भेट ( भाग -४ )
भेट ( भाग -४ )


स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बक्षीसमारंभ होता पण आम्ही मात्र सकाळपासून कोकणातलं निसर्गसौंदर्य ,नागपूरचा उन्हाळा ,हापूस आंबे , संत्री .....असल्या विषयांवर गप्पा मारत होतो . साधारणपणे 9.30 -10 वाजता मी आमच्या संघांबरोबर बक्षीस समारंभाच्या ठिकाणी पोहचलो . तिकडे व्यासपीठावर नमस्कार -चमत्काराची भाषणं सुरु होती आणि मी शेवटच्या रांगेत बसून नॉनस्टॉप चॅट करत होतो .
'' आदित्य , तुला निकालाची भिती वाटत नाही का ? मला तर अजूनही काही खरं वाटत नाही आमच्या संघाचं ' ...तिच्या या प्रश्नावर प्रभु वक्त्यांसारखा मी पण एक इंग्रजी कोटेशन तिला ऐकवलं .
'गप ना रे ... स्पर्धा संपली आहे ना आता ? कशाला उगाचच '...या तिच्या रिप्लायला मी ' ह्या ह्या ह्या ' ..एवढाच रिप्लाय दिला .
यथावकाश निकाल जाहीर झाला . तिला वादात तर मला वक्तृत्वात बक्षीस मिळालं होतं . एकमेकांना अभिनंदन वगैरे करून मी तेवढ्यापुरता आमचा संवाद थांबवला .
रात्री संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टी अरेंज करण्यात आली होती . मी पार्टीला चाललो आहे या माझ्या मेसेज चा रिप्लाय तिने ' Do you buzz ?' असा प्रश्न विचारून केला होता . त्यावेळी माझा इंग्रजीचा घोडा 90% लंगडा असल्यामुळे तिच्या या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर द्यायचं असा प्रश्न मला पडला . पण पार्टी - सेलीब्रेशन या दोन शब्दांच्या रांगेत Booze हा शब्द बसवल्यावर बहुतेक दारुकामाबद्दल ही विचारत असावी या अंदाजाने मी नाही असा रिप्लाय करून मोकळा झालो . ( पहिल्याच भेटीत वाईटपणा का घ्यावा ह्या विचारामुळे )
माझ्या त्या रिप्लायला तिची गोड हसणारी स्मायली मी रिप्लाय बरोबरच केला होता हे सांगून गेली . पार्टी आटपल्यावर मोबाईल चेक केला तर काहीच मिनीटांपूर्वी तिचा गुड नाईट चा मेसेज आला होता. मी रिप्लाय न देताच झोपून गेलो .
रात्री 2 वाजता मधेच उठून " आपकी आँखो में कुछ मेहेके हुए से राज है " अशा ओळी टायपून गुड नाईट म्हणून मी डाराडूर झालो . सकाळी उठल्यावर ' आपसें भी खुबसुरत आपकें अंदाज है ' हा तिचा मेसेज वाचला आणि स्वतःशीच हसलो . पोर हुशार आहे असं म्हणून निवांतपणे आवराआवर करायला सुरुवात केली .
क्रमशः