एक अनुभव
एक अनुभव


शिक्षक म्हटले की शेजारी नातेवाईक मित्र मंडळी एका वेगळ्या अपेक्षेने पाहतात.
आम्ही मुंबई सेंट्रल येथे राहात होतो. आमच्या शेजारी एक जैन कुटुंब रहात होते. अजूनही तेथेच राहतात. त्यांचा मुलगा त्यावेळी ८वी इंग्रजी माध्यमात शिकत होता. तो अजिबात अभ्यास करत नसे. परिक्षेवेळी बेंच वाजवायचा. शिक्षक त्याला वर्गाबाहेर काढत. परिणामी एक इयत्ता दोन वर्षांनी पास होत असे. पालक खूप त्रासले होते. त्याची आई माझ्या खूप मागे लागायची. मी मराठी माध्यमाची. शिक्षण मराठीत म्हणून मी तयार नव्हते. पण पालकांनी गयावया केल्यावर मी तयार झाले. पण पैसे नको सांगितले. कारण आपण कितपत त्याचा अभ्यास घेऊ याबद्दल मी साशंक होते. तसा तो आठवीत म्हटले तरी वयाने मोठा होता. अभ्यास येत नव्हता. बैठकीची सवय नाही. पण शांत होता. ऐकायचा. आठवीची मराठी माध्यमाची पुस्तके आणली. दोन्ही माध्यमाची पुस्तके समोर ठेवून शिकवायला सुरुवात केली. त्याला देवाच्या पाया पडण्यापासून, अभ्यासाची बैठक, मूळ पायापासून शिकवले. सराव पेपर घेतले. मराठी पेपरमध्ये तर तो चार ओळीदेखील लिहित नसे. मराठी निबंध धडे प्रथम चर्चा करून समजावत होते. गणित सूत्र संकल्पना स्पष्ट केल्या. त्याला समजेपर्यंत शिकवले. अगदी रात्री ११ पर्यंत बसत असे. हळूहळू त्याला अभ्यासाची आवड निर्माण झाली. तो मला चांगला प्रतिसाद देऊ लागला. जोपर्यंत मी उठ म्हणत नाही तोपर्यंत उठत नसे. फक्त एकच अडचण होती. ते जैन कांदा लसूण ही खात नव्हते आणि आम्ही कोकणी वाराला मासे चिकन असायचे. त्याला त्या वासाचा त्रास व्हायचा. मग आम्ही जेवण उशीरा बनवत असू. तेवढा वेळ तो घरी बसून होमवर्क करीत असे. सहामाही परिक्षा जवळ आली. बेंच न वाजवता तो सर्व पेपर सोडवून आला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद असे.
एकवीस दिवसांच्या सुट्टीनंतर शाळा सुरु झाली. आता पेपर मिळतील या आशेने आम्ही वाट पहात होतो. मला जास्त उत्कंठा होती. नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला. त्याच्या आईपेक्षाही मी त्याची वाट पहात होते. पण तो घरी आलाच नाही. त्याची आई म्हणाली " आता जर तो नापास असेल तर तो कदाचित घर सोडून जाईल असे मला वाटते." मी खूप घाबरले. एक क्षण उगाच मी ह्या फंदात पडले असे वाटले. आम्ही शाळेजवळ गेलो. तिथे कुणीच नव्हते. तेव्हा मोबाईल नव्हते. घरी आलो एक दोन मित्रांना फोन लावले. पण त्यांनी माहित नसल्याचे सांगितले.
माझे मिस्टर अनाजी आणि त्याचे बाबा जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवून आले.
रात्री उशीरा पोलीस त्याला घेऊन आले. चोरांनी पैशासाठी त्याला मारले होते. दप्तर फाटले होते. त्याला कुणीच काहीच बोलले नाही. सकाळी अंघोळ केल्यावर त्याला आम्ही विचारले त्याने जे सांगितले ते ऐकून आम्ही थक्क झालो. तो सर्व विषयात चांगला पास झाला होता. परंतू त्या शाळेतील शिक्षकांनी तू हे लिहूच शकत नाही तू कॉपी केलीस का अशी जबरदस्ती केली. त्याचे न ऐकता त्याचे सगळ्या पेपरमधील गुण कमी केले नापास दाखवले. त्यामुळे तो बिथरला व घर सोडून गेला. माझे मिस्टर त्याला घेऊन शाळेत गेले. मुख्याध्यापकांना भेटले मी त्याच्यासाठी घेतलेले कष्ट सांगितले. समोर प्रश्न टाकायला लावले त्याने उत्तर लिहून दाखवले मध्ये एकवीस दिवसांच्या सुट्टीनंतरही काही फरक नव्हता. शिक्षकांनी मान्य केले मग त्याची शिक्षणाची गाडी जी धावली ती बिएससीपर्यंत. आता तो बंगलोरला चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. लग्न झालंय. मुलगी आहे. त्याच्या पुढील आयुष्यासाठी माझे सदैव आशिर्वाद