अंकूर
अंकूर


(१)
वर्गात धिंगाणा करून बाहेर निघताना माझा धक्का लागला समोरून येणाऱ्या स्नेहाला .
मी क्षणभर बिचकले .
"देवाने डोळे दिल्यानंतर समोर पाहून चालावं ,!!"
एवढेच खड्या आवाजात बोलून चष्मा वर करून ती निघून गेली.
मला ह अनुभव नेहमीचाच होता पण या विषयावर ठरवूनही मी विचार करू शकले नाही, माणसे इतकी निस्पृह कशी जगू शकतात?असं वाटायचं.
तिच्याबद्दल कोणाच्याही मनात जिव्हाळा नव्हता.
कसा असेल ? प्रेम दिलं तर प्रेम मिळतं ना ! असलासा काही विचार करून मी पुढे निघाले .
"एक मिनिट, प्लीज? त्या स्नेहा कडून मला एक वही हवी होती. तुम्ही मला मदत कराल का प्लीज?"
समोर आलेला शैलेश केविलवाणा बोलला आणि मी बावरले .
" ना बाबा ! ती पोरगी ?. . . अशक्य! तुम्हीच प्रयत्न करा नाहीतर नाद सोडा!"
मी हात जोडले .
"तिला बोलणं कठीणच आहे ,सरळ बोलत नाही . अन बोंब अशी की सगळया नोटस व्यवस्थित पूर्ण असतात तिच्या ! काय करावं ? सांग ना " शैलेश.
" तुमचं तुम्हीच ठरवा ! ती माझ्या डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे ."
एवढं म्हणून मी निसटले खरी, पण मला पुन्हा तिच्या विषयी विचार करणं भाग पडलं .
ही स्नेहा स्त्री असूनही इतकी रुक्ष कशी? इतकी कोरडी कि मुले देखील धजत नाही तिच्याशी बोलायला .
मला मनोविश्लेषण करण्याची , गुंतागुंतीचं प्रकरण सोडवण्याची , कोणालाही समजून घेण्याची खूप इच्छा असायची. इच्छा म्हणण्यापेक्षा नादच म्हणाना किंवा मग आवड, छंद!
यावेळी मी ठरवलं , तिच्यात लक्ष घालायचं ,मिसळायचं ,तिला उलगडायचं किंवा बदलून टाकायचं.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती समोरून आली .
"हाय स्नेहा! "
ती सरळ चालू लागली.
" एक मिनिट स्नेहा ,एक सांगू का, आज तू खूप सुंदर दिसतेस !"
ती थबकली आणि तितक्याच कोरडेपणाने पहात उद्गारली ,
"मला मस्का आवडत नाही आणि हा मस्का नसेल तर मी तुला विचारलं नव्हतं की मी कशी दिसतेय? रिमेंबर वेल यापुढे माझ्या वाटी जाऊ नकोस. बरं राहील !????"
ती सरळ निघून गेली पुन्हा प्रश्नचिन्ह??
कुण्या मुलीच्या सौंदर्याची स्तुती करावी अन ती भडकते हा आयुष्यातला प्रथम प्रसंग होता माझ्यासाठी .
पण मला हरायचं नव्हतं .
ती इतरांपेक्षा वेगळी होती म्हणून हल्ली मला आवडत होती .
मी मात्र हात धुऊन तिच्या मागे लागले होते .
मला कळालं पाहिजे होतं कि ती वेगळी का आहे.
"अगं ,तू त्या स्नेहाच्या मागे का लागली आहेस .ती इतकी झिडकारते त्याचं तुला काहीच कसं वाटत नाही.?? मी असते तुझ्या जागी तर तिच्याकडे पाहिले पण नसतं! तिला इतका गर्व अन मीपणा आहे तर तू का झुकतेस तिच्यापुढे?"
प्रणिता हल्ली नेहमीच वाद घालायची माझ्याशी. रागवायची.
सगळ्या मुलींना तिची चीड होती, मी सोडून!
"ती कमालीची फटकळ पोरगी आहे. प्रेम ,वात्सल्य, ममता या भावना तिच्या जवळ नाहीत. फक्त रागिट आणि गर्विष्ठ ! " हेमा म्हणाली.
"आणि काटेरी . . . तिचं नाव कोणी स्नेहा ठेवले. . कुणास ठाऊक? निवडुंग हवं होतं , निवडुंग ! काटेरी निवडुंग !???" प्रणिता बोलली अन सगळ्यां मैत्रिणी मोठ्यांदा हसल्या पण मला नाही रुचलं.
ती अशी नसेल नक्की !
तिच्या मनात काहीतरी आहे .
ती पण वेगळी असेल, ती पण असेल आतून मऊ !
यासाठीच तर माझी धडपड चालली होती.
* * * * *
हल्ली ती जिथे जिथे जाते तिथे मी जाऊन उभी राहायची आणि तिच्याकडे पाहुन स्माईल द्यायची. मागे जायची, पण तिचे ओठ कधीच उकलले नाहीत . हलले नाहीत .
रागाचा एक कटाक्ष टाकून ती निघून जायची.
चेहऱ्याला नेहमीची कडक इस्त्री अन अाकसलेलं सारं काही!
या स्नेहाला एकही मैत्रीण नव्हती.
ही मुलगी जगतेच कशी?
मला कुतूहल होतं .
पाणी पिताना, वर्गातून निघताना, गेट मधून येताना, कॅन्टीनमध्ये प्रत्येक ठिकाणी मी तिला ओळख दिली, दाद दिली आणि ती मात्र तशीच राहिली पूर्वीप्रमाणे!
* * * * *
एकदा कॉलेजच्या आवारात मी गवतावर बसून चहा घेत होते मैत्रिणींसोबत . स्नेहा तिथे आली अनपेक्षित आणि हलकेच पाठीवर थाप देऊन बरोबर येण्यास सांगितलं.
मी आश्चर्यात चहा तसाच ठेवून गेले.
बाजूला आल्यावर बोटाने चश्मा वर करीत ती म्हणाली -
"तुझं नाव काय आहे? एनीवे जे पण तुझं नाव असेल ऐकून घे . मला सांग तू मला का बोलायला लावतेस ? तुला काय हवं? का माझ्या पाळतीवरती असतेस ? मला पाहून स्माईल का देत असतेस? असले विनोद एकादे वेळा बरे वाटतात , नेहमी नाही !
लक्षात ठेव , यापुढे हे होता कामा नाही. तुझं माझ्याकडे काम असेल तर बोल. आवाक्याबाहेरचे काम मी करीत नाही पण कीव करून तुझी एखादी मदत करू शकेल मी.
तिथं सगळ्या मुलींसमोर तुझा अपमान करू शकले असते ,पुन्हा तू मान वर काढली नसतीस पण मलाच ते रुचले नाही. जे सांगितलं ते मेंदूत कोरून ठेव. गुडबाय!!!"
" खूप बोलायला लागला आज "
ती जाता जाता पुटपुटली .
मी पुतळ्यागत स्तब्ध उभी राहिले.
मनात वादळ असलं तरी कुठेतरी आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या .
तिने कुठेतरी माझी काळजी केली होती .
सर्वांसमोर तिने मला फटकारलं नाही किंवा माझं वागणं तिला कुठेतरी स्पर्शून गेलं .
एवढेच काय माझ्यासाठी कमी होतं ?
मी परतले आणि मुली उत्सुक दिसल्या
घडलेल्या प्रसंगाबद्दल !
"काय म्हणाली ती बाजूला नेऊन? माय गॉड!!! तुझ्याशी स्वतःहून बोलली एकट्यात!"
" काय जादू केलीस तू ?"
""काही सीक्रेट असेल तर आम्हालाही कळू दे ना "
एक ना अनेक! मुली खूप डोकं खात होत्या.
पण मी एक शब्दही बोलले नाही.
सरळ निघून गेले.
मलाही स्वतःच्या वागण्याचं आश्चर्यच वाटत होतं
क्षणभर मनात विचार आला कि मी तिचा सतत विचार करते , असं नाही होवो कि तिचा प्रभाव पडून मी तिच्यासारखीच बनून जाईल .
तिला बदलायला निघाले स्वतः बदलले. . . . तर. . . . .
(२)
रोहन सांग ना रे , स्नेहा विषयी कोणालाच आपुलकी का नाहीये?" माझा प्रश्न !
"तुला जणु माहीतच नाही . अगं ती प्रत्येकाशी एकदम रफ वागते. कधी प्रेमाने बोलणारच नाही. ठीक आहे, तिला मुलांची चीड असेल पण एक गंमत वाटते, मुलींशी तरी बोलू शकते ना ! कुणी मैत्रीण नाही कि कोणाशी संबंध नाही .
सगळं कसं यंत्रवत चालतं तिचं. सरांशी देखील औपचारिकता !
प्रत्येक शब्द जणु मोजून बोलते.जणू प्रत्येक शब्दाचे पैसे पडतात तिला?
असल्या व्यक्तीशी कधी, कोणी बोलेल का ?
ती कुणावर प्रेमच करू शकत नाही. "
" राहू दे ना रोहन हा विषय ! जाऊदे दुसरं काही बोलू या !"
"अरे काय हे? विषय कुणी काढला होता ?" रोहन चिडला.
मी का कुणास ठाऊक हळवी बनले.
" व्हेरी स्ट्रेंज !?? ओके !मी . . . नाही बोलणार तिच्याबद्दल! अगं ती पहा इकडेच येतेय." रोहन बोलला अन् आरामात निसटला.
"स्नेहा, संपला का गं तास ?" मी विचारलं .छापील!
" आता बेल ऐकलीस ?"
"हो ऐकली ना !"
"मग बेल वाजल्यावर तास संपताेच, माहित आहे ! त्यात विचारण्याची काय गोष्ट आहे ?"
ती चालू लागली .
आता मात्र मी चिडले , जाम खवळले.
काहीतरी बोलण्याचा विचार होता ,पण ती निघून गेली होती.
* * * * *
दुसऱ्या दिवशी ती लेडीज रूम कडे येत होती .
मी समोरून गेले.
" स्नेहा, हे घे!"
मी गज़रा पुढे केला.
" का????"
"प्रत्येक "का "चे उत्तर माझ्याकडे नसतं!"
" पण मला नाही आठवत कि मी तुला गजरा मागितला होता ?"
" प्रत्येक गोष्ट मागितल्यावरच द्यावी का?"
" बहुतेक !"
"अगं पण मी देतेय ना ? घे !"
" हेतुपुरस्सर????"
"नाही! प्रेमाने ! "
"अशक्य! उगाचच मला गुंतवायचा निष्फळ प्रयत्न करू नकोस. तुझ्या क्लासला जा . अन् स्वतः लावून घे!"
ती तूसडं बोलली .
"स्नेहा sssss!" मी जवळ-जवळ ओरडलेच .
"मला ऐकू येतं . आवाज खाली घे!"
" तू स्वतःला काय समजतेस?कोण समजतेस गं ? कुणाच्या भावनांची काहीच किंमत नाही का ग ? " मला रागच आला.
" भावना कुठेतरी स्वार्थाशी निगडित असतात."
ती बोलली तितक्याच कोरड्या आवाजात.
" खोटं- साफ़ खोटं !!! भावनांचं स्वार्थाशी काहीच नातं नसतं .
भावना . . . . भावना. . . असतात.! मनातून, हृदयातून, निघणार्या ! त्याशिवाय आयुष्या फक्त अशक्य आहे! खोटी आहेस तू . . ."
आणि मी थबकले .
डोळे लाल होते, पापण्या अश्रुंनी भिजलेल्या आणि पुढे एकही शब्द बोलू शकले नाही.
गजरा तिथेच टाकून मी एकटी चालू लागले पाय आपटीत.
आजपर्यंत इतक्या खालच्या दर्जाची वागणूक मला कोणी दिली नव्हती. अगदी कुणीच नाही!
ही काय महाराणी आहे, ? माझ्या मैत्रीणी किती जीव लावतात मला!
कधीच झिडकारत नाहीत ,
आणि ही????
मला खूप काही वाटत होते तरीसुद्धा शेवटची आशा म्हणून मी माझ्या नकळत मागे वळून बघितले. . . स्नेहा वाकून गजरा उचलत होती .
तिने माझ्याकडे पाहण्यापूर्वी मी पुढे निघाले .
खूप आनंद होत होता मनातून!
हास्याच्या लहरी वर येत होत्या.
मनावरचा भार हलका झाला होता. मी खूप आनंदी झाले होते.
वर्गात खिडकी जवळ बसले होते.
थोड्या वेळाने बाहेर पाहिलं .
स्नेहाच्या कमरेवर रुळणाऱ्या त्या वेणीत वर माझा गजरा माळलेला होता.
आता मात्र मी हर्षोल्हासाने फुलले होते.
" अग आश्चर्यच ! स्नेहाच्या वेणीत गजरा! पोरीला फुलं देखील आवडत नाहीत ! आज चक्क गजरा !! " प्रणिता कुजबुजली. "वा वा . .प्रगति आहे बुवा" प्रणिता पुन्हा हळूच कुजबुजली .
मी काहीच बोलले नाही फक्त एकदा बाहेर पाहिलं .
त्या गजर्याकडे.
ती मान खाली घालून वर्गात चालली होती .
पण मला तर ती रोजच्या पेक्षा वेगळी वाटली , खूप वेगळी . . सुंदर!
* * * * *
एक दिवस कॅन्टीन मध्ये मी कॉफी घेत होते. समोरच्या टेबलावर ती एकटी होती.
मी विठूला बोलावलं आणि तिला पण कॉफी देण्यास सांगितले.
त्याने हुकूमावर अंमल केला .
न मागितलेली कॉफी आलेली पाहून ती चक्रावली .
"कुणी सांगितली ही ?"
"त्यांनी. . त्यांनी " विठू घाबरला .
"बोट काय दाखवतोस? नको म्हणून सांग ."
"स्नेहा. . . घे. " मी इतकच बोलले.
तिने नकार दर्शवण्यासाठी ग्लास थोडा पुढे लोटला .
अन मख्खपणे माझ्याकडे पाहू लागली.
मी पुन्हा एकदा तिच्याकडे पाहून नजरेनेच घे असा इशारा केला.
आवाक असलेला विठू किंवा तिथलं वातावरण पाहून नाईलाजास्तव तिने ग्लास घेतला.
शेवटी मी सुखावले.
तिने कॉफी घेतली .
ती पटकन उठली आणि पैशांसाठी पर्स चाचपू लागली. त्यापूर्वीच मी तिथे गेले आणि पैसे दिले .
"हे रोजचे उपकार का चाललेत, विचारू शकते का?"
चष्म्यातूनही तिच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत माझ्याकडे नव्हती.
मी दुसरीकडेच बघत राहिले .
"मी काहीतरी विचारलं तुला? माझ्याकडे पैसे नाहीयेत असं वाटलं का तुला ? पण ते उडविण्याची सवय नाही मला !"
स्नेहा तू प्रत्येक गोष्टीत इतका व्यावहारिक, व्यावसायिक का बोलतेस त्या शिवाय दुसरं काही नसतं का आयुष्यात?" मी म्हणाले वैतागून.
" हो काय असतं ? हं' !"काय असतं ? सर्वत्र हेच असतं! प्रेम केवळ मुखवटा असतो .अपेक्षांशिवाय हे जग चालतंच नाही. उगाचच भावूक होऊ नकोस !"
"स्नेहा, हे सगळं मला नवीन आहे, पण तुला सांगते अपेक्षा विरहित मी आहे! मला काहीच नकोय गं तुझ्याकडून किंवा आपल्या दोघात कसल्याही मदतीची शक्यता नाही. केवळ प्रेमापोटी आवडीने माणसाला एखादी गोष्ट द्यावी किंवा ऑफर करावी
वाटते!"
"व्वा व्वा प्रेम ! अचानक कुठून निपजलं ? यापुढे असले प्रयोग माझ्यावर करू नकोस"
ओढणीला सांभाळत ती वळणार इतक्यात
"स्नेहा, एक मिनिट ! तुझ्या प्रश्नाचे उत्तर असं देते. तू मला एक वर्ष सिनियर आहे . तू मला क्षणभरासाठी छोटी बहिण समजू शकत नाहीस का?"
तिने फक्त वळून पाहिलं.
तिच्या डोळ्यातले भाव वेगळेच होते. अवाचनीय !
मला झटकन एक खट्याळ कल्पना सुचली .
"स्नेहा , तुला असं तर वाटत नाही ना कि कुणी मला तुझ्या पाळतीवर ठेवलय?"
"तुला का?"
"अगं काय विचारतेस समज हे सत्य असेल तर कोण आहे ? मग विचारणार नाहीस ? विचार तर खरं, मी पटकन नाव सांगेन !"
"इम्पॉसिबल . . ! कल्पना देखील विचार करून कराव्यात ! वेड्यासारखे बोलू नकोस, ते या जन्मात शक्य नाही. असे प्रयोग माझ्यासाठी वापरू नकोस . मी मला पूर्ण जाणते आणि माझ्या बाबतीत इतरांनाही.
"ओके .ओके ! खूप बोललीस, आता लायब्ररीत जा आणि अभ्यास कर. "
मी देखील विचित्र बोलून गेले पण मला जाणवलं यावर तिच्या ओठातून हसू बाहेर येता येता राहीलं.
तिने लगेच त्याला अडवलं होतं .
किती सुरेख दिसली होती त्यावेळी .
ती निघून गेली आणि मी पाठमोरी तिला न्याहळत राहिले.
मला भास झाला तिने वळून पाहिलं. नाही. भास नाही खरंच !
मी दोन्ही मुठी आवळल्या.
स्नेहाला वळून पाहण्याची सवय नव्हती.
तिने तिचा एक नियम माझ्यासाठी मोडला होता , मी आनंदले. येस्स!
(३)
कथा पुढे-
(भाग -३)
एक दिवस , मी, सुनील, रोहन, प्रणिता व नमू बोलत उभे होतो .कसल्याशा टि. वी. मालिकेवर कॉमेंट्स चालल्या होत्या आणि आम्ही मनसोक्त हसत होतो.
" अगं थोड कंट्रोल करत जा ना किती हसतेस "
प्रणिता मला म्हणाली पण मी मात्र काही बोलण्याच्या स्थितीत नव्हतेच.
रोहनच्या वाक्याने झालेल्या विनोदाने मी उकळ्या फुटल्या प्रमाणे सेकंद -सेकंदाने हसत होते .
कंठातून एकही शब्द फुटत नव्हता .
पुन्हा पुन्हा हसायला लागले .
" अगं एवढं कळत नाही का प्रणिता, तिला म्हातारी व्हायची खूप इच्छा आहे" रोहनची पुन्हा कमाल.
" ए का रे का ? " मी इतकच बोलू शकले अन हसायला लागले.
" तुला माहीत नाही का हसल्याने आयुष्य वाढते हीचं तर खूप वाढणार आहे आज. !" आता मात्र माझा बांध फुटला आणि मी खळखळून हसत राहिले .
ते वातावरण तसेच बनलं होतं कि कोणी काहीही बोलले तरी हसू येत होतं .
"हे आता बस करा रे! हे पहा तिच्या डोळ्यात पाणी आले हसून हसून .
"नाऊ स्टॉप प्लीज!" नमू बोलली .
डोळ्यातलं पाणी पुसत मी हसायला लागले .
माझा विक पॉईंट होता, तो.जास्त हसलं कि डोळ्यात पाणी यायचं .
डोळ्याला लावलेला रुमाल काढला तर समोर दिसलं कि स्नेहा समोरच्या लिंबाच्या झाडाखाली उभी आहे आणि एकटक माझ्याकडेच पाहतीय .
मी वरमले.
तिच्या डोळ्यांवर चष्मा होता तरीही मला वाटलं की ती मला रागाने माझ्याकडेच पाहत आहे.
तिच्याकडे पाहून मी एकदम शांत झाले अन् ती झाडाखालून इकडे येऊ लागली.
"अच्छा बाय"
" बाय "
आम्ही सहजच पांगलो . मी आणि नमू पुढे निघालो पण मला का कुणास ठावूक उगाचच अपराध्या प्रमाणे वाटत होतं .
ती किती वेळा पासून पहात होती कुणास ठाऊक?
माझ्या मनात तेच विचार चालू होते. मी वळून पाहिलं ती माझ्यापर्यंत आली होती.
मी स्माईल दिली-
" मग काय म्हणते थंडी स्नेहा ताई "असं बोलताना तेव्हांच दाबलेलं हसू नकळत माझ्या चेहऱ्यावर आलं.
"एक सांगते, प्रत्येकाला समोरचे दात तेवढेच असतात ." स्नेहा बोलली.
"म्हणजे काय ?" मी.
"म्हणजे . . . .जास्त हसणेही शरीराला घातक असतं हे लक्षात ठेव" ती सरळ चालायला लागली .
अन् नमू म्हणाली -
"न हसणं ही शरीराला तितकच घातक असतं! "
तिचा तो उपहास आणि टोमणा ऐकून स्नेहा परत वळली.
" मी तुझ्याशी बोलत नव्हते ,कळलं!आणि मला इच्छाही नाही बोलण्याची." ती रागाने निघून गेली.
" शिष्ट ! गर्विष्ठ ! नालायक ! अरसिक कुठली!" नमू बडबडत राहिली रागाने.
मी पुन्हा गोंधळले , गोंधळात ही आनंदले .
तिल हळू हळू माझी काळजी वाटतीय हे त्या
आनंदाचं कारण होतं .
"प्रणिता, नमू ss प्लीज रीडींग रूम मध्ये चला ना! मला नोट्स काढायच्यात. "
"नको बाई , तुझ्या लाडक्या स्नेहा ताई यावेळी तिथे स्थानापन्न असतात."
"मग असू दे ना ! काय फरक पडतो!"
"वा ग वा! फरक कसा पडत नाही . . ? तिथे हसता येत नाही, बोलता येत नाही "
" रीडींग रूम मध्ये मुळी अभ्यास करायचा असतो. गप्पा मारायच्या नसतात ." मी म्हणाले.
" राहू दे ना ! तू ही चाललीस त्या वळणावर . तिला हसलं कि समोरचे दात दिसतात .त्या दिवशी तुला कशी म्हणाली 'माझ्यामागे लागणाच्या ऐवजी चिकाटीने अभ्यासाच्या मागे लाग, विद्यापीठात प्रथम येशील '!!"
अन् हिला मिळाला ना बाई गुरुमंत्र अभ्यासाचा !"
प्रणिता व नमु तिची टिंगल करत होत्या पण मला रागच आला.
" येऊ नका माझ्याबरोबर अभ्यासाला ! हो! मला आवडते ती! मी एकटीच जाईन तिथे!"
मी पाय आपटत आत आले, मुलींच्या अभ्यासिकेत.
ग्रंथालयांच्या एका भागात आमची मुलींची वेगळी अभ्यासिका होती.
एकदम शांत वातावरण !
तिथे स्नेहा तिच्या नेहमीच्या खुर्चीवर बसलेली होती, काहीतरी वाचत .
मी 'हाय ' केलं आणि तिच्या समोर खुर्चीवर बसले.
पण माझ्याजवळच्या पुस्तकात मला हवा असलेला प्वाईंट सापडेना मी थकून गेले .
माझी चक चक ऐकून तिने वर पाहिलं .
"एनी प्रॉब्लेम ?"
" एस ! पण काय फायदा तुला सांगून ?"
एक आकसलेलं हसू रेंगाळलं तिच्या चेहऱ्यावर.
स्वतःचं पुस्तक बंद करत ती म्हणाली ,"हं बोल!"
"अगं , हे पहा. हा पॉइंट या पुस्तकात कुठेच नाही आणि मला मात्र दहा पानं विश्लेषण हवंय याचं . एवढ्यासाठीच मी हे पुस्तक घेतलं होतं पण छे!. . आता . . . !" मी भडाभडा बोलून गेले.
"एक काम कर हे पुस्तक निरुपयोगी आहे .परत कर . रेफरन्स वरून या विषयाचं डॉक्टर सक्सेना यांचं एक पुस्तक आहे ते घेऊन ये ."
मला सगळे स्वप्नवत जाणवलं . मी पटकन तेथून उठले आणि ते पुस्तक घेऊन आले .
" हं ! आता काय करू ?"
मी पुस्तक टेबलवर ठेवलं.
तिने ते पुस्तक घेतलं, चाळलं आणि ठराविक पान काढून पेन्सिलीने काही ओळी अधोरेखित केल्या.
मी पुस्तका ऐवजी एकटक तिच्याकडेच पाहत होते.
"हं, हे पहा यात इतकं डिटेल मधे दिलंय. एवढे सारे घेऊ नकोस .एक काम कर. हे पुस्तक रात्री हातात घे, पूर्ण वाचून काढ आणि हवं तेवढंच स्वतःच्या भाषेत उतरून काढ . दहा काय, वीस पाणी विश्लेषण मिळेल.
मी देखील हेच रेफर केला होता मागच्या वर्षी . या आधी का नाही विचारलंस.. . . एनी वे!
आता व्यवस्थित पाहुन घे."
" हं! ओ के." तिचं बोलणं संपल्यावर मी भानावर आले.
" स्नेहा निघालीस?"
"हो गं , आता माझा तास आहे ." ती खुर्चीतून उठली आणि वह्या -पुस्तक घेऊन निघाली .
"स्नेहा एक मिनिट. उद्या केव्हा येशील इथे ?"
" उद्या अं . . . साडे दहाला येइल . तशी मी रोजच इथे येते. अभ्यास चांगला होतो. " एवढं बोलून ती निघून गेली अन मी पुन्हा स्तब्ध झाले.
तिचं इतकं चांगलं वागणं देखील मला पचनी पडत नव्हतं .
ती इतकी चांगली असताना मुली तिची निंदा का करतात ? असा विचार आला मनात.
मी तिच्यात जरा जास्तच गुंतत चालले होते.
यापूर्वी मी एक शांत, अबोल व एकलकोंडी मुलगी पाहिली होती.
तिच्या कुणाशी न बोलण्याचं कारण मला कळलं होतं.
तिची एक जीवश्चकंठश्च मैत्रिण होती. दोघीही सतत सोबत असायच्या . धिंगाणा -मस्ती करायची. बदलीमुळे ती दुसरीकडे निघून गेली होती आणि सुहिता एकटी पडली. त्या दोघांची इतकी मैत्री होती पण संपर्कच ठेवला नाही मैत्रिणीने.
त्यामुळेच तिचा प्रेमावरचा विश्वासच उडून गेला.
पण तिने पुन्हा कुणाशी मैत्री केली नाही , एकटीच राहायची.
तिचं हे गूढ मी सहज उकललं होतं , तिच्याशी मैत्री करून, तिला जीव लावून! अाता ती माझी चांगली मैत्रीण आहे .
पण स्नेहाची कधीच कोणी मैत्रीण नव्हती. कुणीच पाहिली नव्हती म्हणून मला तिच्या स्वभावाचा जास्त कुतुहल होतं
दुसऱ्या दिवशी त्याच वेळी मी अभ्यासिकेत गेले तेव्हा स्नेहा तिथे काही तरी लिहीत होती. तिथे चार - दोन दुसर्या मुली देखील होत्या.
"थँक्यू स्नेहा मी पूर्ण नोट्स काढल्यात"
समोरच्या खुर्चीत बसत मी म्हणाले. तिने फक्त वर पाहिलं , अणि हसली थोडसं.
मी अभ्यासाला लागले आणि त्यातच गुंतून गेले पण पुन्हा एका गणिताने मला हैराण केलं
कंटाळून मी तिला विचारलं.
स्नेहाने ते गणित इतकं सुरेख समजून सांगितलं की मी पाहतच राहिले.
ते गणित मी कधीच विसरणार नाही .
" स्नेहा, एक सांगु ? तू लेक्चरर होऊन जा !"
" का ???" तिने लिहितानाच विचारलं.
" माझ्यासारख्याचं कल्याण होऊन जाईल. तुझ्याकडे ती टॅक्ट खूप चांगली आहे. रियली आय अॅम इंप्रेस्ड !"
"धन्यवाद . पाहू या नंतर !"
ती पुन्हा लिखाणात गढली. चेहर्यावर स्मित घेवून.
मला तिला एकटक पाहत रहावसं वाटलं , मी तशीच बसले .
तिला लिहिताना पाहून खूप समाधान मिळत होतं , तिच्या ते लक्षात आलं असावं.
" वेळ कमी आहे, तू आता अभ्यासातच लक्ष घाल."
ती इतकच बोलली आणि मी वरमले.
केवळ तिच्यासाठी अभ्यास करीत राहिले .
त्यानंतर तास नव्हते , म्हणून दोघी तशाच बसून राहिलो.
दुपारी जवळजवळ सगळ्या मुली निघून गेल्या होत्या.
मला भूक लागली होती.
तिच्या चेहर्यावरही मला तेच जाणवलं .
"स्नेहा, भूक लागलीय?"
"हं ! मला सवय आहे .तू घरी जा नाहीतरी तास नाहीतच आज आता !"
" अहं मी डबा आणलाय ."
" मग जेवून घे . मी नाही आणला. "
"माझ्या सोबत जेव ना !" मी.
"नको "
"प्लीज - प्लीज " मी तिच्या हातावर हात ठेवला.
"मला सवय आहे गं . तुलाच पुरणार नाही डबा , तू जेव."
" नाही मी एकटी जेवणार नाही." निर्धाराने म्हणाले.
"अरे देवा ! तू माझी सगळी तत्व मोडतीयस प्रिया, उगीच हट्ट करू नकोस. जेवून घे ."
मी डबा बैगमधे ठेवून टाकला. ती कदाचित कळवळली असेल कारण माझी भूक डोळ्यात अश्रु बनून दिसत होती, पण मी जेवत नव्हते.
" हं काढ डबा! कुठे जेवायचं. ?" ती पुढे होऊन म्हणाली.
मी पटकन डोळे पुसले. आणि डबा काढला.
" इथेच जेवूयात ना स्नेहा ! कुणीच नाहीय इथे . शिवाय ते ग्रंथपाल पण जेवायला गेलेत. हवं तर बाहेर जाऊन पाणी पिऊन येवूयात."
"ओ. के. !"
मग आम्ही दोघींनी गप्पा मारत जेवण केलं.
आजचा दिवस मला कुठंतरी डायरीत नोंदवून ठेवावासा वाटला.
ती भावनिकरित्या खूप जवळ आली होती. फक्त एक राहिलं होतं . . . तिच्या असं वागण्याबद्दल चं कुतुहल. . . त्याचं कारण! तिलाच विचारायचं होतं , मला घाई नव्हती.
कारण इथपर्यंत तिच्याशी मैत्री करणं आणि कारण जाणणं मला शक्य आहे, असं आज वाटायला लागलं .
यानंतर हे रोजचंच झालं बाहेर कुठे विशेष भेट व्हायची नाही किंवा घरीही जंणं येणं नव्हतं , पण
ग्रंथालयांतल्या अभ्यासिकेत माझी व स्नेहाजी भेट रोज पक्की !!!😊
(४)
अंकूर (भाग ४)
परीक्षा महिन्यावर आल्या होत्या. शिकवण सारं संपलं होत.
शिल्लक होता फक्त अभ्यास , तुफान अभ्यास .
घरी पुस्तक उघडलं कि झोप यायची.
मी आणि स्नेहा रोज सकाळी अभ्यासिकेत यायचो , दिवसभर तिथेच अभ्यास करायचो, दुपारी जेवायचो आणि सायंकाळी तृप्त मनाने निरोप घ्यायचो.
आता ती देखील डबा आणायची.
जेवताना गप्पा मारायचा कार्यक्रम होऊन जायचा. चर्चा तर सततचीच.
पण आता मला स्नेहा जाणवली ती एकदम वेगळी . तिच्याकडे खूप विद्वत्ता होती. सामान्य ज्ञान तर अफाट होतं तिचं .
माझ्या वर्गमैत्रिणी तर तुटल्यागतच होत्या.
आता तर मला ती एकटीच पुरेशी होती. रोज भेटूनही पुन्हा दुसर्या दिवशी भेटण्याची एक आस होती.
अशात तर तो रविवार देखील खूप कंटाळणा जायचा , तिची भेट व्हायची नाही म्हणून. तिचं माझं एक अजब नातं तयार झालं होतं , अभ्यासात , बोलण्यात!
ती पुढे होतीच एक वर्ष , शिक्षणात , त्यामुळे मला अभ्यासात खूप मदतही करायची .
मला विश्वासच वाटत नव्हता कि ही पूर्वीची तीच स्नेहा आहे!
"स्नेहा काल रविवार होत नस गं तर कसं वाटतंय ना जणु आपण खूप दिवसांनी भेटतोय."
"हो गं मलाही तसंच जाणवलं . .पण पूर्वी असं होत नव्हतं कधी."
"वा वा! म्हणजे प्रगती आहे तर . ए ती चटणी दे ना इकडे , खूप भारी झालीय गं "
"घे ना. मीच बनवलीय आज. तुझा डबा पण अलिकडे घे , मला सोपं पडेल घ्यायला. "
"स्नेहा एक विचारू. . ?"चटणीचं बोट तोंडात ठेवत मी म्हणाले.
"अगं हो विचार ना !"
" तू असं का वागतेस ?"
असं म्हणजे कसं? ती गोंधळली असावी बहुतेक.
"असं म्हणजे , आता वागत नाहिस तसं !
पण पूर्वी वागायचीस तसं !
विक्षिप्त, रुक्ष ,निस्पृह वगैरे ना !
"हो अजुनही तसंच वागते मी
आणि तसंच वागत राहिन शेवटपर्यंत !. इतर मुलींशी मी तशीच वागते अन घरीही. अपवाद फक्त तू आहेस सध्या!"
मी मनातून सुखावले पण शेवटी मनातला प्रश्न तसाच राहिला ,
का?
ती नेमकी अशी का वागते?
" स्नेहा ऐक ना , आपलं जेवण झालय पण दुपारचा अभ्यास नको ना गं आज. नाहितरी अभ्यासिकेत तुझ्या माझ्या शिवाय कुणीच नाही. प्लीज सांग ना गं ? तू असं का वागतेस?"
तिने चष्म्याआडून एक कटाक्ष टाकला .
आम्ही डबे आवरले. टाकीवरून पाणी पिऊन आलो.
पुन्हा पूर्ववत बसलो.
" हे पहा, तुझ्यामते तू माझ्या लहान बहिणीप्रमाणे आहेस ! हो ना? तू खूप वेगळी आहेस गं , पण तू समजू शकशील. . जे मी सांगणार आहे. आय नो.
ऐक अापला स्वभाव खूप सरळ असतो. आपण भाबडे असतो. परंतु आपण अप्रत्यक्षपणे अशा स्वभावामुळे स्वतःला त्रास देत असतो."
"ते कसं ?" माझ्यासाठी हे सारं नवीन होतं.
"हे पहा ,कसं असतं , तुझी कुणी आवडती व्यक्ति आहे, जिला तू खूप जीव लावतेस ? अं हं .नातेवाईक सोडून! म्हणजे एखादी मैत्रिण ! वगैरे?"
"हं आहे ना . . . तू . .!" मी पटकन
बोलले.
" वेडपट मी नाही. माझ्यापूर्वी कुणी नव्हतंच का ? जवळची मैत्रिण ?. . . . मी मैत्रिण थोडिच आहे.!"
"ते जाऊ दे ना स्नेहा . या विषयावर नंतर बोलू. प्रथम तुझा प्रश्न . माझी एक मैत्रिण आहे जिवाभावाची, कंचन.
माझ्या बहिणीच्या गावी असते. "
"तिची आठवण येते तुला?"
" आठवण येते का ? म्हणजे काय? मैत्रिण म्हटल्यावर आठवण तर येणारच.कधी कधी रात्री झोप येत नाही. कितीतरी गोष्ट आठवतात, हसू, रडू! तेव्हाचे प्रसंग , ते सुवर्ण क्षण , रुसवे- फुगवे, सारं काही. . . अन मग तडफड होते जिवाची !"
"हं हं! तर हेच म्हणत होते ना मी! मग त्या व्यक्ती ला भेटावसं वाटतं . त्या मैत्रिणी ने सतत आपल्या जवळच असावं असं वाटतं हे सारं साहजिकच आहे. परंतु मला ते पटत नाही. "
" का ?"
"पुन्हा का !? अगं एवढा त्रास होतो ना मग त्रासदायक गोष्टी करायच्याच कशाला? तुला खरं वाटणार नाही मनु पण गुंतणे हा जो प्रकार आहे तो मला आवडत नाही. कुणी माझ्यात गुंतणं किंवा मी कूणात गुंतणं !
हे इनवॉल्व होणं फार त्रासदायक असतं . आणि फायदा ? नथिंग !
उगाचंच वेडे पाश बनवायचे , गुंतायचे आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा !"
कुणात गुंतवण्यासाठी किंवा ते प्रेम आहे ते करण्यासाठी काही विशेष लागत नाही आपण इतके हळवे असतो की सहवासाने आपल्याला कोणीही आवडायला लागते. अगदी कोणीही! जशी तुला कदाचित मी पण!"
" स्नेहा ,काय बोलतेस?"
" हो ग ,खरंच सांगते. या सगळ्यात होतं इतकंच की आपण दुरावल्यावर मग नियमाप्रमाणे आठवण येते आपण बेचैन होतो मग तो जो त्रास होतो ना तो असह्य असतो . कधी -कधी इतका असह्य असतो की डोळे भिजवून सोडतो .
मग सांग ना त्रास होत असेल तर का गुंतायचं कुणात ? शेवटी कोण काय देतं आपल्याला ? काहीच नाही ना ! म्हणून सरळ मार्ग !सर्वांपासून एकदम फटकून राहायचं. कोणाशीच सरळ बोलायचं नाही म्हणजे समोरची व्यक्ती दुसऱ्यांदा बोलायचं विचारच करत नाही.
तुझ्या सारखी एखादी अपवाद सोडून.
झालं ! आपण असं वागल्याने कोणीही आपल्या गुंतणार नाही म्हणजे आपण येथून दुरावल्यावर आपली आठवण कोणालाच होणार नाही आणि त्यांना होणारा त्रास टळेल शिवाय लोक आपल्याशी बोलायला धजत नाही म्हणजे आपण कुठे गुंतण्याचा प्रश्नच येत नाही.
मग आठवण येणे, रुसणे, सगळे हे सारं संपलं!
मी दुरावल्यावर कोणी माझी आठवण करूनये इतकाच माझ्या वागण्याचा उद्देश !
अशी माझी थेअरी!
केवळ एवढ्या मुळेच मी रुक्ष बनले.
इथे कायमचं राहायचंय कोणाला ?घरातही माझं असंच आहे .
हे घर सोडून जायचे मग पुन्हा तिथे मला त्रास होणार आणि मग इथे घरातल्या लोकांना !
त्यापेक्षा घरातही असंच काटेरी वागायचं म्हणजे कुणालाच वाईट वाटणार नाही जेव्हा मी हे घर सोडून जाईल.
आईच्या मनात अपत्यासाठी असतं तसं प्रेम माझ्या आईचं माझ्यावर असेल पण इतर बाबतीत वरूनही आई माझ्यासाठी माया किंवा प्रेम दाखवत नाही कारण मी तिच्याशी खूप कडक राहते , एकदम व्यवहारी आणि चोख!
त्यामुळे घरात कोणीच माझ्यात गुंतलेले नाही आणि बाहेर मी कोणाचाच गुंतले नाही.
कोणातच नाही. . . सॉरी तू एकटी कशी निघालीस !
का तू इतकी चांगली वागतेस माझ्याशी?
पुढे मला खूप त्रास होणार आहे .माझं यावर्षी फायनल! कॉलेज सोडून निघून जाईल पण इथे एकत्र घालवलेले क्षण, इथल्या आपल्या गप्पा आणि तू . . .?कसं विसरेन मी? नालायक! तू हळवं बनवलस मला.
काय मिळाले गं तुला असं करून ?
मी एकटीच बरी होते गेली आठ-दहा वर्षे!
तू मात्र मला चांगलाच त्रास देणार आहेस.
हल्ली एक सुट्टीचा दिवस ही किती मोठा वाटतो तुझ्याशिवाय आणि विरान जातो .
ती थबकली .
मला तिचा गूढ कळालं होतं .
तिचं म्हणणं सारं बरोबरच वाटत होतं पण ते पटत नव्हतं.
म्हणजे पटत होतं पण नक्की काहीतरी खटकत होतं!
खरंच काय मिळतं कुणात गुंतून?
मी विचारात पडले.
"ए ए काय झालं तुला ?माझी मतं, विचार पटले नसतील कदाचित !"
"नाही स्नेहा, तसं नाही. क्षणभर माझी बुद्धी कुंठीत होऊन गेल. काय खरं काय खोटं कळत नाही ! तुझे विचार एकदम वेगळे आहेत .बरोबर ही वाटतात पण मनाला पटत नाहीत.
शाश्वत काय आहे नथिंग! नथिंग !आपणही सगळे अशाश्वत आहेत ना! मग किडे-मुंग्या सारखं मरण्यात कायअर्थ आहे.
असं जगावं कि आपण नसताना लोकांनी आपली आठवण काढावी . एनी वे ही खूप दूरची गोष्ट झाली.
इतक्या टोकाला जाऊ नकोस. साधं उदाहरण घेऊ कोणाची तरी आठवण येणे ,वाईट वाटणे यात त्रास काहीच नाही पण त्यात मजा आहे.
आयुष्य जगणं यालाच म्हणतात. त्यात कोणाचं तरी होऊन राहणं, सर्वांना आपलंसं करणं, आपलं कुणी आहे ही भावना जपणं !
सर्वांवर प्रेम करा ,सर्वांशी गोड बोला आणि सदाबहार आयुष्य जगा या भावने वरती, या तत्वावरती मी चालते.
हे तत्व मी तुझ्यावर लादत नाही.
आपल्या माणसांचे मित्रमैत्रिणीचे चेहरे मनात घेऊन जगणं म्हणजेच माझ्यासाठी आयुष्य आहे.
तू फटकळ वागल्याने विसरली जाशील असं तुला वाटत असेल तर ते पूर्णतः चूक आहे .एक वेळ माझ्यासारख्या खेळकर मुलीला क्षणभर लोक विसरतील पण तुला ?
तू सर्वांपेक्षा वेगळी आहेस म्हणून कदाचित लक्षात राहशील.
पण तरीही कशीही असशील तरीही तू मला आवडतेस.
पण मला उगाचच एक वेडगळ आशा आहे .तुला खेळकर , माझ्यासारखं पाहण्याची!
माझी ताई म्हणून एेक! हे घर सोडून जायचे म्हणून तू इथे तुटक वागत असतील तर वाग पण जेव्हा माझ्या भाऊजींच्या घरी जाशील ना तेव्हा तिथे असं वागू नकोस .
तुझ्या बद्दल कोणीही काहीही बोललेलं मला आवडत नाही .तू तिथे इतका जीव लाव सगळ्यांना, खूप प्रेमाने वाग. तिथे कोणाला तुझा राग नाही आला पाहिज.
तू हवीहवीशी वाटावीस सगळ्यांना .
तुझे नाव सार्थ करून दाखव ना स्नेहा!"
मी भावनेच्या भरात बोलत राहिले आणि ती अभ्यास सोडून एकटक माझ्याकडे पाहत राहिली तिच्या डोळ्यात पाहून वाटत होतं कि तिच्या मनात कसलीतरी प्रचंड उलथापालथ चालली आहे .
मी काय काय बोलून गेले आज मला आता आठवत नाही.
(५)
अंकुुर ( भाग ५)
त्यानंतर आठ - दहा दिवस आईने मला घरीच अभ्यास करायला सांगितला.
आठ दिवसांनंतर कॉलेजला गेले तर प्रत्येकाची हॉल तिकीट घेण्याची घाई झाली होती.
सर्वत्र धावपळ !
माझ्या सर्व मैत्रिणी मला भेटल्या, प्रत्येक जण काही ना काही सांगण्यास उत्सुक होती, त्यात प्रत्येकी चा विषय होता स्नेहा!
तिच्याबद्दल मला खूप काही ऐकायला मिळालं आणि मी आश्चर्यचकित तशीच उभी राहिले !
स्नेहा खूप बदलली होती याचं सगळ्यांनाच आश्चर्य नव्हे तर कौतुकही होतं .
ती म्हणे प्रत्येकाशी स्वतःहून बोलतीय, मिळून राहतीय , मोकळं हसतीय,खूप काही जे तिने कधीच केलं नव्हतं .
मी खरंच हेलावून गेले ,माझ्या डोळ्यात आपोआप पाणी आलं.
प्रणिता म्हणत होती कि कोणीतरी तिच्यावर जादूची कांडी फिरवली आणि सगळ्याजणी माझं नाव घेऊन तर्क लावत होत्या.
मी फक्त स्तब्ध झाले होते .
स्नेहाने माझ्यासाठी खूप काही केलं होतं.
तिचं हे वागणं आणि हे नवीन रूप म्हणजे माझ्यासाठी एक मौल्यवान प्रेझेंट होतं.
ती आज आली नव्हती!
घरीच अभ्यास करत असेल ,मला असं वाटलं .
मी मनातल्या मनात सुखावले होते .
ती आता अशीच राहावी ही एकच
कामना करीत होते पण मनात एक भीती होती कि अशाने ती माझ्या वाट्यात कमी येईल.
थोडीशीच !चालेल मला .
पण एवढं नक्की कि शेवटी जीव लावून ते कॉलेज सोडताना ती सगळ्यांना रडवून जाणार होती .
तिचं शेवटच वर्ष आता ते संपल्यावर कुठे पुन्हा भेट !
अभ्यासिकेत आले. खुर्चीवर "परीक्षेसाठी शुभेच्छा" लिहिलेलं होतं. मला कळालं ते स्नेहाचं अक्षर होतं , माझ्यासाठी!
आमच्या दोघींच्या चोर कप्प्यात मला एक पत्र मिळाले ,माझ्यासाठीच ठेवलेलं.
पूर्वी तेथे आम्ही निरोप ठेवायचो एकमेकांसाठी !
* * * * * *
परीक्षा संपल्या. सुट्टी अशीच गेली इकडे तिकडे फिरण्यात.
सगळ्यांशी माझा पत्रव्यवहार होता पण मी मात्र स्नेहाच्या आठवणीत भाजून निघाले होते कारण माझ्याकडे तिचा पत्ता नव्हता , त्यामुळे संपर्कच नव्हता.
निकालाच्या दिवशी कॉलेजात डोळे तिला शोधत होते .
ती विद्यापीठात प्रथम आली होती.
दरवर्षी ती कॉलेजात पहिली यायची.
मला देखील यावर्षी मागच्या वर्षी पेक्षा खूप जास्त मार्क मिळाले होते.
अर्थात हे श्रेय तिला .
मी खूप अगतिक झाले .
कुणी तरी मला सांगितलं कि तिचं लग्न ठरलंय .
मी सर्वत्र शोधलं तिला.
मैदानावर आले पाहते तर मुला-मुलींच्या गराड्यात खूपच आनंदात ती काहीतरी हातवारे करून प्रत्येकाशी बोलत होती.
नविन छानसा ड्रेस घातलेला होता.
ती सर्वात वेगळी उठून दिसत होती.
तिथे त्यांची पार्टी चालली असावी निकालाबद्दल!
तिचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि ती सर्वांची पर्वा न करता धावत धावत आली आणि माझ्या गळ्यात पडली.
आम्ही दोघेही आलिंगनात बद्ध !
कोणाची काळजी न करता !
मी देखील बेफिकीर होते . दोघीही शांत होतो.
सजल नेत्रानी . बोलण्यास खूप काही होतं.
मनात भडभडत होतं , पण शब्दात काहीच मावत नव्हतं.
ती बाजूला झाली दोन्ही हातात माझा चेहरा घेऊन ती बोलली" खूप खूप वाईट आहेस तू! पागल आहेस आठवणीत जाळून मारतेस .
पण सुंदर आहेस ग ! तू मला खूप आवडतेस ! तुझ्याशी किती -किती बोलायचं अाहे ."
ती थबकली तिने माझ्या डोळ्यात पाहिले आणि हलकेच हात हातात घेऊन म्हणाली "मला आज कळालं कुणावर प्रेम करणं ,किती सुखावह असतं!"
माझ्या भोळ्या विचारांनी तिच्या मनात प्रेमाचा अंकुर उगवला होता.
मला अजून काय हवं होत आयुष्यात !
हाच अंकुर कदाचित पुढे मोठा वटवृक्ष बनेल पण त्याचे निमित्त मी होते या गोष्टीचा मला अभिमान राहिल.