अवखळ प्रेम (भाग 3)
अवखळ प्रेम (भाग 3)
मागील भागावरून पुढे.....
माधवी जिवाच्या आकांतानं त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत होती पण त्यात तिला यश मिळत नव्हते. तिच्या सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून ते तिघे मवाली हसत होते. त्यांच्या डोळ्यात वासना स्पष्ट दिसत होती.
"सोडा तिला..." अचानक एक खणखणीत आवाज त्यांच्या कानी पडला. त्या आवाजाने तिघे चमकले. त्यांनी मागे वळून पाहिले आणी त्यांच्या बरोबर माधवीने पण आपल्याला वाचवायला कोण आला ते पाहिले. तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तो शशांक होता. कमरेवर हात ठेवून तो उभा होता. त्याला एकट्याला बघून ते मवाली काहीशे बेफिकिर झाले...
"ए.. हिरो जा.. आपले काम कर नाहीतर फुकटचा मार खाशील..." तिघांतील एक जण दात ओठ खात म्हणाला..
"पोरगी समजला काय मला...?" हसून शशांकने विचारले.. आता ते तिघे पण चिडले. उगाचच थांबण्यात अर्थ नव्हता आणखीन कोणी आले तर हातची शिकार जायची भीती होती. त्यांच्यातील एकाने दोघांना खूण केली. तसे ते दोघे माधवीला सोडून पुढे निघाले. तिसऱ्याने अजूनपण माधवीला घट्ट पकडून ठेवले होते. दोघे शशांकच्या दिशेने पुढे सरकल्यावर माधवीच्या पोटात गोळा आला. भांडणे, मारामाऱ्या हा काही शशांकचा प्रांत नव्हता. आज आपल्यासाठी मार खावा लागणार बिचाऱ्याला... अचानक शशांक एक पाऊल मागे सरकला.. आणी त्या दोघांना वाटले की तो घाबरला... पण तो एक पवित्रा आहे हे माधवीच्या बरोबर लक्षात आले.
एक जण ओरडून शशांकवर धावून गेला. पण काहीतरी चुकले हे अचानक हवेत उडून दाणकन रस्त्यावर आपटल्यावरच त्याच्या लक्षात आले. त्याची कंबर आणी पाठ चांगलीच सडकून निघाली होती. आपल्या साथीदारांची पहिल्याच फटक्यात ही अवस्था बघून दुसरा हबकला... आता तो शशांकला हलक्यात घेत नव्हता.. सावकाश त्याच्या जवळ जात त्याने अचानक आपल्या पायाची एक किक शशांकवर फेकली... काहीसा बाजूला होत शशांकने त्याला हलकासा धक्का दिला त्यामुळे आधीच किक मारण्याच्या नादात त्याचा तोल गेला होता त्यात शशांकने दिलेला धक्का त्यामुळे तो भेलकांडत बाजूच्या भिंतीवर आदळला.. नाक आणि तोंड फुटले... आता पुढे मारामारी करायला त्याच्यात ताकतच नव्हती...
आपल्या दोन्ही साथीदारांची हालत बघून पुढे काय करावे म्हणून तिसऱ्याने एकदा माधवीकडे आणी एकदा शशांककडे बघितले...
"तू पण अजमावून बघ... देवाशपथ अजिबात इथून हलणार नाही जोपर्यंत तुझी पण हालत त्या दोघांसारखीच होत नाही..." माधवी शशांकच्या कारनाम्याने बेहद्द खुश होती त्यामुळे आपण काय बोलतोय त्याचे तिला भानच नव्हते.. पण तिच्या त्या जळजळीत बोलण्याने तिसरा पेटून उठला.. रागाने तिचा हात जोरात झटकून तो शशांककडे वळला..
"अरे मला काय ताकत दाखवतो आहेस तुझ्यात काय मर्दुमकी आहे ते त्याला दाखव... शशांक सोडू नको ह्याला..." माधवी त्याला अजून भडकवीत म्हणाली. आता तिसरा सावकाश शशांकच्या समोर आला. त्याच्या दुबळ्या बाजू कोणत्या ह्याचा तो विचार करत होता. पण बिचाऱ्याला काय माहित की आपण नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनसमोर उभे आहोत... काही क्षण त्याची वाट बघून शशांक पण वैतागला...
"आता काय रात्रभर वाट बघत राहणार आहेस का?.. ये..."
"कशाला तू ये...." तो शशांकला म्हणाला. आणि त्या अवस्थेत पण शशांकला हसू आले..
"बरं मीच येतो..." म्हणून शशांक पुढे सरसावला.. आणि पुढच्या दोन-तीन मिनिटांत त्याने त्याची अगदी शास्त्रोक्त धुलाई केली... अगदी अशी की त्याच्या किमान दोन तीन बरगड्या तुटल्या होत्या..गुडघ्याच्या वाटीला मार लागला होता. त्यामुळे स्वतःच्या पायावर चालणे तर सोडा पण जागेवर उभे राहणेही त्याला शक्य नव्हते... तिघे घाबरून त्याच्याकडेच बघत होते... त्याने तिघांवर नजर टाकत पोलिसांना फोन लावला... काही मिनिटांत पोलीस येणार होते...
"चल... तुला घरी सोडतो..." तिच्या हाताला पकडत शशांकने तिला आपल्या बरोबर घेतले.. त्याचा स्पर्श झाला तसा तिच्या शरीरात वीज खेळू लागली..
"हे काय होते..?" बाईकजवळ पोचल्यावर त्याने विचारले..
"अरे आज मला कॉलेजमध्ये उशीर झाला. घरी निघाले..."
"ते नाही विचारत आहे मी...? जा देवाशपथ अजिबात इथून हलणार नाही वगैरे त्याबद्दल विचारतोय मी..." तो चांगलाच रागात होता...
"ते होय... ते असेच तुला बघून तोंडातून निघून गेले..."
"तुला कधी अक्कल येणार आहे.. कॉलेजमध्ये पण तेच आणि आता रस्त्यावरपण तेच... कधीतरी खूप मोठ्या संकटात सापडशील... नशीब की आज मी पण उशिरा निघालो... म्हणून वेळेवर पोचलो नाहीतर काय झाले असते कळतंय कां तुला?"
तिने शरमेने मान खाली घातली...
"चल बस तुला घरी सोडतो... त्याने बाईकवर बसत म्हटले.. ह्याला आपले घर कुठे माहित आहे. आता आहेच तर मस्त फिरवत त्याला घरी नेऊ असा विचार तिच्या मनात आला.. तेव्हडाच त्याचा जास्त सहवास आपल्याला मिळेल अशी साधीसरळ कल्पना मनी धरून ती बाईकवर बसली.
" हिंदू कॉलनीत राहतेस ना तू ? " त्याने बाईक स्टार्ट करत विचारले.. ह्याला कसे माहित.. कदाचित भाई बरोबर ह्याची दोस्ती असल्यामुळे कदाचित त्याला माहित असावे.. मनातून खट्टू होत तिने हुंकार भरला. आणी त्याने गाडी बाहेर काढली. ती एक महागडी बाईक होती त्यामुळे त्याच्यावर बसणे तिला जरा कठीण वाटत होते. आधाराला तिने एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला होता.. पण तेव्हड्यामुळे पण येणार फील हवाहवासा वाटणारा होता. काही वेळापूर्वी आपल्यावर काय प्रसंग ओढवला होता हे विसरून ती सहज झाली होती. अधे मध्ये येणाऱ्या ट्रॅफिक , गाड्यामुळे त्याला ब्रेक मारावा लागे आणी त्यामुळे ती पुढे ओढली जातं होती आणी त्यावेळी त्याला होणारा स्पर्श तिच्या मनाला सुखावून जातं होता. पंधरा मिनिटात ते हिंदू कॉलनीत पोचले...
" कोणती बिल्डिंग ?" त्याने विचारले.
" ती पुढे.. सगळ्यात शेवटची.. " ती सांगायला पुढे झुकली आणि तो ऐकायला मागे झाला. त्याच वेळी तिच्या उरोजाचा स्पर्श त्याच्या पाठीला झाला. दोघेही गडबडले आणि पुन्हा सावरले... तिच्या बिल्डिंगच्या खाली त्याने गाडी उभी केली.
"'आता ह्या पुढे लक्षात ठेव... एकटी येत जाऊ नकोस...आणि रस्त्यावरील मवाली लोकांच्य
ा नादाला लागायचे नाही..."
"तू एव्हडा चांगला फाईट करू शकतोस तर मग असा बावळटासारखा का राहतोस?" बराच वेळ आपल्या मनात असलेला प्रश्न तिच्या ओठावर आला.
"मग काय करू? तुझ्यासारखा मारामाऱ्या करत फिरू? मला ते पटत नाही. अगदी गरज नसेल तोपर्यंत आपण आपली शक्ती वाया घालवायची नाही. आणि त्याने सिद्ध काहीच होत नाही उलटे ताप वाढतात ह्या मतांचा मी आहे.. कळले.. आता निघू..." त्याने तिला समजावले आणि तेव्हड्यात वरून महेश खाली आला..
"अरे तू आहेस होय ? मी तेच बघायला खाली आलो की कोण सोडायला आला आहे..."
" हो उशीर झाला होता म्हणून म्हटले घरी सोडतो.. आता मी पण निघतच होतो.."
"'अरे ! असे कसे.. आलाच आहेस तर चहा वगैरे घेऊन जा..."
" नको.. खूप उशीर झालाय.. नंतर केव्हा तरी येईन नां..." शशांक म्हणाला.. आणी माधवीच्या चेहऱ्यावर उमललेले तेज लोप पावले...
" बरं येऊ आता..." दोघांनी माना डोलावल्या तशी बाईक वळवून शशांक निघून गेला...
दुसऱ्या दिवशी माधवी चांगल्या मूडमध्ये कॉलेजला आली ते बघून वर्षालापण आनंद झाला. बऱ्याच दिवसांनंतर तिच्या चेहऱ्यावर हसू उमलले होते.
" आज मॅडम खूप चांगल्या मूडमध्ये आहात. काही खास..?" वर्षाने तिच्यावर डोळे रोखत विचारले. त्यावर माधवीने डोळे वटारून तिला गप्प केले.
त्या दिवसानंतर हळूहळू माधवी पूर्वीसारखी हसू खेळू लागली पण भांडणे वैगरे तिने सोडूनच दिली होती कारण शशांकला ते पसंत पडणारे नव्हते.
एकदा सगळ्यांनी मिळून पिक्चरला जायचा प्रोग्राम बनवला सगळ्यांच्या जोड्या तयार होत्या फक्त माधवीबरोबर कोणी नव्हते... त्यामुळे तिने जाणे कॅन्सल केले. तिला पण मनातून खूप होते पण सोबत कोणी नसल्याने तिचा पण नाईलाज झाला.. चार बाईकवर आठ जण तयार होते आणि ती एकटी होती. तिच्या मनाची अवस्था वर्षाला कळली होती.. पण काही इलाज नव्हता..
दुपारी त्यांचा सगळा ग्रुप जायला तयार होता. पार्किंगमध्ये सगळे जमले सगळ्यांना निरोप दयायला माधवीपण आली खरंतर तिची इच्छा नव्हती पण वर्षाच तिला जबरदस्तीने घेऊन आली. सगळ्या मुली आपापल्या मित्राबरोबर बाईकवर बसल्या.. आणि त्याचवेळी शशांक एकदम हायफाय बाईक घेऊन पार्किंगमध्ये आला. आज पहिल्यांदाच त्याने माधवीला बघून स्माईल दिली.
"काय कुठे जायचा प्रोग्राम आहे?" सगळ्यांकडे बघत त्याने प्रश्न विचारला.
"अरे आम्ही पिक्चर बघायला जातोय..." वर्षा म्हणाली..
"अरे वा..! तुमचे आर्टस् वाल्यांचे बरे असते जेव्हा मनाला येईल तेव्हा लेक्चर बंक करता येतात..." तो हसत म्हणाला..
"ए... लेक्चर बंक वैगरे काही नाही... आज मॅडम नाही येणार म्हणून मग आम्ही प्रोग्राम बनवला..." वर्षा आणि इतर मुली त्याच्यावर घसरल्या.. हा तो आडवळणांनी त्यांची फिरकी घेतोय ते त्यांना कळले होते...
"बरं बाबा... चला चालू दे तुमचे... मला जरा काम आहे येतो मी..."
"अरे शशांक ऐक ना... " वर्षा त्याच्याजवळ जात म्हणाली.
काही वेळ दोघे बोलत होते.. शशांकने एक नजर माधवी कडे टाकली. तिचे लक्ष त्याच्याकडे नव्हते. ती आपल्याच विचारात होती.
"ओके... गाईज... आज शशांकपण येतोय आपल्याबरोबर... चला." शेवटी वर्षाने जाहीर केले.. आणि माधवीने अविश्वसनीय नजरेने त्याच्याकडे पाहिले... त्यावर त्याने हलकेच मान डोलावली.. ती कमालीची खुश झाली... पिक्चरला जायचे म्हणून नव्हे तर तीन-चार तास त्याच्याबरोबर घालवता येणार होते. पटापट सगळे गाड्यांवर बसले.. सगळ्यात शेवटी माधवी लाजत त्याच्या बाईकवर बसली.
"निघायचे का मॅडम..?" त्याने थट्टेने विचारले. त्यावर तिने एक चापट त्याच्या खांद्यावर मारली. सगळ्यात शेवटी आपली बाईक काढत तो त्या सगळ्यांच्या मागे निघाला. प्रत्येकजण आपापल्या मित्र-मैत्रिणीच्या सोबत बसला होता. साहजिकच शशांक आणि माधवी दोघे एकमेकांशेजारी बसले होते. आज माधवीला अगदी तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचा फील येत होता. पिक्चर सुटल्यावर सगळे मस्त फिरतफिरत समुद्रकिनारी गेले. तिथे बसून त्यांच्यात गप्पा चालू होत्या. शशांक सगळ्यांशी मस्त गप्पा मारत होता. तो त्यांच्या ग्रुपमध्ये चांगलाच मिसळला होता. माधवीबरोबरपण अधेमध्ये तो बोलत होता. आता पुन्हा माधवीच्या मनात आशा पल्लवित झाली. सगळ्यांसाठी काही खायला आणायला म्हणून शशांक निघाला आणि त्याला मदत म्हणून माधवीपण उठली. दोघे सगळ्यांना खायला घेऊन आले. आता माधवी त्याच्याबरोबर बरीच सहज झाली होती. मागचा कडवटपणा आता दोघांतपण दिसत नव्हता... संध्याकाळी तिला घरी सोडायला म्हणून तो निघाला..
"शशांक आपण कॉफी घेऊ या का? "
"ठीक आहे.." त्याने एका चांगल्या कॉफ़ी शॉपजवळ बाईक बाजूला घेतली.. दोघांचे कॉफी कप आले. कपमध्ये छान बदामाची नक्षी केली होती.
"शशांक तुला एक विचारू...? "
"ह्म्म्म विचार ना... "
"तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? "
"नाही गं...का? अचानक तुझ्या डोक्यात असे का यावे ?"
"असेच.. मला वाटले कदाचित त्यामुळे तू मला नकार दिलास की काय... तसे काही असते तर ठीक होते. मी समजू शकते लॉयल्टीपण काही गोष्ट आहे नां !"
"हे बघ माधवी आज तुला सगळे सांगतो. मला ह्या प्रेमाबिमात अजिबात इंटरेस्ट नाही आणि माझ्या घरी ते चालण्यासारखे पण नाही... तू एक चांगली मुलगी आहेस त्यातच महेश आणि माझी खास मैत्री आहे. तुझ्याबाबतीत तो किती पजेसिव्ह आहे हे तुला माहिती आहे. त्याला हे कळले तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल, त्याच्या नजरेतून मी उतरून जाईन... आलं ना तुझ्या लक्षात... म्हणून तू माझा नाद सोड आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर... ठीक आहे..." शशांक तिला समजावून सांगत होता. आणि ती मान खाली घालून ऐकत होती. त्यानंतर कोणी फारसे बोलले नाही. तिला घरी सोडून तो निघून गेला.
आणि दुसऱ्या दिवसापासून माधवीने कॉलेजला येणे बंद केले. वर्षाने फोन केला पण तिने थातुरमातुर कारण देऊन तिला वाटेला लावले. एखाद-दोन दिवसांत ती येईल असे वाटून वर्षाने तिकडे फार लक्ष दिले नाही...
पुढील भाग लवकरच...