एस. टी. ची -आत्मकथा.
एस. टी. ची -आत्मकथा.


एस. टी.
आत्मकथा-लेखक संजय रघुनाथ सोनवणे
ओळखळत का मला? मी गरीबांची गाडी एस. टी. मी लासलगाव डेपोत गाडीची वाट पहात उभा होता. तेव्हड्यात मला काहीतरी ऐकण्याचा भास झाला. एस. टी. माझ्याशी बोलतेय मी ऐकतोय. मी ही तिच्याशी एकरूप झालो. तिच्या वेदनांची एक एक कैफियत तिने सांगायला सुरुवात केली. मी गरीबांच्या सेवेत रात्रं दिवस राबत आहे. माझ्या लेकरांसाठी मला माझ्या कष्टाची पर्वा नाही. मी त्यांच्या खिशाला परवडेल एवढेच तिकिटाचे पैसे घेती. खेड्यापाडयाची नस म्हणून मला ओळखले जाते. मी प्रवास करत असताना अनेक डोंगर, नदी, नाली पार करत असते.शेताच्या दोन्ही बाजूंच्या मधोमध असलेल्या रस्त्याने मी धावत असते. शेताच्या कडेला असलेल्या द्राक्षांच्या बागा, ऊसाचे राने, कांद्याची शेती पाहून मला खूप बरे वाटते.जनावराना पाहून मला हायसे वाटते.
कधी, कधी माझा प्रवास दुष्काळी भागातून चालू असतो. त्यावेळी आजूबाजुची पाण्याअभावी करपलेली शेते,मरण यातना भोगणारी जनावरे ,पाण्यासाठी वणवण भटकणारी लहान मुले, स्री पुरुष हे पाहून मला फार वाईट वाटते. देश स्वतंत्र होऊन कित्येक वर्षे झाली तरी आम्हाला पाण्यासाठी गावे सोडावी लागतात.साचलेले गढुळ घाण पाणी नाईलाजाने प्यावे लागते. पाणी प्रश्न कधी सुटणार?अजून किती वर्षे लागणार याचे शाश्वत उत्तर अजूनतरी कोणी देऊ शकले नाही. किती दिवस त्यांनी असे जगायचे?त्यामुळे संघर्षमय जगायचे असल्याने शहराकडे धाव घ्यावी लागते. मोकळ्या जागेत राहणारी माणसे आम्हाला शहर नकोसे असते; पण पोटासाठी तर चोरी तर करू शकत नाही. म्हणून रोजगारासाठी माय बापाना घर सोडावे लागते. ही माझ्या लेकरांची हालत मी जवळून पाहत आहे. माझ्या लेकरां ना जलद व आरामदायी सेवा देण्यासाठी मी सदैव तत्पर असते. पण काही वेळा आमचेच काही मुजोर अधिकारी प्रवास्याना वाईट वागणूक देतात. गाड्या वेळेवर सोडत नाही.अनेक खोटी कारणे सांगितली जातात. भर उन्हाळ्यात तर माझी लेकरे शिटवर बसून घामाघुम झालेली असतात. पण ते मात्र सावलीत गप्पा मारत बसतात.त्यांना आपल्या कर्तव्याची थोडीही लाज वाटत नाही. असे पगार घेऊन प्रवाश्याना भर उन्हात तळपट ठेवतात. विचारणा केली तर त्यांना उद्धट उत्तर दिले जाते. ते पाहून मला खूप राग येतो ;पण मी काय करणार?ते उलट प्रवास्यांचा राग माझ्यावर काढतात. चांगल्या रस्त्याऐवजी खड्डयातून मला शिक्षा देतात. माझे अंग खिळखिळे करतात. मी मुळीच कुणावरआरोप करत नाही.पण हे सत्य आहे. पैसे घेऊन गरीब प्रवास्याना ही शिक्षा का?त्यामुळे हल्ली लोक खाजगी सेवा पसंद करतात. मी तोटयात जाण्याची ही विविध कारणे आहेत.याला जबाबदार ढिसाळ व्यवस्थापन होय. तरी सुद्धा मी अजुनही गरीबांची सेवा करते. मी जीवंत असेपर्यंत गरीबांची सेवा करत राहणारच.अजून वेळ गेलेली नाही. वेळीच सावध रहा. एस. टी. ला वाचवा. रोजगार टिकवा. प्रवासी टिकवा.