दिल चाहता है..!
दिल चाहता है..!
साथी मनचाहा हो तो
कितना ही बडा सफर क्यूँ न हो
आसान लगता है...
दिल यही चाहता है की
ये सफर कभी खत्म ना हो...
आज श्रीशा च्या लग्नाचा तीसावा वाढदिवस होता. मिथीलेश ला यायला अजुन अवकाश होता अन् श्री लग्नाच्या वाढदिवसाच्या तयारी मधे गुंतली होती. फक्त दोघेच अन् घरीच हा आयुष्याचा सुंदर क्षण साजरा करायचा ठरवला होता दोघांनीही...!
सगळं उरकून अन् मिथिलेश ला आवडते तशी साऊथ इंडियन स्टाईल तयारी करून श्री त्याची वाट पाहत होती. त्याच्यासाठी सरप्राइज म्हणून घेतलेली डायमंड रिंग तिने एकदा नीट पाहून घेतली. तिच्या आयुष्यातल्या ह्या हिऱ्यासाठी यापेक्षा दुसरे चांगले गिफ्ट असूच शकत नव्हते तीच्यालेखी....!
एवढ्यात फोन ची रिंग वाजली . मिथीलेश चा फोन होता .कॉलेज मॅनेजमेंट ची मीटिंग लांबल्याने त्याला यायला अजून पाऊण तास उशीर होईल हे सांगायला त्याचा फोन होता.
आधीच तो लवकर यावा म्हणून वाट पाहात असलेली श्री त्याच्या निरोपाने थोडी हिरमुसली जरूर पण मग तशीच त्याची वाट बघता बघता अलगद तीस वर्षाआधी च्या काळात कधी जाऊन पोचली ते तिचं तिलाच कळलं नाही.
एकाच इंजिनीअरिंग कॉलेज ला लेक्चरर असलेले दोघेही. दोघांच्याही तशा फॅकल्टी वेगवेगळ्या. तसा या दोघांचाही काही संबंध यायचा प्रश्न नव्हताच पण हीची मैत्रीण त्याच्या डिपार्टमेंट ला असल्याने तिच्याशी मिथीलेश चा संपर्क यायचा. थोडा सावळा, नाकी डोळी नीटस,रुबाबदार मिशी असलेला तो अगदी साऊथ चा हीरो वाटणारा.....! आजकाल च्या इतर चॅप्टर पोरांसमोर त्याचा साधेपणा,त्याची निरागसता त्याच्या डोळ्यात झळकायची. ही स्वतः साऊथ ची असल्याने हिच्या मनात त्याच्याबद्दल अजूनच जवळीक निर्माण झाली....!
हिचं त्याच्याबद्दल आडून आडून विचारणं,त्याचं नाव घेतलं की खुश होणं ह्या सगळ्या गोष्टी मैत्रिणीच्या नजरेतून काही सुटल्या नाहीत . एक दिवस मैत्रिणीने फिरकी घेत हिला विचारलेच ," काय ग येता जाता आमच्या साऊथ इंडियन हीरो बद्दल विचारत असतेस,काय नेमका विचार काय आहे तुझा???"
तिच्या प्रश्नाचा राग यायच्या ऐवजी त्या प्रश्नाने हिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या अन् क्षणातच तो तिला आवडायला लागला आहे हे गुपित तिच्याजवळ बोलून ती मोकळी झाली.
"ए पण तो साऊथ इंडियन नाही हं ,चक्क महाराष्ट्रीयन आहे. आमची महाराष्ट्र एक्स्प्रेस जर दक्षिण एक्स्प्रेस ला चालणार असेल तर विचारून बघता येईल की!! काय मग विचारायचं का तुझ्या हीरोला??"
हो नाही करता करता श्री त्याला विचारायला तयार झाली होती. कारण समोरचा माणूस ओळखण्या इतकं सक्षम आणि परिपक्व वय तिचं होतंच. अन् एवढ्या शिक्षणानंतर अन् रोजगारासाठी केलेल्या स्ट्रगल मधूनही माणसं ओळखायला शिकली होती ती. अन् साऊथ इंडियन असली तरी ग्रॅज्युएशन अन् पोस्ट ग्रॅज्युएशन महाराष्ट्रातच केल्यामुळे मराठी आता तिला बऱ्यापैकी समजायला लागली होती.
मैत्रिणीने मिथीलेश जवळ श्री चा विषय काढत तिची खूप तारीफ केली होती आणि तिच्या प्रपोजल बद्दल सुद्धा त्याला सांगितलं होतं.
बुजऱ्या स्वभावाच्या मिथीलेश साठी हे सगळं शॉकिंग च होतं. प्रेम ,प्रपोज करणं वगैरे शब्द त्याच्या सध्या तरी शब्दकोशात नव्हतेच अन् सध्या तर फक्त डोळ्यासमोर जगण्याचा स्ट्रगल होता.
काय सांगावे हो की नाही त्याला कळत नव्हते पण तिच्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार अन् त्याच्या मित्राच्या सुद्धा सल्ल्यानुसार तो एकदा श्री ला भेटायला राजी झाला.
आज दोघेही एकमेकांना भेटायला उत्सुक होते. श्री ला याआधी त्याने पाहिले होते पण नजरेत तो दृष्टिकोन कधी नव्हताच. त्याच्या बुजऱ्या स्वभावानुसार हे तर त्याच्यासाठी अग्निदिव्य च होते. शेवटी दोघे एकमेकांसमोर आलेच. खूप गोरी नसलेली निमगोरी अन् साऊथ च्या मुलींसारखीच नाकिडोळी रेखीव श्री त्याला आवडली होती. त्याच्या बुजरा स्वभाव हेरून अगदी सहज संभाषण तिने सुरू केले होते. तिच्यातल्या त्या कौशल्याने दोघांचाबुजरेपणा जाऊन दोघांमध्येही अगदी सहज संवाद घडला होता. खरं तर प्रांत, कल्चर, अन् मुळात दोघांचे स्वभाव आणि व्यक्तिमत्व म्हणून दोघेही अगदी भिन्न भासले होते अगदी एकमेकांना!!
पण ती भिन्नता त्या दोघांमधली दरी न बनता दोघांना सांधणारा पूल बनू बघत होती.
एकमेकांना भेटल्यानंतर तर श्री अन् मिथिलेश दोघांनाही प्रकर्षाने जाणवू लागलं होतं की आपला जीवनसाथी असावा तर असाच...! जसं दोन अर्धगोल मिळून एक पूर्ण गोल तयार होतो तसं दोघेही एकत्र आलो तर एक परफेक्ट व्यक्तिमत्त्वाचे चित्र तयार होईल याची कल्पना दोघांनाही आली होती. कळत नकळत दोघेही एकमेकांत गुंतत जातं होते.
" एवढ्या दिवसांच्या भेटीनंतर आपण परफेक्ट मॅच आहोत हे मला सुद्धा कळले श्री पण जगण्याचा संघर्ष दोघांचाही अजून तसाच आहे. नोकरी आहे ती सुद्धा बेताचीच हे तू जाणतेसच. अन् संसार नुसत्या स्वप्नांवर नाही होत ग ,त्यासाठी आर्थिक पाठबळ जरूरी च आहे. म्हणून मी विचारात पडलो आहे. घरची परिस्थिती सुद्धा बेताचीच असल्याने मला तिकडून सुद्धा काही सपोर्ट मिळेल असे वाटत नाही." मिथिलेश आपली अडचण श्री ला सांगत होता.
" मला पण माहीत आहे हे सगळं.पण आता माझं लग्नाचं वय होत चाललं आहे .घरून एक तर तगादा लागलाय आणि जीव मात्र तुझ्यात अडकलाय. आपण दोघं मिळून काढू ना काही मार्ग! मी पण हातभार लावेल संसाराला. अन् तुझी साथ असेल तर प्रत्येकच परिस्थिती ला तोंड द्यायला समर्थ आहे मी मिथिलेश...!"
श्री च्या मनाची पूर्ण तयारी होती. अन् टीन एजर्स चं प्रेम नव्हतेच ते पूर्ण जाणिवेतून केलेलं प्रेम होतं. मग काय दोघांनीही घरी आपापला निर्णय सांगितला अन् एका शुभ मुहूर्तावर दोघेही अगदी साधेपणाने लग्नाच्या बेडीत अडकले.
पण नियती ही परीक्षाच बघत होती. मॅनेजमेंटने काहीतरी घोळ घालून बऱ्याच जणांना काढले होते. त्यांच्या नवीन सेक्शन ची मान्यता रद्द झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
आता काय करायचं???? खूप मोठा प्रश्न होता हे सगळं खूपच अनपेक्षित होतं दोघांसाठी.दोघांच्याही नोकऱ्या एकाच वेळी जाऊन दोघंही अगदी रस्त्यावर आले होते.राहायचं कुठं? खायचं काय??? इथपासून सुरुवात होती.
श्री ने माहेरी जाऊन राहायचा निर्णय घेतला. मिथिलेश नोकरीच्या शोधात आजूबाजूच्या छोट्या शहरांमध्ये खेटे घालू लागला. कशीबशी नोकरी तर मिळाली पण फक्त स्वतः चे भागवण्या पुरतीच!!!श्री मित्रांसोबत पेईंग गेस्ट म्हणून राहू लागला. श्री तब्बल एक वर्ष नोकरीचा शोध घेत माहेरीच राहिली.विरह ,अनिश्चितता या सगळ्या कसोट्या पार पाडत ती वाट बघत होती येणाऱ्या भविष्याचा वेध घेण्याची...!
अखेर हे सुद्धा दिवस निघाले अन् दोघांनाही पुन्हा चांगल्या कॉलेज च्या ऑफर्स आल्या. संसाराची गाडी थोडी रुळावरून चालू लागली. हळूहळू वेग पकडत धावू सुद्धा लागली. संसारात दोघांच्या प्रेमाचे प्रतीक असलेला पुत्ररत्न अवतरला अन् श्री च्या करिअर च्या गाडीला अजून ब्रेक लागला. पण आता मीथिलेश सगळे सांभाळण्यास समर्थ होता.
मुलाच्या संगोपनाचा विचार करत श्री घरीच आनंद शोधत राहिली होती. दोघेही एकमेकांना समजून घेत,एकमेकांना पूरक होत, एकमेकांच्या गुणांचा आदर करत सुखाच्या सागरात विहरत होते.
मुलगा मोठा झाला अन् मिथिलेश च्या मित्राच्या आयटी कंपनी मध्ये वर्क फ्रॉम होम साठी काही ऑफर निघाल्या. त्याने श्री चा रेझुमे पाठवला अन् श्री त्या पोस्ट साठी सिलेक्ट सुद्धा झाली. पाहता पाहता दिवस भुर्रकन निघून गेले. कठीण दिवस थोडे जड गेले पण सुखाचे दिवस मात्र अगदी भुरकन पंख लावून उडून गेले.
सगळी सुख दुःख मिथिलेश च्या साथीने सारखीच वाटली तिला. मनासारखा जोडीदार,त्याचं असलेलं निस्सीम प्रेम, भिन्न व्यक्तिमत्त्वाचा असूनही त्याने तिची जपलेली स्पेस...! एकमेकांमधील उणीव जाणिवांच्या स्पंदनांनी उजळून एक नवा प्रकाशमय पथ शोधला दोघांनीही. अन् त्याच पथावर चाललेलं आज तीस वर्षांचं सहजीवन....!
या प्रवासात दोघांनाही कधीच पश्चात्ताप करायची वेळ आली नव्हती. समस्या येत गेल्या,मार्ग निघत गेले अन् एकमेकांवरील प्रेम अन् विश्वासाला अजून बळ देत गेले.
मुलगा सुद्धा त्याच्या ध्येय पथाच्या मार्गावर झेप घेत होता अन् हे दोघं प्रेमवेडे त्या प्रेमाचं सिंचन करत एकमेकांचे जीवन फुलवत चालले होते.
ती आपल्याच विचारत गुंतली असतांनाच डोअर बेल वाजली. त्याचं स्वागत करायला अगदी नवपरीणिते सारखी धावतच गेली ती. तोही झालेल्या उशिराची भरपाई करायला उत्सुक...!
अन् हे काय, त्याने सुद्धा हिच्यासाठी डायमंड रिंग आणलेली गिफ्ट म्हणून...! हो कारण ती सुद्धा त्याच्यासाठी हिऱ्यासारखिच अनमोल होती ना!!!
पुढच्या अशाच येणाऱ्या लग्नाच्या वाढदिवसांची स्वप्न बघत ,लग्न वाढदिवसा च्या सुवर्ण महोत्सवाचे वेध घेत दोघेही एकमेकांत सहज गुंतली होती.
व्यक्तिमत्व भिन्न असली तरी एवढ्या वर्षांच्या सहवासाने एकमेकांना पुरेपूर जाणणे होतेच की कारण मनासारखा हमसफर मिळाला की वाट सुकर तर होतेच अन् रस्ताही कधी संपू नये असेच वाटत असते हो ना...!
साथी मनचाहा हो तो
कितना ही बडा सफर क्यूँ न हो
आसान लगता है...
दिल यही चाहता है की
ये सफर कभी खत्म ना हो...

