क्षणात येते सरसर शिरवे !
क्षणात येते सरसर शिरवे !
उन्मळून कोसळलेल्या वृक्षागत मनाची अवस्था असताना पूर्ण केलेलं चित्र रसिका एकटक पाहत होती!
मनात विचारांची प्रचंड घुसमट चालली होती!
जगात जर कलारसिक आहेत तर कलेचा तिरस्कार करणारेही आहेत, नेमके दुसऱ्या प्रकारचे लोक माझ्या नशिबात आणि आयुष्यात का आलेले आहेत ?
तिने अरिहंतला पत्र लिहायला घेतलं, नेहमीच स्वतःविषयी मनात खूप गोंधळ झाला की ती त्याला पत्र लिहायची. अरिहंत तिचा सच्चा मित्र आणि शुभचिंतक होता.
त्याने नेहमीच रसिकाला खूप प्रोत्साहन दिलं होतं!
त्याच्यासमोर कुठलाही विषय बोलताना, मनातली भडास लिहिताना, तिला मनात कोणताही संकोच वाटत नव्हता! तिला एखाद्या जवळच्या मैत्रिणी पेक्षाही जास्त विश्वास त्याच्यावर होता.
स्वतःला व्यक्त करताना ती लिहायला लागली, " अरिहंत, स्त्रीने केवळ स्वयंपाक घर सांभाळलं तरच ती स्त्री असते का रे ? फक्त गृह कार्यात कमी असेल आणि इतर लाखो गुण तिच्यात असतील तर त्या स्त्रीला सुख मिळत नाही का रे ?
या समाजात संकल्पनाच्या चाकोर्या
इतक्या घट्ट कशा रूतल्यात ? मी तर झुंज देऊन थकले . . आताच ! अरिहंत तू सोबत असताना किती वेगळं वाटतं आयुष्य ! आणि नंतर कसं सगळंच वेगळं होतं, वीराण आणि निराश होतं !
माझे रंग माझ्याशी खूप बोलतात, सांगतात, दिलासा देतात!
नेहमी आठवतं मला, तू म्हणायचास 'जे.जे.स्कूल ऑफ आर्टस्कूलमध्ये जा च ,मोठी चित्रकार होशील!'
रंगांमध्ये माझे प्राण आहेत त्याविना मी निष्प्राण आहे.
समाजाबद्दल मी बोलणार नाही, पण माझे कुटुंबीय ???माझं नशीब असं का?? घरात सगळे माझ्या रंगांचा तिरस्कार करतात म्हणजे एका अर्थी ते माझीच घृणा करतात. सगळ्यांना माझ्या ब्रशेस आणि कॅनव्हास चा राग आहे.
कधी कधी वाटतं निसर्गाने का दिली असेल मला ही कला ? किंवा मग इतकं हळवं संवेदनाक्षम मन?
किंवा मग मी चूक कुटुंबात जन्मले का?
मला सतत प्रोत्साहन मिळतं ,माझं खूप कौतुक होतं पण बाहेरच्याकडून !
उंबरठ्याबाहेर!
घरात यातला मला कधीच काही मिळत नाही. एवढा विरोध आणि केवळ विरोध!
मला रंगांपासून कोणीही परावृत्त केलेलं आवडणार नाही. तू म्हणालास म्हणून मी डायरी लिहिते. . पण ती फक्त ऐकून घेते रे प्रश्नांची उत्तरे देत नाही म्हणून सहज अधेमध्ये तुला पत्रप्रपंच!
तू माझी बोलकी डायरी आहेस .
अरिहंत चहा-पोहे करण्याइतकं सोपं असतं का रे चित्र काढणं किंवा रंगवणे ?
अरिहंत माझ्या पेन्सिलला, रंगांना माझी साथ सोडून देऊ नकोस!
उत्तरं दे . . माझ्या शंकांची !"
रसिका लिहीत राहिली लिहित राहिलीअगदी डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळेपर्यंत .
तिला खूप हलकं वाटलं आणि असंच काहीतरी लिहिण्यासाठी तिने डायरी घेतली.
नेहमीप्रमाणे रात्रीचा एक वाजला होता, सगळे जण गाढ झोपेत होते. आता तो भावनांचा आवेग ओसरला होता. पण कुठलीही भरती आल्यानंतर जेव्हा ती ओसरते तेव्हा पाऊलखुणा आणि प्रश्नचिन्ह अपरिहार्य!
संध्याकाळी आईशी झालेल्या वादाने तिच्या मनात एक वादळ घोंगावत होतं. . ते सगळं कसं बाहेर काढावे ते कळत नव्हतं .
दिशा सगळ्या बाजूंनी उलटाव्यात असंच काहीसं !
आईने वादाला तोंड फोडलं होतं, पण टाकून कुचकट बोलले सगळेजण! अगदी सगळेजण!
रसिका एकटी पडली होती, परिवारा समोर. ती सामना करू शकली नाही.
सगळे बोलणे आवंढ्या सोबत गिळली.
जेवली ही नाही.
असं का आणि हे माझ्यासोबतच का ?असा एकच विचार तिच्या मनात होता .
प्रश्नांनाही शेकडो चेहरे !
सहस्र रूप प्रश्नांची, मनात सगळं साठत राहीलं आणि शेवटी ती रंग, कॅनवास, ब्रश घेऊन बसली. एक आकाशी रंगापासून तिने सुरुवात केली.
नेहमीच आकाश निरीक्षणाचा छंद आणि काल अनुभवलेली गर्द निळाई त्या चित्रात उतरली. मग काळसर निळा अशा अनेक छटा असंख्य मनोरूपं दाखवत होता .
कुठे तरी ती स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होती.
सतत वाटत राहिले, मोठे काका, आजी ,बाबा आई-दादा कोणालाच माझं कौतुक नाही.
आई रागाच्या भरात बोलून गेली असेल पण तरीही असं बोलावं ???
कॅनव्हास , ब्रश चुलीत घालते म्हणाली . . ती मनात पुटपुटत होती . . . माझी ट्युशनच्या कमाईतून आणलेली सामग्री आणि चुलीत ????
आपोआपच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले चित्र बनलं ,. . सुंदर चित्र पूर्ण झालं .
भावना ओतून पुर्ण झाल्या तरी मनातला तो अवसाद मिटला नाही.
* * * * * * * * * *
"रसिका पाहिलंस का? शहरात पोस्टर लागलेत? विश्वनाथ चित्रप्रदर्शन भरतंय!" रेणू दुपारी सहज आली होती.
" कुठे ? मुंबईत ना ! " रसिका अनभिज्ञ.
" अग्गं ! मुंबईत नाही ,इथेच आपल्या शहरातल्या डेकोरेटिंग हॉलमध्ये ,. . . . उद्यापासून!"
" ओह नो . ओह एस . आपल्या शहरात विश्वनाथांचं चित्रप्रदर्शन ???? मी काय करू? मी गेलच पाहिजे! आय ऍम सो हॅपी !किती वेळा जाऊन ते पाहू?" ती आनंदाने डोलायला लागली.
सायंकाळी आई बाहेरून परतली. जेवताना रसिका हळूच म्हणाली "आई ते विश्वनाथ आहेत ना!"
" आता हे कोण विश्वनाथ ?"
"खूप मोठे चित्रकार आहेत!"
" ते असतील! मग ??"
"अग त्यांचे चित्र प्रदर्शन भरतय इथे. . " ती आनंदात बोलली.
"मग असू दे, आपल्याला काय करायचे ? हं तुला करायचं असेल नाही ? कालच एवढा रामायण झालं ,सगळे घरचे विरोधात गेले अजूनही त्या चित्रांचं वेड तर आहेच तुला? एकदा सांगितलं ना सोडून दे! सोड म्हटलं की सोडायचं बाईच्य जातीने !"
"का पण ? नाद सोडला तरी आवड आहे ना ती माझी ? आहे ती कुठे जाणार ? मी चित्र काढले की तुला राग येतो ! मग बघायला तर जाऊ देना! चित्र पाहण्यास काय हरकत आहे!"
" तुला सांगितलं ना मी नाही म्हणून! त्या मेल्यांना काही कामधंदे नाहित चित्र काढोत नाही तर प्रदर्शन भरवोत. . भिकेचे डोहाळे सगळे! त्यांना पैसा मिळेल ! आपल्याला काय ? चित्र पाहून पोट भरतं का ! असंच करा . . सासरी. . भूक लागली की नवर्याला चित्र दाखवा. . भूकच मरेल त्याची!"
" आईऽ ऽ " रसिका जोरात ओरडली आणि हातातला घास टाकून तशीच उठली .
तिला जेवणात मुळीच स्वारस्य नव्हतं म्हणून तिने स्वतःला पलंगावर झोकून दिलं आणि रडत राहिली.
तिच्या कानात आईचे शब्द पडत राहिले अजूनही आई स्वयंपाक घरातून बोलत होती. घरात सर्वांना ऐकू जाईल अस।
" अशा या पोरी खरं बोलल्यावर नाकाला मिरच्या झोंबतात . माझा राग त्यां अन्ना वर काढला पोरीने !. . सासरी असं चालत नाही कुणी बोललं तर मग भरल्या ताटावरून उठता येत नसतं. . . जा आता, तिथे आमचं नाव चांगलं काढणार तुम्ही!"
आई एकटीच कितीतरी वेळा बडबडत होती.
सगळे मुकाट्याने जेवत होते
अशा प्रकारचे अनेक प्रसंग घरात नेहमीच घडायचे.
रसिका विचारांच्या तंद्रीत असायची आणि मग काहीतरी चुकायची .
नेहमीच बोलणे ऐकून तिला वाटायला लागलं की उगीच मुलीच्या जन्माला आले.
मुलगा झाला असते तरी याच कलेला घरच्यांनीच छंद म्हणून जोपासलं आसतं . प्रोत्साहनच दिलं असतं. . . आणि माझी मात्र मुळं उपटल्या जातयत!
कशी विभक्त करू स्वतःला यासगळ्या पासून .
ही मुक्तीही शेवटच्या मुक्तीपर्यंत शक्य नाही.
काही माणसांचं मन मात्र कधीच मरत नाही, मनाचं अगदी कुत्र्याच्या शेपटी सारखं असतं वळायचा तिकडेच वळते.!
त्यानंतरचे दोन दिवस घरातच गेले पहिल्या दिवशी आई-बाबा लग्नाला गेल्याने तिला घराबाहेर पडता आलं नाही व दुसऱ्या दिवशी बाबांचे मित्र सपत्नीक जेवायला आले होते आईला मदत करण्यात दिवस गेला आणि थकल्याने रात्री ती लवकर झोपी गेली सकाळी सहजतेने पेपर पाहिला आणि हादरली त्यात लिहिलं होतं आज प्रदर्शनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस डोक्यावर हातोडा मारल्या सारखं वाटलं दोन दिवस मी घरातच घालवले!
ती मनाशी बोलायला लागली .
बाहेरच्या विश्वातलं घरात काहीच कळत नाही, त्यासाठी बाहेरच पडावं लागतं.
ती प्रदर्शनांच्या कल्पनेत रमली. डेकोरेटिव्ह हॉलच्या सजवलेल्या भिंतीवर विश्वनाथ यांची अनोखी, अद्भुत, अप्रतिम चित्र!
मनात रुतणारी ,हृदयात सलणारी अशी अनेक चित्र!
प्रचंड गर्दी आणि गजबजाट त्यांच्या चित्रांबद्दल काय सांगायचं?? त्यांची चित्रे नुसते पाहायला मिळाली तरी माझ्यासारखीच आयुष्य धन्य होईल!
तिने ठरवलं, काहीही होवो . . आज जायचंच.
काहीही करावं लागलं तरी !
रसिकाला विचारात पाहून तिच्या आईने दोन हाका मारल्या .
ती दचकून भानावर आल।
" आई मला काम आहे ,जरा बाहेर जायचय!"
" काही नको बाई ! आज जाऊ नकोस उद्या जा ! आज माझं अंग खूप ठणकतय! द्वारका पण भांड्याला येणार नाही .आजीला थोडी मदत कर! मी तर तुला काही काम सांगतच नाही. . . आणि इतक नाराज झालीस काय झालं? कुठे जायचे आणि किती वाजता?"
" काही नाही असच रेणुकडे आणि ती साडी फॉल साठी टाकली होती ना . . आणावी म्हटलं!"
" काही नको चक्कर फुकट जाईल. तो टेलर गावाला गेलाय दोन दिवस येणार नाही."
" अग सहज म्हणाले, अॅक्चुअली मला रेणू कडे जायचंय तिला आणि मला ड्रेस शिवायला टाकायचं होतं ना , सोबत जायचं होतं!"
" थोडं आमचंही सुखदुःख बघत जा, कधीतरी ! घरातली कामं कर, मला बरं वाटलं की मी बघते घरातलं !"
" पण आईऽ. . . !" ती टेबलावर हात आदळून राहिली आणि आई निघून गेली.
केवळ बाहेर जायला मिळावं म्हणून रसिका घरातले सगळं काम आवरायला लागली.
आजी सांगेल ते काम करत राहिली.
धुणी , भांडे सगळं काम करतानाही कल्पनेत विश्वनाथ यांचे चित्रं पाहत होती.
सतत घड्याळावर नजर!
ते वैर्यागत पुढे पळत होते .
दुपारी आई आणि आजी झोपल्या होत्या.
तिला कळून चुकलं ,विचारलं तर ही परवानगी देणार नाही!
ती जाण्यासाठी तयार झाली .
बदामी रंगाचा ड्रेस घातला .
चिठ्ठी लिहून ठेवली .
' रेणू आली होती, तिच्या सोबत चाललेय! झोपली होतीस म्हणून उठवलं नाही.'
ठरल्याप्रमाणे ती निघाली.
घाईघाईत मंतरलेल्या प्रमाणे ती निघाली।
सगळ्या मैत्रिणीं कडे गेली ,कुणी तिच्
या सोबत आलं नाही.
प्रत्येकाची काही ना काही अडचण!
ती मनात पुटपुटली "यांना चित्रां समोर अडचणी मोठ्या वाटतात!"
रेणुल द्यायचा तो निरोप देवून ती टॅक्सीने तिथे पोहोचली.
अनेक ओळखीचे चेहरे, प्रत्येकाशी ओझरता संवाद!
ती आत आली तेव्हा हॉलचे मालक समोरच होते , ते तिला ओळखत होते, त्यांना रसिकाची रसिकता व चित्रवेड माहीत होते.
" तरीच मला वाटलं बेटा, तू कशी नाही आलीस इथे ! चित्रप्रदर्शन आहे आणि तू नाही आलीस म्हणजे काय? " ते हसंत बोलले.
" अंकल दोन दिवस वेळच नाही मिळाला, म्हणून आज आले !"
" रसिका मला काल खूप वाटलं तू येशील, संध्याकाळपर्यंत वाट पाहिली! खूप छान झाला कार्यक्रम!" ते सहज बोलले.
" काय होतं काल इथे विशेष?"
" या चित्रांचे चित्रकार ,रंगमहर्षि विश्वनाथ बाबू आले होते काल. . !"
" काऽ य???" ती जवळ जवळ किंचाळलीच .
कपाळावर हात मारला आणि खुर्चीवर बसली
या मनस्तापाला , आपल्या पश्चातापाला मर्यादा नव्हती.
तिला वाटलं ती रंगदेवता येथे आली होती, या शहरात, माझ्या दारात आणि मी अभागी!. . . छे स्वयंपाकाणे माझा घात केला.
त्यांना फक्त पाहायला मिळालं तरी मला पुष्कळ होते
ती मनात कुढत राहिली.
स्वतःला कोसत राहिली
आज तिने काय गमावलं हे दुःख तीच जाणत होती.
विश्वनाथ ख्यातनाम चित्रकार होते. चित्रकारीतले उस्ताद होते आणि रसिका त्यांच्या चित्रांवर प्रेम करायची.
तिच्यासाठी विश्वनाथ रंगात जन्मलेले देव होते .
दहा मिनिटांनी तिने स्वतःला सावरले आणि चित्र पाहायला लागली.
एका एका चित्रा समोर ती कितीतरी वेळ उभी होती.
त्या चित्रातली अर्थ शोधत, त्या गूढ गर्भाच्या तळाशी जाण्याच्या प्रयत्नात.
रेषां मधले संदर्भ, त्यातल्या आकृत्यांची लय शोधत होती .
तिला जाणवलं विश्वनाथ किती मोठे कलाकार आहेत, अगदी आभाळाएवढे!
. . आणि आपण पृथ्वीवरील एक वाळूचे कण आहोत.
त्यांना पाहण्यासाठी डोळे तोकडे पडतात.
सुजय खूप वेळापासून रसिकाला पाहत होता.
त्या पाहण्यात एक कुतुहल होतं कारण इतर लोक प्रत्येक चित्र समोरून एक दोन मिनिटात सरकत होते जाताना एखादा दाद ही देणारे शब्द उच्चारत होते.
त्याच साध्या दिसणार्या एका चित्रांसमोर रसिका कितीतरी वेळ उभी होती.
काहीतरी समजल्याचे समाधान तिच्या चेहर्यावर दिसल्याशिवाय ती पुढे सरकत नव्हती.
यावेळी ती शेवटच्या सर्वात गूढ असणाऱ्या गर्भरेशमी रंगातील चित्रा समोर उभी होती.
" एक्सक्युज मी, तुम्हाला काही मदत करू शकतो का?"
"अं कसली मदत ? कोण आपण?"
ती गोंधळली.
"मी सुजय! मघापासून पाहतोय तुम्ही या चित्रात गुंतलाय ! हे ! जर यात तुम्ही कसलासा अर्थ शोधत असाल तर मी मदत करू शकतो ?!"
"तुम्हाला काय कल्पना मी काय शोधत होते . . तुम्ही नेमकं काय अर्थ सांगाल मला. . विश्वनाथांच्या चित्राचा???"
" मी तुमच्या इतका संवेदनशील नसेल पण उस्तादजींच्या चित्रातला त्यांना गृहीत असलेला अर्थ मी तुम्हाला सांगू शकतो. . ! उगीच नाही आलो मी इथे!"
ती हसली.
मग त्याच्याशी झालेल्या मैत्रीपूर्ण संवादात प्रथम रसिकाला कळाले की सुजय कुणी प्रेक्षक नसून खुद्द विश्वनाथ यांचा आवडता शिष्य आहे .
ती त्याच्याजवळ विश्वनाथां बद्दल, त्यांच्या चित्रां बद्दल खूप बोलली.
त्याच्याकडून तिला विश्वनाथ यांचा पत्ता मिळाला.
तिला एक गोष्ट समजली की सुजय त्याच्या मित्राच्या जवळच्या मैत्रिणीला या प्रदर्शनात शोधतो आहे.
योगायोगाने ती कला वेडी मैत्रीण रसिकाच आहे हे त्याला कळले.
अरिहंत सुजयचा मित्र होता.
त्यांच्याकडून रसिका बद्दल ऐकून होता.
**********
प्रतिकूल वातावरण आणि तिचे चित्र काढणं चालतच राहीलं.
दरम्यान ती चांगल्या मार्कानी पास झाली होती आणि अचानक एक दिवस टपालात एक वेगळच टपाल आलं!
वाचताच तिला आकाश ठेंगणं झालं.
ती आनंदली!
तिच्या कलेला पहिले यश मिळालं होतं!
एक राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत "अंतरीच्या गुढ गर्भात" या तिच्या चित्राला पहिलं पारितोषिक मिळालं होतं. त्यानंतर ते सगळं कसं स्वप्नवत बदललं !
तिचा आनंद अवर्णनीय!
बक्षीस वितरण झालं , ती प्रकाशात आली , वृत्तपत्रात आई-वडिलांसोबत फोटो!
सगळ्यांकडून कौतुकच कौतुक !
आई- बाबांच्या स्वभावात थोडासा बदल जाणवायला लागला .
रसिका मनोमन सुजयला धन्यवाद देत होती. कारण त्यानेच तिला सुचवलं होतं . . प्रत्येक स्पर्धेत चित्र पाठवत जा .
तुझी कला लोकांसमोर येऊ दे!
त्यानंतर इतर छोटी-मोठी दोन-तीन बक्षिसं मिळाली, सत्कार होत राहिले.
सगळं कसं एखाद्या स्वप्नागत भासलं . . रमणीय आणि धुंद धुंद!
*********
पुन्हा एक दिवस घरातल्या कामात तिच्याकडून झालेल्या छोट्या चुकीचं आणि परत काही गोष्टींचा कारण बनवून घरात वादंग झालं, भांडण, वाद आणि तिच्या प्रतिभेला, कलेला शब्दांच्या डागण्या.
रसिकाच्या डोळ्यातले अश्रू संपले.
रात्रभर विचार केला, तिचे काही या क्षेत्रात होणार नाही !
निर्णय घेतला, या सगळ्या ग्रहांचा मूळ असलेले . . , तिचे ब्रश रंग कॅनव्हास सगळं गाठोड्यात बांधून माळ्यावर टाकलं .
बस संपवलं!
यापैकी काही नाही !
चित्रांना कायमचा निरोप!
पेन्सिल शी कायमची कट्टी !
रसिकातल्या . . रसिकतेचा खून . . तर त्या कलेचा खून!
एका नव्या मुलीचा जन्म- जी सामान्य असेल, केवळ गृहकर्तव्यदक्ष असेल आणि दिल्या घरी सुखी राहील!
**********
काही दिवस गेले.
अचानक एक दिवस परत टपालात भले मोठे पत्र आले.
रसिका चरकलीच.
पत्ता तिचाच होता.
उघडते तर आत खूप काही !
सात-आठ पानांचं पत्र, सुंदर -सुंदर दोन-तीन चित्र , आणि एका कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका !
शेवटी नाव पाहताच ती भारावली!
ते पत्र स्वतः विश्वनाथ यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातलं!
बसून वाचू लागली . .
काहीसा संक्षिप्त मजकूर असा. .
रंगवेडी रसिका!
आशीर्वाद!
तुझे पहिले यश तुझ्या चित्रांना फुलण्याची प्रेरणा देवो!
तुझ्याबद्दल सुजय आणि अरिहंतकडून बरंच काही ऐकून आहे.
तुला न पाहता देखील तू माझ्या शिष्येगत मला जवळची आहेस , रंगांइतकीच प्रिय आहेस.
तुला मिळालेले यश वाखाणण्यासारखे आहे .
तू नक्की एक दिवस परिमळागत पसरशील ,सगळ्या देशावर! सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू मला गुरुस्थानी मानतेस हे वाचून मी धन्य झालो.
तुझं पत्र मिळालं आणि मला वाटतं पहिल्यांदाच मी इतका विचार केला असेल माझ्या फॅन बद्दल .इतर रसिकांबद्दल बद्दल मला आदर आहे पण तुझ्या इतका जिव्हाळा कुणाबद्दल वाटला नाही.
तुझं अक्षर-अक्षर जिवंत चित्र आहे. तू वाळवंटातलं गुलाब आहेस.
तू लिहितेसही खूप छान, मला तुझ्याकडून शिकावं लागेल .
तू कदाचित कळी असशील ,तुझ्या कडे दुर्लक्ष झाले असेल पण एका रात्रीतून तू उमललीस आणि पहा सगळे कसे कौतुकाने तुझ्याकडे पाहत आहेत.
एका यशाने तू व्यक्त झालीस, पण नाही , तुला इथेचं हुरळून जायचं नाही, थांबायचं नाही!
तुला खूप लांब जायचं आहे !
अहंकारी बनायचं नाही.
लक्षात ठेव, रंगात भिजणारा चिंब झाला तरी थांबत नाही.
माझ्या चित्रांविषयी तुझे अभिप्राय वाचले आणि सुजयने जे काही सांगितले त्यावरून मला वाटतं, तुझ्या शहरात माझे प्रदर्शन सफल झाले .
तू तुझ्या घरातल्या वातावरणाविषयी लिहिलंस !
काळजी करू नकोस!
तुझा दोष नाही आणि त्यांचाही नाही. तुमच्या सात पिढ्यात कधीच कुणी चित्रकार नव्हता मग तुझ्या घरच्यांना त्यात आवड कशी असेल?
तुला आवड आहे तर तो छंद जोपासता येतो ना ? तू थोडीच सोडणार ? ते बोलत आहेत, त्यांच्या मनातला हेतु . . तो वाईट नसतो !
तुला पुढे सासरी त्रास होऊ नये या सामान्य भावनेपोटी, प्रेमापोटी ते बोलतात! त्यांना त्यांची मर्यादित चौकट आहे. त्याच्या बाहेर , वर तू आलीस! त्यांच्याप्रमाणे त्यांना समजून घे! सुखी होशील!
तशी तू तृप्त ही नकोआहेस!
कारण समाधान मिळालं की कलाकार सुस्तावतो.
तू अस्वस्थ असतेस हे चांगलं आहे त्यामुळेच इतकी सुंदर आणि ह्रदयस्पर्शी चित्र काढू शकतेस.
रसिका तू मुलगी आहेस, स्त्री आहेस! स्त्रिया या क्षेत्रात खूप कमी आहेत!
तू माझ्या पेक्षाही मोठी कलाकार होशील त्या दिवशी मला खूप आनंद वाटेल!
पुरुषांपेक्षा स्त्रियांचे मन संवेदनक्षम असतं ,ते तुझ्याकडे आहे !
तुझी स्तुती आणि रूपरेखा सुजयकडून ऐकली आणि अरिहंतच्या पत्रात जाणवली तशी मी तुला चितारण्याचा प्रयत्न केला आहे!
माझ्या कल्पनेतल्या रसिकाचं चित्र मी सोबत पाठवत आहे !
पुढच्या महिन्यात जयपूरला होणाऱ्या राष्ट्रस्तरीय चित्र स्पर्धेत पत्र पाठव! चित्र पाठवच !
शेवटी जीवनाला बालकवींच्या कवितेत पहा" क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे"
तुझा गुरूजी
विश्वनाथ"
रसिका काही क्षण स्तब्धच झाली. तिने स्टूल घेतला , ती ओरडली. ."आई ऽ बाबा ऽ स्टूल आणलाय! आई तू पकड ! विश्वनाथ यांचं वैयक्तिक पत्र आलय, मला माळ्यावरचं सामान काढायचय, लवकर ये मला स्पर्धेत पेंटिंग पाठवायचं आहे!"
© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे सखी
३१ .१० . १९