अघटितभाग - २
अघटितभाग - २


इ.शिंदे सानवलीहून निघाले तेव्हा त्यांची मुद्रा अतिशय व्यग्र झाली होती. तपास करण्यात आपलं नेमकं चुकलं कुठे? पूजाचे घरातून पलायन आणि मंदिराच्या आवारात मृतदेह आढळणे या दोन्ही घटना एकाच वेळी घडल्या. तसेच पूजाचे निघून जाणे आणि त्या स्त्रीचा मृत्यू यांची साधारण वेळ एकच होती त्याची सांगड घालून आपण तो मृतदेह पूजाचाच आहे असं गृहीत धरून चाललो आणि तिथेच सगळं गणित चुकलं.
ड्रायव्हर संताजी गाडी वेगाने चालवत होता.साहेब डिस्टर्ब आहेत हे त्याच्या लक्षात आले होते.वेस ओलांडून गाडी पोलिस स्टेशन कडे येऊ लागली तशी माणसांची गर्दी प्रवेशद्वारावर घोषणा देताना संताजीने पाहिली आणि गाडी सफाईने छोटे गल्लीबोळ पार करत मागील दाराने पोलिस स्टेशनमध्ये आणली. 'इ.शिंदे हाय हाय'अशा घोषणा स्पष्टपणे ऐकू येत होत्या.इ.शिंदे घाईघाईने आत शिरले तो हवालदार पवारांनी आडोसा करून त्यांना केबिनपर्यंत नेले.'बाहेर प्रेसची माणसं, लोकप्रतिनिधी तुमची भेट घेण्यासाठी केव्हाचे बसलेले आहेत.'हवालदार पवार इ.शिंद्यांच्या कानात कुजबुजले. इ.शिंदे केबिनमधील आपल्या खुर्चीवर बसत नाहीत तोच पवारांनी त्यांच्या समोर चहाचा कप ठेवला.इ.शिंद्यांनी कृतज्ञतेने पवारांकडे पाहिले.कोकणापर्यंतचा प्रवासाचा शीण,प्रचंड मानसिक तणाव यामुळे त्यांना चहाची अत्यंत गरज होती.
चहा संपवून कप खाली ठेवेपर्यंत टेबलावरचा फोन खणखणला.पोलिस कमिशनरांचा फोन होता.
'ताबडतोब पोलिस मुख्यालयात येऊन भेटा.'कमिशनर भयंकर रागावले आहेत हे त्यांच्या स्वरावरुन कळत होते.हताश होऊन इ.शिंद्यांनी टेबलावरची कॅप उचलली.
पोलिस स्टेशन बाहेर गाडी काढतांना संताजीला प्रचंड यातायात करावी लागली.'इ.शिंदे हायहाय' लोकांच्या घोषणा चालूच होत्या.काहीजण हातात फलक घेऊन उभे होते.संताजीने गाडी भरधाव सोडल्याने इ.शिंद्यांना त्यावरील मजकूर वाचता आला नाही. प्रसिद्धी रांगत रांगत वेशीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत बदनामीच्या तीनदा पृथ्वी प्रदक्षिणा घालून होतात हेच खरे! आजपर्यंत मिळालेला नावलौकिक ,आदर या केसमुळे पार धुळीला मिळाला.
इ.शिंद्यांनी सुस्कारा सोडला.
पोलिस कमिशनर साहेबांच्या केबिनबाहेर इ.शिंदे तब्बल पाच तास ताटकळत बसून होते.अस्वस्थपणे.सतत त्यांची चुळबुळ सुरू होती.त्यांना अत्यंत शीण आला होता.आपल्या भवितव्यात काय वाढून ठेवले आहे या विचाराने त्यांच्या श्वासोच्छ्वासाचा वेग वाढला होता.
'सरांनी बोलावलंय',असा निरोप आल्यावर ते ताडकन उठून उभे राहिले.
'मे आय कम इन सर'?या त्यांच्या प्रश्नावर समोरच्या फायलीत डोके खुपसून बसलेल्या पोलिस कमिशनरांनी डोके वर न करता इ.शिंद्यांना हाताच्या इशाऱ्याने समोरच्या खुर्चीवर बसण्याची खूण केली.इ.शिंद्यांनी साहेबांना सॅल्यूट ठोकला अन् हातात कॅप घेऊन अदबीने खुर्चीवर बसले.जरा अवघडूनच!
'हा काय प्रकार आहे शिंदे?'पूजा मर्डर केसची फाईल शिंद्यांसमोर टाकून कमिशनर गरजले.
'अहो जिला मयत म्हणून घोषित केलंत ती चक्क जिवंत आहे.मग ती मयत स्त्री कोण आहे?पूजाची बॉडी म्हणून सरळ दुसऱ्याच स्त्रीची बॉडी पूजाच्या वडीलांच्या हवाली केलीत? त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून अंत्यसंस्कार सुद्धा केला.उद्या तिच्या वडिलांनी हलगर्जीपणा चा आरोप ठेवून आपल्यावर दावा ठोकला तर?'
'आणि तो योगेश! वारंवार सांगत होता मी खुनी नाही म्हणून तरी त्याला आत टाकलंत?तो आपल्यावर बदनामीचा आरोप ठेवून शकतो.अहो शिंदे, तुम्ही हे काय करुन बसलात?एव्हढा हलगर्जीपणा? तुमच्या कडून मला ही अपेक्षा नव्हती शिंदे! आपल्या पोलिस दलाची किती नाचक्की झाली आहे त्यामुळे! अहो आम्हाला पण आमच्या वरिष्ठांना जवाब द्यावा लागतो.त्यांना काय सांगू की पस्तीस वर्षांचा अनुभव असलेले आमचे अधिकारी इतक्या निष्काळजीपणे काम करतात म्हणून?'
'खरंतर तुम्हाला सस्पेंड करायला पाहिजे पण तुमचा अनुभव, इतक्या वर्षांची कामगिरी पाहता मी तुम्हाला या केसचा नव्याने तपास करण्याचा आदेश देतो.
पण.... फक्त एका आठवड्याचा अवधी देतो.तुम्ही जर एका आठवड्यात केसची उकल केली नाही तर नाईलाजाने मला तुम्हाला सस्पेंड करावे लागेल!': 'यू मे लीव्ह नाऊ', कमिशनर साहेबांनी भेटीचा समारोप केला.इ.शिंदे उठले.सरांना सॅल्यूट करून कॅप घालून निघाले. संध्याकाळ होत आली होती.गाडीत बसत इ.शिंद्यांनी संताजीला इशारा केला आणि संताजीने गाडी सुसाट सोडली.शिंदेसाहेबांचा व्यग्र चेहरा बघून संताजी निःशब्द पणे ड्रायव्हिंग करत होता.
आकाशात गुलाबी छटा पसरली होती.पश्चिमेचा गार वारा सुटला होता.श्रांत आणि क्लांत झालेल्या इ.शिंद्यांचा डोळा लागला. इ.शिंदे जागे झाले तेव्हा गाडी गावाच्या वेशीत शिरत होती.थोडी झोप झाल्याने इ.शिंदे ताजेतवाने झाले होते.
'संताजी,आज वार कुठला?'त्यांनी अचानक विचारले.
'शनिवार सर'
'अरे मग वाटेतल्या मारुतीच्या देवळात जाऊन येतो.तू गाडीतच थांब.'
ओके सर.
गावाच्या वेशीवर छोटंसं मारुतीचं देऊळ होतं . झाडाच्या पारावर.
इ.शिंद्यांनी मनोभावे नमस्कार केला आणि मारुतीला विनविले,'देवा मारुतीराया,आजवर कधीही मला इतके अपयश आले नव्हते.आता तूच माझा तारणहार.मला यश दे.'
इ.शिंद्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.
'अहो पोलिस साहेब'अशी दबक्या आवाजात मारलेली हाक इ.शिंद्यांच्या कानावर पडली तशी ते भानावर आले.समोर चाळीशीची स्त्री उभी होती.कुठेतरी हिला पाहिलंय इ.शिंद्यांना वाटले.
'मी रखमा,पूजाकडे कामाला होते,'असे तिने म्हटल्यावर इ.शिंद्यांनी कान टवकारले.
'अवो, पूजा गायब झाली तवा मी त्या योग्याला ओढ्याकाठी जाताना पाहिलं हुतं.या बंगल्यांच्या मागून एक पायवाट जाती ओढ्याकडे.माला सोयीचं पडतं म्हून मी त्या पायवाटेनं घरला जाते.त्या दिवशी सकाळी लवकर, साडेअकरालाच कामं आटोपली म्हून घरला चालले हुते तवा घाईघाईने योग्या त्या पायवाटेने ओढ्याकडं जाताना दिसला.म्हनलं ह्यो योग्या दुकानात जायचं सोडून हितं कुटं चाललाय?लय वंगाळ मानूस!'रखमा बाजूला तोंड करून पचकन थुंकली.
'बरं पुढे?'इ.शिंदे आता अगदी अधीर झाले होते.
'म्या एका झाडाआड लपून बसलू आनि योग्या जरा पुढे गेल्यावर त्याच्या पाठीपाठी गेलू.तरकाय,तिथं एक गुलाबी पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी उभी होती.योग्या तिच्याशी हिंदीत कायबाय बडबडत हुता.मंग रागारागाने हिकडं तिकडं बघाय लागला तवा मी तिथून सटकलू.'
'आणखी काही आठवतंय का रखमा?'इ.शिंदे आता हुशारले होते.'आठवून पहा नीट.काहीतरी नक्की आठवेल.'
'ती दोगंबी हिंदीत कायबाय बडबडत हुते तवा कायबी कळलं नाही बगा पन... त्यांच्या बोलन्यात खुलगाव आनि हास्पिटल असं कायतरी हुतं एवडं आठीवतंय बगा!' इ.शिंद्यांचे डोळे आता लकाकू लागले.
'काय गं रखमा, आम्ही किती वेळा आवाहन केलं की या केसमध्ये कोणाला काही माहित असेल तर पोलिसांना कळवा म्हणून मग तेव्हा ही माहिती का दिली नाहीस?'
'या बया, तुमच्या त्या पोलिस ठेसनात समदे पोलिस डोळे वटारुन वटारून समद्यांकडे बगत्यात मंग मला लय भ्या वाटलं म्हून मी सांगिटलं नाही.'
रखमाच्या त्या खुलाशाने इ.शिंद्यांना तशाही परिस्थितीत हसू आले.
'तुझी मदत लागेल तेव्हा आम्ही तुला बोलावू मात्र याची वाच्यता कोणाकडे करु नकोस असे रखमाला बजावून इ.शिंदे परत एकदा मारुतीरायापुढे नतमस्तक झाले.
जाताना संथपणे चालणारे, मरगळलेल्या चेहऱ्याने मारुतीच्या देवळात जाणारे आपले साहेब येताना उत्साहाने येताहेत हा फरक संताजीने टिपला.
'इथून खुलगावला जायला किती वेळ लागतो?' इ. शिंद्यांनी संताजीला अचानक विचारले.'फक्त अर्धा तास सर' संताजी म्हणाला.
'ड्युटीवर असलेल्या सर्वांना हजर होण्याचा निरोप द्या.'इ.शिंदेंनी पोलिस स्टेशनमध्ये शिरल्या शिरल्या हुकूम सोडला.
मारुतीच्या देवळातील रखमाच्या भेटीचा तपशील इ.शिंद्यांनी कथन करताच उदास वाटणाऱ्या पोलिस स्टेशनमध्ये चैतन्याचे वारे सळसळू लागले.मात्र पुढील तपास अत्यंत गुप्तपणे करायचा याबद्दल साऱ्यांचे एकमत झाले.
खुलगाव एकदम छोटं गाव त्यामुळे त्यातील एकुलतं एक हॉस्पिटल शोधायला अजिबात त्रास झाला नाही.
'बोला इन्स्पेक्टरसाहेब,तुमची काय सेवा करु?'डॉ.नाचणकरांनी स्वागत केले.
'तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोणी तरुण मुलगी कामाला होती?'इ.शिंद्यांनी डायरेक्ट विषयाला हात घातला.
'हो आहेत ना! तीन मुली कामाला आहेत.पण का हो? काय झालं?'
'त्या तिघींना बोलवा'
'बर' असं म्हणून डॉ.नी तिघींना बोलावले.एक स्वप्ना रिसेप्शनिस्ट आणि दोन नर्सेस होत्या.
'साधारण एक वर्षापूर्वी अजून एखादी तरुण मुलगी कामाला होती का जी अचानक बेपत्ता झाली?'
'बेपत्ता कुणी झालं नाही पण हां, एक लक्ष्मी नावाची तेलुगू मुलगी होती साफसफाई साठी ती लग्न करून गेली.'
इ.शिंद्यांच्या डोळ्यापुढे मृतदेहावरील नव्या हिरव्या बांगड्या आणि नवीकोरी जोडवी आली.
'स्वप्नाची आणि लक्ष्मीची मैत्री होती.त्यामुळे स्वप्नाच तुम्हाला जास्त माहिती देऊ शकेल!'असे म्हणून डॉ.नी स्वप्नाला पुढे बोलाविले.स्वप्ना बिचकतच पुढे आली.
'सर लक्ष्मीचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते.तो तिला भेटायला बाइकवरुन येत असे.मग त्या दोघांनी लग्न करायचे ठरविले.आम्ही दोघींनी तिच्या बांगड्या आणि जोडवी विकत घेतली.बाकी कपडे, दागिने तिचा भावी नवरा घेणार होता म्हणून फक्त तिची पर्स घेऊन ती गेली.पण साहेब, काय झालं? तुम्ही असं का विचारताय?'स्वप्नाने कापऱ्या आवाजात विचारले.
इ.शिंद्यांनी मोबाईल मधला योगेशचा फोटो दाखविला.
'हो,हो सर,हाच लक्ष्मीचा नवरा!'स्वप्ना घाईघाईने म्हणाली.
'अरे लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ वाटतो का रे तुम्हाला?'इ.शिंदे गरजले.'मुलीचे आई-वडील,मुलाचे आई-वडील कोणीच कसं नव्हतं इतक्या महत्त्वाच्या घटनेवेळी?'
'सर,त्या मुलीचे आई-वडील कामाच्या शोधात सतत देशभर फिरत असतात.बरं ते अशिक्षित आणि अत्यंत गरीब परिस्थितीतले.योगायोगाने काही कामानिमित्त या गावात आले त्याचवेळी आमच्या हॉस्पिटलमधील साफसफाई करणारी बाई काम सोडून गेली.लक्ष्मीचं काम चांगलं असल्याने तिला आम्ही इथेच रहाण्याची व्यवस्था करुन ठेवून घेतलं.आणि तिचे आई-वडील पुढील कामाच्या शोधात दुसरीकडे निघून गेले.'
'आता तरी सांगा काय झालं आहे?'
'तिचा खून झालाय'असे म्हणून इ.शिंद्यांनी चेहऱ्याचा चेंदामेंदा झालेल्या लक्ष्मीचा फोटो त्यांना दाखविला.
फोटो पहाताच सर्वजणी किंचाळल्या.डॉ.सुद्धा हबकले होते.
लक्ष्मीच्या सामानात खास काही सापडले नाही पण भानावर आलेल्या स्वप्नाने लक्ष्मीचा फोटो मधील गुलाबी पंजाबी ड्रेस ओळखला.
इ.शिंदे यांचे निम्मे काम फत्ते झाले होते.
'डॉक्टर, तुम्हीसुद्धा कमाल करता, एक मुलगी,जी तुमच्याकडे कामाला होती तिची काही खबरबात नाही तर मिसिंग कंप्लेंट पण दिली नाही तुम्ही?'
'अहो ती लग्न करून जाणार होती ना? मी तिला आशिर्वाद दिले.लग्नाची भेट म्हणून एक हजार रुपयेसुद्धा पाकिटात घालून दिले.इन्स्पेक्टरसाहेब,अशा आडगावात हॉस्पिटल चालवणे किती जिकीरीचे असते याची कल्पनाच कोणी करू शकणार नाही.लक्ष्मीचं लग्न ठरलेलं कळलं तेव्हा पहिला विचार माझ्या मनात आला तो म्हणजे .....आता साफसफाई साठी दुसरी बाई शोधावी लागणार!'
'काय गं स्वप्ना, आपल्या मैत्रिणीची खबरबात घ्यावी असं तुला एकदाही वाटलं नाही?'
'अहो सर, मी किती वेळा फोन केला तिला पण नुसती रिंग वाजायची सुरुवातीला पण नंतर तेही बंद झालं.म्हटलं कदाचित दुसरा फोन दिला असेल नवऱ्याने, त्याचं मोबाईलचं दुकान होतं ना!हा स्मार्ट फोन सुद्धा त्यानेच लक्ष्मीला दिला होता आणि त्याचं बिल सुद्धा तोच भरत होता.'
इ.शिंद्यांचे डोळे लकाकू लागले.'मोठं घबाडच हाती लागलं की आपल्याला!'
खुलगावातून परतताना इ.शिंदे चक्क शीळ घालत होते. पोलिस कर्मचाऱ्यांची या मोहिमेतील एकजूट वाखाणण्याजोगी होती.सर्वजणांनी आपसातील मतभेद विसरून केसची उकल करण्यासाठी चंग बांधला होता. अशोक आणि मोबाईलची डिलिव्हरी देणारा अल्ताफ यांची फेरतपासणी घेऊन केस उभी करण्यासाठी आणखी काही भक्कम पुरावा मिळतोय का यासाठी प्रयत्न करावयाचे इ.शिंदे यांनी ठरविले.
'सर, एक सुचवू का', हवालदार पवार इ.शिंद्यांना भीतभीतच म्हणाले.'हां बोला,'इ.शिंदे 'पूजा मर्डर केस 'फाईल चाळत होते.अजून काही दुवा हाती लागतोय का ते चाचपत होते.
'तुम्ही आता अशोक,रखमा आणि अल्ताफची फेरचौकशी कराल ती त्या मारुतीच्या देवळाच्या आवारात घ्याल का?म्हणजे इतरांना त्याचा मागमूसही लागणार नाही.निर्वेधपणे आणि गुप्तपणे आपल्याला आपले काम करता येईल.'
इ.शिंदे थबकले.खरंच, छान कल्पना आहे.पहिला दुवा आपल्याला त्या देवळात मिळाला होता आणि इथे पोलिस स्टेशनमध्ये सतत आपल्या हालचालींवर पत्रकार , नगरसेवक यांची नजर असते.त्यांचा ससेमिरा चुकवता येईल.
इ.शिंद्यांना कमिशनरांनी बोलावले होते याची कुणकुण स्थानिक पत्रकारांना लागली होती पण त्या बैठकीचा तपशील न कळाल्याने ते फारच अस्वस्थ होऊन पोलिस स्टेशनच्या चकरा मारत होते पण तेथील सर्व कर्मचारी मौन बाळगून होते त्यामुळे सर्व पत्रकार दबा धरून बसलेले होते.
अशोक आणि योगेश कोकणातून एक दोन दिवसात येणार होते म्हणून इ.शिंद्यांनी आपला मोहरा अल्ताफकडे वळवला.एक साध्या वेशातील पोलिस अल्ताफकडे रात्री ११वाजता जावून त्याला घेऊन मारुतीच्या देवळात आला.देवळात विडीओ ग्राफर,पंच काही पोलिस आणि अर्थातच स्वतः इ.शिंदे हजर होते.अल्ताफसमोर इ.शिंदे खुर्ची घेऊन बसले.
'अल्ताफ,घाबरु नकोस.'त्या दिवशी' नक्की काय काय घडले ते नीट आठवून सांग.'
भेदरलेला अल्ताफ आठवून सांगायला लागला,'त्या दिवसाच्या' आदल्या दिवशी योगेशचा फोन आला.उद्या बरोबर अकरा वाजता मोबाईल्सची डिलिव्हरी द्यायला ये.पण मी दुकानात गेलो तेव्हा फक्त अशोकच हजर होता.म्हणून त्याला योगेशला घेऊन येण्यास पिटाळले.परत अशोक एकटाच आलेला पाहून योगेश कुठे आहे म्हणून विचारले तर तो म्हणाला की वाटेत योगेशला आठवले की 'साई सुपर मार्केटमध्ये सामानाची यादी टाकायची आहे म्हणून तो तिकडे गेलाय.मी जरा चिडलोच.मग मला काल का बजावत होता अकरा वाजता ये म्हणून?ते सुपर मार्केट आहे गावाच्या दुसऱ्या टोकाला.त्यात बाजाराचा दिवस त्यामुळे भरपूर गर्दी , ट्रॅफिक जॅम ठरलेला!'
'आणि तसेच घडले.योगेश बारा वाजता उगवला.'
'हे सर्व तू मागच्या वेळी का नाही सांगितलंस?'इ.शिंद्यांनी अल्ताफकडे रोखून पहात विचारले.
'माफ करा साहेब,पण खून, पोलिस.... सगळ्या गोष्टी मला नवीन म्हणून मी अगदी बावचळून गेलो होतो.'अल्ताफ हात जोडून म्हणाला.'शिवाय योगेश बरोबर मी होतो मग माझ्यावर पण संशय घेतला तर या विचाराने मला प्रचंड दडपण आले होते.'
'बरं बरं आता घरी जा आणि याची वाच्यता कोणाकडे करु नकोस.'इ.शिंद्यांनी खूण करताच तो साध्या वेशातील पोलिस अल्ताफला पुढे घालून घरी पोहोचवायला निघाला. अल्ताफच्या जवाबाचे चित्रण व्यवस्थित पार पडले होते.
अल्ताफनंतर अशोकच्या तपासणीत योगेश दुकानात येता येता मध्येच सुपरमार्केटमध्ये यादी टाकायला गेल्याचे अशोकने सांगितलेच पण अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे घरातून निघताना योगेशच्या अंगावर निळा शर्ट होता आणि सुपर मार्केटमधून येताना हिरवा टी शर्ट होता. अशोकच्या जबाबाचेही छायाचित्रण पंचांसमक्ष व्यवस्थितपणे पार पडले.हे पूर्वी का सांगितले नाही असे विचारल्यावर अशोकनेही अल्ताफप्रमाणेच उत्तर दिले.
योगेश खुलगावला जात होता का या प्रश्नावर हो, त्याला तिथे नवीन दुकान टाकायचे होते असे अशोक म्हणाला.योगेशकडे दुसरा मोबाईल होता का?यावर अशोक म्हणाला, काही कल्पना नाही, मी माझ्या कामात मग्न होतो असे अशोकचे उत्तर होते.
रखमा,अल्ताफ आणि अशोक या तिघांनी मागच्या वेळी चुकीचे जबाब दिल्याने तपासाची दिशाच बदलली होती.पण असे का घडले?इ.शिंदे विचार करु लागले. नागरिकांमध्ये पोलिसांचा दरारा हवा,दहशत नको.दरारा असला की माणसं गुन्हा करायला धजावत नाहीत आणि दहशत असेल तर तपासकार्यात मदत करत नाहीत. जनतेमधील पोलिसांची भीती घालवण्यासाठी एक सौजन्य सप्ताह साजरा केला पाहिजे.इ.शिंद्यांनी मनाशी ठरवले.' हे सर्व तू पूर्वीच का सांगितले नाहीस?'
'साहेब, मला माफ करा पण ज्या क्रूरपणे ती हत्या झाली होती त्याने मी फारच घाबरलो होतो शिवाय मला पोलिसांनी संशयावरून अटक केली तर?या भितीने मी काही बोललो नाही.'
'बरं, योगेश खुलगावला जात असे हे तुला माहीत होते?'
'हो'
'का जात होता?'
'त्याला तिथे मोबाईल चे दुकान काढायचे होते.'
'योगेशकडे दुसरा मोबाईल होता का?'
'काही कल्पना नाही.मी कामामध्ये मग्न असे.सर,एक जरी मोबाईल कोणी बघण्याच्या निमित्ताने खिशात घातला तर परवडले नसते म्हणून मी डोळ्यात तेल घालून काम करीत असे.'
साई सुपर मार्केटमध्ये सुदैवाने c.c. camera होता आणि 'त्या दिवसाचे' रेकॉर्डिंग ही शाबूत होते.ते तपासले असता त्यात योगेश दिसला नाही.तसेच कॉंप्युटरमध्येही त्याच्या सामानाच्या यादीची नोंद नव्हती. बरीच किचकट प्रक्रिया होती ती पण योगेशला अडकवण्यासाठी भक्कम पुरावा मिळाला . पोलिसांच्या कष्टाचे फळ मिळाले होते. रखमालासुद्धा मारुतीच्या देवळात बोलावून तिची पंचासमक्ष जबानी विडीओ शूटींगसह पार पडली.यावेळी रखमा आत्मविश्वासाने बोलली. योगेश कोकणातून आलेल्या बसमधून नुकताच बस स्टॅंडवर उतरला आहे असा फोन टेहळणीवर असलेल्या साध्या वेशातील पोलिसाचा आल्यावर इ.शिंद्यांनी काही हालचाल करु नका, फक्त त्याच्यावर नजर ठेवा अशी ताकीद दिली. मध्यरात्री योगेशला त्याच्या बंगल्यातून उचलले आणि थेट मारुतीच्या देवळात आणले.देवळात पंच, विडीओ ग्राफरतयारच होते.योगेशला काय चाललंय कळतच नव्हतं.
'ही लक्ष्मी कोण?'इ.शिंद्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला.योगेशसमोर ते खुर्ची टाकून बसले होते.
योगेश क्षणभर सटपटला,पण लगेच निर्विकार चेहऱ्याने म्हणाला,'तुम्ही कोणाबद्दल बोलताय?'
एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखा बनेल आहे हा....इ.शिंद्यांनी मनात नोंद केली.
'बरं,खुलगावातलं डॉक्टर नाचणकरांचं हॉस्पिटल तुला ठाऊक आहे का?'
योगेशच्या चेहऱ्यावर चलबिचल झाली.
'हो, एकदा माझी बाईक स्लीप होऊन खरचटले होते तेव्हा मलमपट्टी करायला मी त्यांच्याकडे गेलो होतो.'
'तिथल्या स्टाफपैकी कोणाशी तुझी ओळख?'
'छे, कोणाशीही ओळख नाही.'
इ.शिंद्यांचा संयम आता सुटत चालला होता.
'खोटं बोलतोस भ**? आम्ही तुझ्या विरुद्ध भरपूर पुरावे गोळा केले आहेत.बऱ्या बोलानं सांगतोस का चामडी सोलू तुझी?'
इ.शिंद्यांनी कमरेचा पट्टा हातात घेतला.योगेश गर्भगळीत झाला.मागच्या वेळी पोलिसांनी त्याला कसा धुतला होता त्याची आठवण योगेशला झाली.आता आपण जर खरं बोललो नाही तर आपली काही धडगत नाही हे जाणून तो पोपटासारखा बोलू लागला.
'हो,लक्ष्मीला मी ओळखत होतो.आमचं अफेअर होतं.'
'किती वर्षांपासून?'
'तीन वर्षांपासून '
'म्हणजे पूजाशी लग्न करायच्या आधीपासून?'
'हो'.
'मग लक्ष्मीशी का नाही केलंस लग्न?'
'छे, हॉस्पिटलमध्ये साफसफाई करणारी मुलगी ती! तिच्याशी कशाला करीन लग्न?'
लक्ष्मीबद्दल इतक्या तुच्छतेने बोलणाऱ्या योगेशच्या कानाखाली आवाज काढायची इ.शिंद्यांची इच्छा त्यांनी आवरली.
'आता बऱ्या बोलानं लक्ष्मीचा खून का,कसा आणि कधी केलास ते सविस्तर सांग.जर का काही गफलत केलीस तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेव.'इ.शिंदे गरजले तशी तिथे हजर असलेले साऱ्याजणांचा क्षणभर थरकाप उडाला.
'सुरवातीला लक्ष्मी मी देत असलेल्या गिफ्टस् वर खूष असे पण हळूहळू ती लग्न करण्यासाठी तगादा लावू लागली.
'माझे पूजाशी लग्न झालेले तिला कुठूनतरी कळाले आणि ती चवताळलीच.तुझ्या बायकोला भेटून आपल्या संबंधांबद्दल सांगते म्हणून धमक्या देऊ लागली.शेवटी तिला कायमचे संपवायचे असे मी ठरवले.'
'अशोकला किंवा इतर कोणाला तुमच्या संबंधांबद्दल माहित होते?'
'नाही, अजिबात नाही.'
'तू लक्ष्मीला कॉन्टॅक्ट कसा करत होतास?'
'माझ्याकडे दोन मोबाईल्स होते.एकाच मॉडेलचे,एकसारखी कव्हरं घातलेले.त्यांच्यामधील फरक फक्त मलाच कळत असे.'
'तो दुसरा मोबाईल कुठे आहे?'
'शंकराच्या देवळामागे पुरला.'
'आता मला सर्व घटना क्रमाक्रमाने सांग!'
'लक्ष्मी सतत लग्नासाठी मागे लागली होती.आपले संबंध उघड करीन अशा धमक्या देऊ लागली तशी तिला कायमचे संपविण्याचा मी निर्णय घेतला.सकाळी फिरायला येणारी माणसं आठ वाजेपर्यंत परत जातात.मग शंकराचे मंदिर आणि आसपासचा परिसर अगदी निर्मनुष्य होतो.शिवाय लक्ष्मीला गावात कोणी ओळखणारे पण नाही त्यामुळे तिला याच जागेत संपविण्याचे ठरविले.'
'तू सकाळी दहा वाजता देवळात ये.मी तुझ्यासाठी सोन्याचे मंगळसूत्र केले आहे.आपण देवळात लग्न करू असे तिला कळवले.'
'हुरळली मेंढी,लागली लांडग्याच्या मागे',इ.शिंदे मनात म्हणाले.
'मग पुढे काय झाले?'
'सगळा घोटाळा झाला.खुलगावहून येणारी बस नेमकी कॅन्सल झाली.आणि लक्ष्मी पुढच्या बसने आली.त्यामुळे माझ्या ठरवलेल्या योजनेत बिघाड झाला.''कुठली योजना?'
'लक्ष्मीला दहा वाजता शंकराच्या देवळात बोलावून तिचा निकाल लावायचा आणि अकरा वाजता दुकानात पोहोचून अशोक आणि अल्ताफच्या सान्निध्यात रहावयाचे म्हणजे चुकून वेळ आलीच तर साक्षीदार आपोआपच मिळतील.'
'बरं पुढे?'
'लक्ष्मीला कळवलं उशीर झाला आहे तर आज येऊ नकोस पण ती ऐकायलाच तयार नव्हती.'योगेशच्या स्वरात चिडकेपणा आला होता.
'मी अस्वस्थ झालो.अल्ताफला मीच फोन करून अकरा वाजता दुकानात ये म्हणून बजावले होते मग वेळेचा मेळ कसा घालायचा?'
'लक्ष्मीचा फोन आला मी देवळात पोहोचतेय म्हणून.तिला म्हटलं अर्ध्या तासात येतो.तेव्हढ्यात अशोक धावत दुकानात बोलवायला आला,अल्ताफ घाई करतोय म्हणून आणि त्या गडबडीत मी पूजाला कुलूप लावून कोंडायला विसरलो.'
'पूजा पळून गेल्याचे बघितल्यावर म्हटलं बरं झालं,लक्ष्मीलाच पूजा म्हणून दाखवू.नाहीतरी आपल्या बाजूने साक्षीदार आहेतच.पण अशोकला कोकणात पूजा सापडली आणि सगळा घोटाळा झाला.'
इ.शिंद्यांची कपाळावरील शीर तटतटली.किती सहजपणे बोलतोय हा!पश्चात्तापाचा लवलेशही नाही!
'अशोकला माहीत नव्हते तू पूजाला कोंडून ठेवत होतास ते?'
'नाही, अशोक माझ्या दुकानात काम करीत होता बस्स! माझ्या खासगी गोष्टी त्याला कळावयाचे काही कारणच नव्हते.'
'पुढे काय झाले?'
' अशोक बरोबर दुकानाच्या अर्ध्या वाटेवर आल्यावर सामानाची यादी टाकायचा बहाणा करून निसटलो आणि बाईक आमच्या कॉलनीच्या अलिकडे लावून वेगाने झपाझप पावले टाकत देवळाकडे जाऊ लागलो.'
'याचवेळी रखमाने याला पाहिलं असणार 'इ.शिंदे मनात म्हणाले.
'लक्ष्मी माझी वाट पाहत थांबली होती.उशीर झाल्याने ती चिडली होती.आमची बाचाबाची सुरू झाली.एका बेसावध क्षणी मी तिचा दुपट्टा मागून गळ्याभोवती आवळला.लक्ष्मीने सुटण्याची बरीच धडपड केली पण मी तयारीत असल्याने काही क्षणातच तिची धडपड थांबली आणि तिचा निष्प्राण देह जमिनीवर पडला.मग जवळच पडलेला मोठा धोंडा उचलून तिच्या चेहऱ्यावर मारला.'
इ.शिंदे,पंच, विडीओ ग्राफर सारेजण थरारले.चेहऱ्याच्या जागी केवळ मांसाचा गोळा असलेले लक्ष्मीचे कलेवर त्यांच्या डोळ्यासमोर आले.
योगेश मात्र निर्विकार होता.स्वतः केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप अजिबात त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.
इ.शिंदे भानावर आले आणि त्यांनी पुढील तपासणी सुरू केली.
'लक्ष्मी रिकाम्या हाताने तर नक्कीच आली नसणार.मग तिच्या वस्तू?'
'तिची पर्स मी माझ्या शर्टात गुंडाळून देवळाच्या मागच्या बाजूला पुरून ठेवली आहे.'
'तू दुसरा शर्ट कसा काय बदललास?'
'माझा लक्ष्मीला संपविण्याचा प्लॅन आधीच ठरल्याने मी दोन शर्ट एकावर एक घालून गेलो होतो.'
'धन्य आहेस तू'इ.शिंदे योगेश समोर हात जोडून म्हणाले.
'बरं, आता बरीच रात्र झाली आहे,उरलेला तपास उद्या करु',इ.शिंदे सर्वांना म्हणाले.
तपासासाठी रात्रच निवडावी लागत होती कारण वार्ताहर, महिला सुरक्षा समितीच्या मेंबर्स सतत पोलिस स्टेशनमध्ये फेऱ्या मारुन अंदाज घेत होते पण इ.शिंदे आणि त्यांची टीम यांनी ताकास तूर लागू दिला नाही.
दुसऱ्या रात्री योगेशला घेऊन पोलिस पार्टी,पंच, विडीओ ग्राफर असा सारा लवाजमा शंकराच्या देवळात पोहोचला. योगेशने देवळामागे खड्डा खणून त्यात पुरुन ठेवलेला शर्ट,लक्ष्मीची पर्स काढून दिली.पंचांसमोर पर्स उघडली असता त्यात लक्ष्मी व योगेशचे मोबाईल्स,थोडी रक्कम आणि डॉक्टरांनी लग्नाचा आहेर म्हणून दिलेले भेट पाकीट सुद्धा होते. अखेर खुनाला वाचा फुटली होती. इ.शिंदेंचा चेहरा उजळून निघाला होता.अविश्रांत मेहनतीचे फळ मिळाले होते.
योगेशच्या विरुद्ध भरभक्कम पुरावा त्यांच्या हाती लागला होता. परततांना इ.शिंद्यांना खटकत असलेला प्रश्न योगेशला विचारला.
'काय रे योगेश,तू पूजाला का कोंडून ठेवलं होतंस?'
योगेशचे डोळे लालभडक झाले. संतापाने तो उद्गारला,'लग्न झाल्यावर बायकांनी परपुरुषाशी बोलूसुद्धा नाही. तिने 'पतिव्रता' राहिलं पाहिजे.'
योगेशच्या या अजब तत्वज्ञानाने इ.शिंदे थक्क झाले.
समाजाला घातक असलेली ही कीड जास्तीत जास्त कलमं लावून तुरुंगात डांबून ठेवली पाहिजे अशी खूणगाठ इ.शिंद्यांनी मनाशी बांधली. एका फार गाजलेल्या आणि वादग्रस्त खुनाची उकल इ.शिंदे आणि त्यांची टीम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली होती. सकाळी लवकरच पोलिस कमिशनर साहेबांना फोन करून साद्यंत वृत्तांत कळवतो आणि त्यांच्या परवानगीने भलीमोठी पत्रकार परिषद घेऊन गुन्ह्याच्या तपासाची माहिती देतो. इ.शिंद्यांचे बेत चालू असतानाच गाडी पोलिस स्टेशनमध्ये शिरली.
पूर्वेकडे ताबडं फुटायला लागलं होतं. इ.शिंद्यांनी एक कठीण आव्हान यशस्वीपणे पेलून दाखविले होते.