भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे
भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे
सुमनचा सोन्यासारखा संसार होता. नवरा राघव आणि मुलं यापलीकडे तिचे जग नव्हतेच. कारण मुलं आणि नवरा हेच तिने जग मानले होते. सुमन शिकलेली असून तिने गृहिणीपद स्वीकारले.
सुमनची आज सकाळी सकाळी कामाची घाई चालली होती. दोन मुलांचा नाष्टा, शाळेचा डब्बा,तिच्या नवऱ्याची कामाला जाईची घाई,या सर्वांच करता करता तिची सकाळची रोजची कामाची लगबग सुरु असायची. त्यात आज गुरुवारचा दिवस नेहमीप्रमाणे स्वामींच्या दर्शनाला गेल्याशिवाय तिला बरं वाटत नसे. स्वामींवर तिची खूप श्रद्धा होती.असा तिचा गुरुवारचा ठरलेला दिनक्रम नेहमीच असे. मंदिरात गेल्याशिवाय तिच्या मनाला समाधान मिळत नसे.
स्वामीच्या दर्शनाने मनाला समाधान मिळे. त्याची कृपादृष्टी संसारावर राहावी एवढेच ती हात जोडून मागत असे.
आज मुलांच आवरून त्यांना शाळेत पाठवून दिलं , नवरा ऑफिसला गेल्यावर सुमन निवांत झाली. छान साडी नेसून मनात मंदिरात जायचा विचार केला. जाताना एक हार स्वामींसाठी घेऊन जाऊ असं मनोमन तिने ठरवले.
तीने पर्स घेतली एका हातात मोबाईल घेऊन ती मंदिरात निघाली. जाता जाता तिने स्वामीच्या प्रतिमेसाठी हार घेतला. मंदिराच्या आवरात तिला प्रसन्न वाटत होत. गुरुवार असल्याने भाविकांची गर्दी होती. त्यातूनही ती वाट काढत दर्शनासाठी गेली. बरचेसे भाविक दर्शन घेऊन जप करत होते, तर कोणी पोथी घेऊन वाचत होते.
सुमनच्या मनात आज मात्र पोथी वाचणाऱ्या भाविकांना पाहून तिच्या मनाने पोथी वाचण्याचा निर्णय घेतला. कारण नेहमी कामामुळे ती दर्शन घेऊन घरी जात, पण आज सगळं काम उरकलं होत, तर आज तिला मंदिरात देवाच्या सेवेत वेळ घालवावा असं तिला वाटत होत. तिच्या निर्णयाने ती खुश झाली.
सुमनने स्वामींचा पाया पडून आशीर्वाद घेतला. पोथी वाचण्यासाठी ती जागा पाहत होती. तिथे तिला इतर भक्तांशेजारी रिकामी जागा भेटली .तिथं पोथी वाचण्यासाठी सुरुवात केली. स्वामींचे नाव घेऊन पोथीच्या पाया पडून तिने वाचायला सुरुवात केली. पोथी वाचताना शब्दाचा अर्थ समजून घेत अगदी मन लावून ती पोथी वाचत होती. समोर स्वामीच उभे आहेत, असं तिला जाणवत होत. एवढी ती तल्लीन होऊन जगाचा विसर पडून ती वाचत होती.
पोथी वाचताना एक तास होऊन गेला.तिला कळाले ही नाही.तिची पोथी वाचून झाली. डोळे मिठून ती शांत बसली आणि पाहतेय काय...," स्वामी डोळ्यांसमोर तिच्या होते. ते चिंताग्रस्त दिसत होते. ते चिंताग्रस्त का दिसतायेत हे मात्र तिला काय समजत नव्हतं. आता कोणाला विचारावे....?असं का दिसलें...! जरा वेळाने खणखण फोनचा आवाज झाला. तिने त्यातून बाहेर येऊन फोन घेतला. त्यात बत्तीस वेळा नवऱ्याचा कॉल येऊन गेला होता,आणि त्याकडे तिचं लक्षच नव्हतं.
सुमन कोठे आहेस..? " किती कॉल करतोय घेत का नव्हतीस...?
"ते मी सुमन पुढे काही म्हणार तोपर्यंत तिचा नवरा म्हणाला अग मी दवाखान्यात आहे, लगेच ये.
सुमन काळजीने काय झाल तुम्हाला...?
राघव, "माझं रक्तदाब वाढल्याने मला चक्कर येत होती.गाडी ही नीट चालवता येत नव्हती.एका गृहस्थाने मला रस्त्यात मदत केली. त्यांनी माझी गाडी घेऊन मला माग बसवून गाडी दवाखान्यात आणली. त्यांच्यामुळे मी सुखरूप आहे. तू ये पटकन या पत्यावर तुला आल्यावर बाकीचं सांगतो.
सुमन धावतपळत नवऱ्याने दिलेल्या पत्यावर पोहचली. नवऱ्याला दवाखान्यात पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
राघवने डोळ्यानेच तिला शांत होईला सांगितलं. काळजी करू नकोस असं तो डोळ्यानेच म्हणाला.
डॉक्टर म्हणाले , "हे बघा काळजी करण्यासारखं काही नाही,पण यापुढे काळजी घ्या. आज वेळेत पोहचले नसते तर काहीही झालं असतं. त्यात यांचा रक्तदाब खूप वाढला होता. उच्चरक्तदाबात काहीही होऊ शकतं यापुढे उच्चरक्तदाबाच्या गोळ्या कायम चालू ठेवायच्या. बरोबर ही ठेवायच्या. रोज घेईला विसरायच्या नाहीत. संध्याकाळी तुम्हाला डिस्चार्ज मिळेल डॉक्टर असं बोलून निघून गेले.
सुमन,"कोठे आहेत ते गृहस्थ..? त्यांचे आभार मानले पाहिजेत. देवासारखे धावून आले,
अग मलाही ते पुन्हा दिसलें नाहीत ग..!आणि सुमनच्या चेहऱ्यासमोर स्वामी चिंताग्रस्त का दिसत होते याचही तिला उत्तर मिळालं.
तिच्या पुन्हा डोळ्यातून अश्रू वाहू लागले कारण स्वामींनी स्वतः येवून तिच्या राघवचा जीव वाचवला होता.
सुमनने नवऱ्याला देवळात घडलेली सगळी हकीगत सांगितली. त्यालाही ऐकून धक्का बसला.
आज पुन्हा सुमनच्या कानाजवळ आवाज घुमत होता, "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे....!!!
सुमन आणि राघवने पुन्हा स्वामींना हात जोडले. तुमची कृपादृष्टी सदैव अशीच राहूदे असं मनोमन सांगितले.
सुमनला मनापासून केलेल्या भक्तीची प्रचिती आज पुन्हा एकदा मिळाली.
***********समाप्त *********
