Nilesh Gogarkar

Drama Romance

1.8  

Nilesh Gogarkar

Drama Romance

अवखळ प्रेम (भाग 7)

अवखळ प्रेम (भाग 7)

10 mins
744


मागील भागावरून पुढे...


तिला घरी सोडून शशांक आपल्या घरी निघून गेला.. आज माधवी खूप खुश होती. आज शशांकने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. तिचे प्रेम अखेर त्याने मान्य केले होते आणि तितक्याच उत्कटतेने तो पण तिच्यावर प्रेम करत होता. त्याच्या स्पर्शात असलेला आपलेपणा, ममत्व तिला भावून गेले होते. आता स्वर्ग तिला दोन बोटे बाकी राहिला होता. रात्री ती त्याला फोन करत होती. पण त्याचा फोन काही लागला नाही. तिला झोप येत नव्हती. ती परत परत त्याला फोन करत होती. पण रात्री त्याचा फोन काही लागला नाही. असे कां व्हावे? त्याचा फोन लागत नाही असे कधी होत नाही मग आजच असे का व्हावे. शेवटी तिने कंटाळुन फोन ठेवून दिला. त्या रात्री ती त्याच्याच विचारत दंग होती त्यामुळे तिला स्वप्ने पण त्याचीच पडत होती.


सकाळी उठल्या उठल्या तिने सगळ्यात आधी त्याला फोन लावला. पण आताही फोन लागत नव्हता. आता मात्र तिला काळजी वाटू लागली. वेगवेगळ्या पद्धतीने ती विचार करत होती पण काय घडले असावे याचा तिला अंदाज बांधता येत नव्हता.. शेवटी त्याच्या घरीच जाऊ म्हणून ती पटकन तयार करू लागली. शेवटी तासाभरात ती त्याच्या घरी पोचली तर दारावर टाळे होते. ती हताश होऊन त्या टाळ्याकडे पाहत होती. तेवढ्यात बाजूच्या काकू तिथून जात होत्या..


"काय गं कसला विचार करतेस?" त्यांनी तिला विचारले. माधवीचे त्याच्याकडे नेहमी येणे-जाणे असल्यामुळे त्या तिला ओळखत होत्या.


"शशांक.. काकू.. फोन पण लागत नाही म्हणून बघायला घरी आले तर घराला पण टाळे आहे."


"अगं तो कालपासून घरीच आला नाही...."


"असं कस होईल मला माझ्या घरी सोडून तो घरीच निघाला होता.."


"असेल. पण तो घरी आला नाही हे नक्की... त्याच्या बाईकचा आवाज मला चटकन कळतो.. आणि काल तो सकाळी गेलाय तेव्हापासून काही घरी आलेला नाही.."


काकू म्हणाल्या. आणि आता ती विचार करायला लागली.. मग हा गेला तरी कुठे? गावाला? पण गावाला जायचे असते तर मला सांगून गेला असता. फोन लागला असता. छे.. गावाला गेला नसेल. मग कुठे गेला..? ती परत परत त्याला फोन लावत होती पण अजूनही त्याचा फोन लागत नव्हता.. शेवटी ती हताश होऊन घरी आली तिचा मूड पूर्णपणे खराब झाला होता. काही करण्याची इच्छा नव्हती. त्या दिवशी त्याचा काही पत्ता लागला नाही. रात्री पण ती फोन करत होती. पण फोन लागला नाही.


दुसऱ्या दिवशी ती उठली. तिने मोबाईल पाहिला कोणताही मिस कॉल नव्हता.. ती वैतागून बाहेर आली. आई किचनमध्ये काही काम करत होती. माधवीला बघून आई तिच्याजवळ आली.


"अगं परवा शशांकचा ॲक्सीडेन्ट झाला तुला माहित नाही काय?"


"काय?" माधवी चमकली...


"हो... काल रात्री महेशला काही मित्राचा फोन आला होता. तो रात्रीच हॉस्पिटलला गेलाय.."


"अगं मग मला रात्रीच सांगायचे ना.... काय झाले? ठीक आहे नातो? जास्त लागले आहे का त्याला?” ती आता रडवेली झाली होती... आई तिची अवस्था बघून मनातल्या मनात विचार करू लागली.


"रडू नकोस... जास्त लागले नाही थोडे खरचटले आहे. आणि त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे... आता प्लास्टर घातले आहे. आता ठीक आहे."


"कोणत्या हॉस्पिटलला आहे तो... मला गेले पाहिजे..."


"अगं मला पण एवढे माहीत नाही. भाई येईल मग त्याला विचार." आईनं सांगितले. पण तिला कुठला धीर होता. तिने पटकन भाईला फोन लावला आणि त्याच्याकडून हॉस्पिटलचा पत्ता मिळवला आणि पटकन आपले आवरून ती धावतच त्याला भेटायला निघाली.


ती हॉस्पिटलमध्ये पोचली तर शशांक पायाला प्लास्टर करून पडला होता.


"काय रे , हे कसं काय झाले?” तिने काळजीच्या स्वरात विचारले.. त्याच्या रूममध्ये कोणी नव्हते.. रात्री काही मित्र होते तिथे पण आता सगळे काही वेळासाठी अंघोळ वगैरे करायला घरी गेले होते.


"तुला सोडून घरी चाललो होतो अचानक एक म्हातारा माणूस बाईक समोर आला. त्यामुळं अचानक ब्रेक मारावा लागला. बाईक स्किड झाली... आणि बाईक आणि डिव्हायडरमध्ये पाय सापडला."


"मी परवा रात्रीपासून तुला फोन करते आहे. तुझा फोन बंद लागतो आहे."


"बंदच लागणार ना.. बाईक वरून पडलो तेव्हा मोबाईलपण आपटला त्यामुळे मोबाईलपण बंद झाला होता."


"मग तुला इथे कोणी आणले?"


"रस्त्यावरील आजूबाजूच्या लोकांनी मला हॉस्पिटलला दाखल केले. एकाचा नंबर पाठ होता त्याला फोन करून कल्पना दिली. मग त्याने बाईक गॅरेजला टाकली आणि काही मित्रांना बोलावून घेतले. काल रात्री माझे सिम कार्ड एका मित्राच्या मोबाईलमध्ये टाकून घरच्यांना फोन केला. आज ते येत आहेत... काल महेश होता रात्री इथे.. तो तुला काही बोलला नाही...."


"नाही... कदाचित घाईत मला सांगायला विसरला असेल.."


"बरं.... झाले तू आलीस ते...


“मला कळले तशी मी धावतच आलीय... मी परवापासून तुला शोधतेय. घरी जाऊन आली. बाजूच्या काकू म्हणाल्याच की तू घरी आलाच नाहीस. मला कळेना की अचानक तू गेलास कुठे?”" तिचे डोळे पाणावले होते. त्याचा हात तिने घट्ट आपल्या हातात पकडला होता..


"अगं फार काही झालेले नाही... दोन महिन्यात मी पहिल्यासारखा धावायला लागीन काळजी करू नको..."


त्यानंतर दोघे भरपूर वेळ गप्पा मारत होते. साधारण बाराच्या सुमारास दोन बायका आणि एक मुलगी त्याला बघायला आली.. त्या स्त्रियांना बघूनच कळत होते त्या खानदानी स्त्रिया होत्या. दोघींच्या अंगावर खूप दागिने होते. पदर डोक्यावर होता. कपाळावर ठसठशीत कुंकू लावले होते..


"अरे शशांक कसं झाले रे हे?" त्यातल्या बाईने त्याच्याजवळ बसत अगदी काळजीने त्याला विचारले. ती बहुतेक त्याची आई असावी असा माधवीने अंदाज घेतला.


"काकी.... गाडी घसरली आणि पडलो..."


"अवो... किती लागले आहे...."


"तरी तुला नेहमी सांगते की गाडी हळू चालव..” दुसरी बाई म्हणाली..


"आई... तुझी काळजी मला समजते... पण अचानक एक माणूस समोर आला त्याला मी तरी काय करणार..." शशांक स्पष्टीकरण देत होता..

त्यानंतर त्या दोघी बराच वेळ बोलत होत्या. थोड्या वेळाने त्यांचे लक्ष माधवीकडे गेले.


"ही कोण ?"


"माझी मैत्रीण आहे. कॉलेजला सोबत शिकतो.. मला बघायला आली होती."


"नमस्कार आई... " माधवी म्हणाली.


"खुश राहा पोरी..." दोघी म्हणाल्या... आणि त्या यनंतर त्यांचे शशांकबरोबर बोलणे चालू झाले. आणि त्यांच्याबरोबर आलेली मुलगी माधवीबरोबर गप्पा मारत होती. ती शशांकच्या काकाची मुलगी होती. स्नेहा..

दोघींचं चांगलं जमलं होते. ती पण चांगली हुशार होती. बारावीत चांगले मार्क मिळाले होते तिला पण बिचारीला पुढे काही शिकता आले नाही. कारण घरी सगळे जुन्या वळणाचे...


इकडे शशांकची आई त्याला आता इथे ठेवायला तयार नव्हती. ती त्याला गावी घेऊन जायला निघाली. सुट्टीपण लागली असल्याने त्यालाही काही बोलता येत नव्हते. ते ऐकून माधवी मनातून नाराज झाली. तो जर गावी गेला तर त्याला भेटता येणार नव्हते... शेवटी डॉक्टरांशी सल्ला मसलत करून दुसऱ्या दिवशी शशांकला गावी घेऊन जायचे हे ठरले.. आणि त्याच्या बाबाच्या पण तशा सूचना होत्या मग त्याचापण नाईलाज झाला.


दुसऱ्या दिवशी ते सगळे गावी निघून गेले. माधवी त्याच्या फोनची वाट बघत राहिली. आता त्याच्याशी संपर्क करण्याचा एकमात्र तोच मार्ग होता. पण चार दिवस झाले तरी त्याचा फोन काही आला नाही. ती फोन करत होती तर त्याचा फोन अजूनपण लागत नव्हता...


त्या रात्री ती आपल्याच विचारत हरवून बसली होती. आणि तिचा फोन वाजू लागला. कोणता तरी अननोन नंबर होता म्हणून तिने तिकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा परत परत फोन वाजू लागला तेव्हा तिने काहीशा वैतागाने कॉल रिसिव्ह केला.


"हॅलो...." आणि त्याचा आवाज ऐकून तिला आनंद झाला. आणि क्षणात त्याने चार दिवस फोन केला नाही हे पण लक्षात आले म्हणून राग पण आला.


"आज आठवण आली काय माझी?"


"आठवण तर रोज येत होती. पण कोणी ना कोणी असायचे सोबत.. त्यामुळे फोन करायलाच मिळत नव्हता..."


"आणि हा कोणाचा नंबर आहे?"


"हा स्नेहाचा नंबर आहे... सेव्ह कर मी नवीन मोबाईल घेईपर्यंत याच मोबाईलवरून बोलीन तुझ्याशी.."


...........


"राग आलाय कां?" त्याने हसत विचारले..


"तुला काय त्याचे..."


"मला काय त्याचे... बरोबर आहे.. तिथे होतो तोपर्यंत माझ्याशिवाय तुझे पान हलत नव्हते, आता काय मी बिचारा लंगडा जागेवर पडलो तर...” शशांक मुद्दाम तिची फिरकी घेत म्हणाला.


"तू उगाचच काही बोलू नकोस नाहीतर तुझा गळा दाबीन तिथे येऊन.."


"हो का? मग ये च.... बघू तरी..."


"बस झाले हा...” ती रागानी म्हणाली.


“कशी आहे तब्बेत ? लवकर बरा हो आणि इकडे ये... तू नाहीस तर मला पण खूप कंटाळा येतोय इथे..."


"आणि माझी पण काय वेगळी अवस्था आहे कां? कधी एकदा बरा होतोय आणि परत येतोय असे मला झाले आहे..." त्याच्या त्या बोलण्याने तिचा चेहरा लाजेने लाल झाला. त्यानंतर दोघे किती तरी वेळ बोलत होते. जेव्हा त्याने फोन ठेवला तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते.. आणि त्यानंतर रोजच रात्री त्यांच्यात बोलणे होऊ लागले. रात्री बोलण्यासाठी दोघेही मोबाईल पूर्ण चार्ज करून ठेवत... असाच एक महिना गेला.. दोघांनाही एकमेकांची खूप आठवण येत होती पण काय करणार...


”तुम्ही सगळे माझ्या गावी या.... " त्या रात्री बोलता बोलता तो अचानक म्हणाला.


"आम्ही... म्हणजे कोण ?"


"अगं आम्ही म्हणजे... आपले जवळचे मित्र-मैत्रिणी... चार दिवस इकडे या.. म्हणजे फिरण्यासारखे पण होईल आणि मला तुला बघता पण येईल..."


"आई-बाबा पाठवणार नाहीत..."


"असं..." तो पण विचारात पडला..

"बरं बघू..." तो पुढे म्हणाला...


दुसऱ्या दिवशी महेश तिच्या रूममध्ये आला..


"शशांकनी आपल्याला सगळ्यांना त्याच्या गावी बोलावले आहे चार दिवसासाठी.... मला आज त्याचा फोन आला होता..."


"अय्या खरंच..." ती खुश झाली... शशांकची ही आयडिया मस्तच होती. सोबत महेश असेल तर तिचे आई-बाबा काही खळखळ न करता तिला पाठवणार होते.


"भाई आपण जाऊया ना.. मला पण इथे खूप बोर झाले आहे...” ती त्याला मस्का लावत म्हणाली.


"ए... नाही हा.... आमचा आधीच प्रोग्राम ठरला आहे... आम्ही चौघे मित्र सगळे ताडोबाला जातोय... मी तसे त्याला सांगितलेपण आहे..." महेश तिचे बोलणे झटकत लागलीच म्हणाला...


"अरे, असं काय करतोस भाई.. जाऊया ना आपण तिथून आलात की मग ताडोबाला जा ना.."


"अजिबात नाही सगळे आधीच ठरले आहे... तिकिटे काढून झालीत..." तो ठाम म्हणाला. तसा तिचा चेहरा पडला... ती हिरमुसली झाली पण भाई लक्षपूर्वक आपल्या चेहऱ्याकडे बघतोय हे तिला माहितच नव्हते.


"तू कशाला एवढी नाचतेस त्याच्या गावी जायला.." अचानक त्याने विचारले..


"आता तो एकटाच तिथे आहे... कोणी मित्र मंडळी जवळ नाही म्हणून कंटाळला आहे.. म्हणून तो बोलावत असेल तर आपण जायला नको का? त्या निमित्तानी त्याच्या तब्बेतीची विचारपूस केल्यासारखी पण होईल."


"म्हणजे तुमच्यात बोलणे चालू आहे तर..." भाईने डोळे बारीक करत तिच्यावर नजर रोखत विचारले.

त्याने अचूक अंदाज लावला असल्यामुळे आता नाही पण म्हणता येणार नव्हते... तिने हलकेच मान हलवली...


"ह्म्म्म..... ठीक आहे जाऊया आपण..." शेवटी तो म्हणाला... आणि तिला अत्यानंद झाला...


"भाई... यु आर ग्रेट...." तिने सरळ महेशला मिठीच मारली...


"मला माहित आहे माधवी, सध्या तुमच्यात चांगलेच गूळपीट जमतंय ते.... म्हणून मी माझा प्रोग्राम कॅन्सल करून तुझ्याबरोबर येतोय... आई-बाबा तुला एकटीला काही पाठवणार नाहीत..." तो हसत म्हणाला...


"ए... असं काही नाही... एक मित्र म्हणून तो खूप चांगला आहे... बस एवढेच..."


"हो का.... बरं.... तुझ्या खास मैत्रिणीला पण घे आपल्याबरोबर.."


"वर्षा..?"


"हो नाहीतर तू एकटी बोर होशील..."


"बरं... कधी निघायचे आहे..."


" टउद्याच.... शशांक आपल्यासाठी गाडी पाठवतोय.. सगळे आपल्या इथेच येणार आहेत... आई-बाबांना सांगून झाले आहे.."


"म्हणजे...?.... म्हणजे...? सगळे अगोदरच ठरले होते. फक्त मला त्रास देण्यासाठी तू मी बाहेर जातोय सांगत होतास. " तिने चिडून विचारले..


"असे काही नाही.... मी जाणारच होतो पण ऐनवेळी तिकीट मिळाली नाहीत आणि त्याचवेळी शशांकचा फोन आला. त्याने एवढी गयावया केली की नाही बोलताच आले नाही.... आता जास्त प्रश्न विचारत बसू नकोस पटकन सामान भरायला घे... पहाटे गाडी येणार आहे.." असे म्हणून हसत महेश तिच्या रूममधून बाहेर पडला...


ती जाम खुश होती, एखाद महिन्यानंतर ती शशांकला भेटणार होती.. त्यात त्याने सरळ महेशला फोन करून परस्पर तिची अडचण पण सोडवून टाकली होती... कधी एकदा त्याला बघते आहे असे तिला झाले होते...


दुसऱ्या दिवशी पाच जण पहाटे शशांकच्या गावी जायला निघाले. महेश आणि दोन मित्र आणि माधवी आणि वर्षा असे ते पाच जण निघाले होते.. ड्रायव्हरने पहाटे गाडी आणली होती. तो रात्रीच गावावरून निघाला होता. पहाटे पहाटे तो मुंबईला पोहोचला, तेव्हा तीन वाजले होते. त्याने गाडीतच तीन चार-तास झोप काढली. आणि मग सगळ्यांना घेऊन परत गावी निघाला... दुपारी सगळे शशांकच्या घरी पोचले. घर कसले मोठी प्रशस्त जुनी हवेलीच होती ती... त्या सगळ्यांच्या स्वागताला स्वतः शशांक व्हीलचेअरवर त्यांना सामोरा आला... माधवीला बघताच त्याची कळी खुलली... सगळ्याबरोबर गप्पा मारत असला तरी त्याचे लक्ष तिच्यावरच होते... ती पण सगळ्यांची नजर चुकवत अधूनमधून त्याच्याकडे पाहत होती..


मुलींची आणि मुलांची सोय वेगवेगळ्या रूममध्ये करण्यात आली होती. हातपाय धुवून सगळे जेवायला बसले... गप्पा मारत त्यांची जेवणे चालू होती. शशांकची आई तिला ओळखत होती. हॉस्पिटलमध्ये त्यांची ओळख झाली होती. इतरांशी मात्र त्यांची आज ओळख झाली.


संध्याकाळी शशांकचे बाबा आले. उंच , धिप्पाड आणि भारदस्त व्यक्तिमत्व असलेला तो माणूस भारदस्त आकडेबाज मिशा बाळगून होता. त्यांच्या येण्याने घरात न बोलता एक शिस्त आली. त्यांच्या येण्याआधी हसत-खेळत गप्पा मारणाऱ्या सगळ्या स्त्रिया आता चिडीचूप झाल्या होत्या. गडी माणसे कामात असल्याचे दाखवू लागले... एकूण त्यांचे या घरावर आणि आजूबाजूच्या भागावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे दिसून येत होते.


"आले का पाहुणे?” त्यांनी आल्या आल्या सगळ्या पाहुण्यावर नजर टाकत विचारले.. त्यात वर्षाने घातलेल्या टाईट जीन्सकडे बघून त्यांच्या चेहऱ्यावर ना पसंतीची छटा चमकली. पण ते पाहुणे असल्याने ते काही बोलले नाही. एवढा शिष्टाचार त्यांना माहीत असावा..


"या.. पाहुणे बसा. कसा झाला प्रवास?" त्यांनी आपल्या कठोर आवाजात विचारले. त्यांचा आवाजच असा होता की त्यांनी अगदी सहज जरी विचारले तरी समोरील माणूस गर्भगळीत व्हावा..


"छान झाला.... दुपारीच पोचलो..." महेशने पुढाकार घेत त्यांच्याशी बोलायला सुरवात केली..


"बरं झालं तुम्ही सगळे आलात... आमचे शशांकराव खूप कंटाळले होते. त्याचे काय वर्षभर शहरी वातावरणात राहिले ना... आता इथे कंटाळाच येणार...

तुमची ओळख करून घ्यायची राहिलीच..."


"मी महेश... हा आकाश आणि हा साहिल... हे दोघे शशांकबरोबर शिकतात... मी सिनियर आहे.. लास्ट इयरला... ही माधवी माझी बहीण... आणि ही वर्षा... दोघी आर्ट्स करतात..."


"वा छान.... आता आल्यासारखे चार-आठ दिवस राहा.. आमचे गाव बघा... मस्त फिरा... नदीवर पोहायला जा..."


"बरं.. बाबा...." महेश म्हणाला..


"हे मात्र महेशराव छान आहे... चांगले संस्कार केलेत तुमच्या आई-वडिलांनी... मोठ्यांशी कसे बोलावे, कसे वागावे याचे चांगले ज्ञान आहे तुम्हाला.. छान.. छान...

अहो ऐकलं का?” शशांकच्या बाबांनी आता स्वंयपाक घराकडे बघत आवाज दिला... त्याबरोबर शशांकची आई स्वंयपाकघराच्या दाराजवळ आली...


"आता चार दिवस आम्हीही सुट्टी घेतोय.. आपण सगळे मिळून मस्त वावरात जाऊ, जेवण वगैरे तिकडेच करू.... अहो तुम्ही अशा दारात काय उभ्या.. या अशा समोर या.. ही काय मुलेच आहेत आपल्या शशांकसारखी त्यांच्यासमोर यायला काही हरकत नाही..." ते म्हणाले, तसे घरातील सगळे चकित झाले... बाबाच्यात एकदम बदल कसा काय झाला या गोष्टीचा सगळे विचार करत होते. आई बाहेर येऊन त्या सगळ्यांबरोबर बसल्या..


"उद्या वावरात जाऊ... सगळ्यांना तयारी करायला सांगा.. जेवण पण तिथेच करू... " त्यावर आईने मान डोलावली...


पुढील भाग लवकरच.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama