एक होती कांचन - ६
एक होती कांचन - ६
रामपूर! पंकजचं आजोळ. एक सुखी, संपन्न खेडेगाव. छोटंसंच टुमदार गाव. लोकसंख्याही जास्त नव्हती. पण जी होती ती सर्व समावेशक होती. अठरा पगड जाती, बारा बलुतेदार, रंक, राव, सर्वजण गुण्या गोविंदाने नांदत असत.
अशा या गावात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले. त्यामुळे गावात गट, तट निर्माण झाले. प्रत्येक जण आपण कसे निवडून येऊ शकतो?, किती मते मिळवू शकतो, याचे गणित मांडू लागला. निवडून येऊन गावचा प्रमुख होण्याची महत्त्वाकांक्षा ऊरी बाळगून प्रत्येक जण आपापल्या परीने निवडणुकीची तयारी करत होता.
भीमराव पाटील! असंच एक महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्व होतं. थोडंसं अभिमानी, 'मी' पणा रोमारोमात ठासून भरलेला. त्यांनाही निवडणुकीला उभे राहण्याची इच्छा झाली. नशीब अजमावून बघण्यासाठी त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरला.
चांगल्या गोष्टी आत्मसात करायला युगानुयुगे लागतात. तर वाईट गोष्टींना आत्मसात करावे लागत नाही. त्या आपोआप येऊन चिकटतात. फुकटचं काही मिळतं म्हटल्यावर बऱ्यावाईटाचा कोणी विचार करत नाही. काही दिवसातच वाईट व्यसनं माणसाला घेराव घालतात. रामपूर मध्येही तेच घडलं. ग्रामपंचायतीची निवडणूक बऱ्याच बाबतीत गाजली. संत गाडगेबाबांच्या करकमलानं, पदस्पर्शाने पावन झालेल्या या पावन भूमीत दारूच्या पाण्यातील राक्षसाने धुमाकूळ घातला. प्रत्येक उमेदवारा तर्फे मतदारांना मोफत दारू मिळू लागली. पोटच्या पोराला खाऊसाठी पैसे देताना दहा वेळा विचार करणारा उमेदवार सुद्धा हजारो रुपये पार्ट्यांमध्ये खर्ची घालत होता. गावात दररोज कोंबड्यांचे बळी जाऊ लागले बाटल्यांवर बाटल्या फुटू लागल्या. निवडणुकीचे डावपेच रंगू लागले. भोळ्या भाबड्या मतदारांना शपथांच्या बेडीत अडकले जाऊ लागलं. निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसे गावातील वातावरण गढूळ होऊ लागलं. एकमेकांविषयी मनं कलुषित होऊ लागली. एकमेकांच्या घरादारांची राखरांगोळी करण्यासाठी आणाभाका घेतल्या जाऊ लागल्या. या निवडणुकीनं जन्मोजन्मीच्या गाठी निर्माण केल्या.
निवडणूक वाजत-गाजत आली. धुरळा उडवत आली. तशी वाजत-गाजत निघून गेली. विजयी उमेदवारांचे मिरवणुकीने वातावरण दुमदुमले. त्यातल्या त्यात आबांची(भीमराव पाटलांची) निवडणूक फारच गाजली. प्रत्येक विरोधी उमेदवाराच्या दारावर एक एक तास थांबून ढोल ताशे बडविले गेले. घोषणाबाजी झाली आणि इथेच घराघरात द्वेषाचं बीज पेरलं गेलं.
एक दिवस भीमराव पाटील, बाजीराव पाटील यांचा वंशच बुडणार होता. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. कुटुंबाच्या वंशाचा दिवा ग्रासण्यासाठी आलेल्या काळाला, कांचननं मोठ्या अक्कलहुशारीनं, खंबीरपणे परतवून लावलं होतं. भविष्य काळातील संकटांना समर्थपणे सामोरे जाण्याचे सामर्थ्य अंगी असल्याचं दाखवून दिलं होतं.
शाळा गावच्या बाहेर मैल भराच्या अंतरावर, दूर डोंगराच्या पायथ्याशी, रमणीय ठिकाणी होती. सर्व मुले मुली शाळेत जातांना जेवणाचे डबे सोबत घेऊन जात असत. काही विद्यार्थ्यांचे जेवण घरीच बाहेर ओसरीत ठेवलेलं असायचं. आबा, आप्पांच्या कुटुंबातील सर्व मंडळी शेती कामा साठी मळ्यात गेलेली होती. कांचन सहित सर्व शाळकरी भावंडे शाळेत गेलेले होते. त्यांच्या भाकरी एका फडक्यात बांधून ओसरीतील शिंक्यावर ठेवलेल्या होत्या. अशातच वैऱ्यानं डाव साधला. त्या भाकरीवर कुणी तरी कीटक नाशक टाकलं होतं.
मधल्या सुट्टीत सर्व भावंडं जेवणा साठी घरी आले. सर्व मुलांनी भाकरी सोडल्या आणि एका बाजूला जाऊन जेवायला बसली. कांचन आणि सुनंदा मात्र तेथेच ओसरीत भाकरी सोडून बसल्या.
"अगं बाई!" कांचन एकदम दचकली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव एका मागून एक बदलत गेले.
"का गं? काय झालं?" काहीच न समजून सुनंदा विचारती झाली.
"अगं सुने, भाकरीचा वास घेऊन बघ बरं, कुणीतरी औषध टाकलेले दिसतंय". भाकरीचा एक तुकडा तिने सुनंदाकडे दिला.
"होय गं! भाकरीला एंड्रीनचा वास येतोय. आता गं काय करायचं?" वास घेत सुनंदानं विचारलं.
"थांब! भाकरी खाऊ नकोस. मी आत्ता येते." ती धावत पळत निघाली.
तिनं पळत जाऊन भावंडांना गाठलं. त्यांनी भाकरी सोडल्या होत्या. शाळेत शिकवलेला, जेवतांना म्हणावयाचा श्लोक ते म्हणत होते.
"वदनी केवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे......."
"भाऊ भाऊ, थांबा भाकरी खाऊ नका". कांचननं आदेश वजा सूचना केली. पळत आल्या मुळे तिला धाप लागली होती.
"का बरं?" सर्वांनी एकमुखानं विचारलं.
"अरे भाकरी वर औषध टाकलंय कुणी तरी. वास येतोय भाकरीचा."
"छे! तुझं आपलं नेहमीच काही तरी वेगळं असतं. आपण काय कुणाचा घोडं मारलं? म्हणून कुणी आपल्याला औषध खायला घालणार? आम्हाला तर काही वास वगैरे येत नाही.
"भाऊ, मी काय खोटं बोलतेय का? तू जरा नीट वास घेऊन बघ."
"अगं, पण मला खूप भूक लागली आहे. शिवाय आता घरही उघडं नाही मग आम्ही खायचं काय?" रडवेल्या चेहऱ्याचा प्रश्न.
"आजचा दिवस काही नाही खाल्लंस तर मरणार नाहीस काही. एक दिवस उपाशी रहायला जाणार नाही का?"
"जमेल ना. न जमायला काय झालं? जाऊ द्या. आज आपण सर्वजण उपवास करू." पंकजचा तोडगा.
"मला नाही जमणार उपवास करायला. तुला रहायचं असेल तर रहा उपाशी. नाही तरी तुला सवय आहेच अर्धपोटी रहायची."
हेकेखोर प्रकाश ऐकायला तयार नव्हता. समोरच्याला कमी लेखायची सवय नेहमीचीच होती. आजही या गंभीर प्रसंगात सुद्धा त्यांनं पंकजचा पाणउतारा करायची संधी सोडली नव्हती. कांचनला पंकजचा अपमान सहन झाला नाही. ती रागानं लाल झाली होती. प्रकाश कडे खाऊ की गिळू नजरेने बघत होती. पंकज मात्र गप्प बसला होता. प्रकाशनं भाकरीचा एक तुकडा तोंडात घालण्यासाठी उचलला.
आता मात्र कांचनचा राग अनावर झाला होता. राग आणि भीतीचे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. "भाऊsss" म्हणून जोरात ओरडत, तिनं काही कळण्याच्या आत प्रकाशच्या मुस्काटात ठेवून दिली. त्याचं घास घेण्या साठी वासलेलं तोंड वासलेलंच राहीलं. तोंडाजवळ गेलेला भाकरीचा तुकडा खाली जाऊन पडला. सर्वजण तिच्या या चण्डिका अवताराकडे 'आ' वासून पाहत राहिले. तिने ताबडतोब त्यांच्या समोरील भाकरी उचलल्या अन् दूरवर नेऊन मातीत खोलवर पुरून टाकल्या. हेतू असा की, कुठल्याही प्राण्यांनी त्या विषयुक्त भाकरी उकरून खाऊ नये.
मुलं भुकेने व्याकूळ झालेली होती. कांचनच्या दोन्ही डोळ्यांना धारा लागलेल्या होत्या. एका डोळ्यात भावाला मारावं लागल्या बद्दल दुःख होते. तर दुसर्या डोळ्यात सर्वांना मरता मरता वाचवल्याबद्दल आनंदाश्रू.
'या प्रसंगातून तर सोडलं. पण या मुलांच्या जेवणाचं काय? यांना तर खूप भूक लागलेली आहे. वेळही कमी राहिलेला आहे.'
तिनं ताबडतोब निर्णय घेतला. सकाळी शाळेची फी भरण्यासाठी दिलेले दहा रुपये अद्याप तिच्या जवळच होते. तिने धावत पळत जाऊन, दुकानातून बिस्किटचे दोन-तीन पुडे आणले आणि सर्वांना खाऊ घातले. सर्वजण शाळेत परतले. संध्याकाळी सर्वजण शेतातून घरी आल्यानंतर त्यांना जेव्हा ही हकीकत कळली. तेव्हा सर्वांनी तिच्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं. सर्वांच्या तोंडी एकच वाक्य होतं,
'पोरगी वाणात नाही पण गुणात चांगली निघाली'.
