Deepali Rao

Inspirational Others

4.8  

Deepali Rao

Inspirational Others

देवमाणूस

देवमाणूस

11 mins
2.4K


    "सोना! आता राहू दे ग ती आवराआवरी. किती काम करशील सकाळपासून. सगळ्यांचं आवरलं सुद्धा. आत्ता गुरुजी येतील पूजेसाठी. तो परेश सुध्दा बघ तसाच फिरतोय तुझ्या मागून त्याचंही आवरून घे. 

   आणि हो नवे कपडे दिले आहेत तेच घाला गं." शुभा वहिनी सोनाला सूचना देत देत एकीकडे पूजेचं काय हवं नको ते बघत होत्या. 

   सोना...आमच्या घरी कधी आली ते नीटसं आठवत नाही. 

    बाबा शाळेत शिक्षक. एक दिवस संध्याकाळी शाळेतून घरी येता येता सोनाला बरोबर घेऊन आले. खूप वेळ सोना, आई आणि बाबा आतल्या खोलीत बसून बोलत होते. सोना रडत होती. आम्ही भावंडं लहान होतो. नीटसं कळलं नाही काही. 

   मग नंतर सोना आमच्याच घरी रहायला लागली. काही महिन्यातच सोनाला एक छान बाळ झालं. त्याचं नावही आईनेच ठेवलं...परेश..

   आता सोना बरोबर परेशही आमच्याच घरात राहत होता. अंगणातील पलिकडची एक खोली बाबांनी त्यांना दिली होती. दिवसभर सोना आईला मदत करी. घरात काय हवं नको ते बघत असे. 

   परेश जसजसा मोठा होऊ लागला तसं बाबांनी त्याला आमच्याबरोबर त्यांच्याच शाळेत घेतलं. परेश माझ्याहून सहा वर्षांनी लहान आमच्या धाकट्या स्वप्निल एवढा. 

   सोनाला आम्ही सोनाक्का म्हणत असू. ती दिवसभर आईच्या बरोबरीने आमच्यासाठी खूप काही करत असे. नंतर संध्याकाळी तिच्या खोलीत जाऊन काहीबाही वाचताना दिसायची. बाबांकडून सतत कुठली ना कुठली पुस्तकं मागवत असायची. 

   आम्ही तीन भावंड मी, मिताली आणि तिच्या पाठचा स्वप्निल आणि आता आमच्या बरोबर परेश ही. 

   पुढे एकदा दिवाळीला असाच प्रसंग घडला. जो कायम मनात राहून गेला..

   नरू काकांनी फराळाला बोलवलं होतं.

नरू काका..बाबांचे मित्र 

 आम्ही गेलो चौघेही. परेशला पाहताच काकूंच्या कपाळावरची शिर ताणली गेली, 

    "याला कशाला आणला आहात इथे. तुम्ही सांभाळत आहात ही थेरं तेवढं पुष्कळ झालं. आमच्या घरी नको बाई सणासुदीला ही अशी घाण. "

    मला काहीच कळलं नाही पण सारखं डोळ्यात पाणी येत होतं. का कुणास ठाऊक पण बुंदीचा लाडूही गोड वाटत नव्हता. दुःखी मनाने घरी आलो आणि आईला चिकटलो, "आई सांग ना गं. का म्हणाल्या असतील काकू असं? का चिडल्या असतील अशा? मला आज सगळं कळलंच पाहिजे. मी मोठा आहे आता. " मी हमसून हमसून रडत होतो.   

    आईने जवळ घेतलं, 

"अभी! अरे ही सोना.. 

  बाबांच्या शाळेतच शिकत होती. दहावीला होती. जत्रेमध्ये फिरताना गणा नावाचा मुलगा भेटला. प्रेम आहे म्हणाला तुझ्यावर. लग्न करीन तर तुझ्याशीच. ही भाळली. वाहवत गेली त्याच्याबरोबर. त्याच्या प्रेमाच्या खोट्या आणा-भाकांना भुलली. नको ते करून बसली. 

    तो गेला पळून. पुन्हा फिरकलाच नाही इकडे. काही काळानंतर कळलं की हिला दिवस गेलेत. ही अनाथ..मामाकडे वाढलेली. हा प्रकार पाहून मामा-मामीने घरातून हाकलून दिलं. आता ना शिक्षण राहिलं..ना घर..

    जीव द्यायला निघाली होती. बाबांनी शाळेतून येताना पाहिलं. विचारपूस केली. सगळा प्रकार लक्षात आला. तिला शांत करून घरी घेऊन आले. तेव्हापासून सोनाक्का आपल्याच घरी आहे आणि आता परेशही..."

   मला आता सोनाक्का बद्दल दया वाटू लागली आणि आई-वडिलांबद्दल अभिमान. मी परेशला जास्तीत जास्त जपू लागलो.

   त्याला बाबा नाहीत..कोण आहे ते माहित नाही..ही भावनाच माझं मन कुरतडून टाकत होती. कदाचित म्हणूनच मी त्याच्यावर जास्त प्रेम करत होतो.  

   हळूहळू आम्ही मोठे होत होतो. परेश तिसरीला असताना आमची बदली दुसऱ्या गावी झाली. निघणं भाग होतं. सोनाक्का खूप रडत होती. 

  "कसं होईल काकू माझं आणि परेशच. तुमचा खूप आधार होता."

  परेश तर आम्हाला सोडतच नव्हता पण त्या दोघांनाही बरोबर घेऊन निघणं कठीण होतंं. बाबांनी तिला गावातच एक छोटसं घर पाहून दिलं होतं. दोन-चार ओळखीच्यांच्या घरी कामं मिळवून दिली धुण्या भांड्याची. परेशची पुढच्या वर्षीची देखील सगळी फी बाबांनी शाळेतल्या शिक्षकांकडे देऊन ठेवली. त्याची पुस्तकं, लागणाऱ्या वस्तू आणि बाकी इतर अनेक गरजांसाठी त्यांनी सोनाक्काकडे पैसे देऊन ठेवले. ती नको नको म्हणत असतानाही.

   निघताना आई-बाबांच्या पायावर डोकं ठेवून हुंदके देणारी सोनक्का मला बघवत नव्हती.

  "आबा तुम्हा दोघांच्या रूपाने देव भेटला. खूप केलं तुम्ही माझ्यासाठी आजवर. तुमचे हे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. एका मरायला निघालेल्या मुलीला जीवनदान दिलं तुम्ही. मार्गी लावलंत तिचं आयुष्य. तुमच्यातल्या देवाला मी कायम स्मरणात ठेवेन. माझ्या परेशला खूप मोठ्ठा करेन. त्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट करीन. पण आता परत वाईट मार्गावर पाऊल टाकणार नाही"

   ती रडत बोलत होती. आईने तिला जवळ घेतलं. परेशच्या डोक्यावरून हात फिरवला. एक चांदीचा गणपती गंड्या मध्ये घालून त्याच्या गळ्यात घातला आठवण म्हणून. आम्हालाही रडू आवरत नव्हतं. 

    तिथून तालुक्याच्या गावी गेल्यानंतर काही काळ दोघेही संपर्कात होते पण हळूहळू संपर्क सुटत गेला. सगळ्यांच्या दिशा बदलल्या. मी शिक्षण घेऊन नोकरीनिमित्त मुंबईला पोहोचलो. 

  मिताली लग्न होऊन नवऱ्याबरोबर अमेरिकेत गेली. धाकटा स्वप्निल मर्चंट नेव्ही मध्ये जॉईन झाला. काळाच्या ओघात परेश हरवून गेला...

  कधीकधी मधेच आई-बाबांना आणि आम्हालाही त्यांची खूप आठवण यायची. आम्ही गावी चौकशी करून त्यांच्या बद्दल काही माहिती मिळतेय का ते चाचपडलं पण काहीच हाती आलं नाही. 

  आता आम्हा सगळ्यांचही लाईफ सेटल झालं होतं, लग्न...मुलंबाळं.... सगळं व्यवस्थित चालू होतं. माझी एकुलती एक मुलगी शनाया दहावीत गेली होती. 

   एक दिवस ती रडत रडतच क्लासमधून घरी आली. काही बोलायलाच तयार नव्हती. तिची आई खोदून खोदून विचारत होती. 

शनाया फक्त रडतच राहीली. 

  "आता मला जीव देण्यावाचून काही पर्याय उरला नाहीये. माझं पूर्ण आयुष्य बरबाद झालंय. काय करू मी आता. "

  "अग बोलशील तर काहीतरी. काय झाले ते. "

  "आई....आई मी फसले ग. "

 शनाया सांगायला लागली, 

  "माझ्या क्लासच्या बाहेर उदित दररोज उभा असायचा. माझ्या मागेमागे करायचा. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं पण हळूहळू मलाही ते आवडायला लागलं. मग आमची मैत्री झाली. उदीत मला रोज कॅडबरी द्यायचा. "

   शनाया सांगत होती आणि आम्ही सुन्न होऊन ऐकत होतो. माझा तर आता रागाचा पार कडेलोट झाला होता. 

  "अग आम्ही काही कमी करत होतो का तुला? कशाला पाहिजेत ही थेरं. " शर्मिला....तिची आई म्हणाली, "थांबा हो जरा ऐकू तर त्यापुढे ती काय बोलते आहे. आधी आलंय त्या संकटावर मात करू मग बाकीचं बोलू. "

  "हं! बोल तू शनाया. "

ती सांगु लागली, "कधी कधी आम्ही क्लास बुडवून फिरायला जायला लागलो. त्याच्याकडे बाईक सुद्धा होती. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे उदित. एन् टी कॉलेजमध्ये शिकणारा, दिसायला देखणा , उंचापुरा एकदम स्टड  

कुणीही पटकन भाळेल त्याच्यावर असा...

  मला तर जणू स्वर्गातच असल्यासारखं वाटत होतं. इतका हँडसम मुलगा..तोही आपला मित्र. मग हळूहळू त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झालं ते कळलंच नाही. 

  ते चोरटे नजरांचे खेळ....एकमेकांना लपून-छपून मेसेज टाकणे...काहीतरी कारण काढून ग्रुपमधून बाहेर पडून दोघं फिरणं..टेकडीवर जाऊन बसणं...एकमेकांच्या डिश मधले आईस्क्रीम खाणे...खूप खूप काही...खूप जवळ आलो होतो आम्ही एकमेकांच्या. 

इतकं की एक दिवसही एकमेकांशिवाय काढणं, न भेटता राहणं शक्य होत नव्हतं. 

    त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. तो म्हणाला मी सोडतो घरी तुला. मग त्याच्या बाईकवरून त्याच्या मागे बसून मी घरी यायला निघाले. त्याच्या खांद्यावर असा हात टाकून गाडीवर बसणं.. खूप थ्रीलिंग वाटत होतं. एक अनामिक हुरहूर दाटून आली होती.. भीतीही होती. कोणी बघितलं तर..

  तो म्हणाला, "स्कार्फ लाव तोंडाला. मी घरापर्यंत सोडणार तुला. अशी वाटेत कशी सोडीन." 

  मला खरंतर फार भावलं होतं हे सगळं. आपल्या बिल्डिंगपाशी आलो. मी खाली उतरणार इतक्यात लाईट गेले. सगळीकडे अंधार झाला आणि...आणि त्यानी माझ्या कमरेत हात घालून मला जवळ ओढलं. मला काही कळायच्या आतच त्याने माझ्या ओठांना कीस केलं. 

  तो पहिला कीस...तो पहिला स्पर्श....

एकदम गरगरल्यासारखे झालं मला. लाईट आले तसं माझ्याकडे रोखून बघत तो हसला आणि म्हणाला तुला सोडल्याचं बक्षीस मिळालं आज. काहीच कळेना, धुंदीतच मी वर आले. पूर्ण रात्र त्या स्पर्शाच्या आठवणीत जागून काढली. मला सुचतच नव्हतं काही. एकीकडे वाटत होतं हे सगळं चूक आहे. आई बाबांना कळलं तर ते काय म्हणतील. आपण चुकत आहोत. 

   पण त्याच्याशिवाय राहणंही जमत नव्हतं. आता तर आमच्या भेटण्याला स्पर्शाची ही ओढ लागली होती. 

   एक दिवस तो म्हणाला, "आज क्लासला सुट्टी घे ना. आज माझा तुझ्याबरोबर फिरायचा मूड आहे. खरंच घे ना ग आजच्या दिवस सुट्टी. माझ्या आई बाबांनी ही तुला भेटायला बोलावलं आहे. मी सगळं सांगितलं आहे घरी. आईने तुला आवडते म्हणून हि कॅडबरी पाठवली आहे."

मला नाही म्हणवे ना. एका तिरमिरीतच मी त्याच्यामागे गाडी वर बसले. गाडी सिटी च्या बाहेर जाऊ लागली तसं मी त्याला म्हंटलं पण, "अरे इकडे कुठे राहतोस तू?"

 तर तो म्हणाला, "आता तुलाही सवय करून घ्यावी लागेल सिटी बाहेर राहण्याची." 

हसला..गोड मधाळ...

  मग एक दुमजली घरं आलं.त्यांना त्या घरापाशी गाडी थांबवली. 

  "चल आत. हेच माझं घर आहे."

 आम्ही बेल दाबली पण कोणी दार उघडलं नाही.

 "आई झोपली असेल कदाचित."हातातल्या किल्लीन त्यानं लॅच उघडली. 

    आम्ही आत गेलो. बघते तर घरात कोणीच नव्हतं. त्याच्याकडे पाहिलं तर रोखुन बघत म्हणाला, " मी जर सांगितलं असतं घरी कोणी नाहीये तर आली असतीस का? "

   त्याने जवळ घेतलं. नको नको म्हणत मी कधी त्याच्या मिठीत शिरले कळलच नाही. 

  वस्त्रांची बंधनं गळून पडली आणि आम्ही एकरूप झालो."

शनाया बोलत होती आणि आम्ही सुन्न होऊन ऐकत होतो. पायाखालची जमीनच सरकली होती. नशिबात अजून काय लिहून ठेवलं होतं कोण जाणे. 

   "मग तो सतत अशी डिमांड करू लागला. मी नाही म्हणून प्रत्येक वेळी त्याला डावलत गेले. मला कळलं होतं माझ्या हातून चूक झाली आहे. मला ती परत परत करायची नव्हती. 

   आज उदित क्लास पाशी आला. मला म्हणाला माझ्याबरोबर चल. मी नाही म्हणाले तर त्याने मोबाईल मधला एक व्हिडिओ मला दाखवला. त्यामध्ये त्या संध्याकाळी आमच्यामध्ये जे झालं त्याचं रेकॉर्डिंग होतं. 

 मला म्हणाला, "जर तू आली नाहीस आत्ता तर हा व्हिडीओ नेटवर व्हायरल करून टाकेन. "

  त्याला काहीबाही उत्तर देऊन घरी आले आहे पण आता वाटतय मला जीव देण्याशिवाय पर्यायच उरला नाहीये."  

   शनाया हमसून हमसून रडत होती. तिला कळून चुकलं होतं. फार मोठी चूक तिनं केली होती. अभि आणि शर्मिलाचा तर मेंदूच काम करत नव्हता. कसं निस्तरायचं हे प्रकरण. यातून जर काही वावगं घडलं तर कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. 

  तिघेजण कितीतरी वेळ निस्तब्ध बसून होते. काय कराव सुचतच नव्हतं. "शनाया अगं काय करून बसलीस हे तुझ्या आयुष्याचं. " शर्मिलाला संताप सहन होत नव्हता. "आम्ही तुला दिलेल्या मोकळकीचा गैरफायदा घेतलास ग."

तिने शनाया च्या दोन थोबाडीत लावल्या. 

 आपल्याच लेकराला असं हतबल झालेलं पाहवत नव्हतं. आता या परिस्थितीला तोंड देणं भागच होतं. 

  "शनाया तुझ्याकडे उदितचा एखादा फोटो आहे?" अभिजीतनं विचारलं. 

  मोबाईल मधून त्याचा फोटो काढून तिने बाबाला दाखवला. खरंच फार राजबिंडा दिसत होता तो. कोणीही भाळेल असा. पण मनाने मात्र काळाकुट्ट राक्षसी...

 "ठीक आहे. तू मोबाईल घे आणि चल माझ्याबरोबर. "

 "अहो कुठे नेताय आता तिला. "

 "पोलीस स्टेशन मध्ये"

" अहो कशाला आपल्या अब्रुची लक्तरं अशी चव्हाट्यावर मांडताय. नका करू असं."

 "शर्मिला थोडं डोकं जागेवर ठेवून विचार कर. आत्ता या परिस्थितीत आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. तो मुलगा हीला सोडणार नाही आणि दुसरीकडे आज शनाया फसली आहे, उद्या आणखीन कोणती तरी मुलगी फसू शकते. आपण शनायाबरोबरच आणि कोणाचंही भलं करू शकतो. आता नीट विचार करूनच कृती केली पाहिजे. "

  शनायाला घेऊन अभी पोलीस स्टेशन मधे गेला. हवालदारांनी रीतसर तक्रार लिहून घेतली आणि बाहेर बाकावर बसायला सांगितलं. गाडीतून साहेब खाली उतरले. एकवार बाहेर बसलेल्या अभी आणि त्याच्या मुलीकडे नजर टाकून ते आत गेले. 

"ओ चला तुम्हाला बोलावलय," हवालदार म्हणाले. 

  मुलीला घेऊन अभिजीत केबिनमध्ये गेला. साहेबांना सगळी हकीकत सांगितली आणि मोबाईल मधला फोटोही दाखवला. अभिजीत सांगत असताना साहेब त्याच्याकडे रोखून बघत होते आणि अचानक ते खुर्चीवरून उठले, 

 "तुम्ही...तुम्ही अभिजीत का वाडेगावचे. 

 "हो पण आपण कसं ओळखलं?" अभिजीत साशंक स्वरात म्हणाला. 

 काही कळायच्या आत साहेबांनी अभिजीतला मिठीच मारली. 

 "अभि मला ओळखलं नाहीस?" अभिजीत त्यांच्या बॅजवर लिहीलेले नाव वाचण्याचा प्रयत्न करू लागला.

  "श्री. एस्. परेश "

बॅजच्या बाजूलाच गळ्यात घातलेला चांदीचा गणपती त्याला दिसला. 

ओळख पटली.

"परेsssश 

म्हणजे साहेब तुम्ही.."

भानावर येत तो म्हणाला. 

 "अरे तुझ्यासाठी मी परेशच आहे"

  "हे परेश एस्... समजलं नाही"

 "एस्. म्हणजे सोना.

  मला बाप माहित नाही. माझ्यासाठी सारं काही आईच. मग तिचंच नाव लावू लागलो. बाकी मिताली, स्वप्निल, आई आबा सगळे कसे आहेत? कुठे आहेत? काय करतात?" उत्सुकतेने त्याने सारे प्रश्न एका दमात विचारले. 

 "मिताली लग्न होऊन अमेरिकेत. स्वप्निल मर्चंट नेव्हीत असतो. 

त्याचं कुटुंब दिल्लीला. मी, आई, बाबा, बायको आणि मुलीबरोबर मुंबईतच असतो. "

  परेशला बाकी सगळ्यांची माहिती आणि ख्यालीखुशाली संगितली. आईबाबा इथेच आहेत म्हटल्यावर तो लगेचच भेटायला येण्यासाठी निघाला. 

पोलिसांच्या गाडीतून घरी आलोय म्हटल्यानंतर घरचे सगळे घाबरले. बाबा तर मटकन खुर्चीत बसले. खरंतर आई आणि बाबांना या झाल्या प्रकाराची काहीच माहिती दिलेली नव्हती. मी परेशलाही तशी रिक्वेस्ट केली. आत गेल्या गेल्या परेश आई-बाबांच्या पाया पडला. 

 साहेब घरात येऊन असे नमस्कार करताहेत बघितल्यावर दोघे गांगरून गेले . 

 "ही माझी पत्नी शर्मिला"

ती ही बावचळली होती हे सगळं बघून. 

"बाबा ओळखा बरं कोण आहे ते?" 

बाबा बघू लागले. आईने गळ्यातला गणपती बघितला तशी त्याला मिठी मारत म्हणाली, 

 "परेश ना रे तू? कुठे गेला होतास इतकी वर्ष? किती शोधलं तुला."

  परेशनं त्याची हकीकत सांगायला सुरुवात केली. 

 "तुम्ही सगळे गेल्यानंतर माझी दहावी होईपर्यंत मी आणि आई गावातच राहिलो. दहावीला चांगले गुण मिळाले. शिक्षकांच्या मदतीने त्यांच्याच ओळखीत एकांच्याकडे तालुक्याच्या गावी जाऊन राहण्याची संधी मिळाली. आईलाही शिवणकामाच्या फॅक्टरीत काम मिळालं. मग तिथेच राहू लागलो. शिकता शिकता पार्टटाइम पेपर टाकू लागलो. शिकवण्या घेऊ लागलो. तेवढीच आईला घरात मदत. मग पोलीस भरतीची परीक्षा दिली आणि स्वकष्टाने इथवर येऊन पोहोचलो.

   सगळ्यात महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट अशी की मी कॉलेजला असताना आईनंही एक्स्टर्नल बी. ए. ची परीक्षा दिली. तीनही वर्ष उत्तम मार्कांनी पास झाली ती. तशी तिला शिक्षणाची आवड पहिल्यापासूनच होती. तुम्हालाही माहीतच होतं की. पण नको तिथं जीव गुंतला आणि फसवली गेली. पण नंतर मात्र आयुष्यात फार कष्ट केले बिचारीनं आता सुख उपभोगायची संधी देईन म्हणतो तिला. 

   अशाच परित्यक्ता आणि फसलेल्या मुलींसाठी, बायकांसाठी आम्ही एक आश्रम संस्था चालू केली आहे, "आधार" नावाची. आधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समजावून घेते. त्यांना समुपदेशन करून योग्य मार्गदर्शन करते. त्यांची आयुष्य नीट मार्गी लागावी म्हणून सतत धडपडत असते. 

   अजूनही ती तुमची आठवण काढून डोळ्यात पाणी आणते. म्हणते, "आबा नसते माझ्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं असतं. कुठे गेले असते मी? काय केलं असतं?"

  "खरंच आई-आबा आजचे जे दिवस आहेत आमचे ते केवळ तुमच्यामुळेच. तुमच्या आधारामुळे, तुमच्या पाठिंब्यामुळे.."

 आबांच्या पायावर पडून परेश ढसाढसा रडू लागला. आबा-आई त्याच्या पाठीवरुन हात फिरवत होते. बायको आणि मुलगी स्तंभित होऊन बघत होत्या.

"अरे बास-बास आता. लग्न बिग्न केलंस की नाही? का तसाच राहिला आहेस अजून?" आईनं विचारलं. 

  परेश लाजून हो म्हणाला. 

 "सानिका..माझी बायको. अशीच कोणाच्या तरी भूल थापांना बळी पडून मुंबईत आली आणि नको त्या वस्तीत जाऊन अडकली गेली. एकदा रेड मारली तर ही सापडली. नंतर तिची हकिकत सांगितली तिने. खूप वाईट वाटलं. मग कालांतराने प्रेमात पडलो तिच्या. आईला सगळी माहिती देऊन लग्न केलं. आता ती आणि आई 'आधार 'चा भक्कम आधार आहेत."

   दुसऱ्याच दिवशी सकाळी आईला आणि बायकोला भेटायला घेऊन वचन दिलं. शर्मिलाने दिलेले चहा आणि पोहे खाऊन परेश निघाला. जेवायला थांबण्याचा खूप आग्रह केला सगळ्यांनी. पण ड्युटी वर जाणंही गरजेचं होतं. 

 त्याला खालपर्यंत सोडायला म्हणून त्याच्यापाठोपाठ अभिजीत निघाला. त्याला शनयाबद्दलची सगळी हकीकत सांगितली होती. आता तर तो तिचा हक्काचा काका होता. 

 "अभी! तू काहीच काळजी करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. तू आता एकदम निश्चिंत रहा."

  अभिचा हात हातात घेत इन्स्पेक्टर परेश म्हणाला. त्याला अच्छा करून आभि वर आला. आता मात्र तो खरंच मनातून निश्चिंत झाला होता. आल्या-आल्या त्यानं आई बाबांना जवळ घेतलं. त्यांच्यामुळेच तर त्याच्यावरचं संकट टळलं होतं. त्यांची पुण्याई मुलांच्या कामी आली होती. 

  दुसऱ्या दिवशी परेश सोनाक्का आणि त्याच्या पत्नीला घेऊन घरी सगळ्यांना भेटायला आला. सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंद ओसंडून वाहत होता. सोनाक्का कमालीची भावनिक झाली होती.

स्वप्निल आणि मितालीलाही व्हिडिओ कॉल केले. त्यांनाही खूप आनंद झाला. 

 सानिका. तिच्या नवऱ्याला आणि सासूला आई-बाबांनी केलेल्या मदतीमुळे भारावून गेली होती. काही वेळाने खाणे-पिणे, गप्पा झाल्यानंतर परेशनं अभिला बाजूला घेतले. रात्रभरात मोबाईल नंबर ट्रेस करून त्यांनं उदीतचा पत्ता शोधून काढला होता. त्याला ताब्यात घेतलं होतं. त्याच्या जवळ असणारे सगळे व्हिडिओ नष्ट केले होते. मुलींना फसवण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. एका रात्रीत परेशनं हे काम केलं होतं. 

  अभीला जवळ घेत तो म्हणाला, 

"आई बाबांनी आमच्यासाठी जे केलं आहे, त्याची परतफेड मी नाही करू शकत. कधी करणारही नाही.

कारण या ऋणातून मला कधी मुक्तच व्हायचं नाही. 

पण...पण तुमच्यासाठी कामी आलो हेच माझं भाग्य. यापुढेही कधीही, कुठल्याही क्षणी माझी मदत लागली तर हक्कानं बोलाव. हा तुझा धाकटा भाऊ तुझ्यासाठी कायम उभा आहे. "

गर्वाने छाती फुलून आली. 

  पुढे शनायाही या नव्या आजी आणि काकूच्या संस्थेत जाऊन त्यांना मदत करू लागली. 

एक फसवली गेलेली मुलगी...

खचून न जाता, परिस्थितीशी दोन हात करून आपलं आणि आपल्या मुलाचं भवितव्य घडवते.. 

तिच्या सारख्या अनेकांची आधार वृक्ष होते...

एका देव माणसाच्या परिस स्पर्शाने पावन होऊन त्याचा वसा जपते आणि तो जपता जपता स्वत:च देवमाणूस होते...

सारंच अनाकलनीय अन् प्रेरणादायी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational