भणभणपूरला देव येई?
भणभणपूरला देव येई?


भणभणपूरला देव येई?
भणभणपूर! हे नेहमीचे भणभणपूर राहिलेच नव्हते. नेहमीची घाण, तिचा तिलाच वास आला होता की काय कोण जाणे, गावापासून दूर जाऊन पडली होती. आळस सुद्धा प्रत्येक माणसाला उबगून दूर पळाला होता. एरवी आळसाचे माहेरघर असलेले भणभणपूर आज नव्याने जन्माला आलेल्या पाडसागत हुंदडत होते. प्रत्येक रस्त्याला अंघोळ घातली गेली होती. अंगणे तर नेहमी साफच रहात होती, त्यांना साफ करण्याचा प्रश्नच नव्हता. हनुमान मंदिरातील महाराजांच्या बिछान्याने कोपरा जवळ केला होता. सर्वजण उत्साहात असण्याचे कारण तरी काय? भगवान विष्णू अवतार घेणार होता? छे! तो कुठे रिकामा आहे अवतार घ्यायला? झोपळू तो झोपळूच! नेहमी तर झोपलेलाच असतो. मग येथे येणार तरी कोण होते? भणभणपूरला येणार होते मंत्रीमहोदय. कारण प्रवासाचे काम जास्त करून मंत्र्यांकडेच असते ना.
या महोदयांनी जन्मात कधीच भणभणपूरला भेट दिली नव्हती. कारण त्यांना तसा योगच आला नव्हता. भणभणपूरला एखादे नवीन काम, किंवा नवीन वास्तू उभारणी होत नव्हती की, जिच्या उद्घाटनासाठी त्यांनी यावे. वातावरण अनुकूल होते, पोळी भाजून घेता येत होती. परंतु आता? आता तर त्यांना स्वप्नात सुद्धा चक्क पराभवाची माळ गळ्यात पडल्यासारखे दिसू लागले. 'हटाव'च्या घोषणा त्यांना स्वप्नात देखील ऐकू येऊ लागल्या, आणि येथेच त्यांच्या जीवनातील दुसऱ्या महत्वपूर्ण व रसपूर्ण अंकाचा प्रारंभ झाला. राजकीय जीवनातील प्रवेश, पहिला अंक सुखात झाला होता. आता मात्र संघर्षमय जीवन जगावे लागणार होते. दौऱ्यावर दौरे निघू लागले. कधी नांव सुद्धा ऐकले नसेल त्या गावांना त्यांचा मुक्काम पडू लागला. अशा भाग्यवान गावांमध्येच भणभणपूरचे नांव कुठेतरी चमकले. मंत्र्यांचा 'दरकोस दर मुक्काम दौरा' भणभणपूरला येणार होता. त्यांच्या स्वागताचाच तर हा खटाटोप होता.
'मंत्री आले! मंत्री आले!!' एकच कल्लोळ मजला. हनुमान मंदिरासमोर सभा आयोजित करण्यात आलेली होती. मंत्र्यांनी येऊन खुर्चीतच बस्तान ठोकले. खुर्चीवर बसण्याची सवय गेली नव्हती ना.
"बंधू आणि भगिनींनो!" मंत्री महोदय भाषणकलेत सराईत होते. त्यांच्या या शब्दावर सारे श्रोते भारावून गेल्यासारखे शांत बसले.
"बंधूंनो, गेली कित्येक वर्षे या गावाला भेट देण्याचे योजिले होते. निवडून आलो आणि सर्व आशा गुंडाळून ठेवाव्या लागल्या. देशसेवेचे अखंड व्रत चालू करावे लागले. माझ्या या पाच वर्षांच्या काळात मी या भागातील सर्व गावांना भेट देऊन त्या त्या गावी सुधारणा केलेली आहे. परंतु आपणास सांगण्यास खेद वाटतो की, तुमच्या या दोन तीन खेड्याच्या सुधारणेचा अंदाज घेत असतांनाच हा निवडणुकीचा दरोडा पडला. माझे अंदाजपत्रक हे मजजवळच राहिले. मला अत्यंत वाईट वाटते की, फिरून माझ्या हातून ही सेवा घडणे अशक्य वाटू लागले आहे. कारण या भागातून दुसराच कुणीतरी निवडून येणार असे समजते...."
"नाही, नाही!! आम्ही तसे होऊ देणार नाही. आम्ही आपणा शिवाय दुसऱ्या कुणालाही निवडून देणार नाही." श्रोतृ समुद्रातून लाट उसळली.
"असे असेल तर मला आनंदच मानावा लागेल की, मला आपण सर्व या गावची सेवा करण्याची संधी देत आहात. आपण फक्त मतदानाच्या वेळी 'कोल्हा' हे चिन्ह ध्यानात ठेवा आणि फक्त 'कोल्ह्या'वरच शिक्का मारा. धन्यवाद!".
मंत्री महोदयांचे भाषण संपले. त्यांनी त्या गावात फार काळ वास्तव्य केलेच नाही. फक्त त्या गावच्या पोलीस पाटलांच्या घरचे कोंबडे होईपर्यंतच त्यांचा त्या गावी मुक्काम होता.
मंत्री महोदय आले तसे निघून गेले. परंतु जनतेच्या मनातील 'कोल्हा' मात्र जायला तयार नव्हता. 'कोल्ह्या'वरच शिक्का मारण्याचे पक्के ठरले. मंत्री महोदयांचा शब्द न् शब्द त्यांना ठसला होता. कारण भाषण ईश्वराला साक्ष ठेऊन झाले होते ना. विश्वास बसायला कितीसा उशीर? परंतु त्या बिचाऱ्यांना काय माहीत की कोल्ह्याप्रमाणे तो सुद्धा स्वार्थी, लबाड आहे. त्या कोल्ह्याने फक्त निवडणूक काळापुरती नम्रता, ग्राम सुधारणेची कळकळ, दाखवली. मात्र पाच वर्षा पर्यंत तो 'कोल्हा' फिरून दिसणार नव्हता. भणभणपूरकरांनी मात्र त्याला देव मानले. कधी तरी 'देव?' येईल या आशेवर ते जगताहेत.
खरंच! येईल का हा देव पाच वर्षांच्या आत त्यांना भेटायला?
***********