Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Drama Children Stories

2.5  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Drama Children Stories

हरित मुंबई : स्वच्छ मुंबई

हरित मुंबई : स्वच्छ मुंबई

3 mins
2.9K


(पात्र - कुंती, प्रिती, अथर्व, जया, सीमा, रिमा) 

दृष्य - शाळेचा हॉल.

कुंती : चला मित्रांनो आज आपण सहलीला जाऊ या का?

प्रिती : हो, हो कुंती अगदी माझ्या मनातलंच बोललीस.

जया : अगं, पण सहलीला कुठे जायचे?

रिमा : हो मला माहीत आहे ते ठिकाण.

सिमा : कोणते ठिकाण आहे की जिथे आपला वर्षभराचा थकवा जाईल? 

रिमा : मी एक छान ठिकाण निवडले आहे. त्या ठिकाणी जंगल आहे, फुले, पक्षी, प्राणी, वेली, औषधी वनस्पती आहेत. ज्यांचा उपयोग आपल्याला शाळेत अभ्यासासाठीसुद्धा होईल. 

जया : कोणते ठिकाण आहे सांग ना लवकर? 

रिमा : अगोदर तुम्ही ओळखा बघू. मी तर सांगणारच आहे.

प्रिती : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.

रिमा : म्हणजे हे ठिकाण तू ऐकून आहे.

निता : हो आम्ही हे भुगोलाच्या पुस्तकात वाचले आहे.

अथर्व : विशेष म्हणजे हे निसर्गरम्य ठिकाण आपल्या बाजूलाच आहे.

निता : कोणत्या ठिकाणी आहे ते?

अथर्व : मुंबईत बोरीवली या ठिकाणी आहे.

कुंती : हो पण अशी राष्ट्रीय उद्याने का निर्माण करावी लागली? 

प्रिती : अग, आपण मुंबईत राहतो ना? म्हणजे घर, फ्लॅट, शाळा, आणि ट्यूशन या पलीकडे आपल्याला फारसे माहीत नसते. मोकळी हवा, हिरवीगार झाडे, पक्षी, प्राणी दिसत नाही. ते सर्व आपल्याकडे गावालाच जास्त पहायला मिळते.

अथर्व : म्हणजे आपल्याला त्या जंगलात गेले की भरपूर ऑक्सिजन मिळतो. शुद्ध हवा मिळते. ती हवा आपल्या शरीराला उपयुक्त आहे. अनेक, पक्षी, प्राणी, फुले, वनस्पती, झाडे, वेली पहायला मिळतात.

जया : होय, होय. तिथे गेले की खूप मजा येते. असे वाटते ना आपण इथेच रहावे. जंगलात राहणे मला तर खूप आवडते. फ्लॅटमधील A/C ची हवा म्हणजे कितीतरी बिल जास्त भरावे लागते. निसर्ग आपल्याला तर सर्व दानच करत असतो. शुद्ध, थंडगार हवा A/C ला मागे सारते. पुस्तकातील चित्रांपेक्षा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव फार महत्वाचे आहेत. तेच खरे शिक्षण होय.

सिमा : खरंच आपण आपले शहरच हिरवेगार बनवू या ना? जिथे, पक्षी, फुले, वेली, फुलपाखरे असतील. त्यामुळे आपल्याला शुद्ध हवा मिळेल. आपले आयुर्मान वाढेल. अनेक आजार पळून जातील.

रिमा : म्हणजे आपण नेमके काय केले पाहिजे?

सीमा : अगदी छान प्रश्न विचारलास. अग रिमा आपल्या शहरातील जो कचरा आहे. तो आपण एकत्र गोळा करू या. त्यापासून खत निर्मिती करू या. म्हणजे एकीकडे आपल्या शहरातील कचरा कमी होईल आणि स्वच्छता वाढेल. 

कुंती : म्हणजे आपण याची सुरुवात कुठून केली पाहिजे.

प्रिती : याची सुरुवात आपल्या गल्लीपासून, चाळीपासून, गृहनिर्माण संस्थांमधून करू या.

जया : यासाठी आपण काय केले पाहिजे? 

प्रिती : हे बघ, ज्या ज्या ठिकाणी जागा मोकळ्या आहेत. त्या त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण केले पाहिजे. औषधी उपयोगी झाडे, वनस्पती यांची लावणी केली पाहिजे. प्रत्येक शाळेत, कॉलेजमध्ये हे उपक्रम राबविले गेले पाहिजेत. तरुण युवकांकड़ून फार मोठ्या अपेक्षा आहेत. शहरी भागातदेखील आपल्याला हरीतक्रांती घडवून आणता येईल.

अथर्व : हो ते सर्व बरोबर आहे. पण ह्या झाडांना बेवारस सोडून जमणार नाही. त्यांना सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा आपण स्वीकारली पाहिजे. वृक्षारोपण करणे सोपे असते; पण त्यांचे संगोपन करणेही अतिमहत्त्वाचे असते. ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबात आपण आपले भाऊ, बहिणींची काळजी घेतो तेवढीच काळजी आपण लहान रोपट्यांची घेतली पाहिजे. पाच, सहा वर्षे त्यांना योग्यप्रकारे सांभाळले पाहिजे. वेळच्या वेळी खत, पाणी पुरविले पाहिजे. गुरांपासून वाचण्यासाठी त्यांच्याभोवती तारेची गोलाकार जाळी लावली पाहिजे.

जया : अगदी बरोबर. म्हणजे आपण त्या रोपट्यांचे लहान बाळासारखे संगोपन केले पाहिजे. वृक्षारोपण करून त्यांना खत, पाण्यापासून वंचित करणे म्हणजे लहान बाळाला उपाशी ठेवणे होय. निव्वळ झाडे लावून फोटो वृत्तपत्रात छपाई करून आपले राजकीय हीत साधणे महत्त्वाचे नाही. तर वृक्षांचे जतन करणे काळाची गरज आहे. 

रिमा : हो हो, हे काम प्रत्येकाने मनापासून केले तरच आपल्या मुंबईबरोबर आपल्या भारतातील सर्व शहरे हिरवीगार दिसू लागतील. शुद्ध हवेचे प्रमाण वाढेल. प्रदूषण कमी होईल. लोकांचे आयुष्य वाढेल. बदलत्या काळाबरोबर शहरे बदलू लागतील. स्वच्छतेचे प्रमाण वाढेल. पुढच्या पिढ्या वाचवायच्या असतील तर याची सुरुवात आपल्या घरापासून, गावापासून, तालुक्यापासून, जिल्ह्यापासून, राज्यापासून केली पाहिजे.

जया : हो हो, असेच उपक्रम खेड्यापाड्यात प्रामाणिकपणे राबविले गेले तर भरपूर पाऊस पडेल. धरण भरेल. शेती ओलिताखाली येईल. लोक दुष्काळमुक्त होऊन सुखी संपन्न होतील. प्रामाणिक समाजसेेवा करणाऱ्या व्यक्तींना विरोध न करता सर्वांनी मिळून प्रोत्साहन दिले पाहिजे. 

सर्वजण : चला तर पुन्हा एकदा आपण बोलू या. हरित मुंबई, स्वच्छ मुंबई!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational