अपयश ही यशाची पहिली पायरी आहे
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे
राजू पहाटेच उठला. पटपट तयारीला लागला. आज त्याला स्पर्धेस जावयाचे होते. २०० मी धावणे. त्याच्या आयुष्यातील महत्वाची स्पर्धा. त्यात जिंकल्यावर कॅश मिळणार होती.त्याचा उपयोग त्याला पुढील शाळेची फी भरावयाची होती. आपण जिंकणारच याची त्याला पूर्ण खात्री होती.तरिही मनाची चलबिचल होत होती. थोडेसे वॉर्मिंग अप करून आला .घाईघाईत तयारी करून देवाच्या पाया पडून स्पर्धेस निघाला.
मैदानात सारे जमले होते.बक्षिस खूप मोठे असल्याने गर्दी खूपच होती. प्रत्येकाला वाटत होते .हे बक्षीस मलाच मिळणार. सगळ्यांच्या चेहर्याागे प्रश्नचिन्ह होते. वरवर हास्य होते. एक अनामिक हुरहुर होती. नावाचा पुकारा होऊ लागला.राजूचेही नाव घेतले गेले. सगळे एक पाय पुढे एक पाय मागे पोझिशन मध्ये उभे राहिले. एक - दोन -तीन स्पर्धेस सुरुवात झाली.राजू नेट लावून धावू लागला तो प्रथम क्रमांकावरच होता . इतर स्पर्धक जोर लावून धावत होते पण राजू त्यांना अजिबात पुढे जाऊ देत नव्हता. नेटाने धावत होता . अगदी ५मी बाकी राहिले. त्याला धाप लागू लागली. बापरे ! हे काय ?हळूहळू तो मागे पडू लागला. त्याचा आत्मविश्वास खचू लागला. मागेच पडला. तोंडाशी आलेला घास गळून पडला.स्पर्धा संपली. जी आशा मनी धरली होती ती फोल ठरली. डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या. विमनस्क अवस्थेत तो घरी गेला. कशातही मन लागेना . शाळेत तर तो जाईचना. असेच तो विचारात मग्न बसलेला असताना समोर बघतो तर काय शाळेतल्या बाई चक्क घरी आल्या होत्या. तो उठून त्यांना सामोरा गेला. पण डोळ्यातील आसवांनी दगा दिला. ते भळाभळा वाहू लागले.शब्द फुटेना .बाईंनी त्याचे आसू पुसले. "अरे ,राजू वाईट वाटून घेऊ नकोस . आम्ही नेहमी सांगतो 'अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.अरे तुला आता अनुभव आलाय ना?तुझी नेमकी चूक ही समजली ना?तुझा सराव कमी पडला. दोन महिन्यांनी पुन्हा स्पर्धा आहे. आता जाणिवपूर्वक तयारी कर. अतिआत्मविश्वासा पेक्षा नेमका आत्मविश्वास ठेव. आता तू नक्की जिंकणारच."बाईंच्या या शब्दांनी राजू ला हुरुप आला.दोन महिने त्याच्या हातात होते.
तो सकाळ संध्याकाळ धावण्याचा सराव करू लागला. स्टॅमिना वाढवू लागला. खूप कडी मेहनत करू लागला. अपयशाने त्याचे डोळे उघडले होते.दोन महिने कधी सरले त्याला समजलेच नाही.
अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. राजू लवकर उठला. तयारी केली अन् देवाच्या पाया पडला. बाईंना भेटला.त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी आपण जिंकणारच आहोत या भावनेने न जाता जिंकण्यासाठी आपण काय काय करू शकतो हेच त्याच्या मनात होते.शांत ,आत्मविश्वास पूर्ण लक्ष्य समोर ठेवून तो ठाम उभा राहिला. ह्यावेळी तो पूर्ण तयारीतच होता.
एक - दोन -तीन सगळे ताकद एकवटून पळू लागले. राजूने ठरवले गेल्यावेळेसारखी आधीच सगळी ताकद वाया घालवायची नाही. तो एकसंघ स्पीडने धावत होता. श्वासावर त्याने नियंत्रण ठेवले. नाकाने श्वास घेऊन हळूच तोंडाच्या चंबूने श्वास सोडत होता त्यामुळे तो दमत होता. एका अपयशाने त्याला खूप काही शिकवले होते. हळूहळू बाकीचे जसे दमू लागले. तसा शेवटी त्याने जोर धरला. सगळ्याना मागे टाकू लागला. अन् बघता बघता पहिला आला. सगळ्यांनी त्याचे अभिनंदन केले. त्याची नजर त्याच्या बाईंकडे गेली. तो धावतच त्यांच्याकडे गेला. पाया पडून म्हणाला ,"बाई खरेच 'अपयश ही यशाची पहिली पायरी आहे' आता थांबणे नाही. "बाईंनी हसून आशिर्वाद दिला।,"यशस्वी भव ."