अगं... जरा जपून हं...
अगं... जरा जपून हं...
आजच्या प्रगतीशील, टेक्नोसेव्ही जगात जर कुठली गोष्ट महत्वाची असेल तर ती आहे आपल्या हातातील सतत वाजणार मोबाइल फ़ोन. लहान असो वा मोठे असोत, नोकरी करणारे असोत किंवा घरी राहणारे असोत हा मोबाइल् सर्वांची गरज होऊन बसला आहे. आणि का नाही होणार म्हणा, आपल्याला हवी असलेली जगातील कुठलीही माहिती या फ़ोन मधे उपलब्ध आहे. प्रश्न विचारण्याचा अवकाश की चुटकीसरशी त्या प्रश्नाचे उत्तर समोर मोबाइल स्क्रिन वर हजर असते. गुगल च्या माध्यमातून जगभरातील माहिती आपल्याला मिळू शकते. पूर्वी लैंडलाइन फ़ोन होते आणि त्याच्या बाजूने हमखास एक डायरी असायची ज्या मधे नातेवाईक,मित्र, ऑफिसचे महत्वाचे नंबर, गैस,वाणी ई चे नंबर सर्व नावसाहित लिहलेले असायचे. एक पारदर्शिपणा होता.त्याच बरोबर फोटो काढण्यासाठी फोटो स्टूडियो असायचे, हौसेनं लोक फोटो काढून ठेवायचे. ते फोटो खूप जपून ठेवले जायचे वर्षानुवर्ष मोठ्या मोठ्या अलबम मधे....
आणखी एक जुना कालबाह्य होत असलेला प्रकार म्हणजे पत्र व्यवहार.,मनानी मनाशी साधलेला संवाद ज्यामध्ये सुंदर अशा भावना असायच्या, कित्येक दशकं ते पत्र जपले जायचे, त्यातील शब्द न् शब्द पाठ व्हायचा पण त्या पत्राची गोडी काही कमी होत नव्हती. या सर्वच हळूवार सच्च्या भावनांना आजची ( बिचारी) पिढी मुकली आहे.ना ती टेलिफोनची जिर्ण डायरी राहिली,ना ते जुने फोटो राहिले, ना ती पत्रांची अवीट गोडी राहिली. आज सारे काही या छोट्या मोबाइल् मधे कैद होते आहे. आणि एकदा का या मोबाइल् ची मेमरी फुल झाली की मग आपणच सारे काही डिलीट करून टाकतो. आठवणींमधे मागे असे उरण्या सारखे काहीच शिल्लक राहत नाही.पत्रात हळुवार लिहिण्याजोग्या दिर्घसमासी गोष्टी सरळ फ़ोन उचलून स्पष्ट शब्दात बोलल्या जातात. तो आपलेपणा,ते सुंदर भाव जे पत्राच्या शब्दांशब्दातून पाझरायचे ते असे फ़ोन वर बोलून नाही व्यक्त करता येत. मान्य आहे की त्यातही प्रेम असते पण तो प्रेमाचा ओलावा नसतो त्यात..तितका गहिरा..असो.....
तशी ही आजची पिढी प्रचंड हुशार आणि बुद्धिमान आहे. या स्पर्धा युगात आपल्याला मागे राहायचे नाही हे जणू त्यांना लहानपणापासूनच समजलेले असते.पुढे आयुष्यात काय करायचे, कशामधे आपल्याला करियर करायचे याचे नियोजन ते आधी पासूनच करून ठेवतात. आपल्या आवडी निवडी वर ठाम सतात. मुलगा असो की मुलगी, *मी कुणापेक्षाही कमी नाही* हे जणू ब्रिद वाक्य आहे आजच्या पिढीचे. आणि म्हणूनच *नकार* पचवू नाही शकत ते. मग तो नकार करियर मधला असो की प्रेमा मधला असो.,नकार पचवणे फार अवघड जाते यांना व यातूनच मग खुन, अपहरण, बलात्कार, एसीड हल्ला सारखे भयंकर गुन्हे घडतात. यात भरीस भर हा मोबाइल् घालत असतो.,नवीन नवीन कल्पनांचे खजिने देऊन.
पूर्वी सेन्सर् बोर्ड असायचे म्हणजे ते अाज ही आहेत, पण ते चित्रपटांपुरते मर्यादित आहेत. सेन्सर् बोर्ड असल्या कारणाने त्यातील शिवीगाळ किंवा आपत्तीजनक दृश्यं हे चित्रपटातून वगळली ज़ायची. घरात किंवा चित्रपटगृहांमधे तीन पिढ्या एकत्र बसून आनंदाने चित्रपट बघायची. सर्व परिवाराने एकत्र वेळ घालवण्याचा तो काळ होता. ज्याला अाजची पिढी *क्वालिटी टाइम* म्हणतात. आता चित्रपट तर सोडा हो पण साधे एक वेळचे जेवण सुद्धा पु्र्ण परीवार सोबत बसून करत नाही. त्यामुळे होतं काय की आपल्या मुलांच्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे हे पालकांना कळतच नाही. कारण ते स्वतः पुढे येऊन पालकांशी संवाद साधतच नाही. सर्वच प्रश्न आपल्या परीने सोडविण्याचे प्रयत्न करत असतात. संवादाचा अभाव म्हणजे कम्युनिकेशन ग्यॅप मुळे पालकांना समजंत नसतं की मुलांना नेमकी आपली मदत कशा प्रकारे हवी आहे,काय समस्या आहेत त्यांच्या आयुष्यात. कधी कधी पाणी डोक्यावरून गेल्यावर कळते की काहीतरी बिनसले बिघडले होते.विभक्त कुटुंब पद्धती मधे हम दो हमारे दो (आजकाल तर एकच) असतांनाही मुलांना एकांत हवा असतो,आपली स्वतंत्र खोली हवी असते. आणि पालकांनी मुलांच्या रुम मधे जातांना दार वाजवून, आत येऊ का? अशी विचारणा करावी लागते..तसे पाहिले तर किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही,पण अाज काल यालाच ऐटीकेट्स,किंवा म्यानर्स म्हणतात.परिक्षेच्या काळात तुम्ही अभ्यास करत असाल, आजूबाजूला आवाज असतील तर पालक देखील समजुन घेतात तेव्हा,पण मित्रांबरोबर बोलतांना, मोबाइल् वर काही बघताना सतत दार आड होत असेल तर पालकांनी सावध व्हायला पाहिजे. कुठे तरी पाणी मुरायच्या आत त्याला चाप घातला पाहिजे.खरे तर त्यांचे मित्र होता आले पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे.अाज कालच्या शिक्षण पद्धती मुळे अगदी लहान मुलांना देखील मोबाइल् फ़ोन द्यावा लागतो आहे. क्लासेस,पेपर्स,मीटिंग्स सारेच आता अॉनलाईन होत आहेत. तेव्हा मुलां कडून मोबाइल् काढून घेणे ही शक्य नाही, पण मोबाइल् वर मुले नेमके काय बघतात यावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे.चित्रपट गृहे कोरोना काळात बंद असल्या कारणाने मोबाइल् वरती वेब मालिकांचा अक्षरशः महापूर आला आहे.आणि या वेब मालिकांना सेन्सर् ची परवानगी लागत नसल्या कारणाने अतिशय सुसाट व बिभीत्स पद्धतीने सारे काही दर्शविले जाते इथे. (काही मालिका अपवाद असतीलही) अतिशय घाणेरडी शिविगाळ, नुस्ते कंबरे खालचे बोलणे आणि फारच बोल्ड दृश्ये..
नुस्ता धुमाकुळ माजविला आहे या काळ्या वेब मालिकांनी.शिवीगाळ आणी बोल्ड सीन्स दाखविण्याची जणू इथे शर्यती लागल्या आहेत.कोण किती हिंसा, कपट,भ्रष्टाचार,वासनेचा बाजार,स्त्री ची खच्चीकरण व विटंबना उघड-उघड दाखवू शकतो याची जीवघेणी स्पर्धा चालूय जशी.पण याचा बाल मनावर, किशोर मनावर काय आणि किती वाईट परिणाम होतो आहे याचा कुणी विचारच करत नाहीये. या वेब मालिका,वेव चित्रपट इंटरनेटवर सहज उपलब्ध असतात व किशोरवयीनाना हे अगदी सहजपणे बघता येतात व ते बघतातही.वेब मालिकांवर देखील सेन्सॉर ने अंकुश लावायची गरज आहे. सेन्सॉरच्या कैचीतून याही मालिका गेल्या पाहिजे. सेन्सॉरचे,सरकार चे लक्ष या वर गेलेच पाहिजे. समाजमनावर याचा परिणाम लक्षात घेता ही पाऊले उचलणे फार गरजेचे झाले आहे.अाजची युवा पीढ़ी अशी भरकटायला नको, वाहवत जायला नको.राजरोसपणे, उघड उघडपणे चाललेले हे खेळ बंद व्हायला पाहिजे नाहितर यावर काही अंशी अंकुश लागला गेला पाहिजे. टी.आर.पी,पैसा,प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात आपण समाजापुढे अाजच्या पिढी पुढे काय वाढून ठेवतो आहोत याचे भान या वेब मनोरंजन निर्मात्यांना असायलाच हवे. सरकारने या वर गंभीर विचार करत नुकतेच ओटीटी माध्यम म्हणजेच या वेब सिरीज व वेब मूव्हीज साठी काही नियमावली लागू केलीय.
फ़ोन आजच्या काळाची गरज आहे हे तर मान्यच आहे. पण त्याचा गैर वापर होता कामा नये. फ़ोन हातात आला आहे म्हणून कुण्या अनोळखी व्यक्तिशी बोलणे, चॅट करणे योग्य नाही. समोरच्या व्यक्ती बद्दल आपल्यला काहीही माहिती नसते.ती व्यक्ति जे सांगते आहे ते कितपत खरे आणि कितपत खोटे याची शाहनिशा करायला काहीच मार्ग नसतो. तेव्हा अश्या व्यक्तिशी तास न् तास मोबाइल् वर बोलणे, चॅट करणे योग्य आहे का?तुम्ही साध्या मनाने सर्व काही सांगून टाकता. पण समोरचा तुमच्या साधेपणाचा फ़ायदा घेऊ शकतो. समोरचा तुमची किती काळजी घेतो, तुुमच्या खाण्यापिण्या विषयी तुुमच्या तब्बेती विषयी सतत विचारना करतो, तुुमच्या दिसण्यावर तर दिवसातून अनेक वेळा स्तुतीपर पुल बांधतो,तुुमच्या दिसण्याची,कपड्यांची, हसण्याची, डोळ्यांची नको तितकी प्रशांसा करत हळू हळू आपल्या जाळ्यात ओढत जातात आणि शेवटी मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही पर्यंत गोष्टी येऊन ठेपतात. आर्थिक,सामाजिक व लैंगिक गुन्हे प्रचंड वाढले आहेत त्याला ही वेब क्रांती पण खूपशी कारणीभूत आहे.हे मोबाइल् वरील प्रेम अाज काल सर्रासपणे बघायला मिळतं.या जाळ्यात केवळ किशोर वयातीला मुलीच फ़सतात असे नाही तर मध्यमवयाच्या स्त्रिया देखील याला बळी पडताना दिसतात. कुणी प्रेमाने दोन शब्द बोलले की मनाचा कल आपोआप त्याच्या बाजूने झुकतो. फ़ेसबुक, व्हाट्सएप, इन्स्टाग्राम, टेलीग्राम यावर तास् तास गप्पा ज्याच्या बरोबर मारत असतो त्याला प्रत्यक्ष कधी बघितले ही नसते आणि प्रेमाच्या असंख्य आणाभाका घेतल्याही गेल्या असतात.काय म्हणावे याला.. आयुष्याची पोकळी भरून काढण्याच्या नादात बळी पडतं हळवं मन..
सर्वांनाच हा अनुभव येतो असे नाही. माझी मुलगी आणि मी या लॉकडाऊन मधे *सिर्फ तुम* नावाची फिल्म बघत होतो. नायक आणि नायिकीचे पत्रांच्या माध्यमातून प्रेम जडतं. कुणी कुणाला बघितलेलेही नसतं तरीही नायिका त्याला शोधायला मुंबई सारख्या गर्दीच्या महानगरात एकटीच येते. त्याचे केवळ नाव माहिती असते. अगदी अगदी शेवटच्या क्षणात ते भेटतात आणि हैप्पी एंडिंग् होतं...यावर माझ्या मुलीने मला विचारले होते, "आई, ती नायिका जर दिसायला वाईट असती, कुरूप असती तरीही त्या नायकाने तिला स्वीकारले असते का?" मी तिचा प्रश्न ऐकून अवाकच झाले. मी तो चित्रपट दोन-तीन वेळा आधी बघितला होता, पण हा प्रश्न डोक्यात नाही आला....
मुली, स्त्रिया ह्या फार हळव्या असतात, डोक्यापेक्षा मनाने विचार करतात आणि इथेच खरे तर फ़सगत होते त्यांची. आजकाल पेपरला अशा बातम्या नेहमीच वाचायला मिळतात. फसवणूक केली, लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले, अपहरण, या सारख्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसें दिवस वाढतच चालले आहे. प्रेम करा, मैत्री करा पण डोळसपणे करा.फसगत होऊन बोभाटा करण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा वेळीच सावध व्हायला पाहिजे. मैत्रीच्या मर्यादा आपणच ठरवल्या पाहिजे आणि त्या दोन्ही कडून पाळल्या गेल्या पाहिजे.,तर ती खरी मैत्री. मैत्रीच्या सुंदर नाजूक फुलाला वासनेची कीड लागू देऊ नका.,हीच या महिला दिनानिमित्त आपल्या सर्वाना विनंती आणी आपल्या सर्वाना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा.
🌹🌹
