सवाष्ण(कोरोनाकालखंड)
सवाष्ण(कोरोनाकालखंड)
प्रत्येक विवाहित स्त्री ला या जगातून आपण सवाष्ण जावे असे वाटते. म्हणजे आपण पुण्य केलय असं मानलं जातं. अशी मानसिकता का आणि कशी झाली असावी याची कल्पना मला नाही . . पण मी माझाच अंदाज लावते. . तो असा की पूर्वी स्त्रियांना सती जावे लागे. . मग त्यांची इच्छा असो किंवा नसो.
अन कुणी सती नाही गेली तर त्या काळी विधवांचे जीवन किती त्रासदायक होते हे सांगावयास नको !
कदाचित तेव्हापासूनच नवर्याच्या आधी मरण हे पुण्यकर्म वाटायला लागले असेल. .
पण हे सवाष्ण जाणं खरच प्रत्येकवेळी पुण्याचं असतं का? तर उत्तर नाही असं येईल.
माझी एक जिवलग मैत्रिण अचानक डिहायड्रेशन ने गेली. . कळेपर्यंत उशीर झाला होता. . वय वर्षे ३४! लहान मुलगी अप्पर के जी मधे होती व मोठी मुलगी सातवी ला!
तिला नेताना सर्व बायका सवाष्ण म्हणून पाया पडत होत्या व मी मात्र तिच्या लहानशा मुलीला कवटाळून आत बसले होते. मला ते सर्व बघवलं गेलं नाही. अर्धवट संसार टाकून गेली.
आणखी एक मावस जाऊबाई आयुष्यभर कष्ट उपसत राहिल्या . जेव्हा मुलं मोठी झाली व सुखाचे दिवस येऊ लागले. . मुलाचं लग्न झालं अन अचानक न्यूमोनिया ने गेल्या. त्यांचाही मळवट भरून सगळे सोपस्कार करून अंतयात्रा काढली गेली. तिने आयुष्यात खस्ता खाल्ल्या, सुख भोगलच नाही!
आणखी एक मैत्रिण मागच्या वर्षी कॅन्सर मधून बरी झाल्यावर डिप्रेशन मुळे गेली.
मुलं लहान अर्धवट संसार . . तिलाही सवाष्ण म्हणून नटवत होते . . ते पाहवलं गेलं नाही मला !
हो एक वृद्ध काकू सगळ्या जबाबदार्या पार पाडून , आनंदात जगून तृप्तीने गेल्या. . त्यांचं मला खरच पुण्य वाटलं होतं .
परवाच या कोरोना संकटात एका परिचित काकूंचा मृत्यु झाला. त्या कोरोनाग्रस्त होत्या . . मग सवाष्ण जाऊनही त्यांचं दुर्दैव पहा . यातले काहीच सोपस्कार त्यांच्या नशीबी नव्हते.
एकाचवेळी घरात मुलाला नवर्याला व त्यांना कोविड - १९ ने ग्रासले होते. अंत्य संस्काराला परवानगी काढावी लागली. आयुष्यभर जपलेली माणसं खांदा द्यायला पण नाहित हे किती दुर्दैव !
प्रेताचं बांधलेलं गाठोडं . . . लांबूनच स्वस्थ असलेल्या मुलाने नमस्कार केला , लांबूनच साडी अंगावर फेकली आणि पी पी ई किट घालून अग्नि दिला. नवर्याचा तर नाइलाज होता . . सगळं फक्त पहात होते. कसलं मरण आलं असा विचार करून दुरूनच हात जोडले असावेत.
म्हणजे असं संसारसतून उठल्यावर हे सवाष्णीचे सोपस्कार नशीबी नाही की चार मुलं असून एकाने पण प्रेताला कवठाळून आई म्हणण्याचे भाग्य नशीबी नाही. मळवट, हळदी कुंकवाचा सडा किंवा सुहागिनींचा वेढा नाही , ते शेवटचं नटवणं किंवा दर्शन घेणंही नाही.
खरच या लॉकडाऊन च्या कसळात गेलेल्या लोकांचं हे सामाजिक दुर्दैव आहे कि त्यांना मृत्युनंतरही योग्य तो मान सन्मान मिळू शकला नाही. प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व गेली तेव्हा गर्दीही उसळ ली नाही. घरी सांत्वनेसाठी लोक येऊ शकले नाहित.
या काळात जन्म होणे , मृत्यु होणे , लग्न ठरणे किंवा कुठला अन्य आजार उद्भवणे . हे म्हणजे खरच कठिण काम झालेलं अहे. हा सगळा वाईट अनुभव !
या सर्वात कोरोना पॉजिटिव्ह निघणे व त्याला सामोरं जाऊन सुखरूप परत येणे ही देवाची कृपाच म्हणायची. !
© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे , सखी.