एक निर्णय असाही
एक निर्णय असाही


ओंकार आणि गार्गी दिल्लीच्या विधी महाविद्यालयात शिकत होते.दोघे पुण्याचे,सुखवस्तू घरातले,आवडी निवडी जुळल्या . साहजिकच सहवास वाढला. विसाव्या वर्षापासून दोघांचे संबंध पण यायला लागले, ज्यात त्यांना काही वावग वाटत नव्हत . ना कसल्या आण भाका , ना जबाबदारी. पुढे कदाचित दोघांचे मार्ग वेगळे होतील याचीही त्यांना कल्पना होती. पण आला दिवस आपला मानणारे ओंकार आणि गार्गी हळू हळू प्रेमातही पडत होते. पुढे ओंकार बंगलोर ला फायनान्स मधे आणि गार्गी मुंबईला इकोनोमिक्स मधे मास्टर्स करायला गेले ,तरी गाठी भेटी होताच राहिल्या.दोघांच्याही आयुष्यात अधे मधे काही नवी प्यादी येऊन गेली .पण ती पुढे न सरकल्याने त्यांना काटशह मिळाला . जेव्हा घरून लग्नाची विचारणा होऊ लागली, तेव्हा मात्र आपणच का करू नये एकमेकांशी लग्न , असा विचार करून दोघांनी आपापल्या घरी सांगितलं. गार्गी च्या आईला अंदाज होताच . नाही म्हणण्यासारख काहीच नसल्याने धूम धडाक्यात लग्न झालं.अगदी पारंपारिक पद्धतीने .आहेर, रुखवत, सूनमुख , सप्तपदी सगळ . ही सुद्धा एक ईवेन्टच. सगळ्याचाच सोहळा नि उत्सव . गार्गीला आणि ओंकार ला गलेलठ्ठ पगार होते, गुरगाव ला गार्गीला कंपनीचा फ्लॅट होता . ओंकार ने गुरगाव ला ट्रान्स्फर घेतली . दोघेच राजा राणी .भरपूर काम, कंपनीसाठी टूरिंग , फावल्या वेळात मित्र मैत्रिणी , पार्ट्या ...दोघांना हव तस यशस्वी आणि वेगवान करीयर चालल होते दोघांचं. अधे मधे एखाद्याच्या घरातून पेढ्यांसाठी विचारणा होई .पण दोघेही मनावर घेत नव्हते.
एकदा पुण्याला आईला भेटायला गेली असताना गार्गीला धो धो ब्लीडींग झालं. चेक अप ,सोनोग्राफी , औषध ..सगळ पार पडल. निदान झालं –गर्भाशयात गाठी , त्यातली एक गाठ आतल्या अस्तरात वेडी वाकडी पसरली होती. डॉक्टरांनी धोक्याचा कंदील दाखवला. गर्भाशयाच्या पिशवीला धोका पोहचण्याचा संभव होता . गार्गीच्या आईच्या हृदयात धस्स झालं. तिन चांगलच खडसावलं गार्गीला.” अग, विचार काय आहे तुमचा? वय उलटून चाललंय . आता ३७ पुरी होतील तुला .मूल नकोय का तुम्हाला? काही गोष्टी वेळेवर व्हायला हव्यात गार्गी.इतकही स्वातंत्र्य काय कामाचं, ज्यात कोणतच बंधन नसत. त्यात ओंकार ला बी पी आणि डायबेटीस . काय करणार आहात इतक्या पैशाच ? त्या पैशांचाही कंटाळा येईल आता. “
“अगदीच चुकत नाहीये आईच .लेट्स प्लान प्रेग्नन्सी ओंकार.” तो ही हो म्हणाला . तपासण्या झाल्या. ओंकार चा स्पर्मकाउंट शून्य आणि गार्गीची गर्भबीज संपल्यात जमा, त्यातून गर्भाशयाच्या आतल्या त्वचेवर मोठी गाठ .गार्गीला . गार्गीच ऑपरेशन झालं . पण अकाली गर्भाशयातील स्त्रीबीजांची संख्या शून्यात त्यामुळे नैसर्गिक प्रेग्नन्सी राहू शकणार नाही म्हणाले डॉक्टर. स्त्री बीज आणि पुरूषबीज दोन्ही उसने घेऊन आय वी एफ कराव लागेल म्हणाले डॉक्टर.
शॉक होता दोघांनाही. कोणीच कोणाला दोष देत नव्हत . हल्ली मनातून दोघांनाही बेडरूम लाईफ चा कंटाळा यायला लागला होता. पार्ट्या , फ्रेंड सर्कल सवयीच झालं होत. मग इतर जोडप्यामध्ये संसारातली गम्मत का टिकून रहाते? ती हावरेपणाने न ओरबाडल्यामुळे? का मूल जन्माला घातल्याने सेतू बांधला जातो आपोआप ? दोघेही मन मोकळ करत होते. आपणही उसन मूल जन्माला घालायचं? मूल हा आपला एक भाग असला पाहिजे ना? आपली गुणसूत्र मिरवणारी आपल्या राक्तामासाची आणखी एक व्यक्ति . मुलांना न्हाऊ माखू घालून, त्यांच्यासाठी खस्ता काढूनच होईन का मी आई? अशी पण होतेच ना रे मी तुझी आई...तू नर्व्हस होतोस, निर्णय घेऊ शकत नाहीस, तेव्हा लहान मूल होउन माझ्याच कुशीत शिरतोस ना? मला जेव्हा आधार लागतो , तेव्हा पुरता माझा बाबा होतोस ना तू ? अस कोणाच तरी बीज घ्यायचं , कसं असेल, आपल्या बौद्धिक कुवतीला साजेसं असेल का? काही अनुवांशिक दोष असले तर त्याच्यात तर?, जे टेस्ट मध्ये कळणार नाहीत. आय वी एफ कधी यशस्वी होईल माहित नाही. या वयात झेपेल का मूल वाढवण ? अस सुद्धा मूल जन्माला येताना काही अपघात होउन प्रोब्लेम्स होऊच शकतात , पण ते मूल तरी आपल असत ना. हे विकतच दुखण घ्यायची माझी तयारी नाहीये. नाही न्याय देऊ शकलो या जबाबदारीला तर? ओंकारलाही पटत होत तिचं म्हणण. ओंकार म्हणाला , आणि म्हातारपणी काठी व्हायला कितीशी मुल आई बापाजवळ राहतात? आपण अनाथाश्रमालाला पैसे देऊन , काही मुलाचं शिक्षण स्पोन्सर करू शकतो . एकमेकांची सोबत करू शकतो. मुलाचा विचार आपण उशीरा केला , ही चूक झाली खरी ,पण अजिबात आपलं नसलेलं मूल लादून घेऊन दुसरी चूक नको करूया. चूक ..बरोबर कसाही असला तरी तो आपला निर्णय आहे. आणि ओंकारने शांत मनाने गार्गीचा हात घट्ट धरला.