भयभीत भाग१
भयभीत भाग१
मीनल संध्याकाळी क्लासवरून परत येत होती.
तिच्या घरापर्यंत सहसा बसेस किंवा शेअर रिक्शा मिळत नसे.
त्यामुळे अर्धा पाउण किलोमीटर रोज चालणं व्हायचं .
मोठ्या बस स्टॉपची वर्दळ संपली कि थोडासा भाग असा निर्जन असायचा.
मग एक मंदिर होतं .
तिथे मीनल वळायची आणि कॉलनीचे मोठे गेट यायचे , तिथुन अगदी रम्य वाटायचे.
घरी जाइपर्यंत ओळखीचे २-४जण भेटायचे, कुणीतरी बोलायचे।!
मोठ्या बस स्टॉप ते मंदिर या दरम्यान एक छोटीशी दर्गा होती, तिच्याजवळ २-३ मर्क्युरी लाईट होते पण ते क्वचितच चालू असायचे .
त्याच्यामुळेच या अर्ध्या किलोमिटरच्या अंतरात बर्याचदा दिवे नसायचे. आणि नेमके तिथेच मीनलला चालताना भीती वाटायची.
कधी कधी रोहन , तिचा मामेभाऊ गाडी वर घ्यायला यायचा . कधी त्याला जमायचं नाही.
आज मीनल आपल्याच धुंदित चालली होती. दर्ग्याजवळ आली असावी, अचानक साइकिलची घंटी वाजली.
ती बाजूला सरकली.तरीही पुन्हा घंटी वाजली, असे ३-४ वेळा झालं .
ती थबकली पाहते तर एक कुणी माणूस साईकिल हातामधे घेऊन बाजूने चालत होता.
अतिशय किळसवाण्या नजरेने तिच्याकडे पाहत बोलला , " यायचं का डबलसीट ? "
मीनलखूप भेदरली. "नाही काका नाही . तुम्ही जा ना !" आणि झपाझप चालायला लागली.
तो माणूस भीषण हसला . " तुमची मर्जी ! "
आणि सायकलवर बसून घंटी वाजवत निघून गेला !
जाताना मीनलला नखशिखांत पाहत पाहत गेला.
मीनलची ध ड ध ड वाढली. कित्ती काळाकुट्ट माणूस , डोळे बाहेर आलेले घुबडासारखे आणि चेहर्यावर फक्त दात दिसले होते, हसल्यावर !
पण खूप विचित्र आणि भयानक चेहरा होता त्याचा.
भेदरलेली मीनलत्यांच्या कॉलनीचं गेट पाहुन सहज झाली.
ती वरून सहज दाखवत असली तरीही त्या घाणेरड्या डोळ्यांची आठवण तिला किळस आणत होती.
त्याचा चेहरा , आवाज आणि ती घंटी तिच्या डोळ्यासमोरून जाईचना.
मामा किंवा मामीला सांगाव का ? असा विचार आला पण त्याने काय होईल ? .
त्यांना टेंशन कशाला म्हणून ती गप्प बसली.
मीनल एका छोट्या कंपनीत नोकरी करायची आणि संध्याकाळी MPSC च्या कोचिंग क्लासला जायची.
यावर्षी काहीही करून तिला ही परीक्षा पास करून चांगली नोकरी मिळवायची होती.
या ध्येयासाठी छोट्या तालुकाच्या गावातून ती शहरात मामाकडे शिकायला आली होती.
आई बाबांनी नोकरी करण्याची परवानगी पण दिली होती. कारण क्लास संध्याकाळी असायचा आणि या कंपनीत तिला संध्याकाळी लवकर जाण्याची संधी मिळाली होती.
तिचा भार ती कुणावर पडू देत नव्हती आणि क्लास ही होत होता.
या रुटीनमधे काल झालेली घटना तिला डिस्टर्ब करून गेली.
तिने कालची घटना विसरण्याचा खूप प्रयत्न केला .
रात्रीपर्यंत ती थोडीशी नॉर्मल झाली.
झोपताना प्रयत्नपूर्वक तिने आपले मन गाण्यांकडे वळवले.
सकाळी तिला या गोष्टिचा विसर पडला.
ऑफिसमधेही तिला ह्या सगळ्याचा विसर पडला.
संध्याकाळी ऑफिसमधून क्लासला गेली, तेथून बस स्टॉपवर आली.
तेथून पायी घरी निघाली तेव्हा तिला कालची घटना आठवली.
दर्ग्यापर्यंत आली आणि तो मर्क्युरी लाईट फ्लक्चुएट व्हायला लागला नेहमीप्रमाणेच .
कधी प्रकाश, कधी अंधार ! निर्जन रस्ता!
इतक्यात सायकलची घंटी वाजली आणि ती दचकली.
पुन्हा तोच घंटीचा क्रम!
ती अंग वाचवून रस्त्याच्या कडेने चालू लागली.
अतिशय लगटपणे आणि किळसवाण्या आवाजात तो बोल ला " काय ठरलं म्याडम? यायचं का डबलसीट??"
आणि सायकलच्या दांडीवर हात मारला.
मीनल ला शिसारी आली त्याचा अवतार बघून!
कारण चमकणार्या लाईटच्या उजेडात क्षणार्धात तिला त्याचा चेहरा एखाद्या प्रेतात्म्यासारखा वाटला.
पांढरे कुरळे केस, चेहर्यावर कसलासा व्रण , सुरकुतलेला काळा चेहरा , लाल गढूळ , बाहेर आलेले डोळे , आणि तुटलेला दात!
ती खूप घाबरली. " नाही हो काका !! तुम्ही जा ! प्लीज !"
तिच्या आवाजात कापरं भरलं.
" तुमची मर्जी! उद्या तर येसालच ना !"
तो बोलला आणि सायकलवर टांग मारत , घंटी वाजवत, मीनल ला नखशिखांत न्याहाळत निघून गेला.
आता मात्र मीनल पळाल्यागत चालायला लागली.
कॉलनीचं गेट अालं अन् तिच्या जिवात जीव आला.
घरी आल्या आल्या मामीशी बोलली नाही कि
टि वी समोर बसली नाही.
एखादं भूत किंवा पिशाच पाहिल्या सारखी तिची अवस्था होती.
असं माझ्या बाबतीतच का होतंय? हा प्रश्न मनात. . आता काय करावं ? हा प्रश्न??
मी काय बिघडवलंय कुणाचं?
ती रूम मधे पडून राहिली.
मामा आले , वाकून पाहिलं , त्यांना वाटलं - थकली असेल.
पडून राहिल्यावरही तिची बेचैनी थांबेना.
तिने ड्रेस बदलला , घरातले कपडे घातले अन फ्रेश झाली.
देवासमोर येवून बसली.
मामीने दिवा लावला होता.
अगरबत्ती आणि धूपचा सुगंध दरवळत होता.
तिला हलकं वाटलं .
डोळे मिटले आणि आपोआप तोंडातून रामरक्षा बाहेर पडली.
"अथ ध्यानम्
ध्यायेदाजानुबाहुम् धृतशरधनुषम्
बद्ध पद्मासनस्थं।
पीतं वासो वसानम्. . "
देवासमोर दिव्याकडे पहात हे म्हणताना तिला खूप शांत वाट त होतं.
मामीही तिला देवघरात पाहून खूप खुश झाल्या.
"मीनू. . तेवढं झालं कि ताटं अन् पाणी घे बेटा. स्वयंपाक झालाय"
मामी म्हणाल्या.
जेवतानाही ती शांतच होती.
जुजबी बोलत होती.
जेवण झाल्यावर रोहन आणि ती ओट्यावर बाहेर बसले.
"रोहन उद्यापासून मला घ्यायला येत जा ना रे गाडीवर ! अंधार पडतोय हल्ली, मला भीती वाटते रे चालत यायला."
ती काकुळतीने म्हणाली.
"अं बघतो. उद्यापासून का ? बरं पण ताई , त्या बस स्टॉपजवळ नको ताई , ऑकवर्ड वाटतं.
तू दर्ग्याजवळ ये, मी तिथुन पिकप करीन.
तू थांब , मी येईपर्यंत . ठीक ना ?"
"ओके. थँक्यू रोहन !" ती हसली.
तिला खूप रिलॅक्स वाटलं.