दैवलेख
दैवलेख
सकाळी साडेअकराची वेळ होती. मी नेहमीप्रमाणे बाथरूममध्येच होतो. तितक्यात मोबाईलची रिंग वाजली. मनात म्हटले यार हे सगळे लोक मी बाथरूममध्ये असतानाच का बरे फोन करत असावेत? सुखाने अंघोळही करता येत नाही.
फोन बाळ्याचा होता. या माणसाला माझी आठवण तो नाशिकला येणार असेल किंवा काही बातमी सांगायची असेल तरच होते. एरवी आम्ही एकमेकांचे मित्र आहोत हे दोघेही विसरलेलो असतो. अरे हो... काल वाढदिवस झाला याचा आणि मी नेहमीप्रमाणे विसरलोच होतो. लगेचच फोन उचलला आणि म्हटले...
“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... बिलेटेड...”
“मिल्या... वाढदिवस तर कालच झाला आणि तू नेहमीप्रमाणे विसरणार हेही मला माहिती होतंच. आणि काय रे... वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा मी केलेल्या फोनवर देतोस? आता तर फोनही फुकट आहे ना? तरी??? कंजूस कुठला.” मनात म्हटले याची टोमणे मारायची सवय अजूनही गेलेली नाही. टपूनच असतो नुसता.
“हेहेहे...”
“यार... एक बातमी आहे.” त्याने पलीकडून म्हटले. पाहा म्हणजे याला आजही फक्त बातमी देण्यासाठीच माझी आठवण आली होती. आता हा अजून काय बातमी सांगणार याचा विचार करीत असतानाच त्याने सुरुवात केली...
“अरे आपली अनु आहे ना...”
“आपली अनु?” यार हे लोकं असे भलतेसलते शब्दप्रयोग का करतात?
“कॉलेजमध्ये आपल्या बरोबर होती ती रे...”
अनुचे नाव खूप दिवसांनी ऐकत होतो मी. तिचा उल्लेख मला परत एकदा भूतकाळात घेऊन गेला.
अनु म्हणजे अनिता देशपांडे. ज्या वेळेस आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेस आमच्या बरोबर पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंत बरोबर असणारी क्लासमेट....
गोरा रंग, सरळ नाक, तपकिरी डोळे, अंगाने सडपातळ, लांबसडक केसांची एकच वेणी किंवा कधी फक्त चाप लावलेला, नेहमी पंजाबी ड्रेस आणि चेहऱ्यावर हास्य हेच काय ते तिचे वर्णन करता येईल. साधी राहणी असूनही तिची गणना सुंदर मुलींमध्ये होत होती हे मात्र तितकेच खरे. अभ्यासात जबरदस्त हुशार. माझी ओळख तिच्याशी मी फक्त बाळ्याचा मित्र म्हणूनच झाली. पण लवकरच आमच्यात चांगली मैत्री झाली. मैत्रीचे कारण अर्थातच माझा स्वार्थ. मी बऱ्याच वेळेस लेक्चरला दांडी मारायचो. मग त्यावेळी तीच मदतीला धावायची.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना आमच्या ‘सहकार’ या विषयाचे प्रात्यक्षिके आम्ही सहसा बाहेरगावी ठरवत होतो. तेवढीच कॉलेजच्या पैशात आमची ट्रीप. यावेळेस कळसूबाई ट्रीप काढायचे ठरवले होते. आमच्या सरांनाही त्यासाठी तयार केले आणि प्रात्यक्षिक ‘बारी’ या कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या गावात आयोजित केले. आम्ही १०/१२ जण मुले, आमचे सर आणि दोन मुली असे तिथे जाणार होतो.
दोन मुलींपैकी अनिता अगदी पहिल्यापासून आमच्या सोबत असणार होती, पण दुसरी मुलगी मात्र बाभळेश्वर येथून आम्हाला जॉईन होणार होती. पण काही कारणाने ती वेळेवर आलीच नाही. मग शेवटी आम्ही विचार केला की अकोले गावात प्रवीणची बहिण राहते, तिथे अनिताला थांबायला सांगावे आणि आपण पुढे जावे. आम्हाला वाटले होते की इतके सगळे मुले त्यातील बरेच जण तिच्या ओळखीचेही नाहीत; तर ती पुढे येण्यास तयार होणार नाही.
ज्यावेळेस अनिताला याबद्दल सांगितले त्यावेळेस तिने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला आणि म्हणाली,
“अरे मी तर तुम्हाला ओळखते. आपले सरही आहेत बरोबर आणि माझा तुम्हा सर्वांवर पूर्ण विश्वास आहे. सगळ्या गोष्टींची खात्री करूनच तुमच्याशी मैत्री केली आहे मी.”
कळसूबाई शिखरावर सगळ्यात वरती जवळपास २५/३० फुटाचा उभा कडा आहे. तो चढून जाण्यासाठी तिथे एक साखळदंड आणि शिडी लावलेली होती. (आता मात्र जिना आहे) मला उंचीची भीती वाटत असल्यामुळे मी मनातून जाम घाबरलो होतो. पण ही पोरगी मात्र अगदी बिनधास्त शिडी चढत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नाही की टेंशन नाही. आमच्यातील चार जणांनी आधीच शिडी चढून शिखर गाठले होते. पुढच्या काही मिनिटात अनिताही शिखरावर पोहोचली. मी मात्र अर्ध्या शिडीवर होतो. आता तर मला खाली पाहण्याचीही भयानक भीती वाटत होती. खालून आमचे सर हातात काठी घेवून ‘एकेक पायरी चढ’ म्हणून ओरडत होते आणि वरून ही पोरगी मला ‘घाबरू नको आणि खाली पाहू नको’ म्हणून सांगत होती.
शेवटी कसेतरी करून देवाचे नाव घेत घेत मी शिखरावर पोहोचलो. तिथे पोहोचताच मला म्हणाली.
“इतका काय घाबरतोस रे?”
काय बोलणार मी यावर? आता एखाद्याला एखाद्या गोष्टीची का भीती वाटते हे काही सांगता येते का? जरी मी शिखरावर सुखरूप पोहोचलो होतो तरी मनात फक्त एकच विचार होता; परत त्याच शिडीवरून खाली उतरायचे होते. मग म्हटले... ‘बाई गं... तुझ्यात साक्षात जगदंबेचा अंश आहे. त्यामुळे तुला कसली आली आहे भीती? मी मात्र तुच्छ पामर.... इथपर्यंत आलो हेच खूप झाले.’
अनिता जरी डेरिंगबाज असली तरी खुपच सरळमार्गी होती. तिचे कधी अफेअरचे किस्से ऐकू आले नाहीत की कधी तिच्या वागण्या बोलण्यात त्याची झलकही दिसली नाही.
कॉलेजला सुट्ट्या लागल्या आणि आमच्या भेटीही बंद झाल्या. रिझल्टच्या दिवशी ती पुन्हा कॉलेजमध्ये भेटली. सोबत कुणीतरी मुलगी होती.
“काय गं... काय लागला रिझल्ट?”
“अरे पास झाले ना! ८३% मार्क्स आहेत. बरे तुझा रिझल्ट पाहिला की नाही तू?”
“हो तर... फर्स्टक्लास आहे. पण अकौंट मात्र अगदी काठावर आहे. थोडक्यात बचावलो नाही तर परत वारीला होतोच.” मी.
“बरे मग आता पुढे काय करायचे ठरवले आहे?”
“पुढे? अजून विचार केला नाही. पण एम. कॉम करणार नाही हे नक्की. कारण आता परत अकौंटशी पंगा घ्यायची माझी हिम्मत नाही. बरे तू काय विचार केला आहे?”
“एम कॉमला अडमिशन घेणार आहे. पण पाहू पुढे काय होते ते. अरे हो... ओळख करून देते... ही माझी होणारी नणंद. सायन्स करते आहे.” अनिताने ओळख करून दिली.
“आयला... लग्न ठरले? कधी? आणि कोण आहे मुलगा? काय करतो? कुठल्या गावाला असतो?” माझे प्रश्न चालू झाले.
“माझा आतेभाऊच आहे तो. इथेच असतो. बिझनेसमन आहे. बहुतेक तू नाव ऐकलेच असेल.” तिने नाव सांगितले. त्या व्यक्तीला आम्हीच काय पण अर्धे गावं ओळखत होते. एका राजकीय व्यक्तीचा तो मुलगा होता. पण हे सगळे सांगत असताना तिच्या बोलण्यात थोडासा रुक्षपणा स्पष्ट जाणवला.
“चल... बाय... जरा घाईत आहे, लग्नाची तारीख ठरली की तुम्हा सर्वांना कळवेनच.” म्हणत ती निघून गेली. अनिताची आणि माझी ती शेवटची भेट. त्यानंतर आम्ही श्रीरामपूर सोडून कायमचेच नाशिकला शिफ्ट झालो, त्यामुळे भेट होण्याचा प्रश्नच नव्हता.
मध्यंतरीच्या काळात जेव्हा कधी श्रीरामपूरला जाणे होई तेव्हा मित्रांना आवर्जून अनिताबद्दल विचारीत होतो. त्यांचे उत्तर आपले ठरलेले. “यार ते मोठे लोकं. आता ती एका इंडस्ट्रीची मालक आहे. सगळे ती स्वतःच चालवते. आजकाल तर इथल्या शाळा कॉलेजमध्येही कित्येक वेळेस ती प्रमुख पाहुणी असते. गावातील सन्माननीय व्यक्ती आहे ती. अर्थात रस्त्यात भेटली तर आवर्जून बोलते हेच काय कमी आहे का?” हे झाले की विषय तिथेच संपत होता.
मागील महिन्यात श्रीरामपूरला जाणे झाले. रस्त्यात बाळू भेटला. किती वर्षांनी भेटत होता तो. जसा माझ्यात काहीच बदल नाही तसाच त्याच्यातही काहीच बदल नव्हता. तीच बोलण्याची स्टाईल, तसाच पेहराव, तशीच अंगकाठी. दोन पोरांचा बाप झाला तरी त्याच्यात सुटलेली ढेरी सोडता बाकी काहीच बदल झालेला दिसला नाही. दोघांच्याही गाडीला वेळ होता म्हणून लगेच जिप्सी हॉटेल गाठले. मसाले डोसाची ऑर्डर दिली आणि गप्पांना सुरुवात झाली.
“अनु तर आता खूपच पुढे निघून गेली यार! श्रीरामपुरात तिची स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. श्रीमंत व्यक्तीशी लग्न केलं तर माणसं कुठल्या कुठे निघून जातात नाही! मजा आहे तिची.” मी म्हटले.
“मिल्या... आपल्याला नेहमी जसं दिसतं तसेच असेल असे काही नाही. लोकं नेहमी फक्त एकच बाजू पाहतात. दुसऱ्या बाजूचा विचारही त्यांच्या मनात येत नाही.” त्याने उत्तर दिले.
“म्हणजे? काय म्हणायचे आहे तुला?”
“तिच्या लग्नाच्या काही दिवस आधी ती मला कॉलेजवर भेटली होती.” बाळ्याने सांगायला सुरुवात केली.
“त्यावेळेस तिने मला बरेच काही सांगितले. तिने कॉलेजला अडमिशन घेतले तेव्हा तिची घरची परिस्थिती अगदी बेताची होती. तिच्या घरी आई, एक लहान बहिण आणि भाऊ आहेत. वडील काही वर्षांपूर्वीच वारले होते आणि ती तिच्या आजी सोबत राहत होती. बऱ्याचदा तिची आत्या त्यांना आर्थिक मदत करत होती. त्यातच तिच्या आतेभावाला ती आवडू लागली. हिला मात्र तो बिलकुल आवडत नव्हता. एकूणच त्याचे प्रताप कसे होते हे तुला वेगळे सांगायला नको. त्याने अनेक वेळेस तिला पटवण्याचा प्रयत्न केला पण हिने त्याला दाद दिली नाही. या बाबत तिने आत्याकडेही तक्रार केली पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. शेवटी एक दिवस त्याने तिला स्पष्ट सांगितले, माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुला आयुष्यातून उठवेन. विचार कर. माझे जे काही व्हायचे ते झाले तरी चालेल. शेवटी हिने पुढचा सगळा विचार करून नाईलाजाने होकार दिला.” बाळ्या गंभीरपणे सांगत होता.
“अरे पण काही वेळेस केलेली छोटीशी तडजोड नंतर आपले आयुष्य सुखकरही बनवू शकते ना? त्यावेळेस तिला नसेल हे लग्न मान्य. पण आज मात्र तिच्याकडे पैसा, प्रसिद्धी, चैनीच्या सगळ्या गोष्टी, मानसन्मान, मुलंबाळं हे सगळे काही आहेच ना? सुख म्हणतात ते यापेक्षा काय वेगळं असतं?” मी म्हटले. किमान त्या वेळेस तरी बाळ्याकडे यावर उत्तर नव्हते. कारण सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणसाला सुख म्हणजे याच्या पलीकडे काही असेल याची जाणीवच नसते.
नंतर इतर मित्रांची विचारपूस, कॉलेजच्या आठवणी यात वेळ कसा निघून गेला ते कळलेही नाही. जवळपास दीड तासानंतर आम्ही आपापली बस पकडली.
त्यानंतर तसे अनेक वेळेस श्रीरामपूरला जाणे झाले पण अनिताला भेटण्याचा योग काही आला नाही. बाळ्यालाही कधी फोन झालाच तर फक्त ‘अनु काय म्हणते?’ हा माझा प्रश्न आणि ‘मजेत आहे’ हे त्याचे उत्तर ठरलेले. त्यानंतर तो विषय तिथेच संपायचा.
आज बाळ्याचा फोन आला आणि यावेळेस मात्र त्याने अनुचा विषय पहिल्यांदा काढला होता. काही क्षणातच मागील बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या होत्या. बाळ्याचा फोन चालूच होता.
“अबे मी बोललेले ऐकू येतय का नीट?” माझ्या विचारांची तंद्री भंग करत पलीकडून बाळ्याचा आवाज आला.
“हो हो... आठवली... आता काय पराक्रम केलाय तिने?”
“आज तिने पराक्रम नाही, वेडेपणा केलाय.” त्याने उत्तर दिले.
“वेडेपणा? तो कसा आणि काय?”
“परवाच तिने आत्महत्या केलीये.”
“आईशप्पथ... काय बोलतोस?”
“हो... मी आताच वर्तमानपत्रात ही बातमी वाचली. मधल्या पानावर आली आहे.”
“बापरे... कशामुळे आत्महत्या केली काही समजले का?” मी विचारले.
“नाही... वर्तमानपत्रात जास्त काही लिहिलेले नाही म्हणून मी जित्याला फोन केला होता तर त्याने खूपच धक्कादायक माहिती दिली...” त्याने सांगितले.
“धक्कादायक?”
“होय... धक्कादायकच... जित्या सांगत होता की तिच्या नवऱ्याला तिच्यावर संशय येऊ लागला होता. त्याचे संशय घेणे इतके वाढले की त्याच्यात वेडसरपणा दिसू लागला. याच गोष्टीचा फायदा तिच्या दिराने घेतला आणि....” इतके बोलून बाळ्या गप्प बसला.
“आणि काय???” बाळ्या गप्प बसलेला पाहून मी विचारले.
“आणि त्याने तिच्या अब्रूवर हात टाकला. वेडसर नवरा, लंपट दीर आणि त्यांना पाठीशी घालणारी सासू ज्या घरात असेल तिथे मुलगी काय करेल?” त्याने म्हटले मात्र आणि मलाही शॉकच बसला. खरंच नात्याचीही चाड उरत नाही माणसाला? काय बोलावे हे आता मला समजेना.
“मिल्या... फोनवर आहेस ना?” पलीकडून परत बाळ्याचा आवाज आला.
“अं... हो... ऐकतोय... बोल...” मी म्हटले.
“तुला आठवतं... तू एकदा म्हणाला होतास की... पैसा, प्रसिद्धी, चैनीच्या सगळ्या गोष्टी, मानसन्मान, मुलंबाळं हे सगळे असणं म्हणजेच सुख आणि त्यासाठीचं माणसं तडजोड करतात त्यात काही वावगे नाही.” पलीकडून बाळ्याचा आवाज आला आणि मी मनात म्हटलं... याला बरंच काही लक्षात आहे की...
“त्यावेळेस माझ्याकडे या तुझ्या बोलण्यावर उत्तर नव्हते म्हणून मी गप्प बसलो होतो, पण आता मी म्हणू शकतो की फक्त या गोष्टी असणे म्हणजेच सुख ही व्याख्या खुपच उथळ आणि चुकीची आहे. कारण या गोष्टी म्हणजे सुख असेल तर मग अनिताला आत्महत्या करावीच लागली नसती. अजूनपर्यंत सुखाची सर्वमान्य व्याख्या कुणालाच करता आलेली नाही. सुख हे व्यक्तिपरत्वे, कालपरत्वे बदलत जाते. माणसाला फक्त बाह्य गोष्टी दिसतात पण त्यामागील वेदना दिसतीलच असे नाही. जाऊ दे... तुला नंतर फोन करतो... सध्या घाईत आहे.” इतके बोलून बाळ्याने मी काही बोलायच्या आधीच फोन कटही केला
अर्थात त्याने शेवटी जे वाक्य उच्चारले होते त्यावर मी काहीच बोलू शकणार नव्हतो. आता मात्र अनिता डोक्यात घोळत होती. एक वाक्य किंवा काही शब्द माणसाची मानसिक अवस्था बदलण्यास कारणीभूत ठरू शकतात हे मी आतापर्यंत ऐकून होतो, आज त्याचा अनुभव घेतला. मन पूर्णपणे बधीर झाले होते. वरून संथ दिसणाऱ्या पाण्याच्या तळाशी काय खळबळ चालू आहे हे जसे सांगणे मुश्कील, तसेच मानवी मनाचा थांग लागणेही मुश्कील.
