आवेग
आवेग


( प्रिय वाचकहो , ही कथा १९९५-९६ या काळात लिहिलेली आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही मोबाईल किवा सोशल मेडिया आढळणार नाही. वाचुन प्रतिक्रिया अवश्य द्यावी.)
मुग्धा, माझी धाकटी बहिण , कालच घरी आली पण सगळं घर जणू माणसांनी गजबजलेलं.
एखादं अवखळ, बडबड माणूस असलं कि घराला घरपण येतं. हे आज प्रकर्षाने जाणवतंय.
मुग्धा आहेच धांदरट! सगळ्या घरात धिंगाणा घालते ,सर्वांशी बोलत असते, अगदी मनमोकळेपणाने ! आता मुन्नुची आई झाल्यावरही तिचा हा खेळकरपणा कमी झालेला नाही .ती आली की मी खूप रिलॅक्स होत असतो .
कुठलं- कुठलं काय -काय सांगत असते .
हसता हसता पुरेवाट होते .
सगळी टेन्शन्स मी बाजूला ठेवून देतो
मुग्धा अाईशी बोलत होती . मी डायनिंग टेबलावर जेवायला बसलेलो होतो, जेवत होतो इतक्यात बेल वाजली.
"मुग्धा बघ गं कोण आलंय?" मी जेवता जेवताच बोललो.
लहान मुलाने जावं एवढ्या घाईने ती पळत पळतच दार उघडण्यासाठी गेली.
मानिनी हळुच म्हणाली " अहो मुन्नु आणि सुहास संध्याकाळी येणार आहेत ना मग यावेळी कोण?"
" हो मी जाणार आहे स्टेशनवर दुसरं कोण असेल"
दार उघडल्याचा आवाज आला तरी मुग्धा चा आवाज येईना . नेमका कोण आहे याची मलाही उत्सुकता होती . जेवण झालं होतं.
मी हळूच हॉलमधे डोकावलो . मुग्धा दगडाच्या मूर्तीगत स्तब्ध उभी, अन् सृजन दारातच! कोणीच काही बोलत नव्हते.
मुग्धा मान खाली घालुन उभी होती.
" कोण आहे ग मुग्धा?" मी मुद्दामच म्हणालो.
" हे, दादा कोणीतरी आलय तुझ्याकडे!"
अन् ती इकडे यायला वळ ली. जेवण झालेलं असूनही मी पुन्हा टेबलवर जाऊन बसलो , पुन्हा खीर घेतली.
मनात प्रचंड घुसमट होत होती.
" तू बोल त्यांच्याशी मी जेवतोय गं , आलोच मी" मुद्दाम म्हणालो.
सात वर्षानंतर बिचारी त्याला पहात होती. मनात वाटलं आज तरी निवांत बोलू देत।
मला माहित होतं, दोघेही शांत बसले असतील.
मी जेवण आटोपलं आणि हात धुवायला उगीचच वेळ लावला.
मी बैठकीत आलो. दोघेही कुठेतरी बघत तसेच बसलेले होते.
मी मुग्धा आणि सृजनचा चेहरा न्याहाळत होतो.
" अगं काय मुग्धा , कोणीतरी आले म्हणून सांगतेस गं ! अगं हा सृजन , माझा मित्र खूप वेळा घरी यायचा ना !मी तसं नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत होतो.
" हो का, सॉरी हा मी ओळखलं नाही तुम्हाला! म्हणजे खूप बदल झालाय शिवाय न पाहता बरीच वर्षे झाली ना!" ती म्हणाली.
मी एकटक मुग्धाला न्याहाळत होतो.
" केव्हा आलात? " सृजनने आता तोंड उघडलं.
" अं . . कालच सायंकाळी!"
" सुहास नाही आले का ?"
"नाही आज सायंकाळी ते आणि मुन्नु येणार आहेत."
" अच्छा "
इतकं अौपचारिक बोलून झालं की मुग्धा सहजच उठून आत गेली
दोघांना भेटवावे , दोघांनी एकमेकांशी घडघड बोलून घ्यावे असे मला खूप वाटत होतं, हे देखील मागच्या आठवड्यापासून!
त्यापूर्वी असं कधीच वाटलं नव्हतं.
ती आत गेली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होतो तसा तो वरून खूप नॉर्मल असल्यासारखा दाखवीत होता पण मला कळलं होतं की तो मनातून पार ढवळून निघालाय.
तो कधीच काही बोलणार नाही मला माहित होतं . सृजन तसा मितभाषीच होता.
स्वतःला कधी चार चौघात मोकळेपणाने न मिसळणारा!
त्याच्याशी माझी जुनी मैत्री होती .
त्याला मी व मला तो खूप छान समजू शकत होतो.
माझी प्रत्येक गोष्ट मी त्याच्याजवळ बोलायचो, अगदी कौटुंबिक 'खाजगी, सामाजिक ,सगळे- सगळे विषय त्याच्यासोबत बोलून व्हायचे.
त्याच्या मनातलं मला तेवढेच माहित आहे असे मी समजायचो.
त्याला मी स्पष्ट वाचू शकतो ,त्याच्या भावना समजू शकतो असंही वाटायचं .
पण हे सर्व मागच्या आठवड्यापर्यंत!
त्यानंतर नाही.
"अच्छा , बोल सृजन!" मी बॅग आवरत
विचारले.
" अरे, त्या संध्याकाळच्या क्लायंट चं तू पाहून घे. मला दुसरे काम आलय ,अगदी महत्त्वाचे. तेवढेच सांगायला आलो होत. . . पण आता मुग्धा आलीय तर . . . तुमचा काही प्रोग्राम असेल तर . . मग मी दोन्हीकडे अटेंड करतो. काय? ठीक ना "
"नाही रे, नो प्रॉब्लेम संध्याकाळच्या क्लाइंटचं नाहीतरी मी पाहणार होतो .तू निश्चिंती ने तुझे महत्त्वाचं काम करून घे.
मुग्धाच्या येण्याचा काही प्रश्नच नाही कारण सुहास, मुन्नु संध्याकाळी आल्यावर काय तो प्रोग्राम उद्या ठरवू."
तुलाही सांगूनच ठरवणार .तू आता निघतोयस का ? मी थोडा लेट येईल तोपर्यंत तू तिकडेच बस . . "
"ओके येतो . . . येतो!" दुसऱ्यांदा तो पुटपुटला शूज घालताना मी पाहिलं मधल्या उंबरठ्यावर मुग्धा उभी होती.
मी फक्त दोघांच्या नजरा पाहत होतो, हे सगळं आज मला जास्त चांगलं समजलं ,अनुभवाने असे मला वाटलं .
तो गेला.
" हे गेले का ऑफिसला?" मानिनी अातून ओरडली.
" नाही गं , वहिणी घरातच आहे तो. "मुग्धा
बोलली.
ए तिला सांग जा , माझं डोकं दुखतय. मी एक-दोन तास पडतो बेडरूम मधे. उठवू नकोस" असं सांगून मी आत आलो.
पंखा लावून बेडवर पडलो खरा, पण काहीच जाणवत नव्हतं .
डोकं शांत झालेलं होतं.
तसा मी ऑफिसात लगेच जाणार होतो पण सृजन आल्याने मी कसल्यातरी भावनिक गुंत्या मध्ये अडकलो .
स्वतःचे मन स्थिर करण्यासाठी एक- दोन तास शांततेत घालवावे असे वाटले.
मनात फक्त मुग्धा आणि मग तिच्या असंख्य भावमुद्रा ! वेगवेगळ्या प्रसंगांतल्या !
माझ्या लग्नातली मुग्धा आणि त्या अगोदरची मुग्धा. . !
आमच्या सगळ्या घरात तीच जास्त संवेदनाक्षम होती.
खूप -खूप हळव्या मनाची ,लाघवी !
त्यामुळे ती सगळ्यांपेक्षा वेगळी वाटायची, जाणवायची !
मी तसा खूप वास्तववादी !
मी कधीच मनाच्या गुंत्यात अडकायचो नाही पण ती मात्र छोट्या छोट्या गोष्टीत काही ना काही शोधत राहायची.
माझ्या व तिच्या स्वभावात एवढा फरक असूनही मला मुग्धा खूप आवडायची .
ती नेहमी स्वतःच्या भावना कवितांमध्ये ओतण्याचा प्रयत्न करायची. हा सगळा खुळेपणा आहे हे कळत असूनही मी तिच्या कविता वाचायचो, प्रसंगी मी तिची खिल्ली उडवायचो. ती कधीच चिडली नाही माझ्यावर .
"दादा , मला वाटतं तू या सगळ्या गोष्टी कधीच समजू शकणार नाहीस !
भावनांची, मनाची गुंतागुंत ! स्नेह, प्रेम कुठेतरी अडकणं! कसं सांगू ?कसा रुक्ष आहेस रे तु! तुझी बायको जर अशी माझ्यासारखी मिळाली ना तर कसं जमावशील रे तिच्याशी?"
" माझ्यासारखं तिचं मन तरी दुखवू नकोस."
" बावळट लग्न होईल तेव्हा पाहता येईल. तू प्रथम तुझा विचार कर तुला जर माझ्या सारखा रुक्ष, प्रॅक्टिकल नवरा मिळाला तर तुझं हे कवितांचे इथेच गाठोडे मारून ठेवावे लागेल"
" नाही रे मला विश्वास आहे मला तसा नवरा मिळणार नाही.जसाही मिळेल तसं मी त्याला अड्जस्ट करीन . पाहशीलच तू!"
"मुग्धा, हे प्रेम वगैरे सालं आपल्याला कधी जमलंच नाही आणि जमणारही नाही! मी सरळमार्गी माणूस ! म्हणूनच मला ते कवितांचा विश्व पूर्णतः स्वप्नमयी वाटते ! "
"राहू दे रे दादा! तू जेव्हा कुठेतरी इंन्वॉल्व्ह होशील ना तेव्हा कदाचित या गोष्टी तुला कळतील"
तिच्या अशा या बोलण्यावर मला त्यावेळी हसू यायचं.
पण नंतर मी या गोष्टींवर गंभीर विचार करायला लागलो.
मला नोकरी लागण्याचे चान्सेस होते किंवा मग बिझिनेसचा प्लॅन होता.
पणपहिले बहिणीचे लग्न करायचं अन मग लग्न करायचा विचार करायचा असं मी ठरवलं होतं .
अजूनही ते दिवस मला रुतणाऱ्या काट्यासारखे आठवतात .
मध्यंतरी मुग्धाचं हसू जणू कुठेतरी लुप्त झालं, तो अवखळपणा कुठेतरी हरवला, ती खूप शांत शांत राहायला लागली.
बसल्याबसल्या कुठेतरी शून्यात पाहायची. स्वतः तच असायची .ती तिची बडबड बंद झाली.
ती एकटी एकटी जायला लागली.
गर्दी, हसणं ,खेळणं, धिंगाणा सगळं- सगळं तिला नको वाटायला लागलं .
तिचं हे सगळं वागणं आम्हाला अनपेक्षित होतं.
सगळ्यांच्या लक्षात हे बदल यायला लागले, पण ती काहीच बोलेना!
जेवता जेवता हातात घास तसाच असायचा, कुठेतरी एकटक पाहत बसलेली, हरवल्यागत!
कुणी काही बोललं तरी तिचे लक्ष नसायचे.
मला खरच खूप वाईट वाटते कि त्यावेळी मी तिला समजून घेतले नाही , आधार दिला नाही.
तिची माझी चांगली मैत्री असूनही त्या वेळी मी तिच्या भावना समजू शकलो नाही, हे सगळं आज वाटतंय, त्यावेळी वाटलं नाही!
त्यावेळी तिचं वागणं मला मुडी किंवा विक्षिप्त वाटलं .
घरात आई -बाबा तिच्या लग्नासाठी चिंतेत होते.
सात वर्षांपूर्वी चं सगळं -सगळं आता कसं
स्वच्छ चित्रासारखं आठवतय , कारण मी एकटाच इथे पंख्याखाली शांतपणे सगळं आठवत पडलोय.
तेव्हा प्रवीणचं माझ्या मित्राचं लग्न ठरलं होतं. आई-बाबांना लग्नाला जाणं शक्य नव्हतं म्हणून मी मुग्धाला सोबत घेऊन गेलो त्या दिवशी ती खूप खुश होती खरीखुरी की बनावटी माहीत नाही पण दाखवीत तर होती .
मुग्धा खूप नटली होती , अतिशय आकर्षक दिसत होती .
प्रवीणच्या लग्नाअगोदर पर्यंत ही माझी सृजनशी चांगली मैत्री होती .
तो नेहमी घरी यायचा व इतर मित्रांप्रमाणे त्याच्याशीही मुग्धा बोलायची.
कधीकधी ती वाद घालायची.
कोण हरलं कोण जिंकलं ही गोष्ट वेगळी .
कधीच मला ते लक्षात आलं नाही.
सृजनच्या व मुग्धाच्या नजरेतलं वेगळेपण मला कधीच टिपता नाही आलं !
आता जेव्हा मी सगळं आठवतोय, मागच्या आठवड्यापासून तेव्हा मला साफ साफ त्या नजरांचे अर्थ कळत आहेत .
त्या घटनांचे संदर्भ लागत आहेत.
हे मला त्यावेळी का कळलं नाही.
मुग्धाचं कवितेत रमणं, कादंबऱ्यांमध्ये, मालिकांमधले छोटे छोटे प्रसंग विश्लेषित करणे, मी तिचा छंद समजून सोडून दिले.
त्याच वेळी आमच्या सगळ्या मित्र कंपनीत एक हवा होती,कि सृजन कुठल्याशा मुलीत खूप गुंतलेला आहे, जीवापाड प्रेम करतो
पण तो विषय आमच्या दोघात कधी आलाच नाही .
तो इमोशनल होता म्हणून मीही कधी त्याला विचारलं नाही पण अगदी मागच्या आठवड्यापर्यंत मला वाटत होतं कि ती मुलगी स्नेहाच आहे, जिच्यावर सृजन जीव टाकायचा! पण तर्कच बदलून गेले आणि नवीनच काहीतरी समोर आलं.
प्रवीण च्या लग्नात सगळी सगळी मित्रांची टोळी हजर होती!
अगदी बालमित्र, शाळामित्र, कॉलेजातील मित्र आणि वर्गमित्र सगळे सगळे!
त्यातच सुहासही आला होता!
आल्या आल्या त्याने मला विचारलं" कारे मुग्धा नाही आली का? तिला न पाहता सहा-सात वर्षे झाली नाही का?"
" हो आली ये ना !कुठेतरी पोरींच्या घोळक्यात असेल! दिसली की भेटवतो तुला!"
नंतर काय झालं मला कल्पना नाही पण त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याने इथेही खूप धिंगाणा घातला असावा सगळे मित्र त्याला चिडवत होते, पटली की नाही पोरगी!
सुहासला नुकतीच बँकेत नोकरी लागली होती.
तो लग्नाच्या विचारात असेल तर पाहतोय पोरी ! या विचाराने मी निर्विकार होतो पण झालं उलटच!
सुहास अचानक माझ्याजवळ आला व तो मला म्हणाला "माझं सगळं जीवन तुझ्या हातात आहे. प्लीज एक काम कर , मी सांगतो त्या मुलीचं नाव विचारून मला सांग ."
"हे पहा सुहास , तुझी कामं तूच निपटंव .मला का मार खाऊ घालतोस ? इतक्या दिरियसली त्या मुलीचा विचार करायचा असेल तर. . हिंमत कर अन् स्वतःच विचार."
आपल्याला जमत नाही बुवा हे सगळं !"
मी टाळण्याचा प्रयत्न केला
पण त्याचे एकच म्हणणं," तुला बहीण आहे तर तू बहिणी करवी तिचं नाव विचारू शकतोस ,माझं इथे कोण आहे , एखादी मानलेली बहीण ही नाही !"
"एवढ्या सगळ्या मानलेल्या बहिणी आहेत की रे मांडवात !" शेखर ओरडला
" अरे ! जरा गंभीरतेने घ्या रे ! खरंच या वेळी मी कामातुन गेलोय. तो अगदी काकुळतीला आला होता.
" सुहास कोणती मुलगी , ते तर दाखव मग आमच्यापैकी कोणीही तिला विचारून येऊ"
कोणीतरी बोललं .
"खरच ,!हे पहा ती ! पहा रे ती! समोरची आकाशी साडीवाली, मोगऱ्याचे गजरे वाली. स्मार्ट आहे ना ! ती . . . !"
समोरच्या मुलींच्या घोळक्यात तो म्हणतोय ती पोरगी नजरेने शोधली आणि डोक्यावर हात मारून घेतला .
"सुहास ती मोरपंखी साडीवाली ?" बाबकट का ?" मी म्हणालो.
" नाही रे! तिच्या अलिकडची. आकाशी साडी, एकवेणी वाली. . "
त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मी जोरात ओरडलो -
" ए ए ए शुक शुक " आणि मी हात हलवीताच ती लगबगीने इकडे आली.
सुहास थक्क होऊन , डोळे विस्फारून पाहतच राहिला .
"काय रे दादा ! " ती म्हणाली.
" हे पहा हा आपला सुहास, आपलं जुना कॉलनीतला मित्र गं लहानपणीचा ! आणि सुहास ही आपली मुग्धा! "
मला अजूनही त्या प्रसंगाचा हसू येतं.
त्यावेळी सुहासची ती स्थिती अवर्णनीयच !
मी परिचय करून देण्यापूर्वी सुहास ची व मुग्धाची चांगलीच शाब्दिक झूंज झाली होती, हे मला नंतर कळा लं.
मग पुढचं काही करायला वेळच लागला नाही.
सुहास ने सरळ सरळ मुग्धाला मागणी घातली .
दुसरा कुठलाच विचार त्यावेळी मनात आला नाही.
मुलाला विचारलं सुहास कसा वाटला?
" छानच आहे दादा तो !" हे तिचे उत्तर
सुहास तिला परफेक्ट मॅच होता शिवाय घरोबा, जुनी ओळख , नोकरी!
लगेच लग्न जमलं ,उरकलं!
मला आता उलगडतं नेमकं, मुग्धाच्या लग्ना दिवशीच सृजनच्या मित्राचा अपघात झाला म्हणून त्याला पुण्याला का जावे लागले होते?
नंतर सगळं खूप छान झालं !
मुग्धा तिकडेच गुंगली, रमली.
पण मला आठवत नाही कि पुन्हा सृजनची व तिची भेट झाली !
ती कधी आली तर तो दौऱ्यावर आणि तो इथे असला की ती सासरी!
किती लपंडाव सारखे योगायोग!
मला खरी मुग्धा कळली ते मानिनी मुळे ,माझ्या पत्नीमुळे!
माझ्यासारख्या मितभाषी सरळमार्गी निस्पृह प्रवृत्तीचा मुलगा . . मी. . . पण कसा कोण जाणे मानिनी च्या प्रेमात पडलो !
खूप गुंतलो आणि मग आपोआपच भावुक झालो!
त्यावेळी मला मुग्धाच्या त्या सगळ्या भावना कळायला लागल्या!
वाटायला लागले की ती खरं बोलत होती.
ते मी अनुभवले मग माझा व मुग्धाचा खूप पत्र व्यवहार झाला, जवळच्या मित्राइतका!
तिने मला खूप सांभाळ लं .
चांगल्या वाईट भावनिक प्रसंगात, मानसिक आधार दिला. बरेचदा माझ्यासाठी इथे येऊन गेली.
तिच्यामुळेच आज मानिनी मला मिळाली हे मी कबूल करतो .
एकदा मुग्धाला मी म्हणालो होतो, " मला नेमकं काय काय होतंय , काय काय वाटतंय हे तुला बरोबर कसं कळतं ?" ती फक्त हसली होती.
तिच्या त्या हसण्याचा अर्थ मला आता कळतो आहे , तेव्हा काहीच कळालं नाही.
सुहास- मुग्धाचा संसार खूप बहरला होता.
विचारसरणी सारखी असली व समजून घेण्याची तयारी असली की पती-पत्नी सुखी होतात हे मी अनुभवलं होतं.
नंतर मुन्नु झाला .
सगळं घर भरलं होतं
दोन वर्षांपूर्वीच सृजनचे लग्न झालं. स्नेहा ,त्याने स्वतः पसंत केलेली होती .
ती मुग्धाची जवळची मैत्रीण आहे, हेही खूप उशिरा कळालं !
मी व सृजन पार्टनरशिपमध्ये बिझनेस चालवत होतो, त्याचं घर थोडे लांब होतं म्हणून आम्ही आमच्या ऑफिसच्या कामासाठी एक खोली घेतली होती, दोघांमध्ये !
तिथेच आमची सगळी कागदपत्र , पर्सनल फाईल्स, डायर्या वगैरे सगळं पडलेलं असायचं.
अलमारीत रूमची एक चावी आणि अलमारी ची एक- एक चावी आमच्या दोघांकडे असायची.
मागच्या आठवड्यात सृजन गावी गेला होता.
मला अतिशय महत्त्वाचा कागद हवा होता .
मी तडक रूमवर गेलो, त्याची अलमारी उचकायला लागलो.
तसं दुसऱ्यांच्या वस्तूंना हात लावलेला मला आवडत नाही.
पण माझा नाईलाज होता.कागद सृजनचा होता व जिथे जिथे शक्य होते तिथे मी शोधला होता.
शेवटी कंटाळून त्याची पर्सनल फाईल हातात घेतली.
सुदैवाने- दुर्दैवाने कोण जाणे पण ती फाईल खाली पडली .
जुना कागद असल्याने फाईलचं कवर एका बाजूने फाटलं .
त्या कवर मधून एक सप्तरंगी कागद खाली पडला.
केवळ उत्सुकतेपोटी मी तू उचलला.
मी पाहून चक्रावलोच.
ते मोत्यासारखं रेखीव सुंदर अक्षर मुग्धाचं होतं.
तिचं अक्षर इथे कसं आलं म्हणून मी तो कागद पाहिला.
जास्त व्यवस्थित पाहिला .
त्या कागदावर एक सुंदर अशी कविता लिहिलेली होती .
वाचताक्षणी मला आठवलं की ही कविता तिने मला दाखवली होती, सुहासशी लग्न होण्यापूर्वी!
भावनांचा अतिरेक किंवा शुद्ध वेडेपणा म्हणून त्या कवितेची मी त्यावेळीही खिल्ली उडवली होती.
तीच कविता तिथे वाचून माझ्या मनावर असंख्य डागण्या बसल्या .
कविता मुग्धाने सृजनला प्रेझेंट केलेली होती!
मी मटकन खुर्चीवर बसलो .
स्वतःला बजावलं.
पुन्हा वाचायला लागलो ,
तू माझ्या आयुष्यात
येणारच नाही तेव्हा
मी का करतीय प्रतीक्षा
तुझी आणि तुझीच ,
वेड्यागत!
तू मला मिळणारच नाहीस तर . .
तुझ्या आठवणींची
भिरभिरती पाखरे तरी
का सोडून चाललास ?
सोबत घेऊन जा .
किंवा कायमची नष्ट कर
पण परत
इकडे फिरकु देऊ नकोस!
तुझ्या आठवणीत . .
चिंब भिजलेले दिवस . .
- -- - - - - - -
पुढे मला वाचवलं गेलं नाही, डोळे भरून आले.
डोकं गरगरायला लागलं.
माझ्यासमोरची छोटी बहिण मुग्धा आणि ही इतका मोठं रहस्य मनात पचवून सहज जगणारी मुग्धा!!
तिच्यात आणि सृजन मध्ये काय झालं होतं हे तेच जाणो किंवा देव जाणे!
ते जाणून घेण्याची गरजही भासली नाही मला.
जेवढं कळालं तेवढेच पुष्कळ होतं .
लग्नाच्या वेळी मुग्धा काहीच का बोलली नाही मला?
मला मित्र मानणाऱ्या मुग्धाने ही गोष्ट मलाही जाणवू दिली नाही .
याचं आश्चर्य वाटतय.
नक्कीच दोघात खूप काही झालं होतं .
मलाही कळत होतं.
मी तसाच घरी आलो .
स्वतःला सावरायला मला दोन दिवस लागले.
त्या दोन दिवसात मी सगळे संदर्भ लावत होतो.
आज हे सारं कळूनही काही उपयोग नव्हता.
त्यावेळी कळलं असतं तर . . ?
नाही कदाचित त्यावेळी उपयोग झाला नसता, कारण मी तेव्हा प्रेम या उदात्त भावनेने पासून वंचित होतो.
प्रेमाचा संकुचित अर्थ मला माहित होता.
मी कदाचित त्यावेळी मोठ्या भावाची भूमिका निभावली असती आणि जातीपातीच्या भानगडीत पडलो असतो.
मुग्धाच्या या मर्यादित पणा समोर मी नतमस्तक झालो .
आज तिला तिचा व सृजनला त्याचा संसार आहे .
फक्त एवढंच वाटत राहिलं की अजूनही दोघांनी एकमेकांशी मित्राप्रमाणे , पूर्वीप्रमाणे बोलावं .
सृजन कालच परत आला व योगायोगाने मुग्धाही .
आज त्यांची भेटही झाली, सात वर्षानंतर! योगायोगाने !
आता मी पुन्हा पुन्हा स्वतःला सावरलं .
उठून बेडरूम बाहेर आलो .
कोट घातला .
मुग्धाला आवाज दिला.
" संध्याकाळी सुहास आल्यावर सृजनलाही कळवतो. आपण छान ३ फॅमिलीचा उद्याचा प्रोग्राम बनवूया . ओ. के. निघतो."
मी तिच्याकडे पाहिलं नाही.
पुढे निघालो आणि परत वळलो कुठला आवेग आला कोण जाणे! मी मुग्धाला आलिंगन दिलं आणि मुग्धाचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकले.
"मुग्धा यू आर जस्ट ग्रेट! तू खूप खूप मोठी आहेस ! सॉरी फॉर एवरीथिंग "
"का रे दादा ?" ती गोंधळली.
" ते तुला चांगलं ठाऊक आहे! तूच आठव मी सांगणार नाही!" मी म्हणालो आणि निश्चिंत मनाने ऑफिस कडे निघालो.
मुग्धा याप्रकाराने दंग राहिली असेल असा मी अंदाज बांधला.