Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Suresh Kulkarni

Horror


2.5  

Suresh Kulkarni

Horror


चांदी!

चांदी!

5 mins 2.4K 5 mins 2.4K

मी मायाच्या लगामाला हलकेच हिसका दिला. तिने आनंदाने मान डोलावली आणि दुडक्या चालीने मार्गस्थ झाली. तिच्या गळ्यातली घंटी खूळ खूळ वाजत होती. किर्रर्र अंधारी रात्र होती. टिप्पूर चांदणं पडलं होतं. आभाळात आज चांदण्यांचं राज्य होत. पण चंद्राचा पत्ता नव्हता. कारण आज अमावस्या होती.


आमचं गाव या आडबाजूच्या रेल्वे स्टेशन पासून चांगलं सात आठ कोस लांब आहे. पक्कीच काय कच्चा रस्ता पण नाही. कुठं पाय वाट तर कुठं गाडी वाट इतकंच. सगळा मामला डोंगर -दऱ्याचा अन माळ रानाचा. वाटेत दिवसा अंधार वाटावा अशे निबीड जंगल ! या स्टेशन वर रात्री अकराला आणि पहाटे तीनला एक एक गाडी शिट्टी मारून जाते बाकी शुकशुकाटच असतो. 


मी मात्र अशा आडवेळी येथे टांगा घेवून येत असतो ! आता न येवून कोणाला सांगतोय ? माया साठी यावं लागतं बघा. माया म्हणजे माझ्या टांग्याची घोडी ! तिच्या 'चांदी ' साठी अशी अपरात्री धडपड करावी लागते. (' चांदी 'म्हणजे घोड्याचा आहार हो ! गवत ,चारा असलाच काही बाही ) आत्ता पण त्यासाठीच आलोय. एखादं पॅसेंजर भेटलं तर मायाच्या 'चांदी 'ची सोय होईल !


नेहमी प्रमाणेच आज पण गाडी लेटच होती. रात्रीचे बारा वाजून गेलेत , अजून अकराच्या गाडीचा पत्ता नाही. येईल एक दोन पर्येंत. तोवर वाट पाहणं आलंच, पण हे आमचं नेहमीच असतं. मी आपला स्टेशन बाहेरच्या एकुलत्या एक लाईटीच्या खांबाला टेकून बसलो. बिडी काढली अन शिलगावली. मिणमिणत्या मेणबत्ती सारखा पिवळा उजेड खांबावरल्या बलचा पडलाय. पांढऱ्या पीठाचा सडा टाकल्यागत चांदणं दिसतंय. त्यावर काळ्या सावल्याची जाळी रांगोळ्या सारखी वाटतीय ! इतकी अमोश्याची रात्र पण लांब डोंगरा पलीकडं पांढुरका उजेडाचा पट्टा दिसतोय. हवेत गारवा पण भरलाय. समोर माझ्या टांग्याकडं नजर टाकली. माया ऐटीत उभी होती. तिच्या घोटया खालचे चारी पाय काळे असल्याने ती स्वप्नातल्या घोड्यासारख अधांतरी तरंगत असल्यासारखी दिसत होती . या कल्पनेचं माझी मलाच हसू आलं ! माझ्या पायाजवळ आता पाच सहा बिड्याची थोटकं जमली होती. आता बस ,इतक्या बिड्या तब्येतीला चांगल्या नाहीत. गाडीची शिट्टी झाली. आली वाटत. मी लगबगीनं उठलो. 


गाडी स्टेशनात आली थोडं थांबल्यासारखं करून पुन्हा शिट्ट्या मारत निघून गेली. मायला अजून कस कुणी प्रवासी  स्टेशनाबाहेर येईना ? का आज खाडा पडणार ? मी काय पाणी पिवून झोपन , पण या घोडीचं कसं ? असा विचार करत होतो तोच , एक जाडगेला बाबा खंडीभर पिशव्या , पोते घेवून माझ्या टांग्याकडे येत होता . 

"गावात जायचंय काय घेणार ?"त्याने विचारले . 

"काय ,तुम्हाला वाटेल ते द्या ! "

" आ ! म्हणजे ?"मी अवाच्या सवा मागणार या अपेक्षेत तो असावा . 

"अश्या अपरात्री , खडकाळ रस्ता , म्हणून तुमची अडवणूक करणारा मी नव्ह ! माझ्या 'मायाच्या ' पोट भरल इतकं द्या म्हणजे झालं !"

" कोण 'माया '?"

" अहो , माझी घोडी ! ही काय टांग्याला जुंपली हाय ! आमच्या दोघांच जगनं तुमच्यावर --म्हणजे तुमच्या सारख्या गिऱ्हाईकावरच अवलूंबून असतं ! तवा तुमीच समजून द्या झालं ! अन हो चार पाच घंटे लागतील गावापस्तोर जायला तवा पानी ,बिनी भरून घ्या. वाटत काय मिळत नाही ! नुस्त माजलेलं जंगल हाय !डोंगर दऱ्याची वाट !"

"हो ,पाण्याची बाटली आहे . "

" मग ठीक हाय . आता बसा टांग्यात !"मी त्याच्या सामानाच्या पिशव्या त्याच्या पायाजवळच्या जागेत काही तर मी समोर बसतो तिथं काही ठेवल्या. तो मागल्या बाजूला बसला. तो बसताना टांगा चांगलाच कलला होता ! काय 'भारी ' गिऱ्हाईक आहे ! 

मी माझ्या जागेवर बसून हलकेच मायाच्या लगामाला हिसका दिला. मायाने आनंदाने मान हलवून दुडक्या चालीने गावचा रस्ता धरला. 

                                                                      ०००   

स्टेशन मागे पडून साधारण तासभर झाला होता . मायाच्या लयीतल्या टापांच्या संगीताला रातकिड्यांचा 'सा ' बहर आणत होता. आता उतरणीची वाट लागली होती. डोंगर माथ्यावरची झाडी आता दाट होत होती.  माया सारखे डोके हलवत होती. ती काय म्हणतेय मला कळत होते ! 

" झोपलाव का ?"मी मागे बसलेल्या प्रवाश्याकडे पहात विचारले, तो बसल्या जागी डुकल्या घेत होतो. थकला असावा.

"हो जरा डोळा लागतोय. प्रवास झालाय धा -बारा घंट्याचा ! "

"झोपा ,झोपा पर जरा सावधच झोपा . जंगली जनावर असत्यात या वक्ताला ! झडप घालत्यात !"

" बाप रे ! हे मला माहितच नव्हते !"

"आता तुमी जागे झालाव तवर मी धार मारून येतो ! तुमी बसा टांग्यात निवांत ! हे या झाडा मागच जातोय !"

"धार ?"

"मंजी "मी करंगळी दाखवली . 

मी टांग्या खाली उतरलो. एकदा पेंगुळलेल्या प्रवाश्याकडे नजर टाकली आणि झाडा मागे गेलो. हे माझे नेहमीचेच 'धार 'मारायचे ठिकाण . धार मारून , खिशातली चापटी तोंडाला लावली . जळ्जळते दोन घुटके घेतले. फर्मास नवी कोरी बिडी शिलगावली. असल्या गारव्यात बिडीचा झुरका काय आनंद देतो ? ते कळायला असल्या वेळेलाच बिडी वडायला पायजे राव ! 

                                                                     000  

मला जस जसा उशीर होवू लागला तसा टांग्यातल्या प्रवाशाची चुळबुळ सुरु झाली . मायला कुठ तडमडलय बेन कोणास ठावूक ? भकास आडरान ! किरकिऱ्या काय सपाटून वरडत्यात ! घुबड पण घुमाया लागलीत ! त्यात हि काळीढूस्स अमोश्याची रात्र ! असले काहीतरी विचार त्याच्या मनात येत असावेत . मला ते जाणवत होते ! मी ज्या झाडामागे होतो तो त्याच दिशेला पहात होता . सहज त्याने समोर पहिले. त्याची दातखीळच बसली असावी . डोळे वटारून तो समोर पहात होता ! कारण त्याच्या समोर 'माया ' उभी होती ! टांग्याला समोर जुंपलेली माया टांग्याच्या मागे पण उभी होती ! भू SSSSत !त्याने आरोळी ठोकायच्या आत मायाने डायनासोर सारखी मान लांब करून त्याला तोंडात धरले आणि गाडी बाहेर ओढले. त्याचा चट्टा मट्टा करून ती जिभल्या चाटत होती तेव्हा मी झाडा मागून बाहेर आलो . गाडीतल्या त्या प्रवाशाच्या सगळ्या पिशव्या झाडीत भिरकावून दिल्या. 

"चला या घोडीच्या ' चांदी 'ची सोय झाली . आता पुढच्या अमोशेपर्यंत घोर नाही !" टांग्यात बसताना मी स्वतःशीच पुटपुटलो !

आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. मी जर या मायाच्या ' चांदी 'ची सोय नाही केली तर ? ---तर ती माझीच 'चांदी ' करणार आहे ! मग मी तरी काय करू ? माझाही नाईलाज आहे ! 


Rate this content
Log in

More marathi story from Suresh Kulkarni

Similar marathi story from Horror