STORYMIRROR

Jayshri Dani

Romance

3  

Jayshri Dani

Romance

अनफ्रेंड

अनफ्रेंड

4 mins
167

      ज्या दिवशी तो तिला फेसबुकवर भेटला आणि तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली त्या दिवशी गच्च काळे नभ भरून पावसाळी वारे वहात होते. मग जशी संततधार सुरू रहावी तसे त्यांचे कधी मॅसेंजरवर तर कधी पटकन बरे पडते म्हणून व्हॉटसअपवर बोलणे सुरू झाले. 


      ती आपली एक छोट्या गावातली चित्रकार मुलगी. आजूबाजूचा निसर्ग न्याहाळून तो जसाच्या तसाच कॅनव्हॉसवर उतरविण्याचा तिला खुळा नाद ! तो तिच्या चित्रांवर आकर्षित झालेला एक बड़ा दिग्दर्शक. वयानेही जरा मोठा. दोघांची व्हेवलेंथ अगदी सहज जुळलेली. 


      नुकतेच साक्षगंध झालेल्या आपल्या भावी वराशी, विक्रमशी ती जितके बोलू शकत नसे तितके ती "त्यांच्याशी" बोलायची. हो "त्यांच्याशी ". ती त्याला मानाने अहो-जाहो असे संबोधायची तर तो तिला एकेरीने "तू -मी". छान सुरू होती दोघांची संभाषण यात्रा. मन मोकळे होत होते. 


"हाय रानभुली काय करतेस ?" एक दिवस पहाटेच त्यांचा मॅसेज आला.


"रानभुली ? हे काय नविन आता ?" 


"तुझे नविन नाव, सतत रानावनात फिरत असतेस ना! फुलांवर जीव लावतेस. वाऱ्यावर नाचणाऱ्या पानांवर थिरकतेस. म्हणून. माझी रानभुली". 


ती नादावली. 


काही वेगळे घडत होते. 


असे बोलणे विक्रमला का नाही सुचत ? तो आपला नेहमी कंप्यूटरमध्येच घुसलेला. विक्रमला सोडून आपण त्यांच्याकडे ज़रा जास्तच झेपावतोय का ? मनात उठलेल्या प्रश्नाने ती सर्र्कन दचकली. घरात आजूबाजूला पाहीले. तिच्यासारखेच तिचे घर लग्नाळू झाले होते. अहेरांच्या साडया, शर्टपिस, भांडीकुंडी सगळी तयारी जय्यत सुरू होती. आपण हे लग्न मोडावे का, चटकन तिच्या आत एक प्रश्न उमटला.


तितक्याच ताकदीने तिने तो उपटून फेकला. परंतु आपणही त्यांच्याकड़े झुकतोय याची तिला ठळक जाणीव झाली.


      दुपारी नारळसुपारीच्या बागेत बरसणाऱ्या रिमझिम धारा बघत ती निवांत बसली असताना पुन्हा त्यांचा मॅसेज आला. क्षणभर तिला वाटले नको ते वाचणे आणि पुन्हा त्या मंत्रमुग्ध शब्दात हरवून जाणे. 


"तू मला तुझे रान दाखवशील का?" 


अरे किती साधे सरळ तर विचारले त्यांनी.


आपण उगाच फार खोलात शिरतोय. मग तीही पुष्कळशी निश्चिंत होवून तासभर बोलत बसली. एका ऐतिहासिक नायिकेवर ते एक सिनेमा दिग्दर्शित करीत होते. तिने गमतीने विचारलेही, "मला पण कुठल्या चित्रपटाची नायिका कराल का?"


 "तुला विनापाश यावे लागेल पण मुंबईला.., जमेल का ?"


 त्यांचे तडक उलट विचारणे. तिचे चरकणे.


 आजकाल का असे दचकायला होतंय? ते फार सभ्यपणाने बोलतात. तिने उत्तर दिले नाही तर पुन्हा पुन्हा मॅसेज करून त्रासही देत नाहीत. आपण त्यांच्यात अपार गुंतत चाललोय का ? विचारांचा कितीही गुणाकार भागाकार केला तरी ते सुद्धा आपल्यात फार फार गुंतलेय याची तिला जाणीव झाली. 


       तिने धावत जाऊन नवलाने आरशात पाहीले. आपण गोड आहोत, सुंदर आहोत असे सर्वच म्हणतात. विक्रमच्याही डोळ्यात दिसतं. पण तो कधी यांच्यासारखा फुलारून बोलला नाही की शब्दागणीक जवळ आला नाही. यांना कसे जमले दोन जीवांतले अंतर इतके झपाट्याने कापणे? 


      विक्रमने आपल्याला भावी आयुष्यासाठी गृहीतच धरले आणि यांनी आपल्यातल्या आपल्याला मागितले. जीवनचक्र विक्रमला देण्यापेक्षा आपल्याला यांना देणे आवडेल. यांच्यातल्या कलासक्त कलाकाराने आपल्याला बरोबर उचललेय आणि निर्विवाद ते आपल्याला आवडलंय. भविष्यात हवयं. 


     मनातला डोह खूप डचमळला असला तरी पुढचे चारपाच दिवस ते नेहमीसारखे बोलत राहिले. ती नेसत्या वस्त्रानीशी जरी गेली असती तरी त्यांनी त्याक्षणीच तिच्याशी लग्न करून तिला निशं:क करून टाकले असते. सिनेमाशी संबधित प्रत्येकच माणूस वाईट थोडाच असतो. राहिला प्रश्न वयाचा. ती तेविसची. ते अडतिसचे. असावा असाही काही योग. 


     आज ना उद्या आईवडील समजून घेतीलच. हं, विक्रमला खूप वाईट वाटेल,

विश्वासघात झाल्यासारखे होईल पण सावरेल तोही. लग्नही करेल वर्षा दिड वर्षात दुसऱ्या कुठल्या मुलीशी. कसल्याही शंका-कुशंका न ठेवता सगळ्या बाबींवर विस्तृत बोलणे झाले. तिची खात्री पटल्यावरच फोन ठेवला. निर्णय तिच्यावर सोपवला. 


    ते इतक्या प्रामाणिक पोटतिडकीने बोलले नसते तरी तिला त्यांच्याबद्द्ल पूर्ण विश्वास होता. भयंकर अस्वस्थतेत ती झोपायला गेली. आयुष्याचा सगळा साचा ठरलेला असताना आता तिला एक नविन निर्णय घ्यायचा होता.


    विक्रमला मनमेंदूत कुठेही न ठेवता आपणही त्यांच्यात अडकून पडलोय हीही आठवण अर्धवट उध्वस्थ झोपेत येत राहीली. आकाशात विजांचा कडकडाट सुरू होता. 


 व्यवस्थीत तयार झाली ती सकाळी. 


ओलीचिप्प रात्र सरून गेली होती. 


फ़ोन आल्यावर कुठलाही अभिनिवेश न बाळगता तिने फोन उचलला. 


तिचे उत्तर तयारच होते. 


"मग काय ठरवलेस तू ?" त्यांचा आत्यंतिक अधीर स्वर. 


"आपण समांतर चालूया." ती पुढे काही बोलणार तोच विलक्षण वेगात फोन कट झाला. 


तिला वेड्यासारखे झाले एकदम. आधार सुटल्यासारखी ती भिजलेल्या झाडापानाफुलात हातपाय मारू लागली. तिला खूप समजवून सांगायचे होते त्यांना. आज त्यांच्यापेक्षा मोठे होऊन मन सांभाळायचे होते. त्यांचे व्यक्त होणे जर तिने कधी गैर मानले नाही तर त्यांनी का म्हणून तिचे पूर्ण ऐकून घेवू नये ? 


व्यक्ती आहे व्यक्त होणार! 


रक्त आहे आरक्त किंवा विरक्त होणारच !!  


समांतर राहणेही राहणेच आहे ना ?   

    

      त्यांच्याआधी तिच्या आयुष्यात विक्रम येऊन थांबल्याने सोबतीचा अट्टाहास धरण्याची वेळ निघून गेली होती. ते सच्चे आहेत याबद्द्ल तिचे दुमतच नव्हते. त्यांच्या आतवर चाललेल्या भयानक उलथापालथीची ती कल्पना करु शकत होती. नुसते तेच तुटले नसून आपणही भुईसपाट झालोय. त्यांचे येणे हा वळवाचा पाऊस होता. तो गंध आयुष्यभर घमघमवतही राहिला असता कदाचित....


      त्या दिवशी त्यांना फ़ोन करायची , त्यांचा मॅसेज बघायची तिला हिंमत झाली नाही. कुठेतरी ते आपल्याला, परिस्थितीला समजून घेतील, आपले सहप्रवासी म्हणून सोबत राहतील अशा आशेत ती निजली.


    दुसऱ्या दिवशी न राहवून तिने व्हॉटसअप उघडले. त्यांचा डीपी गायब होता. तिने त्यांना मॅसेज पाठवला. पण मॅसेज गेला नाही. त्यांनी तिला अनफ्रेंड, ब्लॉक केले होते. ती मलूल, दु:खी झाली. त्यांना दुसऱ्या फोनवरून फोन करावा असेही मनात आले. मात्र तिने तसे केले नाही. त्यांचे ठिबकणे थांबतपर्यंत वेळ जाऊ द्यायचे ठरवले. 


त्यावेळी,...... 


त्यावेळीही मुसळधार पाऊस कोसळत होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance