अवखळ प्रेम (भाग 4)
अवखळ प्रेम (भाग 4)


मागील भागावरून पुढे ......
माधवी दोन चार दिवसात कॉलेज ला येईल अशी जी आशा वर्षा आणी तिच्या मैत्रिणींना होती त्या उलट आठवडा झाला तरी माधवी कॉलेजला आली नाही. शेवटी काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी ती एके दिवशी माधवीच्या घरी गेली.
तिला बघून माधवीची आई काहीशी सुखावली कारण तिने काय झाले आहे ते घरी कोणालाच सांगितले नव्हते. पण आता वर्षा आली होती. वर्षा माधवीची खूप जवळची मैत्रीण होती. आता नक्की काय झाले ते कळणार होते. आईने तिला व्यवस्थित समजावून माधवीच्या रूम मध्ये पाठवले.
" काय ग , काय झाले ? आठवडा झाला कॉलेज ला का येत नाहीस ? " माधवीने तिच्या रूम मध्ये शिरत विचारले. तिच्या रूम मध्ये नुसता पसारा पडला होता. आठवड्यापासून रूम मध्ये आवराआवर केलेली दिसत नव्हती.
" काही नाही ग ! कॉलेज ला यावे असे वाटतच नाही.."
" असे काय झाले ?"
" जाऊ दे.... तू बोल , तू कशी आहेस.. बरं झाले आलीस ते मी पण खूप बोर झाली होती."
" विषय बदलू नकोस.... काय झाले ते मला सांग..."
" अग काही झालेले नाही... खरंच "
" तुला माझी शपथ आहे.... आता सांग... " माधवी काही तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हती. आणी आता तिने आपली शपथ घालून तिला बरोबर कोंडीत पकडले होते.
" वर्षा.... त्या दिवशी मी शशांक ला पुन्हा विचारले ग... पण तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे. आणी आता कॉलेज ला आल्यावर पुन्हा पुन्हा तो समोर येत राहिला तर मी स्वतःला नाही ग सावरू शकत... त्यामुळेच मला कॉलेज ला यावेसे वाटत नाही.."
" अग पण तू चांगली शिकवीस किमान ग्रॅज्युएट व्हावीस अशी तुझ्या आई वडिलांची इच्छा आहे नां, मग अश्या गोष्टीचा ताप घेऊन तू शिक्षण अर्धवट सोडणार कां ?"
माधवी तिला समजवायचा प्रयत्न करत होती.
" तुला तर माहीत आहे की माझा अभ्यास काय आहे.. जेमतेम पास होऊन मी अशे काय दिवे लावणार आहे... त्यापेक्षा नकोच..." माधवी तिचे म्हणणे खोडून काढत म्हणाली..
" ठीक आहे आता तू ठरवले आहेस तर मग मी काय बोलणार..? चल मी येते.. " वर्षा उठत म्हणाली.
" अग आताच आलीस आणी लगेचच काय निघालीस..?"
" नाही जाते... " असे म्हणून वर्षा तिथून बाहेर पडली.. पण रस्त्यात ती त्याच गोष्टीचा विचार करत होती. हा शशांक आला आणी सगळा गोधंळ झाला होता. त्याला पण काय माज होता माहित नाही ती इतके प्रेम करत असून पण त्याला तिचे प्रेम दिसत नव्हते.. त्याला एकदा ह्याचा जाब विचारायचाच असे मनात बोलत ती घरी निघाली.
दुसऱ्या दिवशी शशांक तिला भेटला तो पण एकटाच मग काय...
" शशांक.... काल माधवी कडे गेली होती..."
" हो का ..? काय झालंय बरी आहे नां ती.. नाही आठवडाभर आली नाही कॉलेजला म्हणून विचारतोय.."
" आता ती कॉलेज ला येणार नाही... कधीही..."
" का ? असे काय झाले ?"
" तुला चांगले माहीत आहे काय झाले ते ..ती तुझ्यावर जीवापाड प्रेम करते आहे पण ते तुला दिसत नाही. पण तू तिला सारखे नाही म्हणून तिला आणखीन दुःख देतोस.. तुला आवडत नाही म्हणून ती स्वतःला बदलायला लागलीय... भांडणे वैगरे तिने सोडून दिलीत.. ह्या आधी अशी तिला कोणासाठी बदलताना मी तरी पाहिली नाही.. अगदी महेश भाई साठी पण नाही.. " वर्षा क्षणभर बोलायचे थांबली..
" ती धड जेवत नाही की घरात कोणाशी बोलत नाही. तिची आई मला सांगत होती. दिवसदिवस आपल्या रूम मध्येच बसून असते.. अश्याने ती वेडी होईल... मी तिला खूप जवळून ओळखते आयुष्यात पहिल्यांदा तिला कोणी आवडले होते. पण त्यात पण तिचा अपेक्षाभंग झाला.. ती ह्यातून सावरणे कठीण आहे. " वर्षा म्हणाली आणी त्याच्या उत्तराची अपेक्षा करत होती. पण शशांक निर्विकारपणे बसून विचार करत होता... म्हणून ती तिथून क्लास मध्ये निघून आली.
शशांक शांतपणे परिस्थितीचा विचार करत होता. त्याचे आणी महेशचे मैत्रीपूर्ण समंधात आता तिच्या मुळे खूपच वादळ उठणार होते.. ह्यावर एकच उपाय त्याला दिसत होता... उलट सुलट विचार करून शेवटी तो त्याच निर्णयावर आला होता.
संध्याकाळी त्याने सरळ बाईक तिच्या घराकडे वळवली..
दरवाजा वाजवल्यावर तिच्या आईने दरवाजा उघडला.
" नमस्कार आई... मी शशांक... महेश आणी माधवीचा मित्र आहे.."
" अरे तू शशांक आहेस कां ? " आई पटकन म्हणाली तसा तो चमकला...
" अरे त्या दिवशी त्या गुंडाच्या तावडीतून माधवीला सोडवलेस नां...." महेश मला सांगत होता...
" आच्छा ते होय... नेमका मी पण उशिरा निघालो होतो. आणी रस्त्यात मला तो सगळा प्रकार दिसला म्हणून.... "
" ये... आत ये... " आईने त्याला आत घेतले...
" माधवी कॉलेज ला येत नाही म्हणून मी पाहायला आलो होतो... "
" अरे काही कळतच नाही.. कोणाशी काही बोलत नाही. काय झालेय ते सांगत नाही. आठवडा झाला आपल्या रूम मध्येच बसून आहे. जरुरी पुरती बाहेर येते धड जेवत नाही की कॉलेज ला जातं नाही... मला तर बाई ह्या मुलीचे काही कळत नाही... "
" मी बघतो कुठे आहे ती? "
" तिच्या रूम मध्ये आहे... तू बस तिच्या रूम मध्ये मी तुला चहा आणते..." आईने शशांक ला तिची रूम दाखवली.. त्याने दरवाजा ढकलला पण आतून बंद होता.. म्हणून त्याने दरवाजा वाजवला... काही वेळानी दरवाजा उघडला. आणी त्याला समोर बघून माधवी चमकली... एक चमक तिच्या डोळ्यात चमकली आणी सावकाश कमी कमी होत नाहीशी ही झाली.
" काय झाले ? काय अवस्था करून ठेवली आहेस स्वतःची.." तिच्या मागे तिच्या रूम मध्ये शिरत त्याने विचारले. ती त्यावर काही म्हणाली नाही. पण तिचे डोळे पाणावले होते हे त्याच्या लक्षात आले होते.
" तू कशाला आलास ? "
" सहजच आलो , म्हंटले बघू तरी काय झालेय. तू ऐकणार नाहीस तर..? "
" आता काय झाले ? "
" तुला त्या दिवशी इतके समजावले पण सगळे पालथ्या घड्यावर पाणी.... आता माझ्या कडे पण काही पर्याय राहिला नाही... "
" म्हणजे....? "
" मी कॉलेज सोडतोय... उद्या त्याबद्दल सगळ्या प्रक्रिया पूर्ण करीन.. माझ्या गावाकडे मला ऍडमिशन मिळून जाईल... पण आता इथे राहणे मला शक्य नाही.... " तो क्षणभर थांबला.
" ह्या कॉलेज मध्ये शिकायची खूप इच्छा होती म्हणून इथे ऍडमिशन घेतले होते पण बहुतेक माझ्या नशिबात इथे शिकणे नाहीच असे दिसतेय..." त्याच्या त्या निर्णयावर ती चमकली.
" पण तू कां कॉलेज सोडतो आहेस ? "
" कारण तुला माहीत आहे... असो आता मी माझा निर्णय बदलणार नाही.. मी एव्हडेच सांगायला आलो की, आता तुला कॉलेज ला यायला काही हरकत नाही.... आणी दोन चार दिवसात मी एक सेंडॉफ पार्टी देणार आहे आणी त्या वेळी तुला यायचे आहे... " तेव्हड्यात आई चहा घेऊन आली. त्याला चहा देऊन ती तिथेच शशांक बरोबर गप्पा मारत बसली.
" शशांक तू हिच्या बरोबरच आहेस कां ? "
" नाही आई मी एक वर्ष जुनियर आहे.. "
" आच्छा.. मला वाटले की तू हिच्या बरोबरच आहेस की काय ? आणी महेश ला कसा ओळखतॊस ? "
" तो सायन्स ला मला सिनियर आहे. काही प्रॉब्लम असेल तर , काही नोट्स वैगरे साठी त्याला भेटायचो अशी त्याची आणी माझी ओळख झाली... "
" ह्म्म्म.... चांगला अभ्यास करा रे... पुढे त्याचाच तुम्हाला फायदा होईल... "
" ह्म्म्म.... मी आता कॉलेज सोडतोय... माझ्या गावी जातोय.. तेथेच ऍडमिशन घेईन. "
" का रे...? आई चमकली..
इथे काही प्रॉब्लम आहे कां ? "
" नाही प्रॉब्लम नाही. पण घरचे एव्हड्या लांब पाठवायला आधी पासूनच तयार नव्हते पण मीच हट्टाने इथे आलो. आणी आता त्याचा पश्चताप होतोय मला.. " माधवी कडे एक नजर टाकत तो सावकाश म्हणाला.
" म्हणजे ? "
" आता मला त्यांची खूप आठवण येते. त्यामुळे मी परत जातोय.. आधी कधी त्यांच्या पासून लांब राहिलो नाही नां म्हणून...
" असं... ह्म्म्म... अग बाई गॅस वर दूध ठेवले आहे.. "आईला अचानक आठवले आणी ती घाई घाई ने उठली..
" मला माहीत आहे तू घरची आठवण येतेय म्हणून जातं नाहीस... " माधवी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली.
" बरोबर आहे.... वर्षा काल मला म्हणाली. आता तू ऐकणार नाहीस मग माझ्या पुढे दुसरा काही मार्गच राहिला नाही. "
" नको नां रे जाऊ.... तू गेलास तर मला शेवट पर्यंत गिल्टी फील होत राहील.. "
" आता ती वेळ निघून गेलीय... आणी इथे राहिलो तर परत परत हीच वेळ येत राहील.. त्या पेक्षा नकोच... आता माझा निर्णय झालाय... उद्या मी वडिलांना फोन करून सांगतो ते तिकडे ऍडमिशन चे बघतील.. त्यांचे वजन बघता ते काही फार अवघड नाही... "
" प्लिज... शशांक असे नको रे करू..." तिने पटकन त्याचा हात पकडला...
" तू आता बोलशील तशीच मी वागेन.. ह्या पुढे मी कधीही तुला पुन्हा त्रास देणार नाही.. उद्या पासून कॉलेज ला पण येते.. पण तू जाऊ नकोस.. माझे काय आहे.. आर्ट्स साईड आहे... पण तू स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस.." शशांक शांतपणे तिच्या कडे पाहत होता..
" उद्या पासून रोज कॉलेज ला येशील..? "
" हो... "
" नीट शहाण्यासारखी वागशील ? "
" तुझी शपथ.." ती सिरीयसली म्हणाली..
" म्हणजे परत मलाच पणाला लावलेस..." तो हसत म्हणाला.. त्यावर ती चिडली..
" तू असा मलाच माझ्या बोलण्यात पकडू नकोस... जा मला तुझ्याशी बोलायचे नाही.. "
" बरं.. सॉरी...उद्या तयार राहा.. मी तुला कॉलेजला न्यायला येतोय.. "
" काय ? "
" हो.... आता तू एव्हडे सगळे करणार आहेस तर मी तुझ्यासाठी एव्हडे नक्की करू शकतो.." तो ओठाच्या कडेवर हसत म्हणाला. आणी ती पण लाजली..
" चल.. आता मी निघतो..." तिने मान हलवून त्याला संमती दिली.. आणी आईचा निरोप घेऊन तो परत निघाला..
आज माधवी जाम खुश झाली...त्याने कॉलेज सोडण्याचे रद्द केले आणी तो तिला उद्या न्यायला येणार आहे. ह्या गोष्टीचा आनंद तिच्या सगळ्या हालचालीत दिसत होता.
पुढील भाग लवकरच....