Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Prashant Shinde

Inspirational

1.8  

Prashant Shinde

Inspirational

भाऊराव शिंदें वाडा...!

भाऊराव शिंदें वाडा...!

5 mins
1.8K


भाऊराव शिंदे वाडा....!

माझे आजोबा कै.जिवाजी लक्ष्मणराव शिंदे तथा भाऊराव शिंदे मु .हसूरचंपू,ता.गडहिंग्लज,

जि. कोल्हापूर यांनी १९०२ साली हा आमचा तीन मजली तळघर गच्चीचा मजबूत वाडा बांधला.या वाड्यात माझा जन्म झाला त्यामुळे एका अर्थाने जन्मस्थान म्हणून या वड्या बद्दलचे प्रेम आपुलकी आजही अबाधित आहे.

त्या काळी मोठं कुटुंब असायचं आणि कर्त्या पुरुषांची कर्तबगारी पण तितकीच मोठ्ठी असायची.सर्व कुटुंबाचा डोलारा त्याच्या कर्तबगारीवर सांभाळला जायचा.मला सहा आत्या आणि आणि चार काका आणि त्यांची फुललेली पिलावळ म्हणजे खरं गोकुळच.

शेती प्रमुख व्यवसाय आणि जोड धंदा म्हणून तंबाखूचा मोठा व्यापार.पंचक्रोशीत आजोबांचा दबदबा मोठा.नोकर चाकर हाही घरचाच भाग.दोनचार बैल जोड्या,सात आठ गायी म्हशी,दोन उमदे काठेवाडी घोडे,बग्गी असा सारा सरंजाम.घोड्यालाही चांदीचे दागिने.अष्टोप्रहर लक्ष्मी घरी पाणी भरायची.

त्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांचा वाड्यात राबता असायचा.आजू बाजूच्या हनिमनाळ,मद्याळ, हेब्बाळ,मुत्नाळ, सोलापूर,कोणकेरी, व्हनोळी, करजगे इतर अनेक गावातूनही जमीन जुमला.हिशोबासाठी दिवाणजी.घरी सर्व प्रकारची धार्मिक कार्ये नियमित व्हायची,त्यात सणवार,श्राद्धपक्ष,इतर पूजनांचा सामावेश असायचा.यात्रा ,जत्रा,वारी हे सारं शेतीवाडी सांभाळून पार पडायचं.लग्न कार्य सुद्धा घरच्यांप्रमाणे इतरांचीही आपली समजून व्हायची.कोणत्याही कार्याला गाव जेवणाचा घाट असायचा.मंडप घालून परस्पर गाव जेवण व्हायचं.गावात कोणाच्याही घरी चूल पेटवीली जायची नाही.लोक पण खूप स्वाभिमानी होती.आमंत्रणा शिवाय पंगतीला यायची नाहीत.सर्वांच्या पोटात अन्नाचा घास गेल्या शिवाय कर्त्या धन्याच्या घश्याखाली अन्नाचा कण उतरायचा नाही.एकदा असे झाले जोती पिरसे आमच्या

घरचाच घरगडी .सर्व गावाची आमंत्रण त्याच्या करवीच झाली ,पंगती उठल्या आणि वडिलांच्या लक्षात आले, तो कोठे दिसला नाही.वडील ताटावरून उठले आणि रात्री साडे अकराला त्याच्या घरी गेले.तर तो झोपण्याच्या तयारीत होता.बाबांना पाहून उठला.जेवला का नाहीस म्हणून विचारताना तो इतकंच म्हणाला आमंत्रण नाही ते पंगतीत बसणार कस अण्णा ? वडिलांनी हात धरून घरी आणले आणि मग दोघांनी मिळून जेवण केले.हे आठवते कारण त्या काळी तितकं प्रेम,जिव्हाळा,विश्वास ,मान ,अपमान या सर्व गोष्टी जीवन जगण्याचाच एक संस्कारित भाग होता.पंढरपूरच्या वारीला ठराविक लोकांना घेऊन जाणे व्हायचे.तिथे आजोबांनी गावच्या लोकांना पाठ टेकण्यासाठी म्हणून त्या काकात घर बांधून ठेवले आहे. आजही आमच्या गावची काही मंडळी तिथे आपल्या पिशव्या ठेवतात.तकदा परतीच्या प्रवासात कल्लोळीला मुक्काम पडला, गावात शंकराचार्य मठाचे सामीजीं आलेले तर तेथे आजोबांनी एका दिवसाचे गाव जेवण घातले हे ऐकिवात आहे. नित्य नियमाने सकाळी सकाळी शंभर सव्वाशे कप चहा असायचा.दिवस भरातली उसाभर ती वेगळीच असायची.सर्वांच खाणंपिणं, जेवण परस्पर पार पडायची.मुलांना सांभाळणारी मंडळीही आनंदाने नांदायची. दिवाळी ,सणावारी ,उन्हाळ्याच्या सुट्टीत घर फुलायचं.पोहायला जाणे आणि शेती वाडीचा आनंद मनमुराद लुटणे सहज पार पडायचं. गुऱ्हाळ तीन तीन महिने चालायचा.रात्रीची गुऱ्हाळात मजा यायची.त्याकाळी लाईट नव्हती.गॅसबत्तीच्या प्रकाशात आणि चांदण्यात मजा यायची.चुलवणात चिप्पाड घालण्या पासून ते रस गाळणे, वरची मळ काढणे,काहिलीत भेंडीची झाडे चेचून फिरवणे,मळी बाजूस करणे,पावडर टाकणे वगैरे सर्व आनंदाने हातून घडायचं.शेंगदाण्याच्या तिखटासह मित्रमंडळी सोबत मनसोक्त रस पिणं, गरम गुळ खाण, आणि ऊसाच्या दांडक्याला डोणीत बुडवून चिक्की तयार करणं,डोक्यावर चिक्कीचा गोळा मारण हे आमचे खेळ आणि छंद पार पडायचे.रात्री काहिल उतरवताना हर हर महादेव गजर गुंजायचा.काकवी काढली जायची,चिनमोऱ्याचे लाडू बनवले जायचे,पाटीच्या गूळ वड्या तयार व्हायच्या.हडदी ची कापडं पत्र्याच्या बादलीत घालून गुळाचे रवे काढले जायचे.ते चिप्पाड्यावरच मोजून मांडायचे आणि बैल गाडीने घरी आणून सोप्यात रचून ठेवले जायचे.नंतर मोजदाद होऊन विक्री व्हायची.त्या आधी मुलांचे दात त्यावर आपली मोहर उठवायचे हे ठरलेलं कर्म असायचं.

शेती वाडी पण तशीच गुण्यागोविंदाने व्हायची.जोड धंदा म्हणून केलेला तंबाखूचा व्यापार मोठ्या प्रमाणात असायचा.आजही पंधरा फुट उंचीचा तीन पहारीचा लोखंडी साखळीचा वजन काटा त्या व्यापाराची साक्ष देतो.तंबाखू खरेदी बोदावर नसून शेतावर व्हायची.आजोबा डोक्यावरच्या टोपीवर खडा ठेवून घोड दौड करायचे.बरोबर नेहमी रामू शिंदे घोड्याचे चारा पाणी पाहण्यासाठी पायी सदैव साथीला असायचा.पळून पळून त्याची उंची साडेसहा फुटाची झालेली आम्ही पाहिली.तंबाखू शेतावर उभ्या आडव्या झाडांची मोजणी स्वतः आजोबा घोड्यावर बसून करायचे आणि सौदा बांदावरच पक्का करून त्या दिवसापासून त्या पिकाची निगराणी आजोबांच्या देखरेखीखाली व्हायची आणि त्या कुटुंबाची चूल आजोबांच्या जीवावर चालायची.

सर्व गोष्टींची रेलचेल असायची.त्या काळी हसूरचंपू गाव हे मोठं कुटुंबच वाटायचं.सधनता असल्या मुळे गावचा प्रपंचच आजोबांच्या खांद्यावर होता.मुलांनी पण त्यांची शिकवण तशीच पुढे चालू ठेवली.गावातील जिल्हा परिषदेची शाळा उभारणी शाळेला जमीन पुरवून केली गेली,सरपंच पदाची धुरा बराच काळ माझ्या वडिलांनी म्हणजे कै. पंडितराव जिवाजी शिंदे तथा पंडितआण्णा आणि काकांनी म्हणजे कै. नारायण जिवाजी शिंदे तथा नानासाहेब शिंदे यांनी समर्थपणे सांभाळली त्यामुळे गावाची उन्नती झालीं पाण्याचे प्रश्न तलाव निर्मितीमुळे आणि पाणी योजने मुळे सुटले.रस्ते झाले,एसटी ची सोय झाली , गावात लाईट आली प्रगती झाली .कुटुंबं वाढली आणि काळ सरत गेला आणि एक एक नवीन नवीन गोष्टीही जीवनात आल्या.गावातला पहिला रेडिओ आमच्या घरी विराजमान झाला तेंव्हा पंचक्रोशीतल्या शाळेच्या सहली वाड्यावर रेडिओ पाहण्या साठी थडकल्या.पहिली रॅली सायकल गावातली अवघी तिनशेहे रुपयांची ,त्यात आर्मीचरच्या दिव्याची.सायकल जेवढी जोरात धावायची तेवढा प्रखर प्रकाश पडायचा.गावातल्या बायका पोरे चौकटीतून डोकावून प्रकाश झोत पहायची.घरी लुना गाडी आली आणि गावान मोठं कौतुक केलं.त्यानंतर गाडी घोड्याच कौतुक राहील नाही.आता गल्ली बोळात गाड्या दिसतात.गावात तलाव झाले,पाणी योजना झाल्या तसे पुढच्या पिढीला पैसा दिसू लागला तो या ना त्या मार्गाने घरोघरी येऊ लागला तसे प्रेम,माया,ममता,माणुसकी,सृजनशीलतेने,सहीष्णुतने,प्रामाणिक पणाने आणि किंबहुना परस्पर दृढ नात्याच्या नाळेने काढता पाय घेतला.मनामनातले अंतर वाढले अंतःकरण फाटले, दुरावाही वाढत गेला.एकमुखी कारभार संपुष्टात आला.विचारांना आचारांना फाटे फुटले. भाऊ बंदकीने डोके वर काढले.वाडा हे सर्व पहात स्थिर राहिला.वाड्याची नाळ इतकी मजबूत की आजही ओढ कायम आहे.चुन्याचे दगडी बांधकाम, सागवानी दार खिडक्या ,तुळया सार जसच्या तस टिकून आहे.अजूनही त्या काळातील पॉलिश सुद्धा टिकून आहे.सत्तेचाळीस सकाळच्या जळीतात अख्ख गाव भस्मसात झालं पण आजोबांच्या वाड्याची पायरी कोणाकडून चढली गेली नाही.प्रत्येक जीव मिठाला जागला.आजोबांच्या कष्टाने बऱ्याच चुली आजही गुण्यागोविंदाने पेटत्या आहेत हीच खरी पुण्याई. अशा अनेक आठवणी हृदयात घर करून आहेत, त्या वाड्यात गेल्यावर उचंबळून येतात आणि मन सुखावते.

आमच्या कडे त्या काळी दोन भाऊ विठोबा जरा डोक्याने बरा आणि हणम्या डोक्याने आणि रूपानेही थोडा डावा असे कामाला होते.विठोबा जणू पीए चे काम करायचा,सदैव आजोबांच्या समोर.त्याला एकदा घोंगड आणायला सांगितलं तर त्यानं घोड दारात आणून उभ केल.हणम्या पण तसाच,तो गायी म्हशी रात्री चारायला घेऊन जायचा.त्याला कशाचीच भीती वाटायची नाही.काळारोम,लाल डोळे,नकटा ,बुटका खरखरीत हाताचा आणि आवाजाचा,अख्या गावाला त्याची भीती,मुलांना हणम्याची भीती घातली जायची.

तसाच पांगळा बाळू तोडकर.तो पाय वर करून सदैव दोन हातावर चालायचा.यात्रेत चोर त्याच्या तोंडातला कंदील पाहून पळून गेले.गावच्या शेवटाला त्याचे किराणा ,बिडी काडीचे दुकान.सर्वांच्या चाव्या आणि उधाऱ्या त्याच्या कडेच मुक्काम करायच्या.अस सगळ बालपण आठवत गेल की वाड्या समोर तासनतास बसून राहावं वाटत आणि मन खरच नुसत्या आठवणीने सुखावत.सोप्यातला फेटा कोटातील आजोबांचा फोटो पाहिला की अभिमान वाटतो, त्यांच्या कर्तबगारीला मानाचा मुजरा ,नमस्कार करावा वाटतो आणि आठवणीने अंतःकरण भरून येते.माझ्या बालपणी ते आमच्या कडे होते त्यामुळे आजोबांची दुधावरची साय म्हणून केलेले लाड आणि माया जाणवते .आजही कितीतरी बारीक सारीक गोष्टींच्या आठवणी उरात साठवून आमचा वाडा सदैव आमच्या येण्याची वाट पाहतो हे त्रिकाल सत्य सदैव हृदयात वास करून राहते आणि प्रत्येक क्षण सोन्याचा होतो....!


Rate this content
Log in

More marathi story from Prashant Shinde

Similar marathi story from Inspirational