"बचतीचा कानमंत्र"
"बचतीचा कानमंत्र"


लहानपणापासून बचतीचा कानमंत्र अगदी कोरून ठेवलेला, बचत कोणत्या गोष्टीची करावी ह्याचं बाळकडू आईने पाजले. वडील म्हणायचं भविष्याचा विचार करून बचत करणे महत्वाचे, कारण कधी कोणती वेळ येईल ते सांगता येत नाही. याचा प्रत्यंतर आता येतो आहेच. मुलांना बालवयापासून बचतीची सवय लागायलाच हावी हा दंडक होता. आमच्या लहानपणी गावी जत्रा असायची. जत्रेत वडिल मातीचा एक गल्ला घेऊन द्यायचे अवघा दोन रूपयाच्या असायचा. तो मला व धाकट्या भावासाठी. मग नियमित आम्ही एक रूपयाचं नाणं आम्ही टाकायचो. बक्षिसाखातर मिळालेली रक्कम पण त्यातच अभिमानाने जायची. आजकालच्या मुलांना मिळणारा पॉकेटमनी आम्हाला मिळत नव्हता. कधी दोन, चार रू. आई कुठल्यातरी डब्यातून काढून हातावर खाऊसाठी द्यायची. ते ही बाबांच्या गुपचूप बाहेरच काही खायचे नाही हा बाबांचा दंडक.
गल्ला फोडण्याचा पण एक मोठा कार्यक्रम असायचा. तो जत्रा जवळ यायच्या चार दिवस आधी. खुपदा मध्ये केंव्हातरी गल्ला फोडण्याचा मोह व्हायचा. पण मोह कसा आवरायचा त्याची खासियत आई छान पटवायची. आज या मोहमयी जगात मोह आवरण्याची मनाला मिळालेली शिकवण कामी येते. आसो
हं! मी काय म्हणत होते तो गल्ला फोडण्याचा खुप मोठा कार्यक्रम असायचा. माझा व भावाचा वेगळा गल्ला असायचा. कोणाकडे जास्त रक्कम असेल याची उत्सुकता ताणली जायची. मग गल्ला फुटला कि, चिल्लर, रोकडा, कागदी नोटा वेगवेगळ्या व्हायच्या. हळूच मोठा भाऊ पन्नास ची नोट कोणाच्या तरी रक्कमेत टाकायचा. केवळ लुटूपूटीच्या भांडणाचा आनंद उपभोगण्यासाठी. खरंच खूप मजा यायची. परत सगळी रोकड गोळा करून तिला नवीन गल्ल्यात स्थान मिळायचे. स्वकमाईतून थोडीफार खरेदी व्हायची. तीही काटकसरीने. या काटकसरीची सवय आज खुप उपयोगी पडते आहे.
आजच्या लॉकडाऊनच्या प्रसंगात मला कसलीच चणचण भासली नाही. खरंच आर्थिक बचत असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीची नक्कीच भविष्याचा आधारस्तंभ. अगदी बदलत्या वातावरणात 'पाणी अडवा, पाणी जिरवा'चे महत्त्व ओळखणे म्हणजे एक प्रकारे पाण्याची बचतच नाही का? पाण्याचा काटकसरीने ही काळाची गरज आहे. शेवटी बचत कोणतीही आसो पण योग्य रीतीने झाली की भविष्यात कसलीच टंचाई भासणार नाही खरयं ना?