दागिना - माझी ओळख
दागिना - माझी ओळख
आई कशाला काळजी करतेस? वेळ आली कि, सगळे होईल आणि हो नको एवढी काटकसर करू, अग दागिन्यांचं एवढे काय घेऊन बसलीस? मला नाही आवडत ते दागिने अंगभर घालायचे, आणि चोराच्या भितीत मिरवायचे!
तुझा जमाना गेला आता. डोळे ऊघड समोर जग पहा, किती सुंदर आहे. मस्त रहा, तुझं आयुष्य पण एन्जॉय कर ग! तुला व बाबांना सगळे जग फिरवून आणनार, सगळे सुखं तुमच्या पायाशी उभी करणार, मगच मी लग्न करणार. मी मुलगी असले म्हणून काय झालं माझी पण जबाबदारी आहेच ना?
आता मला फक्त माझ्या करीअर कडे लक्ष केंद्रित करू दे. तु नको चिंता करू! वेळ आली कि, सगळे होईल.
हो!श्रेया एवढीशी चिमुरडी आज आईची, आई होऊन आईला समजावत होती. श्रीकांत मात्र शांत असायचा त्याला माहित होते, श्रेया म्हणजेच लाखमोलाचा दागिना आहे.
श्रेया आता लग्नाच्या वयाची झाली होती. पाहू, पाहू पर्यंत दिवस जातील म्हणून स्मिता तिच्या लग्नासाठी मागे लागलेली. शेवटी आईच होती ना ती? आजुबाजुचे नातेवाईक होतेच भर घालायला.
पण श्रेयाला शिकायचे होते स्वतःहाच्या पायावर उभं राह्यचे होते.त्यामुळे एवढ्यात काही तिचा लग्नाचा विचार नव्हता.त्यामुळे वायफळ चर्चेत तिला इंटरेस्ट नसायचा.
स्मिताच आपले तेच पालुपद ती म्हणायची, शिक ग तू, पण लग्नानंतर पण शिकू शकतेस ना? आमची काळजी कमी ग! पण श्रेया ठाम मतावर अडकलेली.स्मिता मात्र कायम काळजीत गुंतलेली.
आजुबाजुच्या पोरी लग्न करुन जात होत्या, आणि सांसारिक होत होत्या. आठ दिवसांपूर्वी श्रेयाच्या एका मैत्रीणींचे लग्न झाले. खुप थाटमाट लग्नात किलोभर सोनं घातले असेल तिच्या अंगावर. प्रत्येक विधीला एक दागिना तीची आई पोरीच्या अंगावर चढवत होती. दिखावा खुप. असो ज्यांचे त्याच्याबरोबर म्हणून स्मिताने सुस्कारा सोडला. आपली तर काहीच तयारी नाही श्रेयाच्या लग्नासाठी. श्रीकांत तर काहीच मनावर घेत नाही.
तिला आठवले श्रेया झाली तेव्हा सासरे श्रीकांतला म्हणाले, 'श्रीकांत मुलगी झाली रे बाबा! आता हुंड्याच्या तयारीला लागा' स्मिताला खुप वाईट वाटले. बाबा झालास म्हणून अभिनंदन करायचे सोडून तिसरंच.
पण श्रीकांत खुप खुष झाला.'माझी पहिली बेटी धनाची पेटी' म्हणून निरागस चेहऱ्यात गुंतून गेला. तिची हौसमौज व लाड पुरवण्यात तो गुंग असायचा. श्रेया मुळातच खुप हुशार व चुणचुणीत होती. नवनवीन गोष्टी चाणाक्षपणे शिकण्याकडे तिचा कल असायचा. खूप जिज्ञासु होती.
सुस्कांरात हळूहळू श्रेया वाढत होती 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' तसेच काहीसे, शिक्षण क्षेत्रात तिची भरारी नेहमीच वेगळी चुणूक दाखवायची.मेरीट कधीच सोडले नाही पठ्ठीने. वेगवेगळे प्रावीण्यपदक, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफीने शोकेस नुसतं भरून गेले होते.
श्रीकांत म्हणायचा, बस्स तिचं स्वप्न साकार करायचेच म्हणून मग तिच्या लग्नासाठी साठवणूक वगैरे तो करत बसलाच नाही. तिचे दैदीप्यमान यश हाच तिचा मौल्यवान दागिना असे तो स्मिताला सांगायचा. होईल ग सगळे नको काळजी करु.
पण हिच आपलं एकच पालूपद थोडे पैसे गाठीशी असायला हवे, पोरीचं लग्न करायचं. चार दागिने तर घालावे लागतील लाजेकाजेस्तव. नुसती पदव्या, प्रशस्तीपत्र, ट्रॉफी गळ्यात घालून ऊभी राहणार हि बोहल्यावर?
स्मिता शांत, शांत नको ब्लडप्रेशर वाढवून घेऊस! 'मी आहे ना मग शांत रहा ? श्रीकांत समजूत घालायचा.
श्रीकांतचा शांततेच्या सुरांनी परत स्मितातली आई जागी व्हायची. ह्याला तर काहीच पडले नाही? पोरीचा बाप ना तू? वर संशोधनाला चप्पला झिजवाव्या लागतात रे!
श्रीकांत तरीही शांतपणे घ्यायचा. स्मिता स्वतःहाशी चरफडायची.आता मलाच पाऊल उचलायला पाहिजे. यांचा काही उपयोग नाही. उद्या वय वाढले तर लग्नाच्या बाजारात नुसत्या शिक्षणाला पण कोणी विचारणार नाही.
पहिला प्रश्न दागिन्याचा? एकही छोटा मोठा दागिना करून ठेवला नाही. सोनं स्वस्त झाले कि कित्येकदा म्हणायचे , घेऊन ठेऊत काहीतरी श्रेयासाठी? पण कधी मनावर घेतलेच नाही या बाबाने?
सेव्हिंग पण नाही. सतत तिच्या शिक्षणावर खर्च. काय तर म्हणे शिक्षण हाच अनमोल दागिना आहे बाजारात त्याची किंमत चढतीच राहणार. कधीच स्वस्त होणार नाही. आणि राहता राहिला प्रश्न सोन्याच्या दागिन्यांच्या, जेव्हा लग्न करायचं तेव्हा बघू दागिने. श्रीकांतचे प्रत्युत्तर ठरलेले.
शेवटी स्मिताने ठरवले, माझेच दागिने देईन तिला. माझ्या बाबांनी कन्यादानात दिलेच आहेत. टोपलभर नाही पण वाडगाभर नक्कीच आहेत.मला तरी कोठे मिरवायचे आता ते घालून? एक चिंता तिने स्वतःहाची समजूत काढून मिटवली.
दिवस सरत होते श्रेयाने आपल्या हुशारीने पोस्ट ग्रॅज्युएशन कंल्पीट केले. PhD करण्याचा तिचा मानस होता. आणि इतक्यात 'सोंनं पें सुहागा'
अचानक शेवटच्या वर्षीच्या प्लेसमेंट साठी आलेल्या, मायक्रोसॉफ्ट कंपनीने तिला अलगद उचलले. गलेलठ्ठ पॅकेज तिच्या हातात ठेवले भलेलठ्ठ पोस्टची आॉफर आणि बऱ्याच सोयीसुविधा सहित आणि US ला पोस्टींग. 'चारो उँगलियाँ घी में' . सोबत ती PhD पण करू शकणार होती. कंपनीने तीला मुभा दिली होती.
ती ते appointment letter घेऊन धावत धावतच घरी आली. दारावरच्या बेलवरचा हात तिने दार उघडेपर्यंत काढलाच नाही. दार उघडताच कडकडून आईला मिठी मारली.
आई आता लाग लग्नाच्या तयारीला. बाबा तुम्ही मात्र मला मदत करा हं! US ला जावे लागले ना मला ? आणि Appointment letter तिने बाबांच्या हातात ठेवले. श्रीकांत ने मोंठ्यादा वाचले.
बापरे श्रेया खरच हा अनमोल दागिना आता लग्नाच्या बाजारात दिमाखाने मिरवणार बरका म्हणत, स्मिताने देवासमोर साखर ठेवली. पावलास रे बाबा! लेकं लग्नाला तयार झाली रे! म्हणून देवाला हात जोडून नमस्कार ही केला.
आता हा मोठा दागिना आणि इतर छोट्या, मोठ्या प्रशस्तीपत्राचे दागिने, श्रेयाच्या व्यक्तीमत्वार नक्कीच शोभून दिसणार ना स्मिता बाई? मग कधी जायचे सोनं खरेदीला बोल? श्रीकांतने तिला कोपरखळी मारली.
यात शंकाच नाही माझी लाडकीला तिच्या लग्नात तिच्याच कर्तबगारीवर कमवलेला अनमोल दागिना तिची शोभा नक्कीच वाढवणार हो श्रीकांत राव! आणि ते प्रावीण्यपदके आणि मोठ मोठ्या ट्रॉफ्या, इतर पद्मभूषणे या नववधूची आणखीच शोभा वाढवतील बरका!
हा हिरा आमच्या अशितोषच्या कोंदणात परफेक्ट बसतो आहे हो! चालेल ना तुम्हांला ? दारात देशमुख मंडळी ऊभी होती. लाखमोलाचे स्थळ श्रेयासाठी चालून आले होते. त्यांचा अशितोष पण एक अनमोल रत्नच होता देखणा, यशवंत, किर्तीवंत!.
'अस्सल मोत्याला आपला अस्सलपणा व तेज टिकवायचे असेल तर, शिंपल्यात कोंडून सागराच्या तळाशी दडून रहावं लागतं हो!' तेव्हाच मोती अबाधित राहतो. आलं का लक्षात श्रीकांतराव? देशमुखांनी श्रीकांतला डोळा मारत अशितोषकडे चोरटा कटाक्ष टाकला.
स्मिता आत स्वतःहालाच चिमटा काढत होती!... नक्की कोणत्या दागिन्याचे पारड जड? अनमोल दागिना शेवटी शिक्षण हा अनमोल दागिना आहे. त्याला चोराचे भय नाही. आणि अंगभर घालून मिरवण्याची गरज नाही. तिजोरीत कुलुपात ठेवायची गरज नाही. कारण कोंबड्याने साद घातली नाहीतर सुर्य उगवायचा राहत नाही. खरय ना!!!..
