Pratibha Tarabadkar

Crime Thriller

3.4  

Pratibha Tarabadkar

Crime Thriller

अघटितभाग - १

अघटितभाग - १

12 mins
809


'संध्याकाळी पाचपर्यंत घरी येतो.तू तयार रहा.' बाइकवर स्वार झालेला योगेश हेल्मेट चढवित पूजाला म्हणाला. पूजाने मान डोलावली अन् योगेशने बाइक स्टार्ट केली.

 बंगल्याचे फाटक लावताना पूजाने सहज आजूबाजूला नजर फिरवली. समोरच्या बंगल्यातील देवधर आजींच्या स्तोत्रांचा अस्पष्ट आवाज सोडला तर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या त्या बंगल्यांच्या कॉलनीत नीरव शांतता होती.

 ही कॉलनी गावापासून काहीशी दूर असल्याने कामावर जाणारी मंडळी,शाळा कॉलेजात जाणारी मुले घर लवकर सोडीत.कॉलनी जिथे संपते तिथे एक ओढा होता ज्याला फक्त पावसाळ्यात पाणी असे.उरलेले वर्षभर मुले तेथे क्रिकेट खेळत.ओढ्याकाठी शंकराचे प्राचीन मंदिर होते.सकाळी गावातील माणसे तेथे फिरायला येत.तेव्हढी वर्दळ सोडली तर एरव्ही कॉलनीत शुकशुकाटच असे.

  पूजा फाटक लावून वळली आणि तिचे लक्ष उभ्या करून ठेवलेल्या स्कूटीकडे गेले आणि अभावितपणे तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.महिनाभरात तिची शाळेतील नोकरी सुरू होणार होती.पूजा बी.एड.असल्याने नवीन उघडलेल्या शाळेत नोकरी मिळवणे तिला फारसे अवघड गेले नव्हते.

  पूजा घरात शिरली तो तिचा मोबाईल वाजत होता.तिने घाईघाईने मोबाईल उचलला.

 'हो आई, योगेश आताच गेला.त्याला मी डबा दिला.डब्यात गवारीची भाजी...

 गावातील शॉपिंग मॉलमध्ये असलेले योगेशचे मोबाईलचे दुकान तुफान चालत होते.अशोक नावाच्या असिस्टंटला मदतीला घेऊन योगेश दुकान चालवत होता. नुकतेच लग्न झालेल्या योगेश आणि पूजाचा संसार एकंदरीत मजेत चालला होता.


सकाळची वेळ होती.पूजा योगेशचा डबा भरून हॉलमध्ये ठेवण्यास आली तो जवळच रहाणारा आकाश दारात उभा होता.

  'आम्ही बाळाला घेऊन डॉक्टरांकडे चाललो आहोत आणि विजेचे बिल भरण्याची ‌आज नेमकी शेवटची तारीख आहे.तू योगेशला बिल भरावयास सांगशील ?'

  आकाश बिल व पैसे पूजाच्या हातात कोंबून घाईघाईने गेला.पूजा हातातील पैसे आणि बिल घेऊन वळली आणि एकदम दचकली. मागे योगेश उभा होता.त्याचे ते आग ओकणारे डोळे पाहून पूजा घाबरलीच.पैसे आणि बिल तिच्या हातातून ओढून घेत तो आवाज चढवित ओरडला,'तो आकाश काय गुलूगुलू बोलत होता तुझ्याशी? आणि ही चिठ्ठ्यांची देवाणघेवाण कधीपासून चालू आहे तुमची?'

  योगेशचा तो रुद्रावतार, त्याचा तो गलिच्छ आरोप ऐकून पूजा गारठलीच.तिच्या मदतीला धावून आली ती रखमा.फरशी पुसत असताना तिच्यासमोरच हा प्रसंग घडला होता.

  'काय रे योग्या, कसले वंगाळ संशेव घेतोस त्या पोरीवर? तुज्या हातातच बिल आनि पैशे हायेत न्हवं?मंग?'

  'तू आमच्यामध्ये पडू नकोस,'योगेश फुत्कारला.

'कंदी कंदी लई येड्यावानी वागतूया,' पुटपुटत रखमा फरशी पुसू लागली अन् पूजा बधीर होऊन उभी राहिली.

  त्या प्रसंगानंतर योगेश जेवावयास घरी येऊ लागला.घरी आल्यानंतर तो शोधक नजरेने घरभर फिरुन येई. पूजाचा मोबाईल चेक करी.त्याच्या गैरहजेरीत तिला कोण कोण भेटले याची खोदून खोदून चौकशी करी. पूजाला भेटणारे होतेच कोण? रखमा आणि पूजेसाठी फुले तोडावयास येणाऱ्या देवधर आजी!

  आता पूजा बाजारात गेली तरी योगेश सतत मोबाईल वरुन तिचा ट्रॅक ठेवत असे. बिचारी पूजा अगदी गांगरुन गेली. ्मो्बाईलवर आईचा आवाज ऐकला आणि पूजाला रडे आवरेना.तिने आणलेले उसने अवसान गळून पडले. पूजाने रडत रडत योगेशच्या विचित्र वागणुकीविषयी आईला सांगितले.पूजाची आई योगेशच्या या अनपेक्षित वागणुकीने हादरुन गेली आणि पपांबरोबर लवकरात लवकर तुझ्याकडे येते असे आईने पूजाला आश्वासन दिले.

 'हॅलो पूजा, मी आणि पपा उद्याच तुझ्याकडे येतोय. तू काही काळजी करू नकोस. चांगलं खडसावतो योगेशला. उगाच आमच्या साध्या भोळ्या मुलीला त्रास देतो म्हणजे काय?' पूजाची आई भडाभडा बोलत होती.

 'आई, मी योगेश बोलतोय.'आज अचानक लवकर घरी आलेल्या योगेशने थंड आवाजात म्हटले आणि पूजाची आई एकदम चपापली.

  'माझ्याबद्दल तक्रार केली होतीस का तुझ्या आईबापांकडे?' भेदरलेल्या पूजाला छद्मीपणे हसत योगेशने विचारले.पू जा एखाद्या भेदरलेल्या कोकरासारखी थरथरत उभी राहिली.: 'या या आई पपा!' योगेशने तोंड भरून पूजाच्या आई पपांचे स्वागत केले. पाठोपाठ येणाऱ्या आपल्या आई वडिलांना पाहून तो आश्चर्य चकित झाला.

 दोन दिवसांच्या मुक्कामात योगेशने पाहुण्यांची अशी सरबराई केली की बस्स! मोबाईलचे दुकान अशोकवर सोपवून त्याने सर्वांना जवळच्या प्रसिध्द लेण्यांना नेले, गावात आलेले नाटक पहिल्या रांगेत बसवून दाखविले. मनमोकळ्या गप्पा अन् हास्य विनोद यांनी घर अगदी दणाणून गेले.योगेशमध्ये झालेला हा बदल पूजा विस्मित होऊन न्याहाळत होती. योगेश नॉर्मल वागतोय हे पाहून पूजाला जरा हायसे वाटले.

 'हे बघ पूजा, योगेश तुला वाटतो तसा नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे.दोन वेगवेगळ्या घरातून आलेल्या नवरा-बायको ला एकमेकांना समजून घ्यायला जरा वेळ लागतोच! तेव्हा तू अगदी निश्चिंत रहा.तुला जर होमसिक वाटत असेल तर शाळा सुरू होण्याअगोदर थोडे दिवस आपल्या घरी येऊन रहा.'पूजाच्या आई पपांनी तिला समजावले आणि दोघे योगेशच्या आई वडिलांबरोबर रवाना झाले.

  'काय, झाल्या का माझ्याबद्दल आईबापाकडे तक्रारी करुन?'योगेशच्या लाल डोळ्यांकडे अन् छद्मी हास्याकडे पाहून पूजा थरथर कापू लागली.आपल्या आई वडिलांची पाठ वळते न वळते तोच योगेशला पुन्हा त्याच्या पूर्वीच्या रुपात पाहून पूजाचे अवसान गळून पडले.

   घरातील भाजी संपली होती म्हणून पूजाने बाहेर जावयाची तयारी केली आणि बाहेर जाण्यासाठी दाराची कडी उघडली.पूजा हादरली.

योगेशने दार बाहेरुन बंद केले होते.म्हणजे मला कोंडून तर गेला नाही?

  पूजाने जिवाच्या कराराने बंगल्याच्या खिडक्या उघडून कोणाला तरी हाक मारुन सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.पण हाय रे दैवा! सगळ्या खिडक्या बाहेरून बंद केलेल्या होत्या.

 पूजा पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्यासारखी फडफडू लागली.संताप,उद्वेग, असहायता यांनी तिचे मन भरून गेले.तिरीमिरीने तिने तिचा मोबाईल फोन उचलला तो काय!योगेशने तो बिघडवून ठेवला होता.

पूजा पलंगावर कोसळली आणि हमसून हमसून रडू लागली.तिच्या हातापायातील बळच निघून गेले.आता मी काय करू?आई पपांना कसं कळवू? पूजा विचार कर करून शिणून गेली.

  'बोला आईसाहेब,कसा झाला प्रवास? पोहोचलात ना नीट घरी?' योगेश अगदी लाघवीपणे बोलत होता.'पूजाचा फोन ना?तो बंद पडलाय.लवकर नवीन मोबाईलच देतो तिला. बोलायचंय तिच्याशी?' पूजाच्या हातात आपला मोबाईल देऊन तिच्यावर नजर रोखून योगेश समोरच बसला.त्याच्या नजरेच्या धाकाने पूजा आईशी फक्त हो नाही असे तुटकच बोलू शकली.तिचे बोलणे झाल्यावर योगेशने तिच्याकडून फोन हिसकावून घेतला.

  पूजा आणि योगेश यांच्यातील संवाद पूर्णपणे थांबला होता.दुकानातून येताना तो घरातील सामान आणत असे.कामवाल्या रखमाला त्याने काय सांगितले होते कोणास ठाऊक,पण तीसुद्धा येईनाशी झाली होती.योगेशने टी. व्ही. बिघडवून ठेवला होता की काय कोणास ठाऊक पण तो ही चालत नव्हता.कधी मधी देवधर आजी देवाचे श्लोक म्हणत बागेतील फुले तोडताना आवाज येत असे पण योगेश तेव्हा घरी असल्यामुळे पूजाला हिंमत होत नव्हती.रोज सकाळी शंकर मंदिरापर्यंत फिरायला येणारी मंडळी अन् दुपारी ओढ्यात क्रिकेट खेळायला येणारी मुले सोडली तर बंगल्यांच्या त्या कॉलनीत नीरव शांतता होती.

योगेशच्या नजरेच्या धाकात आई पपांशी बोलणे एवढेच एकमेव काम तिला उरले होते.आपली सुटका कशी करून घ्यावी याचाच सतत विचार पूजाच्या मनात चालत असे.

 'योगेश, लवकर चल, मोबाईल्सची डिलिव्हरी द्यायला माणूस आला आहे',योगेशचा सहाय्यक अशोक बाहेरून हाका मारत होता.त्याबरोबर योगेश घाईघाईने अशोक बरोबर दुकानात पळाला.

 योगेश काम आटोपून घरी पोहोचला तेव्हा रात्र झाली होती.आज कामाचा अगदी पिट्ट्या पडला होता.पूजाला जेवावयास वाढण्यास सांगून लवकर झोपी जावे या विचारात त्याने दाराचे कुलूप उघडण्यास हातात चावी घेतली आणि तो चक्रावलाच! दार सताड उघडे होते आणि घरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते.

   'पूजा, पूजा', संतापलेला योगेश सर्व खोल्यांमधील दिवे लावू लागला.

  योगेशच्या घरातील गडबड ऐकून समोरच्या देवधर आजी बाहेर आल्या.'योगेश, पूजाच्या नावाने का एवढा ओरडतो आहेस?'आजींनी चौकशी केली.त्यांच्या मागोमाग त्यांची सूनही डोकावली.'अरे तू तर म्हणाला होतास ना की पूजा माहेरी गेली आहे म्हणून?'

   देवधर सूनबाईंच्या प्रश्नाने योगेश चपापला. एव्हढ्यात दुकानाच्या किल्ल्या देण्यासाठी अशोक आला.एव्हाना पूजा न सांगता कोठेतरी गेली आहे ही बातमी रात्री जेवणानंतर शतपावली घालणाऱ्या अख्ख्या कॉलनीकरांना समजली आणि सारेजण योगेशच्या बंगल्यासमोर जमले.

  'अहो दाराला तर कायम कुलूप लावलेले असे.मग हा पूजाला कोंडून दुकानात जात होता की काय?'सर्वत्र कुजबुज सुरु झाली.

   'पूजाच्या आई वडिलांना फोन लावून पहा! कदाचित ती त्यांच्याकडे गेली असेल.'देवधरांनी आता सर्व सूत्रे हातात घेतली.योगेशने पूजाच्या आई वडिलांना, तिच्या नातलगांना फोन करून पाहिले पण सर्वांकडून नकार आल्यावर मात्र त्याचे धाबे दणाणले.डोके धरुन त्याने पायरीवरच बसकण मारली.

   पोलिसांकडे तक्रार करा असा सल्ला देऊन सर्व मंडळी आपापल्या घरी परतली.उरले फक्त योगेश, अशोक अन् देवधरकाका.रात्रभर पूजाची वाट पहात पायरीवरच ठिय्या देऊन बसले.पूजा कोठे गेली असेल या विचाराने योगेशचे डोके भणभणू लागले.

   पहाटे शंकर मंदिराकडे मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्यांची वर्दळ सुरू झाली.

 'खून खून' ओरडत मंदिराकडून लगबगीने परतणाऱ्या लोकांना पाहून योगेश ताडकन उठून उभा राहिला.सर्व बंगल्यांमध्ये पटापट दिवे लागले.

 'मंदिराबाहेर ओढ्यात एका तरुण बाईचे प्रेत पडले आहे.तिचा चेहरा दगडाने ठेचला आहे.'एकजण उत्तेजित स्वरात म्हणाला आणि 'बाप रे 'लोक भयाने किंचाळले आणि जो तो ओढ्याच्या दिशेने धावू लागला.देवधरांनी तेव्हढ्यात प्रसंगावधान राखून पोलिसांचा फोन फिरवला.

  पोलिसांची गाडी सायरन वाजवित कॉलनीत शिरली आणि योगेशच्या घरासमोरील गर्दी पाहून थांबली.

  'योगेश कोण आहे?' इ.शिंद्यांच्या जरबी हाकेने योगेश सटपटला.'तुझी बायको गायब आहे ना?मग पोलिसांत तक्रार नको करायला?'इ.शिंद्यांच्या सरबत्तीने योगेशने घाबरून मान खाली घातली.

  'यांनापण घेऊन चला रे मंदिराकडे,'इ.शिंद्यांनी हुकूम केला आणि तिघांना घेऊन पोलिसांची जीप मंदिराच्या दिशेने धावू लागली.

  पोलिसांची जीप येताच गर्दी पांगली आणि आता पुढे काय होणार याची उत्सुकता बघ्यांमध्ये दाटून आली.

  'पूजाssss'समोरचे दृश्य पाहून योगेश खाली कोसळला.खरोखर फारच भयाण दृश्य होते ते! त्या मृतदेहाच्या चेहऱ्याच्या जागी केवळ रक्त आणि मांसाचा गोळा उरला हज्या दगडाने चेहरा ठेचला होता. तो दगड बाजूला पडला होता.अंगावरील गुलाबी पंजाबी ड्रेस रक्ताने माखलेला होता. हातातील हिरव्या बांगड्या, पायातील चकाकणारी जोडवी ती तरुणी नवविवाहिता असल्याची साक्ष देत होती.

  'पूजा' योगेश किंचाळला.आणि त्याने मातीतच बसकण मारली. डोके धरुन तो पूजा पूजा असे पुटपुटत होता.

 इ.शिंदे त्याचं बारकाईने निरीक्षण करत होते.त्यांनी आता सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली.

  'कदम,चव्हाण,बॉडीचा पंचनामा करून पोस्टमॉर्टेमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवून दर्या.आणि योगेश, चला तुमच्या घरी.आम्हाला तपास करायचा आहे.'

  'माझ्या घरी कशाला?' योगेश भेदरलेल्या स्वरात म्हणाला. 'मी खून नाही हो केला. पाहिजे तर विचारा अशोकला, देवधर काकांना! काल सकाळपासून मी बाहेरच होतो.'योगेश हात जोडून गयावया करत म्हणाला.

 'मी कधी म्हटलं खून तू केलास म्हणून?'इ.शिंद्यांनी योगेशला पेचात पकडले आणि त्यांची जीप योगेशच्या बंगल्याकडे : 'या योगेशच्या घरात काही आक्षेपार्ह सापडतंय का पहा',इ.शिंद्यांनी हुकूम केला.'काही चिठ्ठी चपाटी वगैरे!'

  'अरे देवा,'देवधर आजींनी कपाळाला हात लावला. 'मला पूजाने चिठ्ठी दिली होती आणि म्हणाली होती देवधर काकांना द्या म्हणून! पण मी ती चिठ्ठी माझ्या मुलाला द्यायला विसरले हो! आताच आणून देते.दासबोधात ठेवलीये.'

   'कमाल करतेस तू आई, वेळच्या वेळी द्यायची नाही ती चिठ्ठी?'देवधर काका चिडून आईला म्हणाले.

 'असू दे असू दे आजी, वयानुसार विस्मरण होणारच ना थोडं?'इ.शिंद्यांचे दिलासा देणारे ते शब्द ऐकून आजींना हुरुप आला.त्या पुढे म्हणाल्या,'आणि साहेब,पूजाने ती चिठ्ठी कोठून दिली माहित आहे? मागच्या बाजूने, टॉयलेटच्या खिडकीची काच काढून!मी तिला विचारणार पण होते की बाहेरुन कुलूप आणि तू आत कशी म्हणून पण घाईत राहून गेले बघा!' देवधर आजींनी लगबगीने ती चिठ्ठी इ.शिंद्यांच्या हातात आणून दिली.चिठ्ठी वाचताना इ.शिंद्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले.

  'बायकोला कोंडून ठेवलं होतंस घरात? माणूस आहेस का हैवान?'इ.शिंद्यांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते.

  'बरं, योगेशच्या बंगल्याच्या दोन्ही बाजूंच्या बंगल्यात कोण रहातं?'

 'साहेब, दोन्ही बंगले बंदच असतात.एकांची बदली झाली आणि दुसऱ्या बंगल्याचे मालक सोयिस्कर पडतं म्हणून गावातच रहातात.'

   'पण तुम्हाला कोणालाही संशय आला नाही योगेशने पूजाला कोंडून ठेवलंय म्हणून?'

  'योगेशने सांगितले की पूजा माहेरी गेलीय म्हणून.नवीन लग्न झालंय , आम्हाला वाटलं खरंच गेली असेल! आणि रोजच्या व्यापात आजूबाजूला लक्ष द्यायला वेळ आहे कुठे?'

'साहेब,हा मोबाईल सापडला घरात,पण बिघडलेला आहे', घरात तपास करणाऱ्या हवालदाराने इ.शिंद्यांना रिपोर्ट केला.

  'कोणाचा मोबाईल आहे हा?'इ.शिंद्यांच्या जरबेनं योगेश चाचरला,'पू.... पूजाचा आहे.'

  'मोबाईलचं दुकान चालवतोस आणि बायकोचा फोन बिघडलेला?'

   'पण साहेब, पूजाचा खून मी नाही केला.'सर्व धीर गोळा करून योगेश म्हणाला.

   फाSड इ.शिंद्यांची पाचही बोटं योगेशच्या गालावर उमटली आणि बघ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. 

   'तुझे सगळे कारनामे या चिठ्ठी मध्ये आहेत.'इ.शिंद्यांनी पूजाची चिठ्ठी योगेश समोर फडफडवली.'चला रे, याला टाका आत'असा हुकूम देवून योगेशला फरफटवत जीपमध्ये कोंबून जीप पोलिस स्टेशनकडे सुसाट सुटली.

  पोलिस स्टेशन समोरील रस्ता माणसांनी फुलून गेलेला पाहून इ.शिंदे चक्रावले च! पण इतकी सनसनाटी बातमी गावात वणव्यासारखी न फैलती तरच नवल!

  पूजाच्या खूनाला दोन दिवस उलटले.इ.शिंदे पोलिस स्टेशनमध्ये डोके धरून बसले होते.

   देवधरकाका, अशोक अन् मोबाईल ची डिलीव्हरी देणारा माणूस यांच्या जबानीत एकच सारखेपणा होता आणि तो म्हणजे पूजाच्या खूनाच्या वेळी योगेश कोणा ना कोणाच्या सान्निध्यात होता.

 मग योगेशने पूजाचा खून कोणाला तरी सुपारी देऊन तर करविला नसेल?

 इ.शिंद्यांनी योगेशचा फोन पुन्हा पुन्हा चेक केला.तो कुणाकुणाला भेटला याची परत परत कसून चौकशी केली पण संशयास्पद असे काहीच मिळत नव्हते.

  दरम्यान पूजाचे पपा तिची बॉडी घेऊन त्यांच्या गावी गेले ते योगेशचा सूड घेण्याची धमकी देवूनच.

  इ.शिंद्यांवर तपासासाठी दबाव वाढतच चालला होता.खुद्द पोलिस कमिशनर रोज फोनवरून खुनाच्या तपासातील प्रगतीविषयी विचारणा करीत होते.स्थानिक वर्तमानपत्राचे प्रतिनिधी रोज पोलिस स्टेशनमध्ये खेटे घालीत होते तर महिला अन्याय निवारण समितीच्या मेंबर्स दिवसभर पोलिस स्टेशनला येऊन ठिय्या देऊन बसत होत्या.या साऱ्यांना तोंड देता देता इ.शिंदे त्रासून गेले होते.खुनाचे धागेदोरे हाती लागत नव्हते अन् 'पोलिसी खाक्या'दाखवूनही योगेशचे 'मी खून केला नाही'हे पालुपदही बदलत नव्हते.

   पूजाचे लग्नाआधीचे काही प्रकरण....पण खबऱ्यातर्फे तिच्या गावात चौकशी केली असता ती अतिशय साधी सरळ मुलगी असल्याचे कळले.तसेच तिचे कॉल डिटेल्स तपासले असता त्यात संशयास्पद असे काहीच सापडले नाही.

  मग पूजाचा खून कोणी व का करावा?तो ही इतक्या निर्घृणपणे? आणि जंगजंग पछाडूनही आपणास पुरावा मिळू नये?

 इ.शिंदे हताशपणे डोक्यावर संथपणे फिरणाऱ्या पंख्याकडे बघत राहिले.

   पत्नीचा मानसिक छळ करण्याचा आरोप ठेवून योगेशला जामिनावर सोडावे लागले. न्यायालयाने पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर ताशेरे ओढले. इतके घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीस केवळ पुराव्याअभावी सोडावे लागले म्हणून सर्वत्र जनक्षोभाची लाट उसळली.

  योगेशचे वडील त्याला जामीन राहिले पण त्याची भेट ही न घेता गावी परतले.

   योगेश पोलिस कस्टडीतून बाहेर आला तो पूर्णपणे बदलूनच! आत्मविश्वास गमावलेला,अंगात त्राण नसलेला आणि संपूर्ण जगात एकटा पडलेला!

   योगेशचे मोबाईलचे दुकान आता पूर्णपणे बंद पडले होते.साहजिकच आहे, बायकोचा खून करणाऱ्या माणसाच्या दुकानात जाण्यास कोण धजावेल? लोक आता नव्याने उघडलेल्या मोबाईल शॉपमध्ये जात होते. अशोकही त्या दुकानात नोकरीला लागला होता.


योगेशला आता एकच उद्योग उरला होता.....आढ्याकडे पहात दिवसभर पडून रहाणे!

   पहाता पहाता एक वर्ष लोटले आणि एक दिवस अचानक...'योगेश, योगेश,'अशोक उत्तेजित स्वरात हाका मारत बंगल्याच्या पायऱ्या चढत होता.योगेश पलंगावर उठून बसला.

    'योगेश,अरे पूजा वहिनी जिवंत आहेत!'

   'काय?' योगेश चमकून उभा राहिला.

    'हे बघ मी त्यांचे फोटो मोबाईल मध्ये काढून आणले आहेत.कोकणात सानवली गावात काकांकडे गेलो होतो तेव्हा पाहिलं मी वहिनींना.'

   योगेश व अशोक तीरासारखे पोलिस स्टेशनला धावले.

  इ.शिंदे ते फोटो पाहून चक्रावलेच! घाईघाईने त्यांनी पूजाच्या पपांना फोन लावला.

योगेश,त्याचे आई-वडील,पूजाचे आई पपा, अशोक आणि अर्थात इ.शिंदे यांना घेऊन गाडी कोकणाच्या दिशेने धावू लागली.देशावरचा रुक्ष भाग मागे पडून कोकणातील हिरवाई दिसू लागली पण निसर्गातील या बदलाकडे कोणाचेही लक्ष नव्हते.जो तो आपल्याच विचारात मग्न होता.

   'ह्या तर पूजा जमदाडे बाई.गोविंदसरांची बायको.आमच्या गावातील शाळेत शिकवतात.'मोबाईलमधील पूजाचा फोटो पाहून पोलिस चौकी वरील शिपाई पवार म्हणाले.इ.शिंद्यांनी त्याला पूजाला चौकीवर आणण्यासाठी पिटाळले.

 सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती

   थोड्याच वेळात साडी नेसलेली गर्भवती पूजा हळूहळू पावले टाकत चौकीवर येताना दिसली.बरोबर तिच्याच वयाचा एक तरुण व मागून एक वयस्कर खेडवळ जोडपे येताना दिसले.

   पूजाला येताना पाहिले आणि पूजाच्या आईचा बांध फुटला.'पूजा' तिने हाक मारली आणि ती व पूजाचे पपा तिच्या दिशेने तीरासारखे धावले.आई पपाना पाहून पूजाचे डोळे भरून आले.

   'देवधर आजींबरोबर पाठवलेल्या चिठ्ठी नंतर तुम्ही मला घ्यायला का आला नाहीत?'पूजाच्या प्रश्नाने आई पपा गडबडले.इ.शिंदे पुढे सरसावले.

'पूजा योगेश पाटकर तुम्हीच ना?'

'नाही.मी पूजा गोविंद जमदाडे.हे माझे पती गोविंद जमदाडे आणि हे माझे सासू सासरे.' पूजाने शांतपणे तिघांची ओळख करून दिली.

  'तुला जर याच्याशी लग्न करावयाचे होते तर आमच्या योगेशशी का केलेस?'योगेशच्या आईने कळवळून विचारले.

   'मी तुम्हाला इतकी उथळ वाटले?'पूजाने प्रतिप्रश्न केला.

  विषय भलत्याच दिशेला वळण घेत आहे हे पाहून इ.शिंद्यांनी सूत्र हातात घेतले.

   'हे बघ पूजा,तू इथे कशी पोहोचलीस ते सांग.'

   इ.शिंद्यांचा प्रश्न ऐकून पूजा सांगू लागली.

   'विनाकारण संशय घेऊन योगेशने माझा छळ सुरू केला.माझा मोबाईल बंद केला, घरात कोंडून ठेवू लागला.पपांना चिठ्ठी लिहून देवधर आजीकडे सुपूर्द करून आईपपा येतील या आशेने मी वाट पाहू लागले.पण आईपपा काही आले नाहीत.मग मी रात्रंदिवस या बंदीवासातून कशी सुटका करून घ्यावी याचाच विचार करु लागले.आणि लवकरच ती संधी चालून आली.एक दिवस अशोक योगेशला बोलाविण्यास आला आणि ते दोघे घाईघाईने दुकानात जाण्यास निघाले.योगेशने दार उघडेच टाकले होते.आणि ती संधी साधून मी एका छोट्या बॅगेत दोन कपडे,माझी सर्व सर्टिफिकेट्स आणि पपांनी दिलेले दहा हजार रुपये भरले व चेहरा स्कार्फने झाकून एस.टी.स्टॅंडकडे झपाट्याने पावले टाकू लागले.मनावर प्रचंड दडपण आले होते.स्टॅंडवर एक बस सुटण्याच्या बेतात होती.मागचा पुढचा विचार न करता त्या बसमध्ये चढले आणि एका सीटवर जाऊन बसले.बस सुटली आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला.

   'पूजा तू?'शेजारुन आवाज आला अन् मी दचकून शेजारी पाहिले तो माझ्या बी.एड.कॉलेजमधला गोविंद जमदाडे बसला होता.'पूजा, कोठे चालली आहेस?'गोविंदच्या या प्रश्नाने मी भानावर आले.या जगाच्या पाठीवर मी कोठे जाणार?काहीच ठरवले नव्हते.एकटेपणाच्या जाणीवेने माझ्या डोळ्यात पाणी साचू लागले.गोविंदाच्या आश्वासक स्पर्शाने माझ्या मनाचा बांध फुटला.मी घडाघडा माझ्यावर कोसळलेले संकट गोविंदला कथन केले. माझ्या कहाणीने गोविंद हादरुन गेला.हळूहळू धीर गोळा करून त्याने मला विचारले,'पूजा, माझ्या बरोबर कोकणात येशील?आमची गावची जमीन माझ्या शिक्षणापायी विकावी लागली.मग कोठलेही गाव मला सारखेच.म्हणून कोकणातील सानवली गावात शिक्षकाची नोकरी पत्करली.माझे आई वडीलही माझ्याबरोबर रहातात.तुझी हरकत नसेल तर तू माझ्या बरोबर येऊ शकतेस.'

   गोविंदच्या या अॉफरने मी विचारात पडले.पण नाहीतरी मी कोठे जाणार होते? गोविंदला मी आमच्या वर्गातील मेहनती, प्रामाणिक पण ग्रामीण भागातील काहीसा बुजरा सहाध्यायी म्हणून ओळखत होते.मग ही रिस्क घ्यायला काय हरकत आहे असा विचार करून मी होकार दिला.आणि गोविंदने कंडक्टरला सांगितले.....'दोन सानवली'

  'इतके दिवस मी कुठल्याही दडपणाशिवाय माझ्या गोविंद बरोबर आणि साध्या सरळ सासू सासऱ्यांबरोबर आनंदात रहात होते.'

  पूजाचे अंगार ओकणारे डोळे अशोककडे वळले.'का आलास माझ्या सुखी संसारात विष कालवायला ? इन्स्पेक्टरसाहेब, मला मुळीच परत जावयाचे नाही या नराधमाबरोबर रहावयास!'पूजाचे अंग हुंदक्यांनी गदगदू लागले.तिला सावरण्यासाठी गोविंद पुढे सरसावला.

   'बेटा, काही काळजी करू नकोस.'पूजाचे पपा तिच्या खांद्यावर हात ठेवून आश्वासक सुरात म्हणाले,'तुझी या राक्षसापासून कायदेशीर सुटका होण्यासाठी मी जंगजंग पछाडीन.'

  योगेशने मान खाली घातली.

   अपूर्ण चित्राचे सारे तुकडे जुळून आले होते.

   पूजाचे आई पपा पूजाजवळ थांबणार होते.बाकीचे सारेजण कोकणातील प्रसिद्ध स्थळांना भेट देऊन परतणार होते.इ.शिंदे गाडी घेऊन परतीच्या प्रवासाला लागले.

इ.शिंद्यांच्या मनात राहून राहून एकच प्रश्न येत होता,

   'मग मंदिरासमोर खून झालेली ती तरुणी कोण होती?'


या रहस्याची उकल करण्यासाठी येत आहे 


     अघटित भाग दोन....


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime