भूत-भय कथा
भूत-भय कथा


पूर्वी मला तमाशा पहाण्याचा खूप नाद होता. पूर्वीचे तमाशे रात्री चार चार वाजेपर्यंत कार्यक्रम करायचे. तमाशा पहाण्यासाठी लोक गाडीबैल करून बायका पोरांसह येत होते. पाच, सहा गावचे लोक तमाशाला पहायला यायचे.
मी मात्र पायी पायी जायचो आणि यायचो. त्यात आमच्या गावात अफवा पसरली होती की गावाच्या वेशीजवळ भूत दिसतंय. माणसाबरोबर कुस्ती खेळते. ते एकटे माणूस दिसले की विडी मागते. कधी बाई बनते तर कधी पुरुष बनते. ते आपल्याकडे येताना उलटे हात पाय, लांबलचक केस मोठ, मोठे दात असे आक्राळ विक्राळ दिसते. कधी गाड्याना हात करून सुंदर स्त्री बनून गाडी बाहेर ओढते व ठार मारते.
असेच मी एकदा तमाशा पहायला गेलो. मनात भूत व भूताची जागा माहिती होती. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. साडे तीन वाजता तमाशा संपला. आकाशात चंद्र प्रकाश होता. तमाशा संपल्यावर मी त्या वाटेने जाऊ लागलो होतो. जसे जवळजवळ येत होतो तसे भूत आपल्याला मारणार ही भीती निर्माण झाली होती. मी माझ्याच सावलीला भूत म्हणून समजू लागलो होतो. त्यात अमावस्येच्या रात्री भूते नाचत असतात. त्यांच्या झुळकीत सापडले तर ठार मारते. पूर्वी गावतल्या एका माणसाला भूताने ठार मारले होते असा समज होता. पण भूताला पळवायचे म्हणजे खिशात आगकाडी पेटी ठेवायची असे एकाने सांगितले होते. म्हसोबाला भूत घाबरते म्हणून मी जय म्हसोबा म्हणून ओरडायचो. त्यामुळे माझी मनातली भीती कमी झाली होती. मी आगकाडी पेटवली व तिच्या आधाराने घर गाठले. खऱ्या भूतापेक्षा मनातल्या भूतानी कहर केला होता. भूताला घालवण्यासाठी मांत्रिक होता. तो ते भूत घालविण्यासाठी बकरा, कोंबडीचा बळी द्यायचा.