एक ओली प्रेमकथा
एक ओली प्रेमकथा
ती बस स्टॉप जवळ उभी होती सकाळी सकाळी!
बस आलीच नाही.
वेळ उलटून गेली .
तिची खुप घालमेल व्हायला लागली.
इतक्यात भरलेलं आभाळ होतं ,जोरात पाऊस सुरू झाला मग ती अजूनच बावरली . अंग चोरून उभी राहायला लागली.
अचानक एक बुलेट भरधाव आली आणि त्यावरचा मुलगा गाडी थांबवून, उतरला व बस स्टॉपवर थांबला.
दुसरं कोणीच तिथे नव्हतं त्यामुळे ते अधिकच चिंतेत पडली.
तो हेल्मेट सकट बराच वेळ बसला बेंचवर!
ती मात्र उभी .
तो तिच्या साधेपणाला पहात होता.
भोळेपणा तर तिच्या चेहऱ्यावर ओथंबून वाहत होता .
साधी सरळ मुलगी पण खूपच मोहक होती असं वाटलं.
त्यांनी हेल्मेट काढले, केसावरून हात फिरवला, कंगव्याने केस सारखे केले.
ती डोळ्यांच्या कडेने हे पहात होती.
पाऊस काही थांबेना.
त्याने मोबाईल काढला.
बॅटरी पण सहा टक्के दाखवत होती.
रात्री घरात लाईट नव्हते, रात्रभर पाऊस पडत होता .चार्जरही नव्हते सोबत.
आता काय करावं ! असा विचार करत होता.
"शिट्ट यार ! या पावसाने पचका केला !कशाला येतो हा ?"
तो मोठ्याने म्हणाला .
"अहो प्लीज! असं म्हणू नका .
पाऊस हवाच ग्राउंड वॉटर ची लेव्हल किती खाली गेली शिवाय बोरवेल ला पाणी पण नाहीये.
पडू द्या हो त्याला .आता तरी कुठे थोडा पडतोय तो!" त्याने कपाळाला हात मारला.
" अहो तसं नाही! पाऊस पडावा पण आता दिवसा पडला की असं होतं कॉलेजमधला सकाळचा क्लास जाईल ना!"
तो कुठे , कॉलेजला, काय शिकतो असं तिने विचारावं असं त्याला वाटलं पण ती काहीच बोलली नाही.
" बगाडिया कॉलेज का ?"
त्याने विचारलं.
" हो आणि तुम्ही?"
" तेच तुमचं बगाडिया!!" आणि ती मिश्किलपणे हसली.
त्याच्या काळजात कुठेतरी वीज चमकली.
ती एकदमच त्याला खूप खूप जवळची वाटली.
काहीतरी होतं त्या हसण्यात! तो तिला निरखत राहिला.
" कशी जाणार कॉलेजला?" त्याने विचारलं "बस आली नाही ना ! नाहीतर गेली असती आतापर्यंत !"
"छत्री आहे वाटतं सोबत ?"
"हो आहे पण एवढ्या पावसाच्या तडाख्यात शक्य नाही चालणं. . कॉलेजही लांबच आहे ना इथून."
"मग मी सोडू का बाईकवर?!"
"नको नको. एक सांगा , मग तुम्ही का थांबलात इथे ?"
" पुढे रस्ता खराब आहे ,माझी बुलेट आणि शूज मला खूप प्रिय आहेत . बाइक पडली झडली, चिखल उडाला तर मला आवडणार नाही !"
ती पुन्हा हसली, खूप मोहक!
" मला तेच वाटलं तुम्ही रेनकोट घालूनही, बाइक असूनही बस स्टॉपवर का थांबलात?"
" तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला एकटी पाहून थांबलो ??"
आणि ती पुन्हा मोठ्यांदा हसली.
" फर्स्ट ईयर का?"
" हो! पण तुम्हाला कसं कळलं?"
" कळतं चेहऱ्यावरून, अनुभव आहे हा !"
ओह !!! हो का ! छान आहे कि अनुभव !"
मग हळूहळू पाऊस वाढत गेला.
दोघांच्या गप्पा वाढत गेल्या.
तास-दीड तास कुठे गेला कळलच नाही.
" कॅबनी जायचं का? पण माझ्या फोन मध्ये चार्जिंग नाही.?"
" माझ्याकडे चार्जिंग आहे पण मी पुरेसे पैसे आणले नाहीत !" ती टाळण्यासाठी बोलली.
" पैशाची काळजी सोड गं , मी आहे ना!"
" काय म्हणालात ?"
"काही नाही गं . . असच. एकेरी सोपं वाटतं बोलायला . औपचारिकता किती वेळ?
" मला नाही बोलता येत एकेरी . .जाऊ द्या मग कॅब नको , ऑटो करूयात .!"
ती पटकन बोलली.
"माझी भीती वाटते का तुला ?"
"नाही मला नाही आवडत , अनोळखी लोकांसोबत कॅबमध्ये जायला!!"
"मी अनोळखी वाटतोय का अजून?. . जाऊ दे मग . . पायीच जा तुम्ही!
मग हळू हळू पाऊस कमी झाला , थांबला !
ती निघाली छत्री उघडून, तो पण आला मागून आणि म्हणाला "चला ना ओळख झालीच आहे तर बाईक वर सोडतो!"
" कुठे ओळख झाली , मला तुमचं नाव देखील माहीत नाही."
"म्हणजे नावा शिवाय चालणार नाही ? का तसं ?. . गाडीवर बसण्यासाठी ड्रायवरचं . . नाव आणि गाडीचा नंबर आवश्यक आहे का ?. .आय मीन राईड ट्रॅक करणार का ?. . तो हसला मोठ्यांदा !
"अहो तसं काही नाही. . . नाहीच पण कळालं तर बर झालं असतं!" ती ओशाळली.
आणि ती मिस्किलपणे हसली त्याच्या मनात पुन्हा वीज चमकली .
"तुमचं नाव तरी मला कुठे सांगितलं ?"
"मी हीच जी बरसते आहे!"
" हो का वर्षा . . !"
"वर्षा नाही!"
" मग मेघा ?? "
"नाही "
"श्रावणी !"
नो"
"सावनी"
"जा मग पाऊस ऽ !"
तो ओरडला दबल्या आवाजात.
"असं कुठं नाव असतं का . .?
ती मोठ्याने हसली.
" संपले का गेस ??? संपले का गेस, ?"
" सांग ना यार ऽ आता !" तो थकला .
" माझं नाव बरखा !!"
"वाव कसलं गोड नाव आहे. !"
" आणि तुमचं ??"
"ओळखा ना आता! समजा मी तुमचा देवता आहे!"
"काहीपण. . काय कोडं ? इंद्र का. . ?"
" हो. . . कुठे गेस करतेस? चल सोड! मी वरुण!!"
"खरंच आता ओळख झाली ना. . मग येतेस का" बाइकवर ?"
तिला नाही म्हणण्यासाठी काहीच कारण नव्हतं.
इतक्यात पुन्हा भुरभुर सुरू झाली.
त्याने रेनकोट काढला , हक्काने तिला दिला!
तिने त्याच्याकडे तिरकस पाहिलं पण आभाळाकडे पाहून रेनकोट घेतला , मग घातला आणि अलगदपणे बाईकवर बसली.
त्याने गाडी स्टार्ट केली.
त्याला खूप भारी वाटत होतं
आयुष्यात पहिल्यांदा एका अनोळख्या मुलीला गाडीवर घेऊन जात होता .
"कॉलेजला जाणं जरुरी आहे का, ?" तो
" म्हणजे हो! नाहीतर कुठे जाणार " ती.
"एक कॉफी घेतली असती तुमच्या सोबत !"
"नको बाबा, आज तर नको !"
"म्हणजे उद्या येणार . .!!"
ती गोड हसली ,त्याने गाडी कॉलेज कडे वळवली.
दिवसभर दोघेही वेगळ्याच मूडमधे होते.
रात्रभर दोघेही झोपले नाहीत .
सकाळी ती खूप छान तयार झाली .
तोही आज वेगळ्या मूडमध्ये आवडते कपडे घालून निघाला .
त्याच बस स्टॉप वर तो थांबला .
ती उभी होती .
तिने आलेली बस सोडली.
" अच्छा ! कॉफी साठी येतायना बरखा मॅडम?"
"होना यावं कि नाही विचार करतेय वरूण सर!"
" शब्द तुम्ही दिला होतात. . !"
" आईशप्पथ . .मी नाही बाबा शब्द दिला. .!"
" एका कॉफीसाठी आई आणि बाबांना मधे आणतेस. . बरखा. .कधी जेवायला चल म्हणालो तर आजी - आजोबा , काकू काका. ." ती प्रचंड लाजली.
"चूप. .चला आता !"
ती हक्कानं गाडीवर बसली.
एका दिवसात किती अंतर कमी केलं होतं पावसाने.
सुरुवात झाली होती एका सुंदर पावसाळी प्रेमकथेची !
ओलीचिंब प्रेम कथा पुढे त्या अनुशंगाने होणार होती.
अाज पाऊस पडत होता पण तिने छत्री आणली नव्हती आणि त्याचा रेनकोट ती मुद्दाम विसरून आली होती.
भिजताना आज थंडीची तमा नव्हती कि रेनकोटची.
एका झाडाखालच्या टपरी जवळ त्याने गाडी थांबवली.
"कॉफी पुन्हा घेऊ. .आता पावसात आल्याचा चहा. .इथला छान असतो."
ती हसली आणि संमतीपूर्वक मान डोलावत लाजली. .
बाजूला मोठ्याने गाणं लागलं होतं. . .
"गुज ओठांनी ओठांना सांगायचे, एका पावसात दोघांनी भिजायचे"
तिने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं. .
तो तिलाच न्याहळत होता . ती मनी लाजून चूर झाली.
ही एका सुंदर प्रेमकथेची सुरुवात होती !
* * * * *
काही महिने असेच गेले. . पावसाळा आणि मग हिवाळा.
थंडी वाढत राहीली, संपर्क वाढत राहिला.
वरूण आणि बरखाची प्रेमकहाणी रंगली होती.
फोनवर सतत बोलणं , कॉलेजात कमीच पण बाहेर जास्त भेटणं . . रुसणं- फुगणं , भेटण्यासाठी धडपडणं. . सगळं चालूच होतं .
सहा महीने उलटली असतील, आणा भाका , लग्नाचं नियोजन सगळं बोलून झालं होतं.
वरूणचं एम बी ए चं शेवटचं वर्ष होतं .
कॅम्पसच्या जॉबसाठी तो वाट पहात होता.
मग पुढचं ठरवू असं त्याला वाटलं.
जातीचा प्रश्न होता , घरातल्यांच्या अपेक्षा होत्या.
एकमेकांशिवाय आपण जगूच शकत नाही ही भावना प्रबळ होतीच.
बरखाच्या वागण्यातला बदल तिच्या आईच्या लक्षात येऊ लागला होता.
तिने स्थळे शोधण्यासाठी वडिलांना भरीस पाडलं.
"आई मला शिकायचय अजून . .प्लीज लग्नाचं बघू नका." एकदा बरखाने कळवळीने सांगितलं.
" बेटा आता पाह्यलं की लग्न ठरत नसतं. आता सुरुवात केली की तुझं ग्रॅजुएशन होईपर्यंत ठरेल. मग बघू पुढचं . मनाजोगतं स्थळ मिळायला नशीब असावं लागतं . . शिवाय . . काही बाही ऐकायला येतं आजकाल. .भीती वाटते गं राणी. ."
पण आई असं दाखवून ठरवून कसं लग्न होतं गं. . अनोळखी लोकं. . ते कसे असतात कसं सांगणार ना. तू पण पाहतीयस ना कीती प्रॉब्लेम होतायत लग्नानंतर. . . ओळखीत असल्यावर काही नाही." ती काहीतरी म्हणाली. याव्यतिरिक्त तिला काहिच बोलता आलं नाही.
तिने वरूणला सांगितलं पण त्याने सिरिअस घेतलं नाही.
"सगळेच आईवडिल असं करतात. .गं ! त्यांना काळजी असते. . आपली. आता वेळ चुकीची आहे. . मी काही बोललो आणि तुझ्या बाबांनी विचारलं कि तू काय करतोस ? मी काय सांगणार. . जस्ट ६ महिने गं बरखा. . मग मी आणि तू. ! काळजी करू नकोस!" त्याने तिला जवळ घेवून समजावलं. ती रिलॅक्स झाली.
एक दिवस बाबाही म्हणाले . . बेटा तू हुषार आहेस , गुणी आहेस. तुझ्यं लग्नंची कसळजी मला नाही. तुझ्या मर्जीशिवाय . . म्हणजे तुला सांगूनच मी लग्न ठरवीन. आई म्हणत होती कि तुला शिकायची हौस आहे. . बेटा मी असं स्थळ शोधेन कि तुला ते मुलीसारखं ठेवतील आणि शिकवतीलही. . "
"हो का बाबा. . थँक्यू !" ती एवढंच बोलू शकली तिच्या धीरगंभीर शिस्तीच्या बाबांपुढे!
पण तिच्या मनातली शंका पूर्ण गेली नाही कारण बंबा शांत आणि मंद हसत होते हे बोलताना . .
काही कळालंय का घरी ? . . त्यांची संमती आहे कि विरोध. . ? ती बुचकळ्यांत पडली.
ती शांत राहीली.
महिना दीड महीना गेला. घरात काहीतरी होत राहिलं. . फोना फोनी मग ती आली कि विषय बदलणं. . काहीतरी प्लॅनिंग . . आणि सिक्रेटली काहीतरी.
परीक्षा दोन तीन महिन्यांवर आली.
अचानक मोठी आत्या एकदा घरी आली , नेहमीप्रमाणैच तिला जवळ घेतलं , लाड केला पण यावेळी तिची नजर वेगळीच होती. ती खूप खुश दिसत होती.
बाबाही दोन तीनदा आत्याच्या गावी जाऊन आले होते.
अचानक बॉंब पडावा तशी बातमी कळंली तिला. तिचं लग्न ठरलं होतं मयूरशी , तिच्या आत्याच्या मुलाशी!
लग्न! ! ! ती तर गारठली.
नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं.
तो ओळखीतला होता , स्मार्ट होता , जॉब छान होता , तिचा चांगला मित्रही होता, शिवाय आत्या पुढे शिकवणार होती हवं तेवढं.
आत्या लाडाने सून म्हणायची लहानपणापासून पण तिचं असं ठरलेलं असेल हे नव्हता माहित.
बाबांनी तर केव्हाच ठरवलं होतं म्हणे , आत्यानी मागणी घातली आणि बाबांनी शस्त्र ठेवली.
वरूण ला कळाल्यावर तो हादरला. अगदी डेट पण ठरली होती उन्हाळ्यातील. .
मी आहे. . तू माझी आहेस . काळजी करू नको.
तू फक्त शांत रहा जे होतंय ते होऊ दे!
त्याने एक प्लॅन बनवला .
चार महिन्यात तो प्लॅन वर्कआऊट झाला आणि बरखा वरूणची झाली.
घरी तयारी चालत राहीली आणि बरखा आणि वरून ने मित्रांच्या मदतीने कोर्ट मॅरेज केलं
एक खोली घेतली , भेटण्या साठी. हळू हळू वस्तुंची जमवा जमव केली.
दोघेही आपापल्या घरात राहत होते नॉर्मल !
परीक्षा झाली पेपर छान गेले तिचे.
त्याला कॅम्पस मधे मस्त मल्टिनॅशनल मधे छान पॅकेजचा जॉब मिळाला.
इकडे तयारी चालू होती.
सर्वांसोबत मयूर अन बरखा कपडे खरेदीला मार्केटमधे आले होते.
ज्यूस पिण्यासाठी म्हणून दोघे सर्वांपासून वेगळे बाहेर आले.
बरखाने वरूणला तिथे बोलावलं होतं.
ओळख करून दिली. . अन तो खूप शॉक झाला.
." हे माझे पती वरूण"
कानात शिसं ओतल्याप्रमाणे. . झालं. तो खूप समजदार होता.
थोडावेळ बोलणं झालं आणि तो म्हणाला " बरखा तू अशीच ,आताच तुझ्या नवर्यासोबत जा. . नाहीतर पुढचं तू थांबवू शकणार नाहिस. मी घरातल्यांना बघून घेतो. अन परत येण्याचा विचार करू नकोस."
"वरून आमच्या बरखाची काळजी घे. . "इतकं बोलून तो हळवा झाला.
बरखा तर निशब्दच झाली. दोघे गाडीवर बसून निघून गेले अन मयूर एकटाच परतला.
पुढे काय काय होतं हे. . आपण सारे सुजाण वाचक समजू शकतो.
महिनाभर एका खोलीत संसार केल्यावर वरूणच्या घरच्यांनी त्याला बोलावणं पाठवलं. थाटात विधिवत लग्न लावलं.
रेसेप्शन दिलं आणि आनंदाने बरखाला घरात सामावू घेतलं .
या सर्वात तिचे माहेरचे कूठेच नव्हते, बसबांनी तर पाणी सोडलं होतं तिच्या नावाने.
पुढेही हे असेच राहिल असे सांगता येत नाही. संबंध बनतील , नाते जुळतील.
आनंद याचाच कि एक पावसात सुरू झालेली प्रेमकथा तिच्या पूर्णत्वास गेली.

