End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Nilesh Gogarkar

Drama Romance


3  

Nilesh Gogarkar

Drama Romance


अवखळ प्रेम (भाग 1)

अवखळ प्रेम (भाग 1)

5 mins 717 5 mins 717

कॉलेजचा पहिलाच दिवस... सर्वजण अगदी उत्साहात कॉलेजला आले होते. प्रत्येक जण अगदी नटून आला होता. मुली नवीन स्टाईलिस्ट कपडे, केसांच्या नवीन केशभुषा, साजेसा मेकअप करून आल्या होत्या. मुले अत्यंत महागड्या ब्रँडेड जीन्स, त्यावर आकर्षक टी-शर्ट्स वा ब्रँडेड शर्ट्स घालून, महागड्या बाईक्स घेऊन आले होते. सिनियर विद्यार्थ्यांना हे सगळे जुनेच होते पण जे नवीन होते त्यांच्यासाठी हे सगळे वातावरण एकदम नवे स्वप्नवत, हवेहवेसे वाटणारे होते. ज्यांचे अगोदरच जमले होते ती कपल दीड महिन्याच्या सुट्टीनंतर परत एकमेकांच्या सहवासात आली होती. त्यामुळे त्या गोष्टीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सगळीकडे तरुणाई सळसळत होती. जो तो आपापल्या ग्रुपमध्ये मग्न होता. हसण्या खिदळण्यात जो तो मग्न होता.


"ए.... आधी माफी माग...." अचानक टिपेला गेलेला आवाज सगळ्यांच्या कानावर पडला. ही होती कॉलेजची झाशीची राणी माधवी... एका मुलाची कॉलर पकडून ती उभी होती. तिच्या डोळ्यात अंगार होते. रागाने ती थरथरत होती.


"सॉरी... माझे लक्ष नव्हते म्हणून चुकून धक्का लागला...” तो मुलगा वरमून म्हणाला..


"चुकून....? मुद्दाम धक्का मारून वर चुकून लागला म्हणतो..." त्याची कॉलर पूर्ण ताकतीने हलवत तिने त्वेषाने विचारले...


"हे बघ तुझा काही गैरसमज झाला आहे... चुकून धक्का लागला आणि त्यासाठी मी सॉरी पण म्हणालो आहे.."


"सॉरी म्हणाला म्हणजे सगळे संपले काय?" माधवी अजून पण रागात होती. तिच्या सोबत असलेल्या मैत्रिणी तिला खेचत त्याला सोडण्यासाठी सांगत होत्या. पण ती त्याला अशीच जाऊ देणार नव्हती.. आता पुढे काय होईल याचीच चिंता सगळ्यांच्या चेहऱ्यावर होती.


"काय चालले आहे..?" अचानक महेशने तेथे येत विचारले. त्याला बघताच माधवीने त्या मुलाची कॉलर सोडली. एका नजरेत महेशने सगळे ओळखले.


"पहिल्याच दिवशी झाली का तुझी सुरवात.." थंड नजरेने माधवीला बघत महेशने विचारणा केली.


"पण भाई यानेच आधी धक्का मारला.. म्हणून.." माधवीने बोलण्याचा प्रयत्न केला.. पण तिला पुढे बोलू न देता महेश पूढे बोलू लागला.


"हा सेकंड इयरचा मुलगा आहे. त्यामुळे तुझ्याबद्दल त्याला सगळे माहित असताना हा मुद्दाम तुला धक्का मारेल असे तुला वाटते कां?"

त्यावर ती काही बोलली नाही.. महेशने त्या मुलाला जायची खूण केली.


"पण भाई..."


"अजिबात काही बोलू नकोस... जा आता आपल्या क्लासला जा..." महेश कठोर स्वरात म्हणाला.. आणि वळून चालू लागला.. पुन्हा सगळे सुरळीत झालेले बघून तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणींनी सुटकेचा श्वास सोडला.


"नशीब तुझा भाई वेळेवर आला नाहीतर आज काय त्या मुलाचे खरं नव्हते.." वर्षा हसत म्हणाली.


"अहं... नको त्या वेळी बरोबर हजर होतो.." माधवी म्हणाली. महेश माधवीचा मोठा भाऊ होता. आणि कॉलेजला थर्ड इयरला शिकत होता. हुशार, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणे त्यामुळे कॉलेजमध्ये त्याच्या शब्दाला किंमत होती. या उलट माधवी अभ्यासात जेमतेम असलेली, सारखी सगळ्यांशी भांडणारी, कोणाशीही कोठेही दोन हात करायला तयार असणारी माधवी म्हणजे डोक्याला ताप होती. त्यामुळे कॉलेजमध्ये तिला झाशीची राणी म्हणूनच ओळखले जात होते. पण महेशपुढे तिचे काही चालत नव्हते. एकतर त्याच्यावर तिचे खूप प्रेम होते. आणि दुसरे म्हणजे त्याने ही गोष्ट घरी सांगितली तर आई-बाबा तिला चांगलेच रागावले असते.. त्याने कितीतरी वेळा तिला प्रेमाने, रागाने समजावून सांगितले पण तिच्या वागणुकीत फरक पडत नव्हता.. एक वर्षा सोडली तर तिचे फारसे कोणाशी जमत नसे.... वर्षा तिची एकदम खास मैत्रीण दोघी नेहमी सोबतच असायच्या...


"चल आपण आपल्या जागेवर बसुया... आज पहिलाच दिवस त्यामुळे काही लेक्चर होईल असे वाटत नाही.." माधवी वर्षाला म्हणाली..


"ह्म्म्म चल..." वर्षा तिच्याबरोबर चालू लागली. कॉलेज कॅम्पसमध्ये गार्डनमध्ये काहीशी उंचावर असलेले बेंच त्यांची आवडती जागा. तिथून सगळा कॉलेज कॅम्पसमधील परिसर स्पष्ट दिसायचा. दोघी बेंचजवळ आल्या तशा त्यांना बघून बेंचवर बसलेली एक जोडी तेथून उठली. ही जागा तिच्या आवडीची आहे हे एव्हाना सगळ्या कॉलेजला माहित झाले होते. एक नापसंतीची छटा माधवीच्या चेहऱ्यावर उमटली. तिला हे असे एकमेकांमध्ये गुंतून जाणे वगैरे सगळे झूठ वाटत होते. अर्ध्यापेक्षा जास्त जोड्या आयुष्यात पुन्हा एक दुसऱ्याचे तोंड बघणार नव्हत्या याला प्रेम म्हणायचे कां? तिला कायम हा प्रश्न पडायचा. वर्षभराच्या काळात तिला कोणी कधी प्रपोज केले नव्हते. कदाचित तिची डॅशिंग पर्सनॅलिटीच त्यासाठी कारणीभूत असावी की आजपर्यंत कोणी मुलगा तिच्या नादाला लागला नव्हता. पण जर आपल्याला कोणी प्रपोज केले तर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा असावा उगाचच दिखावा नको, असे तिला वाटायचे.


दोघी शांतपणे बसून कॉलेजमधील गंमती-जंमती बघत बराच वेळ तिथे बसल्या होत्या. अचानक एका मुलाने माधवीचे लक्ष वेधून घेतले. तो दिसायला स्मार्ट होता. चांगली सहा फुटाच्या आत बाहेर उंची, गोरापान वर्ण, कुरळे केस आणि त्याला शोभेल असे कमावलेले शरीराचे शेप्स बघून माधवी त्याचेच निरीक्षण करत होती.


तो नवीनच कॉलेजला आला होता, त्याचा नवखेपण त्याच्या हालचालीतून जाणवत होता. नवीन ऍडमिशन दिसत होते. तो काहीसा गोंधळात दिसत होता. बहुतेक त्याला त्याचा क्लास सापडत नसावा.. विचारपूस करता करता तो नेमका राहुलच्या ग्रुप कडे निघाला. आता पुढे काय हे तिला वेगळे सांगायची गरज नव्हती. राहुल हा कॉलेजमधील सगळ्यात वाया गेलेला मुलगा होता. नवीन आलेल्या मुलांची रॅगिंग करणे हा त्याचा आवडीचा खेळ. तिला हे सगळे माहित असल्यामुळे ती ताडकन उठली.


"काय गं! काय झाले?"


"काही नाही. चल..."


"कुठे..?" वर्षाला काही कळत नव्हते अचानक तिला काय झाले. पण काही न बोलता ती माधवीबरोबर निघाली.


"मला जरा फर्स्ट इयर सायन्सचा क्लास कुठेय ते सांगाल कां प्लिज?" तो नवीन मुलगा सरळ जाऊन राहुललाच भिडला...


"ओह हो..... सायन्स...? म्हणजे चांगलाच हुशार आहेस म्हणायचे...." राहुलने कुत्सित हसत विचारले...


"आहे बरा..." तो पण तिकडे दुर्लक्ष करत म्हणाला..


"बरा म्हणजे मग काय वशिल्याने ऍडमिशन मिळवली की काय ?"


"नाही... माझ्या जीवावर ऍडमिशन मिळवली.. आता जरा मला क्लास कुठे आहे ते सांगाल का?"


"क्लास ना..? सांगतो हा...." राहुल म्हणाला पण त्याच्या डोळ्यातील लबाड भाव काही वेगळेच सांगत होते. आणि त्याचवेळी माधवी त्या मुलाच्या मागे येऊन उभी राहिली. आणि तिला बघून राहुलची हवा निघाली. तिच्याबद्दलचा त्याचा अनुभव खूप वाईट होता.


सुरवातीला जेव्हा ती कॉलेजला आली तेव्हा तिची रॅगिंग करायला गेलेल्या राहुलचा तिने असा काही पानउतारा केला होता की अजून पण ते आठवले तरी राहुलच्या अंगावर काटा यायचा..


आता पण तिला त्याच्या मागेच उभी बघून त्याला एक झटका बसला.


"मला एक काम आठवले... अरे तुम्ही याला जरा याचा क्लास सांगा मी पटकन जाऊन आलो..." असे म्हणून आपल्या बरोबरच्या मुलांना सांगून राहुल पटकन तेथून सटकला..


"कोणता क्लास हवाय तुला?” अतिशय गोड आवाजात माधवीने त्याला विचारले. तिचा तो मधाळ आवाज, चेहऱ्यावरील हसरा भाव बघून वर्षा तर माधवीचे हे नवीन रूप बघतच राहिली.. उत्तरादाखल त्या मुलाने आपले आयकार्ड तिच्या समोर धरले...


शशांक मराठे... तिने पटकन नाव वाचून घेतले. चला त्याचे नाव तर कळले ती मनातल्या मनात खुश झाली.


"असे कर सरळ गेलास की समोर जिना लागेल. पहिल्या माळ्यावर डावीकडे तिसरा क्लास..." ती म्हणाली.


"थँक्स...”


"माय प्लेजर... माझे नाव माधवी आहे..." माधवीने त्याच्यासमोर हात धरत म्हटले..


"ओह.. माय सेल्फ शशांक..." तिचा हात आपल्या हातात घेत शशांकने तिला शेकहॅंड्स केले. त्याच्या हातात हात असताना माधवीला अगदी भारीच वाटले. त्याची ती काहीशी उबदार, काहीशी कठोर हाताची पकड तिच्या मनाला स्पर्शून गेली. त्याचा असा स्पर्श तिला हवाहवासा वाटू लागला. पहिल्या भेटीतच त्याने तिच्यावर गारुड केले होते हे मात्र नक्की...


पुढील भाग लवकरच...


Rate this content
Log in

More marathi story from Nilesh Gogarkar

Similar marathi story from Drama