Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Nilesh Gogarkar

Romance

2.5  

Nilesh Gogarkar

Romance

अवखळ प्रेम (भाग 6)

अवखळ प्रेम (भाग 6)

9 mins
774


मागील भागावरून पुढे.....


तिला घरी सोडून शशांक आपल्या रूम वर निघून आला. खरा पण त्याच्या डोक्यातून तिचा विचार काही जातं नव्हता. ती त्याच्यावर प्रेम करतेय ही गोष्ट तर स्पष्टच होती तसे तिने त्याला विचारले ही होते. पण आपल्या बाबाचा स्वभाव बघता त्याला असे काही करणे योग्य वाटत नव्हते. त्यातच त्याची आणी महेश ची मैत्री. तसे त्याने महेश ला विश्वासात घेऊन सगळे सांगून टाकले होते. तिचे त्याला प्रपोज करणे , कॉलेज ला न येणे, त्याच्या नकारात्मक प्रतिसादा नंतर तिची झालेली अवस्था बघता महेश आणी त्याने संगनमताने तिला ह्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तिच्या बरोबर एक मित्र म्हणून सोबत राहायचे ठरवले. एकूण शशांक चा स्वभाव बघता महेश ला काळजी करण्यासारखे काही नव्हते.. उलट त्याच्या संपर्कात आल्या पासून ती जरा माणसात आल्या सारखी वाटत होती. हे सगळे इथं पर्यंत ठीक होते पण सतत तिच्या बरोबर राहून तिचे हट्ट पुरवता पुरवता आता शशांक पण तिच्यात गुंतून गेला होता. ह्या सगळ्या प्रेमाच्या भानगडी पासून दूर राहायचा प्रयत्न करणारा शशांक अलगद त्याच जाळ्यात अडकला होता. त्याने अजून तिला काही आपल्या मनातील सांगितले नव्हते... पण तिचे त्याला गृहीत धरणे , त्याची काळजी करणे हट्टाने त्याच्या कडून एखादी गोष्ट करून घेणे... हे सगळे त्याच्या साठी स्वप्नवत होते. आता येणारे दोन महिने जसे तिला कठीण होते तसेच ते त्याला ही कठीण होते.... माणसाचे कसे असते नां जो पर्यंत सवय नसते तो पर्यंत त्या शिवाय त्याचे काही अडत नसते पण एकदा कां सवय लागली की मग मात्र त्याचे सगळे आयुष्य अवघड बनत जाते. शशांक कितीतरी वेळ विचार करत होता. तिचा , तिच्या आई वडिलांचा , महेश चा त्यावर खूप विश्वास होता. त्याच्या बरोबर ती कधीही कुठेही जाऊ शकत होती. आणी हा विश्वासच त्याच्या मनावरील मोठे ओझे ठरत होता . शिवाय त्याच्या घरी काय प्रतिक्रिया येईल ह्याची त्याला अजिबात कल्पना नव्हती.


शेवटी मनातील सगळे विचार झटकत त्याने अभ्यासात लक्ष टाकले.. त्याला डॉक्टर बनवणे हे त्याच्या घरच्यांचे स्वप्न होते आणी त्यात तो अपयशी झालेला कोणालाही चालणार नव्हते...


आणी मग बघता बघता दोन महिने त्याने झटून अभ्यास केला... ह्या दोन महिन्यात माधवीच्या आठवणी त्याने मनाच्या कोपऱ्यात तात्पुरत्या बंद करून टाकल्या... कॉलेज मध्ये जाता येता ती दिसत असे त्यावेळी काही मिनिटापुरते त्यांचे बोलणे होई.. तेव्हडेच... आणी ह्या सगळ्याचा परिणाम दिसून आला.. त्याला पेपर चांगले गेले... अगदी टॉपर नाही तर पहिल्या पाचात आपण असू असा त्याला विश्वास वाटू लागला. पेपर च्या वेळा आर्ट्स आणी सायन्स च्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे माधवी आणी त्याला परीक्षेच्या काळात भेटता येत नव्हते. पण पहिल्या दिवशी ती आपला पेपर देऊन त्याला बेस्ट ऑफ लक दयायला आवर्जून थांबली होती.


आठ दिवस कॉलेज चे वातावरण खूपच तंग होते. वर्षभर हातात पुस्तक न घेतलेली मुले पण पुस्तकं वाचताना दिसत होती. जिकडे बघावे तिथे सगळे पुस्तकात मग्न... जे पॉईंट खास करून लव्हर पॉईंट म्हणून कॉलेज मध्ये प्रसिद्ध होते ते सुद्धा तात्पुरते लायब्ररी मध्ये बदलल्याचे दिसत होते. अर्थात तिथे पण जोड्याने अभ्यास चालू होता.. आता अश्याने अभ्यास कसा व्हावा?.. आहे नां गंम्मत.. !


पण बघता बघता हे आठ दिवस पण गेले. पेपर चांगले गेले असल्यामुळे त्याला पण आनंद झाला. पण एव्हड्या दिवसात जीव तोडून अभ्यास केला असल्यामुळे त्याच्यावर खूप ताण आला होता. आता उद्याचा दिवस मस्त निवांत झोपून काढायचा हे त्याने रात्रीच ठरवले होते. अगदी जेवायला पण उठायचे नाही.


पण कधी कधी माणूस ठरवतो एक आणी घडते एक हे मात्र अगदी खरे आहे. सकाळी सकाळी त्याचा मोबाईल कोकलायला लागला..


वैतागाने त्याने मोबाईल स्क्रिन कडे नजर टाकली तर माधवी हे नाव फ्लॅश होत होते... त्याला इतका कंटाळा आला होता पण कॉल कट करायची त्याची हिम्मत झाली नाही थोडावेळ वाजून मोबाईल बंद झाला. आणी त्याने सुटकेचा निस्वास सोडला आणी परत कूस बदलून डोळे मिटून घेतले आणी परत मोबाईल वाजू लागला... परत तीच...

असे पाच सहा वेळा झाले ती कंटाळुन कॉल करायचे थांबेल अशी जी आशा त्याला वाटत होती ती फोल ठरवत ती परत परत कॉल करत राहिली.. आता मात्र त्याला मोबाईल उचलावाच लागला.


" हॅलो..."


" काय करत होतास? कधीची फोन करतेय मी ?"


" काय झाले ?"


" उठलास...?"


" अग आता सकाळचे सात वाजलेत एव्हड्या लवकर कोणी उठते कां, ते पण काल परीक्षा संपल्यावर..."


" हां... ठीक आहे.... मी अर्ध्या तासात येतेय पटकन आवरून तयार राहा..."


" ए... बाई तू आज येऊ नकोस आज मला आराम करायचा आहे.. तुझे जे पण काय आहे ते आपण उद्या बघू...."


" अहं.... आज म्हणजे आज.... मी येतंय आणी जर तू तेव्हा उठला नशील तर बादलीभर थंड पाणी ओतीन मी अंगावर... लवकर... अर्ध्यातासात तयार राहा. " आणी त्याला पुढे काही बोलून न देता तिने कॉल कट केला...

तो चडफडत उठला... ती आली आणी तो तयार नसेल तर ती बोलल्या सारखे करणार ह्या बद्दल त्याच्या मनात बिलकुल शंका नव्हती. पटापट आपले आवरत त्याने बाईक ची चावी खिशात टाकली... आणी बिल्डिंग खाली आला... काही मिनिटातच ती पण आली..


" बोला मॅडम , काय सेवा करू आपली ?"


" आज मॅडम ला लांब कुठे तरी फिरायचा मूड आलाय तेव्हा चला मॅडम ला घेईन... " ती पण मोठ्या ठेचात म्हणाली.


" काय... ? अजिबात नाही हां... " तो वैतागला होता. लांब कुठे तरी म्हणजे त्यालाच गाडी चालवायची होती.


" ए... असे नाही हा... काल परीक्षा संपल्या आहेत आणी ठरल्या प्रमाणे आपण एकमेकांना भेटलो पण नाही. त्यामुळे आज मी तुझे काही एक ऐकणार नाही... चल..." नाईलाज झाल्याने तो गुपचूप बाईकवर बसला... त्याच्या मागे ती बसली..


रस्त्यावरील तुरळक वर्दळीतून सफाईदार वाट काढत तो बाईक चालवत होता. काही वेळाने ते शहराच्या बाहेर आले... हळूहळू शहर मागे पडले आणी ते हायवे वरून धावत होते... जवळ जवळ साठ एक km गेल्यावर त्याने बाईक एका आडरस्त्याने बाजूला काढली.. काही वेळ काहीश्या कच्या रस्त्यावरून बाईक चालवत त्याने पुढे एका मोठ्या गेट समोर गाडी उभी केली. आणी त्याने आपल्या बाईक बाईक चा हॉर्न वाजवला...


" आज रिसॉर्ट बंद आहे... " गेटमधून एका वयस्कर माणसाने डोकावत उत्तर दिले. शशांक च्या डोक्यावर हेल्मेट होते. शशांक ने डोक्यावरचे हेल्मेट काढले.


" माझ्या साठी पण बंद आहे कां ? " त्याने हसत विचारले...


" अरे सरदार.... छे तुमच्या साठी कसे बंद असेल. " त्याला निरखत त्या माणसाने पुढे होत त्याला लवून नमस्कार केला.


" काका....तुम्हाला माहित आहे हे मला आवडत नाही.... शशांक म्हणाला...


" असुदे... छोटे सरदार.... या आता या.... " त्याने त्यांच्या साठी रिसॉर्ट चा भला मोठा दरवाजा उघडला शशांक ने बाईक आत घेतल्यावर त्याने दरवाजा पुन्हा लावून घेतला..


" काय काका... आज रिसॉर्ट बंद कां?"


" थोडी डागडुजी करायची होती म्हणून बंद ठेवले होते तर तो कॉन्ट्रॅक्टरच आला नाही म्हणाला उद्या येतो.."


" बरं श्याम कुठे आहे ?"


" बाजारात गेलाय... " तो पर्यंत माधवी आत जाऊन तो रिसॉर्ट बघत होती.. मोठा स्विमिंग पूल , वेगवेगळ्या स्लाईड्स सगळे बघून ती हरकून गेली. इथे येण्याचा सगळा क्षीण ते पाणी बघूनच निघून गेला..


" अरे यार आधी सांगितले असतेस तर मी कपडे घेऊन आले असते... मस्त धम्माल केली असती नां..."


" कपडे... ते काय मागवता येतील... शशांक सहज म्हणाला..


" कसे काय ?"


" बघच आता... " त्याने मोबाईल वरून श्याम ला फोन लावला..


" हॅलो " पलीकडून आवाज आल्यावर त्याने बोलायला सुरवात केली..


" कुठे आहेस ? मी रिसॉर्ट वर आलोय.. "


" हां काय निघालो... " थोड्या वेळात पोचतो..


" ऐक नां.... एक काम कर आम्ही आज इथेच जेवून जाणार आहोत तेव्हा जेवायला मस्त काही तरी कोंबडी वैगरे बघ... "


" आम्ही...? किती लोक आलेत तुम्ही ?" श्यामने पोटात गोळा येऊन विचारले. कुक ला आज सुट्टी दिली होती कारण रिसॉर्ट बंद होते.


" आम्ही म्हणजे मी आणी माझी एक मैत्रीण आलोय... "


" अरे वा... मैत्रीण ? प्रगती आहे सरदार तुमची... " त्याची फिरकी घेत श्याम म्हणाला...


" ए... असे काही नाही... उगाचच आगाऊपणा करू नको... बरं ऐक नां... आम्ही इथे आलो पण घाईत काही कपडे वैगरे आणले नाहीत.. आणी आता मॅडम नां पाण्यात जायची हौस आली आहे... "


" मग ठीक आहे नां... मी येताना कपडे घेऊन येतो.. तू फक्त माप सांग..." तो हसत म्हणाला..


" शाम्या... मी काय मापे काढत फिरतो काय...? "


" अरे मग कपडे कसे आणणार... स्विमिंग कॉस्ट्यूम आणायचा तर माप बरोबर नको.. "


" मी एक काम करतो तुला फोटो पाठवतो.. त्या प्रमाणे दुकानातून घेऊन ये आणी मला पण आण... "


" ठीक आहे... अजून काही हवय ? "


" नको एव्हडे घेऊन लवकर ये... "


" बरं... "


" चल झाली सोय कपड्याची काही वेळातच श्याम येईल कपडे घेऊन.. "


" हे कोणाचे रिसॉर्ट आहे ? "


" ते काका बघितलेस नां.. ते श्याम चे वडील त्यांनीच हे रिसॉर्ट उभे केले. ही जमीन खुप वर्षांपासून त्यांच्या कडे पडून होती. मग माझ्या वडिलांच्या सल्ल्याने आणी मदतीने त्याने दोन वर्षापूर्वी हे चालू केले. श्याम आणी मी एकत्रच शिकलो... एकाच गावात वाढलो माझा खास दोस्त आहे... "


" ह्म्म्म..."


काही वेळानी श्याम कपडे घेऊन आला.. त्याच्या बरोबर ओळख करून दिल्यावर तो जेवणाच्या तयारीला लागला.. आणी हे दोघे पाण्यात उतरले.. त्या तंग स्विमिंग कॉस्ट्यूम मध्ये तिचे गोरेपान अंग अगदी चमकून दिसत होते. छातीचे उभार प्रकर्षानं नजरेत भरत होते. खांद्यावरून ओघळणारे पाणी पुढे तिच्या छातीच्या खोल घळीत नाहीसे होत होते. शशांक तिच्या बरोबर मस्ती करत होता , खेळत होता पण त्याचे लक्ष तिच्या शरीरावरुन काही बाजूला होत नव्हते... आता आता तिच्या पण ते लक्षात आले होते. ती होता होईल तेव्हडे अंग झाकायचा प्रयत्न करीत होती. शेवटी तिला लाज वाटू नये म्हणून शशांक पाण्यातून बाहेर आला... पण ती अजून पण लहान मुलांसारखे पाण्यातच खेळत होती..

खूप वेळ झाला. जेवण पण तयार झाले म्हणून शशांक तिला बोलवायला आला. आता जवळपास कोणी नसताना ती बिनधास्त पाण्यात खेळत होती तिचा कॉस्ट्यूम बराच गळ्या खाली सरकला होता. त्यातून दिसणारी उन्नत उरोजाची घळ त्याचा श्वास वाढवायला पुरेशी होती..


" माधवी जेवायचे नाही कां ? आपल्या मुळे ते पण खोळंबून राहिले आहेत. " तो म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून ती पाण्याबाहेर आली. तो बोलत होता तरी त्याची नजर मात्र तिच्या अंगावरचं फिरत होती. तसा तो काही स्त्री लंपट नव्हता पण एकतर नेहमी माधवीचा सहवास आणी त्यात आता तिचे हे असे रूप बघून तो स्वतः वरचा ताबा हरवत चालला होता..

तिला ते कळले होते. तिला बरं पण वाटत होते आणी लाज पण वाटत होती. ती सावकाश त्याच्या समोर आली. आणी त्याच्या डोळ्यावर तिने हात ठेवला...


" आता काय झाले ?" त्याने विचारले.


"'मागासपासून बघतेय तुझी नजर सारखी माझ्या शरीरावरूनच फिरते आहे..." तिने लाजत सांगितले.


" आता तू आहेसच एव्हडी सुंदर की ..... "


" की ? " तिने परत त्याला विचारले


" जाऊदे.... तू लवकर आटपून घे आणी जेवायला ये.." तो म्हणाला आणी वळून चालू लागला... त्याला फार गिल्टी फील होत होते. थोड्या वेळानी ती कपडे बदलून आली.. आणी त्यांची जेवणे झाली. जेवताना पण शशांक तिची नजर चुकवत होता. त्याच्या मनाचा अंदाज तिला आला.. जेवल्यावर तो शांत झुल्यावर बसून होता.. तेव्हा ती तिथे आली.


" शशांक काय झाले ? तू माझ्या कडे बघायचे पण टाळत आहेस... "


" माधवी.. आय एम सॉरी.... पण आज मला काय झाले माहित नाही.... "


" शशांक..... हे नॅचरल आहे... मला काही त्या गोष्टीचा राग आला नाही... तू उगाचच मनाला लावून घेऊ नकोस... मला माहित आहे तुझ्या हातून काही वेडेवाकडे होणे शक्यच नाही.... नाहीतर तुझ्या बरोबर कधीही , कुठेही अशी फिरायला आली असती. तेव्हडा विश्वास तर आहे माझा तुझ्यावर... "


" खरंच... तुला राग नाही नां आला... "


" नाही आला... आता तू पण मनाला लावून घेऊ नकोस नाहीतर सगळ्यां चांगल्या दिवसाची वाट लावशील... "


" ओह... माधवी यु आर रियली ग्रेट...माझ्या मनाला काय काय वाटत होते. " शशांक म्हणाला त्याचे डोळे पाणावले होते. त्याने सहज तिला प्रेमाने मिठी मारली. आज ओळख झाल्या पासून पहिल्यांदाच माधवी त्याच्या मिठीत होती. त्याच्या मिठीतुन सुटण्याची तिने अजिबात घाई केली नाही...आपल्या आवडत्या व्यक्तीच्या मिठीत काय सुख असते ते आज दोघांना कळले... शशांक ने सावकाश तिला सोडले. त्याची नजर तिच्या नजरेत मिसळली तशी तिने लाजून आपली नजर खाली केली.

त्याने हळुवार आपल्या तर्जनीने तिची हनुवटी वर उचलली...


" तू मला नेहमी विचारायचीस की तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे कां ? आता सगळ्यांना सांगू शकतेस आहे म्हणून.."


ती त्याचे बोलणे ऐकून खूप लाजली आणी पुन्हा त्याच्या मिठीत शिरली.. आता मात्र शशांक ने तिला अगदी व्यवस्थित आपल्या छातीशी घेतले. त्याचा हात तिच्या डोक्यावरून फिरत होता. त्या नंतरचा सगळा वेळ त्यांनी एकमेकांच्या बाजूला अगदी खेटून बसत काढला..


संध्याकाळी ते घरी परत निघाले तेव्हा श्याम आणी काका त्यांना निरोप दयायला गेट पर्यंत आले. शशांक पैसे देत होता पण त्यांनी ते अजिबात घेतले नाहीत.. शेवटी नाईलाजाने शशांक त्यांचा तसाच निरोप घेऊन निघाला.. जाताना आज माधवी त्याला अगदी चिटकून बसली होती. संध्याकाळ झाली होती हवेत गारवा होता. तिचे तसे चिटकून बसणे दोघांना पण उब देत होते.


" आज एका दगडाला विरघळताना पाहिले मी..." ती त्याच्या काना जवळ येऊन हळूच म्हणाली.

त्यावर तो मंद हसला.. तिचे प्रेम आपण कबूल केले खरे पण ह्याचे परिणाम पुढे काय होतील हे आठवून त्याला आता छातीत धडकी भरली होती...


पुढील भाग लवकरच.....


© सर्वाधिकार लेखकाकडे..


Rate this content
Log in