Pratibha Tarabadkar

Horror Fantasy Thriller

3.9  

Pratibha Tarabadkar

Horror Fantasy Thriller

अष्टपाद भाग १

अष्टपाद भाग १

6 mins
264


मध्यरात्रीची नीरव शांतता.सारे जग जणू गाढ झोपी गेले होते.दुरुन एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्याचा अस्पष्ट आवाज येत होता. अचानक एक गढी दिसू लागली.पूर्णपणे ओसाड.मोठे मोठे बुरुज,भक्कम तटबंदी.बाहेरच्या बाजूला पाण्याचा तलाव.सारा आसमंत पूर्ण पणे निर्मनुष्य.ओसाड.माणूसच काय पण पशू पक्ष्यांचही वास्तव्य तिथे दिसत नव्हते.निश्चल, शांत गढी आणि घोंघावणारा वारा.

अचानक एक साधू त्या गढीसमोर प्रकट झाला.चंदनाचा लेप कपाळभर लेवून मधोमध लालभडक कुंकवाचा उभा टिळा,चेहरा भर दाढी मिशांचे जंगल,गळाभर रुद्राक्षांच्या माळा, डोक्यावर भगवे मुंडासे आणि अंगात भगवी कफनी.

पायातील खडावा खाडखाड वाजवत तो कुठून तरी अचानक प्रकट झाला आणि त्याने अजिंक्य कडे रोखून पाहिले. त्याची ती भेदक नजर...अजिंक्य नखशिखांत थरारला साधूने गढीकडे इशारा केला आणि आपल्या खणखणीत आवाजात म्हणाला,'अष्टपाद,अष्टपाद',साधूचा आवाज त्या निर्मनुष्य गढीच्या आसमंतात घुमला.त्या घनगंभीर शब्दाचे प्रतिध्वनी अजिंक्यच्या कानावर लाटांसारखे आदळू लागले आणि अजिंक्य खडबडून जागा झाला.त्याचे सर्वांग घामाने निथळत होते.त्याच्या कानात अजूनही साधूमहाराजांनी उच्चारलेल्या शब्दाचा प्रतिध्वनी आदळत होता...'अष्टपाद,अष्टपाद'.

  अजिंक्यला कळेना आपण जागे आहोत का स्वप्नात?तो हृदयाची वाढलेली धडधड नियमित होईपर्यंत बेडवर बसून राहिला.डोक्यात विचारांनी गर्दी केली होती.जवळ जवळ आठ दिवसांपासून त्याला रोज हे स्वप्न पडत होते.त्याचा दादा यश नाहीसा झाल्यापासून!मनहारीच्या जंगलात जातो म्हणून सांगून गेलेला यश जो गेला तो परतलाच नाही.

  यशची आठवण झाली आणि अजिंक्य खाडकन् जागा झाला.पटकन् उठून तो आईच्या खोलीत डोकावला.आईची झोपेत चाळवाचाळव चालू होती.मध्येच मुसमुसत होती, कण्हत होती, घालमेल झाल्यासारखी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती.अजिंक्य अस्वस्थ झाला.

साहजिकच आहे, एक अठ्ठावीस वर्षांचा तरणाबांड मुलगा जंगलात फिरण्याच्या छंदापायी मनहारी जंगलात जातो काय आणि अचानक अदृष्य होतो काय! कुठेही त्याचा थांगपत्ता लागत नाही.जणू काही हवेत विरघळून गेलाय!वनरक्षकांनी सारे जंगल पालथे घातले पण यशचा कुठे थांगपत्ता लागेना!

   अजिंक्यची झोप उडाली होतीच.त्याने यशचे कपाट धुंडाळायचे ठरविले.आधीसुद्धा शोधले होते पण काहीच धागेदोरे हाती लागले नव्हते.त्याचा लॅपटॉप सुद्धा पासवर्ड शिवाय उघडता येत नव्हता.यशच्या कपाटात जंगलाविषयी माहिती देणारी विविध पुस्तकं खच्चून भरली होती.रात्रीच्या त्या नीरव शांततेत अजिंक्य यशची पुस्तकं चाळत बसला.एका पुस्तकातून एक चिठोरे खाली पडले.त्यावर त्रोटक स्वरूपात लिहून ठेवले होते,'मनहारी जंगल,रांगनेरला जाणाऱ्या हायवेच्या ४५कि.मी.च्या दगडापासून आत शिरणे.कोकटू वस्ती, बारक्या वाटाड्या.'यशचे अक्षर अजिंक्यने ओळखले.

   अजिंक्य ते चिठोरे हातात धरून विचार करीत बसला.यशदादाचे जंगलवेड घरच्यांना कधीच पसंत नव्हते.घरचे म्हणजे कोण?तर आई आणि अजिंक्य!बाबांचा अपघाती मृत्यू यशदादा आठवीत असतानाच झाला होता.तेव्हापासून आईनेच नोकरी करुन दोघांना वाढविले,शिकविले होते.यशला लहानपणापासूनच जंगलात फिरण्याची ओढ !यश इंजिनिअर झाला.नोकरी करतानाच त्याला जंगलाची ओढ अनावर होई.आणि तो काहीतरी क्लृप्त्या लढवून ,रजेची तजवीज करून जंगलाकडे धाव घेत असे.विविध जंगलं त्याने पालथी घातली होती.मनहारी जंगलात तो नुकताच जाऊन आला होता पण कुठल्या तरी आकर्षणाने तो परत मनहारी जंगलात जाण्यासाठी निघाला होता.अजिंक्यने खोदून खोदून विचारले पण यशने उत्तर दिले नव्हते.असं कुठलं रहस्य होतं की तो सांगायला तयार नव्हता?मनहारीच्या जंगलातच तो हवेत विरघळल्यासारखा अदृष्य झाला होता?

 यश बेपत्ता होण्यात या मनहारी मध्येच काहीतरी रहस्य दडले आहे.अजिंक्यने मनाशी निश्चय केला.आपण स्वतः जाऊन याचा छडा लावायचा.आता आईला कसे पटवायचे हा मुख्य प्रश्न होता.बॉटनीची स्टडी टूर आहे म्हणून सांगून निसटावे.त्याने ताबडतोब गुगल सर्च करून मनहारी जंगल कुठे आहे त्याचा शोध घेतला आणि तो जंगलात लागणाऱ्या वस्तूंची जुळवाजुळव करु लागला.

  'यश गेला, आता तूही मला सोडून जातोस का?'आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं.'अगं आई, जाणं कंपल्सरी आहे.सरांनी बजावलंय, कोणीही स्टडी टूर चुकवायची नाही म्हणून!'आईशी खोटं बोलणं अजिंक्यला जड जात होतं पण यशला शोधायला मनहारी जंगलात जातोय असं सांगितलं असतं तर तिने कदापि सोडलं नसतं.

     कानेरीगंज स्टेशनवर अजिंक्य उतरला तेव्हा सकाळचे सात वाजले होते.हवेत बऱ्यापैकी गारवा आणि सभोवताली धुके पसरले होते.रांगनेरला जाणाऱ्या बसमध्ये अजिंक्य चढला.बसमध्ये तुरळक बसलेली माणसं या शहरी बाबू कडे अचंब्याने बघत होती.अजिंक्य पुढच्या सीटवर बसला.त्याला ४५ कि.मी.च्या दगडावर लक्ष ठेवायचे होते ना!

    कानेरीगंजची हद्द संपली आणि घनदाट जंगल सुरु झाले.जिकडे नजर जाईल तिथे हिरवीगार वनश्री! एकदा रस्त्याच्या कडेला हत्ती झाडाची फांदी सोंडेने वाकवताना दिसला तर एकदा हरणांचा एक कळप उंच उड्या मारत रस्ता ओलांडून पलीकडे गेला.आतापर्यंतचे सारे आयुष्य मुंबईत गेलेल्या अजिंक्यला ते दृष्य फारच विलोभनीय वाटले.'उगाच नाही यशदादा जंगलाच्या प्रेमात पडला', त्याला वाटले.यशच्या आठवणीने तो भानावर आला.

    ४५ कि.मी.दर्शवणाऱ्या दगडापाशी अजिंक्य उतरला.जंगलाची प्रदूषण विरहित हवा त्याने छाती भरुन घेतली आणि सरळ जंगलात घुसला.मोठमोठ्या पानांचे वृक्ष सभोवताली पसरले होते.त्याला जाणवलं, या रस्ता विरहित विस्तीर्ण अशा जंगलात आपण एकटेच आहोत.आसपास कुठेही मानव वस्ती दिसत नाही.अजिंक्यचे हृदय धडधडू लागले.एका विशालकाय वृक्षाच्या बुंध्याला टेकून तो थोडा वेळ उभा राहिला.हृदयाचे ठोके नियमित झाल्यावर तो पुढे चालू लागला.दूरवर वृक्षाची फांदी मोडल्याचा कडकड असा अस्पष्ट आवाज येत होता.'हत्ती', अजिंक्यच्या मनाने नोंद घेतली आणि तो वेगाने पाय उचलू लागला.थोडे अंतर गेल्यावर त्याला झोपड्यांचा एक समूह दिसू लागला.यशदादाच्या नोंदीतील कोकटू वस्ती हिच असावी.अजिंक्यने अंदाज केला.एक बाई डोक्यावर पानांचा हारा घेऊन जाताना दिसली.अजिंक्यने वेगाने तिला गाठले.ती आदिवासी स्त्री या अनोळखी मुलाला पाहून गर्भगळीतच झाली.पानांचा हारा टाकून ती पळण्याच्या बेतात होती पण अजिंक्यने तिला खाणाखुणांच्या साह्याने विचारले,'बारकू?'तसा तिच्या जिवात जीव आला व अजिंक्यच्या मदतीने तो हारा परत डोक्यावर घेत तिने अजिंक्यला आपल्या मागून येण्यास खुणावले.ती एका झोपडीसमोर उभी राहिली.समोर एक उकीडवा बसून चिलीम ओढणारा वृद्ध बसला होता.त्याच्या अंगावर फक्त लंगोटी होती तर जवळच एक वृद्ध स्त्री हातभर आकाराची पानं एकमेकात विणण्यात गुंग झाली होती.घराचं छत शाकारण्यासाठी कदाचित! दोघांच्या मध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे अंगभर सुरकुत्यांचं जाळं! भलतंच कष्टप्रद जीवन असावं त्यांचं!

अजिंक्य बरोबर आलेली ती स्त्री एका अगम्य भाषेत बोलली त्यामधील फक्त 'बारकू'हा शब्द त्याला कळला.म्हाताऱ्याने डोळे किलकिले करून अजिंक्य कडे पाहिले.पानं विणण्याचे काम अर्धवट सोडून ती वृध्द स्त्री उठली आणि घरातून पाणी व बसायला पानांची चटई घेऊन आली . बारकू बाहेर गेला आहे असे खुणेनेच सांगितले.अजिंक्य पाठीवरची सॅक टाकून चटईवर बसला.तेव्हाच त्याला जाणवले की आपण फार दमलो आहोत.प्रवासाने अंग पार आंबून गेले आहे.तो चटईवर रेलला.कानेरीगंजला उतरल्या उतरल्या आईला फोन केला ते बरं झालं.या जंगलात कसं नेटवर्क मिळालं असतं, विचार करता करता त्याचा डोळा लागला.

    कोणीतरी आपल्याला जोरजोरात हलवते आहे हे जाणवून अजिंक्यने डोळे उघडले.एक काटकुळा तरुण त्याच्यावर ओणवून बघत होता.अजिंक्य धडपडून उठून बसला.'मी बारकू',समोरचा तरुण म्हणाला.'हा माझा बापूस उकंड्या आणि ही माझी माय राणूबाई.'दोन्ही वृद्धांकडे बोट दाखवत तो म्हणाला.

    'मी अजिंक्य,यशचा धाकटा भाऊ.'हे शब्द अजिंक्यने उच्चारले आणि बारकूचे डोळे विस्फारले.समोरच्या त्याच्या आई-वडिलांचीही गडबड उडाली.ते त्यांच्या भाषेत काहीतरी बोलू लागले.'माझे आईवडील म्हणताहेत, खूप दिवसात यशभैय्या आला नाही.लयी भला माणूस.'बारकूने भाषांतर केले.'तो इथे आला नाही?'अजिंक्य चकीत झाला.'आम्हाला सांगितलं की मनहारी जंगलात जातोय आणि आठ दिवसांपूर्वी घरातून गेलाय तो परत आलाच नाहीय.त्यालाच शोधायला मी आलोय. वनरक्षकांना कळवले, त्यांनीही शोध घेतला पण त्यांना पण तो सापडला नाही म्हणून मी आलोय तुमची मदत मागायला.'

     बारकूचा बापूस अजिंक्यचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता.तो हातवारे करून बोलायला लागला आणि बारकूची आई डोकं धरून रडायला लागली.अजिंक्य घाबरून गेला.अचानक काय झाले त्याला कळेना.बारकू म्हणाला,'त्याला भूताच्या वाड्यात जायचे होते.हट्टच धरुन बसला होता.पण त्या वाड्यात भुतं रहात्यात.तिथं गेलेला कुणीबी जित्ता परत येत नाही.पाखरं आणि जनावरंबी तिथं जात न्हाईत.पण यशभैय्या म्हणाला, या सगळ्या अंध शरद्धा हायेत.जगात भुतं बितं काय बी नसत्यात.मी तिथं जाऊन परत येतो की नाही बघ पण माय आणि बापूस नी वाघोबादेवाची शपथ घातली तेव्हा तो घर ला ग्येला.आनि मंग गपचिप परत आला होता की काय!'

  अजिंक्यलाही भुताचा वाडा वगैरे गोष्टी हास्यास्पद वाटल्या.जंगलातील हे अशिक्षित आदिवासी, त्यांच्या भुतंखेतं, जादूटोणा असल्या अंधश्रद्धांवर शहरातील सुशिक्षित अजिंक्य थोडीच विश्वास ठेवणार होता?

    जेवण झाल्यावर बारकूने अंगणात शेकोटी पेटवली आणि झोपण्यासाठी दोन खाटा टाकल्या.अजिंक्य खुल्या आकाशातील चमचमणाऱ्या चांदण्या पाहून मंत्रमुग्ध झाला.झोपडीमध्ये बारकूच्या आई-वडिलांची निजानीज झाली.वातावरण अगदी सामसूम झाले.अजिंक्यने मनात खदखदणारा प्रश्न बारकूला विचारला.'बारकू,मला भुताच्या वाड्याकडे घेऊन जाशील?'

अजिंक्यच्या प्रश्नासरशी बारकू ताडकन् उठून बसला.'न्हायी बा, मी तुम्हाला अजाबात तिकडं घेऊन जाणार न्हायी आणि तुम्हीपण तिकडं बिलकुल जाऊ नका.लयी वंगाळ जागा हाये ती.तिकडं गेलेला माणूस जित्ता परत येत न्हायी!अवं माणूसच काय,जनावरंबी फिरकत न्हायी.'

   बारकूचे बोलणे ऐकून अजिंक्य ची उत्सुकता अजूनच शीगेला पोहोचली.त्याने बारकूची बरीच मनधरणी केली तेव्हा बारकू येण्यास तयार झाला.पण एका अटीवर.तो भुताचा वाडा लांबूनच दाखवून परत जाईल.पहिली चांदणी म्हणजेच शुक्राची चांदणी उगवली की निघायचा वायदा बारकूने केला.थोड्याच वेळात बारकू मंद सुरात घोरु लागला.अजिंक्यने डोळे मिटून झोपेची आराधना सुरू केली.सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते आणि निःशब्द शांतता!मधूनच अस्पष्ट अशी कोल्हेकुई ऐकू येई आणि परत तीच नीरव शांतता.आणि अचानक..... अजिंक्य च्या डोळ्यासमोर ती निर्मनुष्य गढी आली.तोच घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाज... आणि... आणि त्याच्यासमोर साधूमहाराज प्रकट झाले.तेच ते भेदक डोळ्यांचे, डोक्यावर जटा बांधलेले.अजिंक्यकडे त्यांनी रोखून पाहिले आणि गढीकडे इशारा करीत ते आपल्या घनगंभीर आवाजात म्हणाले,'अष्टपाद,यश,अष्टपाद...'

  त्यांच्या स्वरांचे प्रतीध्वनीत रुपांतर होऊन त्याच्या लाटा अजिंक्यच्या कानावर आदळत राहिल्या,'यश...अष्टपाद...यश....'


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror