गाव व परंपरा
गाव व परंपरा


रस्त्याच्या कडेला गाडी (दुचाकी) लावून निसर्गाचा आनंद घेत उभा होतो, इतक्यात " काय गाववाल निवांत हाय म्हणा" असा मागून आवाज आला. एकाच गावचे असतिल तर अशी हाक देण्याची तर परंपराच आहे आणि म्हणूणच मला गाववाला म्हणणारा नक्की या गावचा की त्या, असा विचार करतच मी मागे पाहिल. समोरचा चेहरा या अगोदर कधी पाहिला नव्हता, तरीही मी त्या इसमाला "राम राम पाव्हन कस काय बर हाय ना?" अस एक रिवाज म्हणून विचारल.... तर समोरून मात्र "हे बर न्हव आम्ही गाववाल म्हटल पण तुम्ही पाव्हन म्हणून परकच केलतकी."..... "मला समजल नाही तुम्ही की तुम्ही या गावचे गाववाले का त्या गावचे?"..... "म्हणजी?"..... "तुम्हाला तर माहितच असणार या गावात मी फक्त कामा निमित्त रहातो तस माझ गाव पुणे."..... समोरची व्यक्ती (हां-हां - हा) अस हसतच " अस असल तर मी ना ह्या गावचा ना त्या गावचा, मी तर परकाच. या गावच्या सरपंचाकड काम व्हत म्हणून आलो व्हतो."...... "तर तुम्हला सरपंचांचा पत्ता हवा आहे."......" पत्ता तर तुम्ही सांगालच कि पर, ह्या दुचाकी वरन दोन माणस जावू शकतिलचकी गाववाल."..... "तरीच म्हटल अचानक मी कोणाचा तरी गाववाला कसा झालो? बर बसा सोडतो. आणि हो आता नाव आणि गाव सांगितलत तर बर होईल."...... "मी भिकाजी. हितन म्होर दोन गावं सोडली की माझ गाव तुरकवाडी."..... " काय म्हणालात तुरकवाडी? "...... " हो ऐकलय का कधी हे नाव? "..... मी अगदी त्याच्या एवढ नाही पण जरा हसूनच म्हणालो. " ऐकलय म्हणून काय विचारताय गाववाले? "..... आश्चर्यान " गाववाले? म्हणजी?"..... " लहानपणी तिथ गेलो होतो कारण माझ आजोल आहे ते म्हणूनच म्हणालो गाववाले."
तेजस्विनी.