अदित्यतेजाभिलाषी
अदित्यतेजाभिलाषी
पंकज! कमळाचे एक नांव. नावा प्रमाणेच चिखलात तळाशी उगवून, पाण्याशी संघर्ष करत करत, सूर्याकडे बघत त्याच्या प्रमाणे तेजस्वी जीवनाभिलाषा बाळगणारे एक जीवन कमळ. आदित्य तेजाभिलाषी जीवन असलेला पंकज अतिशय गरिबीत जन्म घेऊनही जन्मतःच संघर्ष करत जीवन जगायला शिकला. चार भाऊ, चार बहिणी असलेल्या पंकजला जन्मा पासूनच जीवनावश्यक गरजांसाठी संघर्ष करावा लागत होता. घनदाट जंगलात दाट झाडांमध्ये उशिरा उगवलेल्या झाडाचं जसं झुडूप होतं, वाढण्यासाठी त्याला जे अन्न, पाणी, ऊन, वारा मिळायला अडचण येते तशीच काहीशी पंकजची गत झाली होती.
घरात अठरा विश्वे दारिद्र्य, खाणारी भरपूर तोंडे, अन्नाची मारामार, दुष्काळाने कंबरडे मोडलेले शेतकरी कुटुंब, कधी अर्धपोटी, तर कधी उपाशी राहून सुद्धा दिवस काढावे लागत होते. त्यामुळे वयाप्रमाणे शरीराची वाढ होत नव्हती. शिक्षणायोग्य वय झाल्यावर शाळेत नांव घालतांना समवयस्क मुले कुत्सितपणे हसत होते. कुणाची तरी फुटकी पाटी आणि उरलेल्या लेखणीचे तुकडे यावर त्याचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. तिसऱ्या वर्गापर्यंत वही पेनाची आवश्यकता भासली नाही. चौथ्या वर्गात गेल्यावर कुणाचे तरी जुनी पुस्तके घेऊन शिक्षण सुरू होते. चौथी बोर्डाची परीक्षा दुसऱ्या गावात होती. पायी चालत जावे लागायचे. पायाची अन् पायतणांची जन्मापासून भेट झालेलीच नव्हती. त्यामुळे काट्यातून, उन्हाने तापलेल्या मातीतून चालतांना इतर मुलांसारखा त्रास त्याला होत नव्हता. पायांना सवय झाली होती ना.
परगावी जायचे म्हटल्यावर सर्वांच्या घरून मुलांना खायचे चांगले पदार्थ करून मिळायचे. त्याकाळी चांगले खायचे पदार्थ तरी कोणते? तर गव्हाची चपाती, वरून तेलाची धार ओतलेला गूळ, थोडासाच तांदुळाचा भात. हे सारे म्हणजे त्याकाळचे पक्वान्नच! पंकजला मात्र हे सारे मिळणे म्हणजे उंबराचे फुल बघायला मिळण्यासारखेच! त्याचा जेवणाचा डबा म्हणजे एका फडक्यात बांधलेली ज्वारी वा बाजरीची भाकरी आणि त्यावर तेल नसलेली लाल मिरचीची चटणी. त्याच्याच वर्गातला एक गवंड्याचा मुलगा त्याच्या सारखाच. त्या दोघांची गट्टी जमली. ते दोघे जण जेवतांना इतर मुलांपासून दूर जाऊन बसायचे, आपापले जेवण प्रेमाने एकमेकांना देऊन जेवायचे.
चौथी बोर्डाची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाल्यावर पुढचे शिक्षण थोडेसे खर्चिक होते. शाळेची फिस, पुस्तके, वह्या, गणवेश, यासाठी लागणारा खर्च परवडण्या सारखा नव्हता, म्हणून जेव्हा जेव्हा त्याला शाळेतून घरी बसवण्याची चर्चा घरात चालायची, तेव्हा तेव्हा त्याचा जीव खालीवर व्हायचा. पण म्हणतात ना, 'मनातून इच्छा असेल तर देवही मदतीला धावतो!, कुणाच्या तरी रूपाने येऊन मदत करतोच!'
त्याच शाळेतील एक अविवाहित शिक्षक त्याच्या मदतीसाठी पुढे आले, त्यांनी शाळेची फिस भरायची तयारी दर्शवली, परंतु गरीब असलो तरी लाचार व्हायचे नाही. या वृत्तीच्या पंकजला तर रुचले नाही त्याने गुरुजीं कडे त्याबदल्यात काम मागितले. गुरुजीनेही त्याचा स्वाभिमानी स्वभाव बघून त्याला पाणी भरायचे काम दिले. आणि शाळेच्या फिस व्यतिरिक्त काही थोडेफार पैसे द्यायचे कबूल केले. अशा तऱ्हेने पुढील शिक्षणाची सोय झाली. रोज सकाळी लवकर उठून घरचे पाणी भरू लागायचे, आणि गुरुजींचे पाणी भरायचे. वेळ झाल्यावर शाळेत जायचे, शाळा सुटल्या नंतर शेतात जाऊन जनावरांना चरायला सोडायचे. जनावरांमागे जातांना इतर मुलांचे पुस्तक सोबत घेऊन जायचे, वाचायचे, आणि घरी आल्यावर त्या मुलाचा गृहपाठ पूर्ण करून द्यायचा. त्यामुळे त्याचा डबल अभ्यास व्हायचा. कधी कधी तो गृहपाठ पूर्ण करतांना उशीर झाला तर घरच्यांचे बोलणे खायचे. असा नित्यक्रम चालायचा.
रात्री मिळेल तेवढे खाऊन गुरुजींच्या घरी झोपायला जायचे, तिथे त्याच्या सारखेच आणखी दोघे विद्यार्थी मुक्कामाला यायचे. गुरुजी या सर्वांचा अभ्यास करून घ्यायचे, अर्थातच तिथे पुस्तके गुरुजीच पुरवायचे. गुरुजी मुद्दामच स्वयंपाक करताना जास्तीचा करायचे आणि उरला म्हणून या तिघांना खायला लावायचे. अशा प्रेमळ स्वभावामुळे गुरुजी साऱ्या गावाचे लाडके झाले होते. गावकरीही त्यांच्यावर अतिशय प्रेम करत होते, आपापल्या शेतातील भाजीपाला, ऊस, बोरे, चिंचा, पेरू, आंबे, पपई, शेंगा, इ. वानवळा म्हणून गुरुजींच्या घरी यायचा आणि अर्थातच त्याचा काही भाग पंकजलाही मिळायचा. गुरुजी रोज रात्री खसखस, काजू, बदाम, दुधात भिजत घालायचे. सकाळी हे सारे पाट्यावर वाटून, त्यात बेदाणे घालून खीर, नाहीतर साजूक तूप घालून शिरा करायचे. स्वतः बरोबर पंकजलाही आग्रह करून खायला लावायचे.
थोडेफार चांगले खायला मिळायला लागले, मना सारखा अभ्यास व्हायला लागला. त्यामुळे त्याची मानसिक, शारीरिक स्थितीत सुधारणा होऊ लागली. कठीण परिश्रम आणि गुरुजींचे मौल्यवान मार्गदर्शन लाभल्या मुळे पंकज दहावीला चांगल्या मार्काने पास झाला, शाळेतून पहिला आला. घरच्यांसोबतच साऱ्या गावाला आनंद झाला. 'पोराने अतिशय कठीण परिस्थितीत दिवस काढून शिक्षण घेतले आणि घराचे, कुळाचे, गावाचे नाव मोठे केले!' लोक म्हणायला लागले.
पंकजला मात्र थोडे अस्वस्थच वाटत होते. पास झाल्याच्या आनंदा बरोबरच हुरहूरही वाटत होती. पुढील उच्च शिक्षणा साठी गाव सोडून दूर अशा १०० किलोमीटर अंतरा वरच्या शहरात जावे लागणार होते, पैसाही खूप लागणार होता. घरून त्याची बरोबरी होऊ शकणार नव्हती. घरी कुणाला काही सांगून उपयोग होणार नव्हता. जिथे दोन वेळा खाण्याची मारामार तिथे डोक्यात दुसरा विचार येणार कुठून? काहीतरी काम केल्या शिवाय गत्यंतर नव्हते. अशातच दुष्काळी रोजगार हमीच्या कामांना सुरुवात झाली होती. पंकजने मित्रा सोबत मातीकाम करायला जायचे ठरवले. घरच्यांनाही बरे वाटले, खर्चाचे काम टळले होते, शिवाय घरासाठी चार पैसेही येतील असे त्यांना वाटत होते. एका मित्रा सोबत पंकज मातीकाम करायला जाऊ लागला, चार पैसे मिळायला लागले. कामावर मिळणारे सुकडीचे पाकीट तेथे न खाता घरी आणून घरच्या साऱ्यांना खायला देऊ लागला. अशातच त्याचे वडील वार्धक्याने वारले, त्यांनतर भाऊही वेगळे झाले. आपापले संसार सांभाळू लागले. आई मात्र पंकज सोबत राहू लागली. आता सुकडीचे वाटेकरी कमी झाले होते, आई आणि तो. दिवस जरा बरे चालले होते.
मात्र पंकज अधून मधून नाराज राहायचा, एकांतात बसून आपल्या परिस्थितीवर रडायचा. त्याला उच्च शिक्षण खुणावत होते. आदित्य तेजाभिलाषा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती, 'काही तरी करायलाच पाहिजे', मनोमन विचार करत होता. पण काय करावे? कळत नव्हते. उच्च ध्येयाभिलाषा मनी धरून त्याने गुरुजींचा सल्ला घ्यायचे ठरवले, गुरुजींकडे गेला. त्यांच्या प्रेमळ कुशीत बसून मनसोक्त रडला. गुरुजींनी प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला, अन् सांगितले..
"अरे! असा रडतोस काय? रडू नकोस, लढायला शीक. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करायला शीक. यश तुझेच आहे, तुझ्याच हातात आहे. तुला आता पंख फुटले आहे. जा, उंच भरारी घे. पंखात बळ आपोआप येईल. शहरात जा. काही तरी काम बघ. पार्ट टाइम काम कर, शिक्षणाची सोय जरुर होईल. येथे राहूनही जर तुला कष्टच करायचे आहे, तर तेथे कर. पोटाबरोबरच तुझ्या शिक्षणाचीही सोय होईल. तू कष्ट करू शकतोस. तुझ्यात ती हिम्मत आहे. परिस्थितीने तुझ्यापुढे उभ्या केलेल्या 'I can't ' मधला शेवट चा t कापून टाक, ' I Can' बनेल. परिस्थिती बदलण्याची ताकद तुझ्यात आहे, बळ तुझ्यात आहे. तुला कुणीही थांबवू शकणार नाही. जा! काही मदत लागल्यास विना संकोच सांग."
गुरुजींनी पंकजच्या इच्छा शक्तीला जागवले, खतपाणी घातले. जीवनात तेजाभिलाषा भरली. गुरुजीं कडून प्रेरणा घेऊन पंकज शहरात आला. कॉलेजला ऍडमिशन घेण्या अगोदर त्याने काम बघायला सुरुवात केली. एका छोट्याशा शेडमध्ये सुरू असलेल्या लघु उद्योजकाकडे त्याला पार्ट टाइम कामही मिळाले. चार तास काम करावे लागणार होते. एक चिंता मिटली होती. राहिला प्रश्न राहण्याचा. तोही मिटण्या सारखा होता. एका कॉलेजचे स्वतःचे वसतिगृह होते. तेथे राहणे आणि दोन वेळचे जेवण मिळणार होते. बदल्यात त्याला सकाळी लवकर उठून कॉलेज साठी रोज दोन तास काम करावे लागणार होते. त्याने ते स्विकारले आणि कॉलेजला ऍडमिशन घेतले.
पंकजच्या जीवनातल्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली. तो कॉलेजला जाऊ लागला. सकाळी लवकर उठायचे. दोन तास कॉलेजचे काम करायचे. तिथून आल्यावर जेवण करून कॉलेजमध्ये जायचे. पिरियड्स संपल्यावर कंपनीत जायचे, चार तास काम करून उशिरा वसतिगृहात यायचे, जेवण करायचे, थोडा अभ्यास करायचा अन् झोपायचे. असा त्याचा व्यस्तसा दिनक्रम सुरू होता. महिन्याचा पगार जो काही थोडाफार यायचा त्यातून कॉलेजची फिस भरायची, आणि थोडे फार पैसे आईलाही मानिऑर्डर करायचे. आठ दिवसातून एकदा आईला पत्र लिहायचे. या व्यस्ततेतून त्याला इतर मुलांप्रमाणे इतर उद्योग करायला वेळच नसायचा.
वर्गात शिकवलेले व्यवस्थित समजून घेणे, न समजल्यास विचारणे, जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करणे, यातून पंकज खुलत चालला होता. त्याचे खुलते, सुंदर व्यक्तिमत्व, अभ्यासू वृत्ती, मन मिळाऊ स्वभाव, यामुळे त्याच्याकडे सर्व मुले मुली आकर्षित व्हायचे. त्याच्याशी मैत्री करायला बघायचे. अशातच एक मुलगी त्याच्या नकळत त्याच्या कडे आकर्षित झाली. वर्गात बसतांना जवळ बसायची, कुठले कारण काढून बोलायचा प्रयत्न करायची. अशातच गॅदरिंगची तयारी सुरू झाली. सर्वांनी आग्रह करून त्याला गॅदरिंग मध्ये भाग घ्यायला लावला. गॅदरिंगच्या निमित्ताने त्याच्या जवळ जाण्याची संधी तिला मिळाली. तिने त्याच्यावर मोहिनी टाकायला सुरुवात केली. घरून त्याच्यासाठी खास खास पदार्थ स्वतः बनवून घेऊन येणे, आग्रह करून खायला लावणे, यातून जास्तीत जास्त वेळ त्याच्या जवळ राहण्याचाही प्रयत्न करू लागली. पंकजलाही तारुण्यसुलभ भावनेने तिचा सहवास हवा हवासा वाटू लागला. मन तिच्याकडे ओढ घेऊ लागले. तीही त्याच्या मनाची तयारी करण्या साठी रोमँटिक कादंबऱ्या त्याला वाचायला देऊ लागली. कादंबऱ्या वाचतांना तो नायिकेच्या रुपात तिला बघायला लागला. या साऱ्या गडबडीत त्याच्या कडून गावाकडे पत्र लिहिण्याच्या त्याच्या सवयीत अनियमितता येऊ लागली, ठराविक काळाने पाठवल्या जाणाऱ्या पत्रांना महिना महिना लागू लागला. आणि एक दिवस त्याच्या गुरुजींचे पत्र आले. लिहिले होते......
।।श्री।।
दिनांक:- ०५.०९.१९८०
चिरंजीव पंकज, अनेकाशीर्वाद.
खूप दिवस झाले तुझी काही ख्याली खुशाली कळली नाही. त्यामुळे काळजी वाटते. अभ्यास जोरात सुरू आहे असे वाटते. चालू दे. असाच अभ्यास कर. मला खात्री आहे, दहावी प्रमाणेच पदवी परीक्षेतही तू आपल्या कुळाचे, माझे, गावाचे नांव मोठे करशीलच. तुझी मनीषा पूर्णत्वास जावो.
परवा आई भेटली होती तुझी. म्हणत होती, "लेकराची ख्याली खुशाली यायला आजकाल फार वेळ व्हायला लागला. जास्त अभ्यास असतो का? फारच मेहनत करून जीवाला त्रास करून घेऊ नकोस म्हणावं. जीवाची काळजी घे. पोटाला मिळण्या पुरतं शिक्षण झालं तरी बस झालं म्हणावं."
आईचं काळीज, काळजी करणारच. तिचे तशी काळजी करणेही योग्यच आहे म्हणा. शहरातल्या त्या मोहमयी वातावरणात मुलगा आई पासून दूर जाऊ नये असंच तिला वाटत असावं. नाही का?
असो, काळजी घ्यावी. ध्येयाचा विसर पडू देऊ नये. खूप खूप मोठा हो. उंच भरारी घे. आकाश तुझेच आहे. उंच उंच जा पण मातीला, मातेला, जन्म भूमीला विसरू नकोस.
खूप खूप शुभेच्छा!
तुझाच हितचिंतक
गुरुजी
ता. क.:- आईला लवकर पत्र पाठव. तिचा फारच जीव लागला आहे.
गुरुजींच्या या पत्राने पंकजला एकदम भानावर आणले. क्षणिक स्वप्नसृष्टीत रममाण होऊन आपण ध्येय मार्गापासून दुरावणार होतो. त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्याच वेळी तो वाचत असलेल्या कादंबरीतला एक परिच्छेद त्याला वाचायला मिळाला. त्यात लिहिलेले होते,......
ही दुनिया मोहमयी आहे, मोहाने भरलेली आहे. जीवन जगत असतांना अनेक घटक व्यक्तीला मार्ग भ्रष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असतात. सुंदर आणि आकर्षक रूप घेऊन समोर येतात. त्यात अडकून न बसता जो ध्येय मार्गावर दृढतेने मार्गक्रमण करत जातो. तोच इच्छित स्थळी पोहचू शकतो. कमळ सागराच्या तळाशी चिखलात उगवते पण आदित्य तेजाभिलाषा ठेऊन मार्गक्रमण करत असतांना सागराचे पाणी, त्यातील रंगीबेरंगी जीव, त्याला मोहित करण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण पाण्यातून वर येतांना त्याचा अंशही अंगाला न चिकटू देता भास्कराच्या तेजाकडे लक्ष ठेऊन ते पाण्याबाहेर येऊन फुलते, त्या भास्कराला प्रसन्नतेने वंदन करते.
हा परिच्छेद आणि गुरुजींचे ते पत्र पंकजच्या जीवनाला योग्य ती दिशा देण्यास कारणीभूत ठरले. त्याने निश्चयपूर्वक स्वतःला 'ती'च्या पासून दूर ठेवायला सुरुवात केली. शक्य तितक्या समजुतीच्या स्वरात त्याने तिला समज दिली. स्वतःचे दृढनिश्चयी ध्येय तिला सांगितले. विद्यार्जन करतांना असल्या मोहक क्षणांना कटाक्षाने दूर ठेऊनच जीवन उजळायला हवे. त्याने तिला समजावले...
असल्या मोहा पासून स्वतःला दूर ठेवल्यास जीवन सुंदर अन् तेजस्वी बनू शकते. माझी अभिलाषा धरण्यास तू तुझी स्वतंत्र आहेस. परंतु माझ्या ध्येयापासून मी कदापिही विचलित होणार नाही, माझ्या निश्चयापासून मी ढळणार नाही. मला प्राप्त करायचे असेल तर तुलाही माझ्यासारखे तेजस्वी जीवन बनवावे लागेल. असे झाले तर मी नक्की तुझाच असेन, याबद्दल खात्री बाळग.
तिने त्याचे विचार ऐकले. त्या विचारांनी ती आणखीच प्रभावित झाली. त्याच्या ध्येयमार्गात आडवे न येण्याचा निश्चय करून तिने स्वतःला त्याच्या पासून दूर केले. मात्र त्याच्या प्रमाणेच तिनेही निश्चय केला, 'काही झाले तरी त्याच्या प्रेमास पात्र ठरायचेच, त्याला आवडेल असेच स्वतःला घडवायचे. त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल.'
अशा दृढनिश्चयाने दोघेही एकमेकांपासून दूर झाले आणि अभ्यासाला लागले.
या घटनेपासून पंकज अतिशय सावधतेने आणि दृढतापूर्वक कामाला लागला खूप कसून अभ्यास केला. पदवी परीक्षेत विद्यापीठातून सर्व प्रथम आला. कॉलेज मध्ये हिरो ठरला. आईच्या काळजाचे कोंदण ठरला. गावकऱ्यांना खूप आनंद झाला. त्याच्या कर्तृत्वाने गावकरीही भारावून गेले.
'ती'च्याही जीवनात पंकजचा तो परिसस्पर्श जीवनाला कलाटणी देणारा ठरला. परीस बनून त्याने तिच्या जीवनाचे सोने केले, तिचे 'कांचन' हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी ठरले. त्याच्या सहवासाने, त्याच्या तेजस्वी विचाराने प्रभावित होऊन तिचेही जीवन उजळून निघाले. तीही त्याच्या पावलावर पाऊल टाकत विद्यापीठातून सर्व द्वितीय क्रमांकाने पास झाली. कमळ जसे स्वतः प्रसन्न असते आणि बघणारालाही प्रसन्न करते, तसंच तिचंही जीवन त्याच्या सहवासाने प्रसन्न बनलं होतं, फुललं होतं.
यथावकाश पंकजला उच्चपदावर नोकरीही मिळाली. पहिला पगार घेऊन तो गावी आला. गुरुजींना भेटला, आईच्या हातात पहिला पगार ठेवतांना सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. गावाने कौतुक भरल्या अंतःकरणाने त्याचा सत्कार केला.
रात्री गप्पा मारतांना आई त्याला फक्त एकटक नजरेने त्याला न्याहाळत होती. मायेने तोंडावरून हात फिरवत होती. काय करू, कुठे ठेवू असे झाले होते. गप्पा मारता मारता हळूच आईने विषय काढला...
"बाळा, आईच्या साऱ्या इच्छा तू पूर्ण केल्यास, भरून पावलं. आता एकच इच्छा, तेवढी लवकरच पूर्ण करशील तर फार बरं"
"कोणती?" तो.
"एकदा दोनाचे चार झाले, म्हणजे मी मोकळी.!"
"आई, तू म्हणशील तसे होईल. फक्त थोडे दिवस थांब."
"फार वेळ लावू नकोस बाळा.या जीवाचा आता काय भरवसा? पिकलं पान, केव्हाही गळून पडायच."
"आई, असं नाही बोलायचं. तुला अजून खूप जगायचंय. तुझ्या बाळाचं सारं काही तुला डोळ्यांनी बघायचंय. लवकरच तुझ्या मनासारखी, तुला आवडेल अशी, सालस, सुंदर, सोजवळ सून आणतो बघ." असं म्हणून तो झोपायला गेला. आईही झोपायला गेली.
तो परत नोकरीवर रुजू झाला. वर्षभरातच कांचनलाही चांगली नोकरी मिळाली. दोघांचीही ध्येयपूर्ती झाली होती. आता एकत्र यायला कुणाचीही काही हरकत नव्हती.
एक चांगलासा मुहूर्त शोधून गाव, गुरुजी, आई या सर्वांच्या साक्षीने दोघांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. आईला घेऊन ते दोघे सुखाने राहू लागले.