STORYMIRROR

नासा येवतीकर

Drama

2.8  

नासा येवतीकर

Drama

बहिणीची शपथ

बहिणीची शपथ

6 mins
648


तारा आज दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत होती आणि तिचा भाऊ मोहन हतबल होऊन तिच्या शरीराकडे पाहत उभा होता. दोनच दिवसापूर्वी ताराचे संपूर्ण शरीर भाजले होते, स्वयंपाक करतांना गॅसचा भडका उठला आणि तिचे शरीर जळाले असे तिच्या सासरचे म्हणणे होते पण सत्य काही वेगळेच होते. मोहनला सारे सत्य माहीत होते पण तारामूळे तो काही बोलू शकत नव्हता. तिने एक दोनदा सासरच्या लोकांनी तिचा कसा छळ करत आहेत हे बोलून दाखविले होते पण त्याबाबतीत मोहनला देखील काही करता येत नव्हते. ताराच्या नवऱ्याला ऑटोमोबाईलचे दुकान टाकायचे होते आणि त्यासाठी पाच लाख रुपयांची गरज होती. ताराने आपल्या भावाकडून ते पैसे आणावेत अशी त्यांची मागणी होती आणि त्याच कारणावरून तिला रोज त्रास दिला जात असे. मोहन एका कंपनीमध्ये नोकरी करायचा त्यामुळे त्याच्याकडे देखील तेवढे पैसे नव्हते तो तरी कुठून आणणार? हे ताराला माहीत होतं, त्यामुळे ती कधी त्याला पैसे मागितली नव्हती. पण अचानक एके दिवशी मोहन जेंव्हा तिच्या सासरी गेला होता, त्याला जे दृश्य दिसले ते पाहून तो हबकून गेला. तारा आपल्या खोलीत रडत बसली होती आणि मोहन अचानक तेथे गेला. ताराला त्याने खूप विचारणा केली पण ती काही बोलेना. पाच दिवसांपूर्वी त्यांचे फोनवर बोलणे झाले आणि तिने सर्व कहाणी सांगितली. माझ्या जीवाचं काही बरंवाईट झालं तरी ही गोष्ट कोणाला सांगू नको अशी शपथ ती त्याला घातली होती. त्यामुळे मोहनच्या डोक्यात विचाराचं काहूर उठलं होतं पण तो ताराच्या शपथेमुळे उदास होता.


तारा खरोखरच आकाशातल्या त्या चमकत्या ताऱ्यासारखी तेजस्वी आणि स्वाभिमानी होती. ती कधीच कोणापुढे हात पसरलेलं मोहनने पाहिलं नव्हतं. नावाप्रमाणे तिचे कार्य होते. लहानपणापासून तिने कष्टाशिवाय काही पाहिलेच नाही. तिच्या जीवनात संघर्ष आणि संघर्षच लिहिलेलं होतं. मोहन पाच वर्षाचा असेल त्यावेळी त्यांची आई पार्वती देवाघरी गेली. त्यावेळी तारा जेमतेम आठ वर्षाची चिमुकली पोर. तिला घरातले सगळी कामे जमायची. धुणीभांडी, स्वयंपाक झाडलोट हे सारं ती करायची. आई गेल्यावर तिच्यावर घराची जबाबदारी अजून वाढली. तिचे शाळेत जाणे हळूहळू बंद झाले. कशीबशी चौथ्या वर्गापर्यंत ती शिकली. मोहन पहिल्या वर्गात प्रविष्ट झाला आणि तिची शाळा बंद झाली. तिचे वडील शंकर हे दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीने काम करायचा. घरात लागलेली वस्तू आणून द्यायचा पण पार्वती गेल्यापासून तो ही जरा बेचैन झाला होता. सायंकाळी त्याला झोप लागत नसे. त्यामुळे तो रोज सायंकाळी पिऊन येऊ लागला. मनातल्या मनात तो कुढत होता. त्याचे ही वय ते किती ? पसतिशीच्या वयाचा शंकर, तो पार्वतीच्या विचाराने रात्रभर जागे राहायचा. त्याच्या काही मित्रांनी त्याला दुसरे लग्न करण्याचे सुचविले. तो यावर खूप विचार केला. पुढील दिवस सहचारी विना राहणे शक्य नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले. गावातीलच सुंदरा नावाची मुलगी जीचे एक लग्न होऊन मोडले होते, तिच्यासोबत एक नवा संसार सुरू झाला. तारा आणि मोहन यांना देखील आनंद झाला. नवीन आई त्यांना मिळाली होती. सुरुवातीचे काही दिवस मजेत आणि आनंदात गेले. एके दिवशी ताराने बाबाला म्हणाली, 'बाबा, मी शाळेला जाऊ का?' यावर बाबांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी ती सकाळी शाळेला जाण्यास तयार झाली तेंव्हा सुंदरा ने तिला शाळेला जाण्यास अटकाव केला, ती म्हणाली, 'काय करतेस शाळा शिकून, ही घरातली कामे कोण करावी? शाळा बिळा काही नाही, ठेव ते दप्तर आणि काम कर' हे ऐकून ताराला रडू आले. मोहन एकटा शाळेत गेला, जाताना त्याच्या ही डोळ्यात अश्रू गळत होते. मोहनचा जीव शाळेत लागत नव्हता. सायंकाळी घरी गेल्यावर मोहन ताराला म्हणाला, 'मी पण शाळेत जात नाही, मला तरी शाळा शिकून काय करायचं आहे? मी तुला कामात मदत करतो. 'यावर टीव्ही बघत बसलेली सुंदरा म्हणाली, 'हे बेस हाय बघ, तू पण शाळेला नको जाऊस, दोघे मिळून काम करा.' ताराला मोहनचा खूप राग आला आणि ती म्हणाली, 'ते काही नाही तुला शाळा शिकावचं लागंल, शिकून खूप मोठं व्हावं लागंल ' असे म्हणत ती रडू लागली. रात्री शंकर घरी आल्यावर मोहनने सर्व कहाणी सांगितली तेव्हा शंकर म्हणाला, 'आईचं बरोबर आहे, तारा शिकून काय करणार? तू शिक आणि ताराला घरी राहू दे.' तारा आणि मोहन एकाच अंथरुणात झोपी गेले. सुंदरा आई सुरुवातीला खूप छान वागली मात्र पुढे पुढे तारा आणि मोहनला त्रास देऊ लागली. त्यांचं घरात राहणं तिला अवघड वाटू लागली. हे दोघे घरातून पळून जावं अशी ती त्यांच्यासोबत वागू लाग

ली.


ताराला खूप कामे करावी लागत होती तर मोहनला शाळा करून आल्यावर कामे करावी लागत असे. आपल्या आईच्या आठवणीत ते दोघे खूप रडायचे. शंकर समोर सुंदरा चांगली वागायची आणि माघारी मात्र छळ करायची. चंद्रकोराप्रमाणे दोघे ही वाढत होते. तारा उपवर झाली होती. त्यामुळे एकदाचे तिचे लग्न लावून द्यावे असा विचार सुंदराच्या मनात घोळतच होते. जवळच्या गावातील तिच्या ओळखीच्या एका घरातील पाहुणे बघायला आले आणि ताराला पसंद देखील केले. मोहन त्यावेळी पाचव्या वर्गात शिकायला होता ज्यावेळी ताराचे लग्न ठरले. ताराचे लग्न वाजत गाजत झालं आणि येथे मोहन एकटा पडला. सुंदरा त्याला खायला देत नव्हती आणि कामे तर भरपूर सांगायची. ताराचे सर्वच काम मोहनला करावं लागू लागले. त्यामुळे शाळेकडे देखील दुर्लक्ष होऊ लागलं. मोहनला ते सारे झेपानासे झालं तसं तो एके दिवशी ताराच्या घरी गेला. तिला सर्व कहाणी सांगितली आणि तेथे जाणार नाही व राहणार नाही असे सांगितलं. यावर तारा म्हणाली मग कुठं राहणार ? मोहन म्हणाला तुझ्याजवळ राहतो. तू सांगेल ती कामे करतो पण तिथं जाणार नाही. सासरच्या लोकांना ताराने कसेबसे समजावून सांगितले तेंव्हा कुठं त्यांनी मानलं. ताराचा सासर म्हणजे दहा माणसांचे कुटुंब आणि त्यात मोहन अकरावा. या सर्वांचे कामी फक्त तारा एकटी करत होती. हे सारं पाहून मोहन मनोमनी दु:खीकष्टी झाला. काय हे नशीब ! म्हणून तो मनातल्या मनात रडू लागला. ताराचे दुःख कमी व्हावे म्हणून तिच्या सासरी तो खूप कामे करत होता, ज्यामुळे ताराला ही बरे वाटत होते. एक नोकर गडी मोफत मिळाला म्हणून सासरचे सर्व मंडळी खुश होते. दिवसामागून दिवस सरकत होते. ताराच्या जीवनात दोन गोंडस मुले जन्माला आली. मोहन मामा झाला. दुःखाची पर्वा न करता तारा आणि मोहन काम करत होती आणि सुखात राहत होते. मोहन कसाबसा दहावी पास झाला आणि त्यानंतर त्याने आयटीआयला प्रवेश घेतला. मुळातच काम करण्याची सवय त्यामुळे त्याला आयटीआय मध्ये काम करतांना कंटाळा आला नाही.


ताराची मुलं आता शाळेला जाऊ लागली. ताराचा नवरा मेकॅनिक होता, मिळेल ते काम करता होता, पण त्याच्या अंगात एकचअवगुण होतं ते म्हणजे आळस. त्याच्या माघारी मोहनच त्याचा दुकान चालवायचा आणि आलेला पैसा देऊन टाकायचा. कधी एक पैसा आपल्या खिशात ठेवला नाही. त्याच्या आयटीआयमध्ये असलेल्या सोबतच्या मित्राला एका कंपनीत चांगली नोकरी मिळाली होती. त्याने मोहनला देखील घेऊन गेला. मोहनची हुशारी पाहून मालकाने लगेच त्याला कंपनीमध्ये घेतलं. त्याला महिन्याचा चार आकडी पगार मिळू लागला. काही महिने त्याने पैसे ताराकडे पाठविले पण तारानेच पैसे पाठवू नको, तुझ्याकडे जमा ठेव असे सांगितले. त्यावेळी मोहनला काही कळाले नाही. तारा स्वाभिमानी होती त्यामुळे तिने पैसे पाठविण्यास नकार दिला. असेच काही दिवस आणि वर्ष संपले. कामाच्या व्यापामुळे तारा खूपच कमजोर होऊ लागली. तिच्या तब्येतीकडे कोणी ही लक्ष देत नव्हते. मोहन काही दिवस पैसे पाठवून बंद केल्याने सासरची मंडळी तिला पैशाचा तगादा लावू लागले. आमच्या आशीर्वादामुळे आणि मदतीमुळे तुझ्या भावाला चांगली नोकरी मिळाली म्हणून परतफेड म्हणून त्याने पाच लाख रु द्यायला हवे. आम्हांला ऑटोमोबाईलचं दुकान टाकायचं आहे, त्यासाठी तू पैसे माग असे रोज तिला तगादा देऊ लागले. तारा मात्र पैसे मागण्यास नकार देऊ लागली. एके दिवशी मोहन सुट्टी घेऊन अचानक जेंव्हा तिच्या सासरी गेला होता, त्याला जे दृश्य दिसले ते पाहून तो हबकून गेला. तारा आपल्या खोलीत रडत बसली होती आणि मोहन अचानक तेथे गेला. ताराला त्याने खूप विचारणा केली पण ती काही बोलेना. म्हणून तो तसाच निघून गेला. पाचच दिवसांपूर्वी त्यांचे फोनवर बोलणे झाले आणि तिने सर्व कहाणी सांगितली. माझ्या जीवाचं काही बरंवाईट झालं तरी ही गोष्ट कोणाला सांगू नको अशी शपथ ती त्याला घातली होती. ती आपल्या सासरच्याना अडचणीत आणू इच्छित नव्हती. सासरच्या लोकांबद्दल तिच्या मनात खूप जिव्हाळा होता कारण ते पैश्यासाठी तिचा छळ करत असले तरी ते सुंदरा सारखे दुष्ट नव्हते. त्यातच ती धन्य मानत होती. मोहनने सासरच्या लोकांवर काही कारवाई करावी, त्याचा त्रास मोहनला ही होणार सासरच्या लोकांना ही होणार म्हणून ती मोहनला शपथ दिली होती की, तू काही बोलू नको. मोहन हतबल नजरेने काचेतून ताराच्या शरीराकडे पाहत उभा होता. आज भाऊ आणि बहीण यांच्या प्रेमाच्या परीक्षेची घडी होती. भाऊ परमेश्वराकडे ताराच्या जीवनदानाची भीक मागत उभा होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama