एक प्रेम असेही...
एक प्रेम असेही...
सिध्दी ही शहरात राहणारी श्रीमंत मुलगी. तिच्या आईचं माहेर हे एका छोट्याशा गावातील होते. ते गाव खुप छान आणि निसर्गसौंदर्याने नटलेले होते. सिध्दीला मामाच्या गावाला जायची दरवर्षीच खुप ओढ असायची. तिथे सर्व लोक शेती करायचे. गावात सगळीकडे शेतेच होती. सिध्दी आता काॅलेज शिकत होती. आई व ती मामाच्या गावी एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले असता, सिध्दीला तिथेच राहायचे होते. आईही तिच्यासोबत थांबली, पण तिला सर्वच सुट्ट्या इथेच गावी enjoy करायच्या होत्या. तिच्या मामाची मुलगी प्रियाही तिच्या एवढीच... दोघींमध्ये छान मैत्रीचं नातं होत.
आईने सिध्दीला प्रियाच्या सोबत ठेवलं. तिही छान आनंदाने राहू लागली. तिथे ती एका मुलाला दहावीपासुन ओळखत होती. तेव्हा त्यांची खुप मैत्री होती. त्याचं नाव किरण. त्याने बारावी पुर्ण करुन तो शेती करू लागला. वडील सारखे आजारी असायचे, त्यामुळे त्यांना शेतीमध्ये काम करणे अशक्य होते. जमिन खुप होती. म्हणुन किरणने शाळा सोडली आणि शेतीची सर्व जबाबदारी त्याने आपल्याकडे घेतली.
सिध्दीला गावात अजुन मैत्रिणी मिळाल्या होत्या. सिध्दी आणि प्रिया रोजच स्कुटीवरून फेरफटका मारुन यायच्या. सिध्दीला शेतात फिरायला खुप आवडायचं. ती आवडीने मामाच्या शेतात जायची. निसर्ग पाहायला तिला खुप आवडायचं. तिला गावाकडचं जीवन खुप छान वाटत होतं. ती तिथेच रमली होती. प्रियाही तिचे खुप लाड करायची.
सिध्दी आणि प्रिया किरणच्या शेतातुन चालल्या होत्या. तिकडेच त्यांची मैत्रीण राहायची. तेवढ्यात सिध्दीचं लक्ष पेरूंच्या झाडांकडे जातं. तिला पेरू खायचा मोह आवरत नाही. अगं असं कसं ना... तोडणार.
प्रिया - सिध्दी थांब... मी बघते कुणी आहे का इथे.
किरण तिथेच असतो. तो तिच बोलणं ऐकतो नि त्यांच्यासमोर पाच - सहा पेरू त्यांना देतो, खाउन तर बघा की पेरू... खुप गोड आहेत. तो पेरू देऊन निघून गेला. सिध्दीला किरण ओळखत होता, ती त्याला आवडायची पण ती शहरातील होती, म्हणून तो कमी बोलायचा. ती काही बोलेल याची त्याला भिती असायची. पण असं काहीच नव्हतं. सिध्दीला तर किरण मनापासुन आवडत होता. ती त्याला नेहमी शेतात काम करताना बघायची.
सिध्दी प्रियाला सहजच म्हणते... प्रिया... हा किरण किती मोठ्या मनाचा आहे ना !
प्रिया - हो पण शेतकरी आहे. त्याने काॅलेज सोडलंय बारावीनंतर आणि शेती करतोय आता.
सिध्दी - अगं मग त्यात वाईट काय आहे. शेतीचं काम काही सोपं नाही. त्यालाही खुप मेहनत घ्यावी लागते. विचार कर ना ! शेतकरी शेती करतो... धान्य पिकवतो... तेव्हाच तर आपण जगु शकतो ना... शेतकर्याला कमी नाही समजायचं... तुला माहीत आहे का ? आपल्या देशात एकच इंडस्ट्री अशी आहे. ती थांबली तर संपूर्ण जग थांबेल... म्हणजे... शेती... जगाचा पोशिंदा... शेतकरी राजा...
प्रिया - तुला काय 'शेतकर्याशी लग्न' करायचं की काय ?? खुपच शेतीविषयी आवड दिसते.
सिध्दी - त्यात काय करील मी...
प्रिया - ये सिध्दी.... तू एवढी शहरात राहतेस. चांगली शिकली आणि नोकरीही लागेल तुला. अन् तू काय शेतकर्याशी लग्न करायचं स्वप्न बघते वेडे... अरे तुझ्यासाठी तर मुलांची लाईन लागेन... हे गावाकडचं वगैरे स्वप्न सोड...
सिध्दी - प्रिया , जाऊ दे तुला नाही कळणार... सिध्दीला गावाचं वातावरण खुप आवडायचं. ती रमुन जायची इकडे. जेव्हाही सिध्दी गावी यायची तेव्हा ती किरणला बोलायची. त्याला नेहमी ती बघत राहायची. किरण सिध्दी बोलली तर बोलायचा. त्यांची मैत्री होती. तरीही किरण सिध्दीला बोलायला घाबरायचा. कितीही केल तरी ती शहरातील मुलगी... त्याचंही तिच्यावर प्रेम होतं. ती त्याला आवडत होती. दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले ते त्यांना समजलंच नाही. प्रिया नेहमी सोबत असायची, म्हणून किरण दिसला तरी सिध्दीला त्याला बोलता येत नसे. ती त्याला स्माईल करायची. त्यालाही छान वाटायचं. दोघेही एकमेकांची विचारपुस करायचे. सिध्दी आपल्या घरी जाईल म्हणुन तिने किरणला आपला नंबर दिला होता.
किरण खुप साधा नि सरळ स्वभावाचा मुलगा होता. तो सिध्दीचा खुप आदर करायचा. ती आपल्या घरी आली. काॅलेज सुरू होईल म्हणुन, पण तिला किरणची खुप आठवण यायची. सिध्दीचा सगळा वेळ काॅलेज आणि क्लास यामध्ये जायचा. किरण खुप घाबरायचा. तो तिच्या घरी तिला कुणी बोलू नये म्हणुन काॅल करत नव्हता. सिध्दीला त्याची आठवण आली की तीच त्याला काॅल करायची मग तो बोलायचा. तो दिवसभर कामात असायचा. त्यामुळे सिध्दी त्याला कधीतरीच काॅल करायची. पण त्याला तिचा काॅल आला की छान वाटायचं.
एक दिवस सहज बोलता बोलता सिध्दी किरणला सहजच म्हणाली.... तुझं माझ्यावर प्रेम आहे ना... तुला मी आवडते... मग लग्न करशील का माझ्याशी ??
किरण - मी लग्न करायला करेल गं तुझ्याशी, पण तुझ्या घरचे कसे तयार होतील आपल्या लग्नाला... मी एक साधा शेतकरी आहे. तु शहरातील आहेस. तुझे बाबा नोकरीला आहेत.
सिध्दी - शेतकरी असल्याने काय होतं मग ?
किरण - हे कस शक्य आहे. तुझ्या घरचे विरोध करतील. जी स्वप्न पूर्ण होणार नाहीत, ती न पाहिलेली बरी...
सिध्दी - गप्प बस... काही सांगु नको... मी तुझं मन ओळखते ना, तेवढं पुरेसं आहे मला... अन् तू शेतकरी आहेस म्हणून काय झालं... हे पण नोकरीपेक्षा कमी नाही. स्वतःला असं कमी समजू नको...
सिध्दीचं शिक्षण पूर्ण झालं. तिचे आईबाबा तिच्यासाठी लग्नासाठी मुले बघू लागली. तिच्या बाबांचं म्हणणं होत की 'मुलगा चांगला शिकलेला आणि नोकरी करणारा असावा, वेलसेटल्ड असावा. थोडक्यात आपल्या बरोबरीचा असावा...'
तेव्हाच सिध्दीने मला किरणशी लग्न करायचं आहे, हे आपल्या आईबाबांना बोलून दाखवलं. कारण तिला श्रीमंत मुलापेक्षा समजुन घेणारा आणि आपल्यावर मनापासुन प्रेम करणारा हवा होता. तिच्या आणि आईबाबांच्या विचारांत तफावत होती. सिध्दीला श्रीमंतीपेक्षा सुखी असणं जास्त महत्वाचं वाटत होतं. ते ती किरणसोबत राहू शकते हे तिला वाटत होतं. सिध्दीच्या या बोलण्याने आईबाबा दोघेही चिडले.
"सिध्दी तु आमची एकुलती एक मुलगी आहेस आणि असा जर शेतकरी जावई केल्यावर लोक काय म्हणतील ? हा विचार केला का ? अन् किरण मध्ये काय पाहुन तु त्याच्याशी लग्न करणार आहेस. गावात राहणारा साधा शेतकरी आणि शिक्षण तरी आहे का त्याचं एवढं आणि तू त्याच्याशी लग्न करायचं म्हणते.
आईही सिध्दीला खुप बोलली आणि सांगितलं त्याचा विचार करणं सोडून दे. त्यांना शेतकरी जावई नको होता. पण ते त्यांच्या मुलीचं मन ओळखु शकले नव्हते. त्यांना श्रीमंती, स्टेटस, परिस्थिती, घराणं महत्वाचं वाटत होत. तिचे बाबा तिला म्हणाले, लग्न म्हणजे खेळ नाही बेटा...
बिचारी सिध्दी सर्व ऐकून घेत होती... अगं... शेतकरी म्हटल्यावर तुला शेतात कामाला जावं लागेल. काय भवितव्य आहे सांग ना ? तुला कसं सांभाळणार तो... तुझी स्वप्न, तुझ्या इच्छा... तुला जे पाहीजे ते सगळं आणून देऊ शकतो का ?
सिध्दी - बाबा, माझी आहे ना तयारी... मी सगळं समजुन घेऊ शकते. मी त्याच्या बरोबर सुखी राहू शकेल हे माझं मन सांगतंय मला.
जो शेतकरी सगळ्या जगाला पोसु शकतो... तो मला का नाही सांभाळू शकत... जो सगळ्यांच्या गरजा शेतीतुन भागावु शकतो... तर माझाही विचार करुच शकतो ना....
बाबा तिच बोलणं ऐकून शांत बसले होते. पण आईनं स्थळ बघण्याचं चालू केलं होतं. तिचे बाबा एक दिवस घरी येतात. ते खुप चिंतेत असतात, दडपणाखाली होते. आईलाही कळत नव्हतं की काय झालंय नेमकं, ते काहीच बोलत नव्हते. त्यांना कुणीतरी फसवलं होते. त्यांचे पैसे सर्वच गेले होते. त्यांना पाच लाख रूपये लागत होते. अर्जंट होते. तर एवढी मोठी रक्कम एका दिवसात कुठुन देणार हा त्यांच्यापुढे खरा प्रश्न होता... आईबाबा दोघेही दडपणाखाली होते. आईने मामांना विचारलं पण त्यांना एवढी रक्कम एका दिवसात जमवणं शक्य नव्हतं. सिध्दीकडे थोडे जमा केलेले आणि आईकडची सेव्हींग्ज मिळुन दोन लाखांची सोय झाली होती. पण अजुन तीन लाख कोण देणार ?
बाबांचा चेहरा आणि टेन्शन सिध्दीला बघवत नव्हत. तिला काही सुचत नव्हत. तिने रात्रीच किरणला फोन केला... त्याने लगेच फोन उचलला... "बोल ना सिध्दी... तू इतक्या रात्री काॅल केला... सगळं ठीक आहे ना घरी.." तिला रडूच आवरल नाही. तिने बाबांना पैसे लागतात... तिने सगळं कसंबसं त्याला सांगून टाकलं. तिने सांगितलं की पाच लाख रूपये बाबांना उद्याच लागतात... खुप अर्जंट आहे. आमच्या जवळ फक्त दोन लाख आहेत. तु मला मदत करू शकशील का ? म्हणजे मला तुला सांगायलाही कसंतरी वाटतंय... एवढी मोठी रक्कम एका दिवसात कसं जमवणार...
किरण - सिध्दी तू आधी शांत हो. मी बघतो उद्या सकाळीच... तू टेन्शन घेऊ नको... तू कुठे यायचं तेवढं सांगुन ठेव. ती त्याला तिच्या घरीच बोलवते. रात्रभर तिच्या आईबाबांच्या डोळ्याला झोप लागत नव्हती.
किरणला तिच रडणं ऐकून खुप वाईट वाटलं. तो त्याच्या कपाटात बघतो तर आजच त्याने कामासाठी एक लाख रूपये काढले होते. इतक्या सकाळी तर बँका उघडत नाही, उद्या नेमका रविवार आला. त्याने त्याच्या शेतकरी मित्राकडून पैसे घेतले. अशी तीन लाखाची रक्कम घेऊन तो तिच्या घरी पोहोचला. किरण आला सिध्दीला बरं वाटलं. तिची आई आणि बाबा त्याच्याकडेच आश्चर्याने पाहत होते.
मी इथे कसा आलो ते सांगतो, सिध्दीनेच मला सांगितलं होतं काही मदत पाहिजे म्हणुन तर त्यासाठीच आलो आहे.
तिच्या आईचे तर डोळे भरून येतात. काय बोलावं त्यांना कळत नव्हतं.
तुम्ही काळजी करू नका. बाबा, मी पैशाची रक्कम सोबत आणली आहे. हे घ्या... आईकडे त्याने पैसे देऊन टाकले. त्यांना स्वतःचीच लाज वाटली. आपण शेतकर्याला कमी समजत होतो. किरणशी कुठलंच नातं नसताना त्याने ‘माणुसकीच्या नात्याने एवढी मोठी रक्कम एका दिवसात उभी केली’ ही फार मोठी गोष्ट होती. त्याचं मन किती मोठंय हे दोघांनाही कळलं होतं. बाबांनी सिध्दीला चहा करायला सांगितला. आईबाबांनी त्याने दिलेली मदत स्वीकारली आणि किरणलाही 'आपला जावई’ म्हणून स्वीकारला. त्यांना शेतकर्याची खरी किंमत कळली होती, वेळेनेच दाखवून दिलं.
एक शेतकरी वेळेला काय करू शकतो हेही समजलं होतं... आपल्या मुलीसाठी असा जावई शोधुनही सापडणार नाही, त्यांची खात्री पटली की किरण नक्की सिध्दीला सुखी ठेवू शकतो. आपल्या मुलीच्या सुखापेक्षा एका आईवडीलांना अजुन काय महत्वाचं असतं ? ते किरण आणि सिध्दीच्या लग्नाला होकार देतात.
शेतकर्याला कधीच नाव ठेवू नका आणि कमी समजू नका ! शेतकरी अख्या जगाला सांभाळतो. शेतकर्यामुळे आपण सुखाने जगु शकतो. शेतकरी पिकवतो तेव्हाच आपण सुखाने दोन घास खाऊ शकतो.
"शेतकरी सुखी तर जग सुखी..."

