शिक्षण म्हणजे नेमके काय?
शिक्षण म्हणजे नेमके काय?
बऱ्याच वेळा आपण उच्च शिक्षण का घेतो? असा प्रश्न कुणी विचारला तर आपण सरळ उत्तर देतो की नोकरीसाठी. खरंच शिक्षणातून सर्वांना नोकऱ्या मिळतीलच का? तर माझे उत्तर नाही असेच असणार आहे. मग शिक्षणातून आम्हाला कोणते उद्दिष्ट गाठावयाचे आहे? त्याचा सारासार विचार करणे काळाची गरज आहे. शिक्षण कोणत्या दर्जाचे असावे?अभ्यासक्रम समितीने त्या पाठीमागे कोणते उद्दिष्ट ठरवले आहे, हे समजून घेणे काळाची गरज आहे.
यापूर्वी आपण शिक्षण घेतले व आताही घेत आहोत. अगदी उच्च शिक्षणापर्यंत ध्येय गाठलेली प्रतिष्ठित माणसे. पण त्यांच्यात जास्त घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. अहंकार वाढत आहे. हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे; पण कमी नाही. शिक्षणातून चांगल्या पगाराची नोकरी मिळालेली असते. तरीपण त्या घरात सतत भांडण का होते? एकाच घरात राहून घटस्फोट झाल्यासारखे का वागतात? याचे उत्तर माझ्या मते संस्काराचा अभाव, अहंकार व अनियोजन होय.
हे सर्व साध्य करायचे असेल तर आपल्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय मूल्ये, संस्कार, शिस्त, संयम, व्यायाम ह्या गोष्टी अभ्यासक्रमात असायला हव्या. त्यासाठी शालेय वेळापत्रकातील तासिकात ते तास असावेत. समाजसेवा हा विषय पाठ्यपुस्तकात समायोजन करण्यात यावा. विद्यार्थ्यांना पोटच्या उपजीविकेचे शिक्षण मिळावे. तो स्वतः व्यवसाय करून पोट भरू शकेल. शिक्षण म्हणजे जीवन परिवर्तन होय. आदर्श नागरिक होय. देशहिताच्या दृष्टीने अभ्यासक्रमात सुसूत्रता आणावी. नको तो भाग अभ्यासक्रमात नसावा. संस्काराची सुरुवात प्रत्येक कुटुंबाने स्वतःपासून करावी. त्यासाठी शिक्षकांनी शालेय स्तरावर मुलांना जाणीव करून देणे फार गरजेचे आहे. लहान वय संस्कारमय असते. लहान वयापासून सुरुवात करणे हे प्रत्येक कुटुंबाचे कर्तव्य आहे. ते ही एक शिक्षणच आहे.