण्याची कल्पना माझ्या मनात आली आणि मी या दोघा भावांना येथे बोलावून घेतले.तेसुद्धा सततच्या आर्थिक तंगीस कंटाळले होतेच त्यामुळे पटकन तयार झाले.मग मी 'अजय सेल्स'मध्ये नोकरीस लागलो.चोरी करण्यास सोयिस्कर जागा शोधण्यासाठी संपतला फुगेवाला बनवून टेहळणीसाठी पाठवू लागलो.चोरीसाठी बंगल्यांची वसाहत सोपी पडते कारण घरं सुटी सुटी असल्याने वसतीसुद्धा कमी असते.कोणी बंगलेवाल्यांनी दुकानातून खरेदी केल्यास मेकॅनिक म्हणून मी जात असे आणि बंगल्यांची आतून रचना कशी आहे ते पाहून येत असे.उरलेल्या बंद बंगल्यांवर संपत पाळत ठेवत असे.मात्र आम्ही ठरवलं होतं की फक्त बंद बंगल्यामध्येच चोरी करावयाची.'

 'आणि श्रीपत?'इ.कदमांनी विचारले.'तो एका भाजी व्यापाऱ्याकडे टेंपो ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागला.चोरीच्या दिवशी काहीतरी सबब सांगून रात्रभर टेंपो आमच्या कडेच ठेवला होता.'

'बरं पुढे सांग.शांतीनगरमध्ये चोरी केल्यावर चारच दिवसांनी विसपुते सराफांकडे चोरी कशी काय केलीत?कारण त्यांचे घर फक्त एकच रात्र बंद होते!'

 'साहेब, मी त्यांच्या कडे टी.व्ही.आणि वॉशिंग मशीनची डिलिव्हरी द्यायला गेलो तेव्हा तेव्हा त्यांचा मुलगा फोनवर कोणाला तरी सांगत होता की सगळे जण लग्नासाठी आधीच येतील पण मी मात्र संध्याकाळी निघून सकाळी लग्नाला हजर राहीन म्हणून.बोलता बोलता त्याने‌ जो वार सांगितला तो मी लक्षात ठेवला.संपतला पाळत ठेवण्यास सांगितले.विसपुत्यांचा मुलगा प्रवासी बॅग घेऊन बाहेर पडलेला पाहिला आणि त्या रात्री आम्ही विसपुत्यांकडे चोरी केली.

 'काय रे संपत,फुगेवाला बनून फिरत होतास तेव्हा चेहराभर दाढी मिशा होत्या आणि आता एकदम सफाचट?'

 'साहेब, कोणी ओळखू नये म्हणून मी खोट्या दाढी मिशा लावून फिरत होतो.'

 'चला,चोरीचा माल कुठे ठेवला आहे ते दाखवायला.'इ.कदम उभे रहात म्हणाले.'पाटील पंचांना फोन करा

 चोरीच्या वस्तूंचा पंचनामा करायचा आहे म्हणावं.सुभान, गाडी काढ.'इ.कदमांनी एका दमात ऑर्डर्स दिल्या.

 

मार्केट यार्ड जवळील एका चाळीजवळ गाडी पोहोचली.मध्यरात्रीची वेळ असल्याने सर्वत्र शांतता होती.भूपतने पुढे होऊन खोलीचे कुलूप उघडले. इ. कदमांची सर्वप्रथम नजर गेली ती कोपऱ्यात उभ्या असलेल्या टी.व्ही.आणि वॉशिंग मशीनकडे.पोलिस टीम खोलीची झडती घेऊ लागली.माळ्यावर बांधून ठेवलेल्या बोचक्यात चांदीची भांडी आणि दागिने होते तर एक डबा नोटांनी गच्च भरला होता.एका कोनाड्यात संपतची खोटी दाढी मिशी सापडली.ती पण जप्त केली.पुरावा म्हणून कोर्टात केस उभी रहाताना तिचा उपयोग होणार होता. सर्व वस्तूंचा पंचनामा करून त्या वस्तूंसह टीम गुन्हेगारांना घेऊन पोलिस स्टेशनमध्ये परतली तेव्हा पहाट होत आली होती.

 'अजय सेल्स'चे मालक आणि मॅनेजर पोलिस स्टेशनमध्ये अधीरतेने त्यांची वाट पहात बसले होते.त्यांना पहाताच भूपतने मान खाली घातली.

 'भूपत, अरे काय करुन बसलास हे?अरे तुझे कामातील कसब बघून मी आपणहून तुला पगारवाढ देणार होतो, तुला नोकरीत कायम करणार होतो.अरे हिसकावून घेणाऱ्याचे कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही.तू सगळ्यात मोठा भाऊ होतास,'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' या संतवचनाच्या अगदी उलट शिकवलंस की रे आपल्या धाकट्या भावांना!',भावनावेगाने त्यांना पुढे बोलवेना.'मला माफ करा मालक,'एव्हढेच शब्द भूपत उच्चारु शकला.

 सकाळी वार्ताहर परिषद घेऊन गुन्ह्यांचा छडा लागला आहे असे जाहीर करण्यासाठी मुद्दे काढण्यात इ.कदम मग्न झाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime