अमावस्या आणि दत्तूची आजी
अमावस्या आणि दत्तूची आजी
कोकणातल्या सावंत गुरुजींची बदली कोल्हापूर जिल्हयातील एका छोटयाशा गावात झाली होती. गाव तसं लहानच असल्यामुळे गुरूजी आपल्या कुटुंबाशिवाय एकटेच राहत होते. खोली ही त्यांनी शाळेपाशीच घेतली होती. शाळा गावाच्या वेशीवरच होती. साधारण वेस म्हटलं तर चार रस्ते एकत्र येणारा चौक, म्हणजे गावचा चौक पण इथे मात्र तीन रस्ते होते त्याला आपण नाका किंवा कोकणातल्या भाषेत तिक्स म्हणू शकतो. शाळेमध्ये प्रत्येक तासाला वेगळे गुरूजी नसून, प्रत्येक वर्गाला एक गुरुजी होते. म्हणजे वर्गात शिकवले जाणारे जे काही विषय होते ते एकच गुरुजी शिकवायचे तसे आमचे सांवत गुरुजी ६ वीच्या वर्गावर शिकवायचे. त्या दिवशी अमावस्या असल्यामुळे सकाळपासून गुरुजींच्या कानावर बरंच काही म्हणजे अमावस्याचे किस्से ऐकायला आले होते. त्या कारणाने गुरुजीनीं समजून घेतले होते की शाळेतील मुलांच्या मनात अमावस्येबद्दल बरीच भीती आहे. त्यामुले शाळा सुटण्याच्या अगोदर निदान थोडा वेळ तरी स्वतःच्या वर्गातील मुलांना अमावस्येबवंदल सांगा आणि त्यांच्या मनातील भीती दूर करावी असं ठरवलं. गुरुजींनी विषय काढला आज अमावस्या आहे ना मुलांनो?...मुलांनी फक्त हुंकार भरला आणि एकमेकांकडे डोळे थोडे मोठे करून पाहू लागले. गुरुजींनी ओळखलं प्रत्येक विद्यार्थी घाबरलेला आहे.... मग त्यांनी विचारलं तसा अमावस्येचा वाईट अनुभव तुमच्यापैकी कोणाला आला आहे का रे मुलांनो?... लगेचच बरीच मुले आपापला अनुभव सांगण्यासाठी उठू लागली ते पाहून गुरूजी म्हणाले नको तुम्ही सर्वानीं खाली बसून घ्या आज मी माझे मत सांगणार आहे. ज्यामुळे तुमच्या मनातील भीती निघून जाईल.
मुलांनो तुम्हाला माहीतच असेल की आपल्या पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती आहे सर्वांनी एका सुरात म्हटले हो.... मग अमावस्येला याच शक्तीमध्ये थोडा फरक पडतो आणि त्याचाच परिणाम म्हणून त्या दिवशी गाड्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढते. गाड्यांना लिंबू मिरची आणि काळी बी लावली जाते कारण लिंबातील अँसिड व त्या बीच्या अँसिडमुळे गुरुत्वाकर्षणला थोडा प्रतिकार मिळेल व गाडी खेचली जाणार नाही.
रात्रीची तर गोष्टच निराळी अगोदरच मनात प्रचंड भीती त्यात चांदोमामा इतर देशात फिरायला गेल्याने रोजच्यापेक्षा जास्तच अंधार आणि याचा परिणाम प्रत्येक गोष्टीच्या सावलीवर पडतो आणि काही सावल्या थोड्या वेड्यावाकडया दिसू लागतात ते पाहून आपण जास्तच घाबरतो.
आमच्या कोकणात समुद्राचे पाणी आपल्या दिशेने जास्त खेचले जाते कारण चांदोमामा स्वतःच्या दिशेने पाणी खेचत असतात, म्हणून अमावस्येला समुद्र माणसांना खेचतो असा समज होऊन कोणी समुद्राकडे जात नाही.
त्यामुळे अमावस्येला कोणत्याही गैरसमजाने घाबरून न जाता थोडी सतर्कता दाखवावी म्हणजे वाईट अनुभव येणार नाहीत समजलं का मुलांनो? मुलांनी एक अवाकक्षर न काढता फक्त माना हलवल्या, इतक्यात बेल वाजली आणि शाळा सुटली.....
सावंत गुरुजी ही खोलीवर गेले. थोड फ्रेश होऊन नाश्ता आवरून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले, नाक्यावर पोहचल्यावर त्यांचे लक्ष्य गेले ते एका झाडाखाली बसलेल्या दत्तूच्या आजीकडे. गुरुजींच्या खोलीपासून चार घरे सोडल्यावर एक कुटुंब राहायचं, आजी नातू आणि त्याचे आईवडील, नातवाचं नाव दत्तू, त्याची दहावी संपली होती आणि आता तो कॉलेजला रोज शहरात जात असे म्हणजे रोज जाऊन येऊन.
आजींनी नुकताच शिजवलेला भाताचा गोळा, गोळा कसला ज्या भांड्यात शिजवला होता तसाच तो त्यातून आकार मोडू न देता काढलेला दिसत होता. जसा आपण केक काढतो ना तसं अगदी दोन किलोचा होईल इतका आणला होता, तो झाडाला टेकवून ठेवला त्यावर काळ्या कोळश्याने भल्या मोठ्या मिश्या काढल्या होत्या दोन मोठे डोळे म्हणून लावले होते आणि वर भली मोठी धूपाची काडी पेटवून लावली होती, काडी बरीच जाड आणि मोठी होती जी रात्रभर पेटत राहील अशीच... ते पाहून गुरूजी म्हणाले "काय करताय आजी"?
आजी- मी काही कोणाचं नुकसान नाही करत माझ्या घरच्यांच्या भल्यासाठी करते.....
असं म्हणून निघून गेल्या. गुरुजी गालातल्या गालात हसून पुढे निघाले..... थोड्या उशिरा दत्तू घरातून बाहेर मित्राना भेटण्यासाठी निघाला
आजी- लवकर येरे बाबा आज अमावस्या आहे
दत्तू- बरंबरं
रात्री परत येताना दत्तूला उशिरच झाला होता... घरी झोपण्याची तयारी सुरू होती इतक्यात दार जोरजोरात वाजू लागलं. दत्तूच्या आईने दार उघडलं तर दत्तू थरथर कापत दारात उभा होता. तो खूप घाबरला होता हे नक्की... आईने त्याला आत घेतलं त्याचं अंग तापाने फणफणत होत. आईने त्याला कुशीत घेऊन शांत केलं आणि विचारलं काय झालं?.... पण दत्तूची बोबडीच वळली होती.... इकडे आजीची बडबड सुरूच होती.
सांगितलं होतं लवकर ये माझं म्हातारीचं कोण ऐकणार, भोगा आता कर्माची फळं.
दत्तूच्या आईने नजर वगैरे काढली. नंतर रात्रभर त्याच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसली.
नेहमीप्रमाणे गुरूजी पहाटे फिरावयास निघाले, त्या नाक्यावर आल्यावर त्यांचं लक्ष त्या झाडाकडे गेलं जिथे आजीनी भात ठेवला होता... आता त्यावरची धूपकांडी संपली होती.. एक कुत्रा भात खात होता. थोड्यावेळाने गुरुजी परतले त्यांनी पाहिलं दत्तूच्या घरी गडबड चालली आहे त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर आजी ओरडून ओरडून दत्तूला विचारत होती काय झालं होत रात्री सांग मेल्या काहीतरी बोल.... शेवटी दत्तू बोलला भूत भूत पाहिलं मी इथेच जवळ. ते ऐकून सर्वच घाबरले... गुरुजींनी दार वाजवलं आणि ते आत गेले. त्यांनी दत्तूला विचारलं कूठे पाहिलंस ती जागा दाखव... तसा दत्तू घाबरलाच होता पण आम्ही तुझ्यासोबत आहोत असं सांगून गुरुजींनी त्याला बाहेर आणलं त्याच्या पाठोपाठ सगळेच निघाले, दत्तूने लांबूनच झाडाकडे पाहिलं व म्हणाला इथंच पाहिलं होतं मी आता ते निघून गेलं असेल, " असे मोठे डोळे होते, मोठी मिशी होती आणि आग ओतत होतं ते."
(खरंतर दत्तूला धूपाच्या कांडीतून निघणारा धूर भीतीने आगीसारखा दिसला होता)
हे ऐकून आजीने कपाळाला हात मारला आणि गुरुजी हसत हसत निघून गेले.